मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे|

श्रीयाळ चरित्र

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥८१७६॥
होय सूर्यवंशीं नृपती श्रीयाळ । कांता हे सुशीळ राजपत्नी ॥१॥
पतिव्रता नामें वेधक धैर्याची । प्रीति भजनाची हरिचिया ॥२॥
शिवा ऐसी मात प्रतीवचनासी । सादर धर्मासीं आवडीनें ॥३॥
नेमव्रत करी शांती दया क्षीति । अन्न सर्वाभूतीं इच्छिलें तें ॥४॥
तया पोटीं पुत्र चिलया या नांवें । सर्वज्ञ या नांवे भक्तराज ॥५॥
तुका ह्मणे ज्यासी घडे आत्मपूजा । तेथें अधोक्षजा वस्ती होय ॥६॥

॥८१७७॥
होय पुण्य गांठीं नाम वदे मुखीं । तोचि एक लोकीं मान्य होय ॥१॥
होय कीर्ति जगीं याचकाचें इष्ट । सर्वा भूतीं निष्ट दान करी ॥२॥
तेणें झाली कीर्ति जगांत न माये । तेव्हां आला स्वयें सदाशीव ॥३॥
पूर्वी सुकृताचें तोडियलें फळ । तें आलें कपाळ टाकोनीयां ॥४॥
जप तप नेम केलीया सायास । नये जो ध्यानास योगियांच्या ॥५॥
आला अमंगळ घेउनियां रुप । विश्वासाचा बाप वेषधारी ॥६॥
तुका ह्मणे बहु जन्माचें साधन । तेव्हां नारायण भेटी देतो ॥७॥

॥८१७८॥
येऊनियां उभा राहे राजद्वारीं । गळीत शरीरीं रक्त पू ये ॥१॥
दुर्गंधीच्या मुळें न राहेची कोणी । देखतांचि प्राणी वांती होय ॥२॥
इच्छा भोजनाची धरुनीयां चाड । उभा राहे पूढें शब्द करी ॥३॥
दीन वाणी वदे येतो काकुलती । नाना करी ग्लांती दीना ऐशी ॥४॥
पसरोनि हातें दाखवी उदार । मुखावरी कर ठेवोनियां ॥५॥
दिसतसे ग्लान करीतो करुणा । देखोनियां जना त्रास वाटे ॥६॥
माशाचि घोंगाणी दुर्गंधीं अपार । भरे दिगंतर वाटतसे ॥७॥
धांवोनियां पायीं राजा करी स्तुती । संतोष हा चित्तीं थोर मानी ॥८॥
तुका ह्मणे देव कृपा करी जधीं । तरी होय बुद्धी चित्ताऐसी ॥९॥

॥८१७९॥
नमितों मी पाय मजला ऊचित । तुमची हे नीत आशीर्वाद ॥१॥
तेणें मज पोटीं न माये वोरस । म्हणउनी कास धरियेली ॥२॥
तुमच्या उच्चिष्टें करीन भोजन । पोट हें भरीन तेणें सुखें ॥३॥
सुख माझें गांठी नाहीं ऐसें कांहीं । पडे मिठी पायीं एकसरें ॥४॥
तुका म्हणे तुम्ही कृपा केली संतीं । आठवलें चितीं पांडुरंगा ॥५॥

॥८१८०॥
जरी मज कृपा करी नारायण । तरी तेंचि ज्ञान ब्रम्ह होय ॥१॥
कोठोनियां कांहीं नलगे आणावें । नलगें कोठें जावें तरावया ॥२॥
जरी देवें कांहीं धरीलें पैं चित्तीं । तरी तेचि होती दिव्य चक्षु ॥३॥
तुका म्हणे देव दावील आपणा । तरी जीवपणा ठाव नाहीं ॥४॥

॥८१८१॥
धरुनियां हातीं । करी अभ्यंग भुपती ॥१॥
दिव्य वस्त्र परिधान । शोभे भुषणचि रत्न ॥२॥
दिधलें आसन । गंधाक्षता ही सुमनें ॥३॥
जोडोनियां कर । उभा राहिला समोर ॥४॥
तुका म्हणे देवा । कोण आर्त सांगा जिवा ॥५॥

॥८१८२॥
मात कळो सर पत्नीपुत्र वेगें । पातलीं तीं दोघें रायापाशीं ॥१॥
गोवियेला राजा दिसे वेडा झाला । राणीतें बोलिला मग कांहीं ॥२॥
येरी ह्मणे दिलें तुझिया पुत्राचें । आपुलिया वाचे शीर मज ॥३॥
चाकचली राणी पाहिले कुमरें । एक ह्मणे बरें निकें झालें ॥४॥
पितराचिया काजा देह हे वेंचावें । तेव्हांच बरवें दिसे लोकीं ॥५॥
सरसावला पुत्र ह्मणे मातेप्रती । वांचवी भुपती सत्वाहातीं ॥६॥
तोषल्या श्रीपती मज ऐसे किती । पुत्र तुह्मा होती शूर धीर ॥७॥
तुका ह्मणे कोणी सत्वानें आगला । प्रिय तो गोपाळा तोचि एक ॥८॥

॥८१८३॥
रुप धरुनी निश्चळ । छळूं आला जाश्वनीळ ॥१॥
देई इच्छाभोजनास । आवडीनें नरमास ॥२॥
भलीं चांगुणा श्रियाळ । त्यांचे कापविलें बाळ ॥३॥
सिद्ध केला पाक । जेऊं बैसला त्रिंबक ॥४॥
नेघे निपुत्र्याचें अन्न । वेगें चालिला उठोन ॥५॥
पुत्र पाचारिला त्यांनीं । आला खेळत धांवोनी ॥६॥
भक्त केलासे संतुष्टी । रुप दाविलें धुर्जटी ॥७॥
तुका म्हणे वाडें कोडें । गाती पुराणीं पवाडे ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : July 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP