मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे|

चोखामेळ्याचें चरित्र

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥८२०३॥
स्वर्गीचें अमर इच्छिताति देवा । मृत्युलोकीं व्हावा जन्म आह्मां ॥१॥
नारायणनामें होऊं जीवन्मुक्त । किर्त्तनीं अनंत गाऊं गीतीं ॥२॥
वैकुंठींचे जन सदा चिंतिताति । कइं येथें येती हरिचे दास ॥३॥
यमधर्म वाट पाहे निरंतर । जोडोनियां कर तिष्ठतसे ॥४॥
तुका ह्मणे पावावया पैल पार । नाममंत्र सार भाविकासी ॥५॥  

॥८२०४॥
अमृतासी रोग स्वर्गी झाला पाहीं । अमरनाथा तेंही शुद्ध नसे ॥१॥
नारदासी प्रश्न केला अमरनाथें । शुद्ध हें अमृत कोडें होय ॥२॥
नारद म्हणे तेव्हां ऐका हो भुतळीं । सांगेन नव्हाळी तुह्मापाशीं ॥३॥
पंढरी वैकुंठ आहे भुमीवरी । पुंडलीकाचे द्वारीं देव उभा ॥४॥
आनाथांचा नाथ विटेवरी उभा । लावण्याचा गाभा तुका म्हणे ॥५॥

॥८२०५॥
तिहीं लोकीं पाहतां ऐसें नाहीं कोठें । कैवल्याची पेंठ पंढरी ती ॥१॥
नामाचा गजर नाचताती संत । सुरवराची मात काय तेथें ॥२॥
ऐकोनि अमरनाथ संतोषला मनीं । सांगे नारदमुनी तुका ह्मणे ॥३॥

॥८२०६॥
तया ठायीं जातां शुद्ध होय अमृत । नारदें ही मात सांगितली ॥१॥
तेव्हां एकादशी आली सोमवारीं । विमानें पंढरीं उतरलीं ॥२॥
अमृताचें ताट घेऊनी राजा इंद्र । गर्जती सुरवर जयजयकारें ॥३॥
वाळवंटीं नामा करि घोष कीर्तना । तेथें देवराणा उतरला ॥४॥
देव नर सुर समुदाय झाला । पहा त्या सुखाला पार नाहीं ॥५॥
तुका ह्मणे तया पार नाहीं सुखा । तेथें माझा सखा पांडुरंग ॥६॥

॥८२०७॥
दिंडयापताकांनीं भरली चंद्रभागा । तेथें झाली सभा सुरवरांची ॥१॥
नारद तुंबर नाचती कीर्तनीं । अंबर दणाणी नामघोषें ॥२॥
देव नर सुर बैसले समस्त । कीर्तनीं नाचत नामदेव ॥३॥
तुका ह्मणे देव आले किर्तनासी । सांडोनी स्वर्गासी इंद्रराव ॥४॥

॥८२०८॥
ऐसा समुदाय चंद्रभागेतीरीं । तेव्हां आपुले घरीं चोखा होता ॥१॥
एकादशी व्रत करिती दोघेजण । उपवास जाग्रण निजमानसीं ॥२॥
तीन प्रहर झाले उपवास जाग्रण । चोखामेळा ह्मणे स्त्रियेलागीं ॥३॥
तुझिया घरासी येऊं पारण्यासी । सांगोनि मजपासी देव गेले ॥४॥
नामयाचे किर्तनीं आले गणगंधर्व । तेथें देवराज गुंतलासे ॥५॥
तुका ह्मणे चोखा भाकितो करुणा । तेव्हां नारायणा जाणवलें ॥६॥

॥८२०९॥
चोखामेळियाची ऐकोनि करुणा । चालले भोजना नारायण ॥१॥
नामदेवासहित आणि गणगंधर्व । इंद्रादिक देव चालियेले ॥२॥
पुढें नारदमुनी सांगे चोखियासी । तुझिया घरासी देव येती ॥३॥
रिद्धी सिद्धी आल्या चोखियाचे घरीं । झालीसे सामग्री भोजनाची ॥४॥
रुक्मिणीसहित पंढरीनिवास । चोख्याच्या घरास आले वेगीं ॥५॥
चोखामेळा तेव्हां आला लोटांगणीं । उचलोनी देवांनीं आलिंगीला ॥६॥
चोखियाची स्त्री आणि चोखामेळा । करिती वेळोवेळां दंडवत ॥७॥
तुका ह्मणे ऐसा चोखियाचा भाव । जाणोनियां देव आले घरीं ॥८॥

॥८२१०॥
चोख्याचे अंगणीं बैसल्या पंगती । स्त्री ही वाढिती चोखियाची ॥१॥
अमृताचें ताट इंद्रें पुढें गेलें । शुद्ध जें पाहिजे केलें देवा ॥२॥
तेव्हां नारायण पाचारी चोख्यासी । शुद्ध अमृतासी करी वेगें ॥३॥
चोखा म्हणे देवा काय हें अमृत । नामापुढें मात काय याची ॥४॥
अमृताचें ताट घेऊनी आला इंद्र । यासी तूं पवित्र करी आतां ॥५॥
चोखियाची स्त्री ही चोखामेळा आपुण । शुद्ध अंगोळीने अमृत केलें ॥६॥
चोखियाचे घरीं शुद्ध झालें अमृत । तुका ह्मणे मात काय सांगों ॥७॥

॥८२११॥
बैसल्या पंगती चोख्याचे अंगणीं । जेवी सारंगपाणी आनंदानें ॥१॥
नामदेवासहित आणि गणगंधर्व । इंद्रासहित देव मुकुटमणी ॥२॥
चोखामेळा विनवी कर जोडून । दुर्बळाचें भोजन मान्य करा ॥३॥
हीन याती माझी अमंगळ महार । कृपा मजवर केली तुह्मी ॥४॥
पंढरीचे ब्राह्मण देखतील कोणी । बरें मजलागोनी न पाहती ते ॥५॥
ऐसें ऐकोनियां हांसले सकळ । आनंदें गोपाळ हास्य करी ॥६॥
विडा देउनियां देव बोळविले । स्वर्गाप्रती गेले इंद्रराव ॥७॥
पंढरीच्या ब्राम्हणीं चोख्यासी छळीलें । तेंही संपादिलें नारायणें ॥८॥
तुका ह्मणे ऐसी चोखियाची मात । जेवी पंढरीनाथ त्याचे घरीं ॥९॥

॥८२१२॥
चोख्याचे अभंग करविले देवानें । प्रत्यक्ष येऊन सांगितले ॥१॥
देव म्हणे माझा चोखा प्रियकर । माझी प्रीति थोर तयावरी ॥२॥
चोखामेळा ऐसें नित्य घेती नांव । त्यांच्या घरीं धांव जाय माझी ॥३॥
तुका ह्मणे चोखा युगायुगीं भक्त । म्हणोनि पंढरीनाथ ऋणी त्याचा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : July 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP