मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे|

श्रीरामजन्म

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥७९९६॥
कांहीं आड नये जतन हें दिटी । राहतां ते भेटी फळा संगें ॥१॥
संग सज्जनाचा आवडे मानसीं । रामचरित्रासी आस्था फार ॥२॥
आवडे श्रवण कथा हें कीर्तन । जडले लोचन निद्रा नये ॥३॥
नये मना कांहीं संसारीचें काम । भरलासे राम हृदयांत ॥४॥
हृदयीं चिंतन करी श्रीरामाचें । नाठवे देहींचें देहभान ॥५॥
भान नाहीं देहीं मी हें आहे कोण । न कळे हे खूण गुरुविना ॥६॥
विना काय गोष्टी वाउगी चाउटी । तुका ह्मणे पोटीं देव राहे ॥७॥

॥७९९७॥
राहे देव तेथें नसेचि पैं चिंता । उन्मनीं अवस्था देह होय ॥१॥
होय पूर्व पुण्य तरी नाम होटीं । वसे नाम पोटीं सर्व काळ ॥२॥
सर्व काळ करी नामाचें चिंतन । ऐसें बहु दिन झालें तेथें ॥३॥
तेथें उगवली भाग्याची सुवेळा । आला कळवळा दशरथा ॥४॥
दशरथ तेव्हां गुरुलागीं पुसे । जनामाजि हांसे थोर झालें ॥५॥
झालें विपरीत न बोलवे मात । तुह्मी कृपावंत गुरुमूर्ती ॥६॥
मूर्ते श्रीरामाची गुरु पाहे ध्यानीं । तयासी उन्मनीं ध्यान लागे ॥७॥
लागलेंसे ध्यान अंतरीं रामाचें । नसेचि देहाचें भान कांहीं ॥८॥
कांहीं बोलावया नाहीं दुजा भाव । तुका ह्मणे राव वेडावला ॥९॥

॥७९९८॥
वेडावला राजा ह्मणे राम । न फिटेची भ्रम कांहीं केल्या ॥१॥
केलें जें चिंतन चिंतातुर मनें । भक्तांचें त्या ऊणें न सोसवे ॥२॥
न देखवे कदा दीन रुप दासां । पुरविता इच्छा होय त्यासी ॥३॥
त्याची वेळां झाला वसिष्ठ साधव । तुटलेंसें द्वंद्व पृथवीचें ॥४॥
पृथ्वीपाळ पोटीं आला तुझ्या राया । साह्य देवकार्यालागुनियां ॥५॥
या वेगला दैवी तुज ऐसा कोणी । नाहीं दुजा वाणी वेद बोले ॥६॥
तुका ह्मणे देव रामदेहधारी । भक्तांचा कैवारी तुझ्या पोटीं ॥७॥

॥७९९९॥
रविवंश दीप उदेला अयोध्ये । ब्राह्मणाचीं साध्य कर्मे होती ॥१॥
होती वेळा दोन प्रहराभिजित । माध्यान्हा आदित्य पाहों आला ॥२॥
आला चैत्रमास रविचा वासर । नवमी साचार तीथि आली ॥३॥
आली पाहे हस्त नक्षत्र पर्वणी । तिथी मिश्र दोन्ही नवमीसी ॥४॥
सिद्ध आणि ऋषी पातले अपार । केला जयजयकार एकसरां ॥५॥
राम उभा पुढें कौसल्येतें देखे । झालासे हरिख न समाये ॥६॥
माय ह्मणे राम ऐसा कैसा तुला । स्तन देतां मला येई कैसा ॥७॥
सांवळा सुंदर होई बा सगुण । वंशाचें मंडण दाखवावें ॥८॥
वेगें पडो नेदी भक्तांचें हें उणें । पाळिलें वचन अंगिकारी ॥९॥
अंगिकार केला तुका ह्मणे ज्याचा । करुनीयां साचा दावी भाव ॥१०॥

॥८०००॥
वाखाणिती कीर्ति बंदिजन गाती । भाट हे वर्णिती पवाडे हो ॥१॥
हेंचि सुख सुता सुमित्रामंदिरीं । नामकर्ण करी वसिष्ठ हा ॥२॥
हरुष अंतरीं सुमित्रे सुमित्र । जन्मला पवित्र भक्तराज ॥३॥
राजा राम त्याचा दुजा सहोदर । सेवेसी तत्पर रामाचिया ॥४॥
याचि ऐसें दोघां भरतशत्रुघ्ना । केलें नामकर्णा आवडीनें ॥५॥
आवडी देवाची दोघांचिया चित्तीं । भरताची भक्ति रामापायीं ॥६॥
पायीं दृष्टी ज्याची देवाठायीं बैसे । तुका ह्मणे त्यास धन्य धन्य ॥७॥

॥८००१॥
रिघ नाहीं कोणा पाहीं आले जन । फिटलें पारण लोचनाचें ॥१॥
नाचती नारद गाताती गंधर्व । तुंबर हा भाव दाविताती ॥२॥
स्तुती करी शेष वर्णना वेदांची । स्तवन विरंची करीतसे ॥३॥
करिताती नारी अभ्यंग रामासी । पायांवरी त्यासी नाहाणीती ॥४॥
मिति नाहीं गुणां विश्वाचा जनिता । तयाचिया माथां पाणी घाला ॥५॥
घाली तेल माता हातें माखी टाळु । दिनाचा दयाळु कुर्वाळिती ॥६॥
तीर्थवास करी जयाचे चरणीं । पायांवरी त्यांनीं नाहाणीला ॥७॥
लाउनी पालव रामासी पुसिलें । वेगें फुंकियले कान दोन्ही ॥८॥
दोन्ही दोहीं कडे सिद्धी रिद्धी जाणा । घातला पाळणा राम त्यांनीं ॥९॥
त्यांनीं धणीवरी गाईला पाळणा । वैकुंठीचा राणा तुजवरी ॥१०॥
तुजवरी देती खावया ती खोडी । लाधली हे जोडी कौसल्येसी ॥११॥
शिराणी वाटिली तेव्हां सुंठवडे । बोलवडे पुढें देत्या झाल्या ॥१२॥
झाल्या सुखी सर्व गाताती पाळणा । ऐके नारायण वैकुंठींचा ॥१३॥
ऐके देखे परी सर्वाही वेगळा । तुका ह्मणे कळा अंगीं ज्याच्या ॥१४॥

॥८००२॥
येउनी ब्राह्मण ज्योतिष वर्णित । प्रताप विख्यात झाला पुत्र ॥१॥
पुत्र तुझा राया धीर व्रतधारी । एक पत्नी वरी सीता सती ॥२॥
एक राम राजा बोले जें वचन । चालविल पण एक बाणीं ॥३॥
सुख करी जनां गाईब्राह्मणांसी । दु:ख दरिद्रासी त्रासले जे ॥४॥
तुका ह्मणे एकछत्री राज्य झालें । नाम रुढ केलें जगामाजी ॥५॥


॥८००३॥
भावें भक्त लुब्ध झाले ज्या चरणीं । चोखित धरुनी वामांगुष्ठ ॥१॥
चोरी प्रेमरस प्रीति जगदानीं । जान्हवी चरणीं वास करी ॥२॥
करी नामकर्ण वसिष्ठ सद्गुरु । रविकुळतारु पातलासे ॥३॥
पातला श्रीराम जग तारावया । देवांचिया भया निरसिलें ॥४॥
लक्षुमीचा वास झाला घरोघरीं । प्रेमें नरनारी पहावया ॥५॥
पहावया आले इंद्र सुरवर । पार्वती शंकर ब्रह्मदेव ॥६॥
विमानीं पुष्पकें केली पुष्पवृष्टी । आनंदली सृष्टि जन लोक ॥७॥
लोकांलागीं सुख झाला हा आनंद । तुका ह्मणे वेद वाखाणिती ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : July 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP