मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे| श्रीवामन अवतारचरित्र चरित्रे नृसिंहअवतारचरित्र प्रल्हादचरित्र श्रीवामन अवतारचरित्र परशुराम अवतारचरित्र श्रीरामजन्म श्रीरामचरित्र सीताशोक श्रीकृष्णजन्म कृष्णचरित्र १ कृष्णचरित्र २ कल्की अवतार कालयवनवध रुक्मांगद राजाचें चरित्र अंबऋषी राजाचें चरित्र भानुदास चरित्र श्रीयाळ चरित्र धांवा द्रौपदीचा मयुरध्वज चरित्र सुदाम चरित्र दामाजीपंताचें चरित्र चोखामेळ्याचें चरित्र चोखामेळ्याचें चरित्र दुसरें द्रौपदी वस्त्रहरण सांवतामाळीचरित्र हरिपाळचरित्र ८२४१ ते ८२५० ८२५१ ते ८२६० ८२६१ ते ८२७१ ८२७२ ते ८२८० ८२८१ ते ८२९० श्रीवामन अवतारचरित्र तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगचरित्रतुक्राराममराठीसंत श्रीवामन अवतारचरित्र Translation - भाषांतर ॥७९६७॥न्याय नीति राज्य चालवी भूपती । न करिती क्षीती भूपपरी ॥१॥न करिती इंद्र चंद्र आदि यम । पाळीताती नेम आज्ञा शीरीं ॥२॥पूजिले ब्राह्मण देव भक्त गुरु । पवित्र सागरु बळीराज ॥३॥एके दिनीं पूसे प्रार्थोनी शुक्रासी । भेटी केशवासी होय कैसी ॥४॥गुरु ह्मणे अग्नि संतुष्ट भोजना । करावें ब्राह्मणां यथारुची ॥५॥तुका ह्मणे जेव्हां सर्वस्वें उदार । तेव्हां विश्वंभर कृपा करी ॥६॥॥७९६८॥पाळीयेली आज्ञा गुरुचें वचन । आणियलें धन अनिवार ॥१॥मांडियेला याग नर्मदेच्या तीरीं । ऋषी परीवारीं पाचारीले ॥२॥मूर्तिमंत देव दिक्पाल ठेविले । रक्षणा स्थापीले रक्षपाळ ॥३॥कुंडीं बैसवीला अग्नि मूर्तिमंत । आपण दिक्षीत बैसलासे ॥४॥तुका ह्मणे शुक्र टाकीतो आहूती । मिळोनी भोंवती ऋषीवृंदें ॥५॥॥७९६९॥संकटीं पडला तेव्हां पुरंदर । नचले विचार बळ कांहीं ॥१॥जाय शरणागत तेव्हां ब्रह्मयासी । ह्मणे उपायासी करा कांहीं ॥२॥उठोनी वीरंची क्षीराब्धींत गेला । सत्वरीं प्रार्थिला नारायण ॥३॥तुका ह्मणे दयासागर श्रीहरी । कृपावंता करीं सांगितलें ॥४॥॥७९७०॥सांगे वर्तमान याग करी बळी । छळीतां ही छळी नाटोपेचि ॥१॥तेव्हां पांडुरंगें केलें समाधान । स्वस्थळा सन्मानें पाठविलें ॥२॥आदितीच्या पोटीं धरी अवतार । देखोनी साचार व्रत तीचें ॥३॥पाहोनियां उग्र तप कश्यपुचें । जन्म वामनाचें तया घरीं ॥४॥तुका ह्मणे घरीं ओवाळी मंगळें । आनंदिलीं कुळें ऋषीचीं हीं ॥५॥॥७९७१॥चिमणा सुंदर सांवला राजस । बाळ भोग वेष धरीयेला ॥१॥नामकर्ण केलें वामनालागून । केलें उपनैन सप्तवर्षी ॥२॥दंड कमंडलु हातीं शोभलासें । निघाला भिक्षेस मागावया ॥३॥संगें ऋषीमुलें चिमणीं चांगलीं । कंठीं हे शोभलीं ब्रह्मसूत्रें ॥४॥ऋषीसंगें आला बळी करी याग । तेथें उभा मग राहीलासे ॥५॥तुका ह्मणे ठक पडलें सकळा । पाहोनी गोपाळा आनंदले ॥६॥॥७९७२॥ह्मणती हा कोण आलासे कोठून । न देखिला मन भूलवितो ॥१॥कर्णीचीं कुंडलें अति ढाळ देती । लोपला गभस्ती नखचंद्रीं ॥२॥उठोनियां राजा देव पुजियेले । बैसावया दिल्हें रत्नपीठ ॥३॥बैसा स्वामी तुह्मी नामकर्ण सांगा । अपेक्षित मागा आजी मज ॥४॥तुका ह्मणे धन्य दिवस उदेला । भिक्षा मागों आला नारायण ॥५॥॥७९७३॥धन्य तोचि दीन न वर्णवे सृष्टीं । भिक्षामिषें भेटी घेऊं आला ॥१॥धन्य मानी बळी मी एक दैवाचा । मागील भाग्याचा ठेवा लाभे ॥२॥मागा ह्मणे बळी इच्छेचा पदार्थ । चित्ताचा जो आर्त असे कांहीं ॥३॥तेव्हां बळीराया ह्मणे नारायण । अपेक्षा हे आन नाहीं दूजी ॥४॥ब्रह्मचारी व्रत नेम संपादीला । आश्रम पाहीला नाहीं कोठें ॥५॥ऐकोनियां कीर्ति आलों मागावया । देई बैसावया ठाव मज ॥६॥तुका ह्मणे भक्तां घरीं नारायण । मागतसे दान नवल हें ॥७॥॥७९७४॥बळी ह्मणे बैसा करीन मी पूजा । अंगिकारा माझा भक्तिभाव ॥१॥सोडावा संकल्प दिलें ऐसें दान । मोजोनियां तीन पदें मज ॥२॥तेव्हां बैसावया स्वस्थ वाटे चित्त । बळी ह्मणे हेत पूर्ण करा ॥३॥आणविली झारी संकल्प उदीतु । वर्ते अघटीतू गोष्टी एक ॥४॥राजगुरु शुक्र ह्मणे नृपवर्या । देऊं नका यया दान कांहीं ॥५॥विश्वाचा पाळक आला वेषधारी । तया पुरे धरी एक पदा ॥६॥तुका ह्मणे विश्व हेळाच निर्वाणी । तयाचे तुळणीं काय असे ॥७॥॥७९७५॥देईन मी ऐसें ह्मणशील जेव्हां । न पुरेचि तेव्हां विश्व सारें ॥१॥दिसतो लहान ह्मणसी वामन । संकल्पितां मन कळों येतें ॥२॥ठावा आहे मज मोजील पदवी । न पडेचि ऊर्वी एक पदा ॥३॥न मिळतां पुढें कर्मी लागे धोका । शेखी तुज नर्का जाणें लागे ॥४॥तुका ह्मणे ऊभा देव हा याचक । तयासी विन्मुख होतां नये ॥५॥॥७९७६॥होऊनी समोरा केला नमस्कार । बैसा जी सत्वर पूजा करुं ॥१॥देह गेह वित्त राज्य हें करणें । तुज देतां दान काय वेचे ॥२॥पूजियला देव संकल्प सोडीतां । बैसला अतौता शुक्र झारीं ॥३॥राखिलें कोंडूनी येऊं नेदी पाणी । हें तो चक्रपाणी कळों आलें ॥४॥तुका ह्मणे दर्भ दिला राया हातीं । शोधिलें निश्चीतीं झारीयेसी ॥५॥॥७९७७॥शुक्र राहे झारी होउनीयां बोळा । बळी रायें डोळां फोडियेला ॥१॥राणी घाली पाणी सोडिला संकल्प । दावी विश्वरुप नारायण ॥२॥झांकळल्या दिशा भरोनियां तेज । न बोलवे मज ऐसें झालें ॥३॥ठेविला चरण फणीवर माथां । एक तो अतौता ब्रह्मांडासी ॥४॥तुका ह्मणे पाय लागतां ब्रह्मांडीं । कटाहासी फोडी क्षणामाजी ॥५॥॥७९७८॥तेथुनियां आलें क्षीरा ऐसें पाणी । श्रीपद नहाणी तये वेळे ॥१॥येउनियां ब्रह्मा करीत पूजन । केल्या प्रदक्षणा जांबुवंतें ॥२॥सुरवर भयें करिताती स्तुती । करी उमापती प्रार्थनेसी ॥३॥तुका ह्मणे जेव्हां जगत्रय भ्यालें । देखणें उरलें विश्व कांहीं ॥४॥॥७९७९॥न पुरे पृथवी एका पदा पाहे । भरोनियां राहे तिन्ही लोकीं ॥१॥उरलें कांहीं नाहीं तया ठाव । मागतसे देव देई आतां ॥२॥जाव नेदी कांहीं खुंटला उपाव । देइ लवलाहे सत्व आतां ॥३॥दिल्हें ह्मणे राजा शरीर ब्राह्मणा । वैकुंठींचा राणा काय करी ॥४॥बांधोनियां राजा सुदृढ स्तंभासी । मागे हृषीकेशी देई आण ॥५॥तुका ह्मणे घेई तुज कळे ऐसें । नेदीं वाचे ऐसें न बोलें मी ॥६॥॥७९८०॥भोगावती जाय पाताळीं चरण । घातलें तें स्नान तये ठायीं ॥१॥एक भाग शीवें वाहिला मस्तकीं । ती जी सत्यलोकीं वास करी ॥२॥पुराणीं वर्णीली ऋषीमुखीं कीर्ति । ते हे भागीरथी देखतसां ॥३॥तुका ह्मणे पायीं ठेविलिया भाव । मग भवभेव काय करी ॥४॥॥७९८१॥नारदें पाहीलें विश्वरुप डोळां । आला कळवळा बळियाचा ॥१॥मेरुचे पाठारीं बैसला प्रल्हाद । वाढला मुकुंद पाहे डोळां ॥२॥बैसलासी काय तुझा पौत्र बळी । मारी वनमाळी बांधोनियां ॥३॥धांव धरी शस्त्र त्रिविक्रमा जिंकी । कीर्ति तिहीं लोकीं होय तुझी ॥४॥तुका ह्मणे जेणें मज हें तारिलें । तेणें ही मारीलें निवारण ॥५॥॥७९८२॥नको सोडूं क्षेत्र कुळ धर्म मेरु । पूर्वी पाहे धुरु शिष्य माझा ॥१॥सोडविलें राज्य माता आणि पीता । आला पैं मागुता स्वस्थळासी ॥२॥तैसेंच तूं करी शस्त्र धरी वेगें । मी ही येतों संगें चालनेटें ॥३॥तुका ह्मणे गुरु वंदुनियां पद । उठला प्रल्हाद भक्तराज ॥४॥॥७९८३॥विठ्ठला केशवा मुकुंदा वामना । सोडवी बंधना बळीचीया ॥१॥आजि तुह्मा हातीं मरणें श्रीपती । अपत्य निश्चीती सोडवणें ॥२॥नाहीं दुजें मज मारियली हाक । तेव्हां पडे धाक भूमंडळा ॥३॥तुका ह्मणे आलें नारायणा हांसें । तेव्हां जगदीश काय बोले ॥४॥॥७९८४॥धरियलें धनु जेव्हां टणत्कारी । कांपती धरित्री थरथरां ॥१॥दिल्हीं हांक ह्मणे रामकृष्णहरी । सांभाळी मुरारी बाण माझा ॥२॥कळलासी नष्टा सर्पाची तूं माय । आपुलींच खाय पिलें जैशी ॥३॥न बोले आणिक होई गा सावध । निर्वाणीचें युद्ध करी आजि ॥४॥तुका ह्मणे रुपा न धरी मी धाक । आला जरी कोप तुजलागीं ॥५॥॥७९८५॥ब्राह्मणाचा धर्म मागावें दातया । दिल्हें घेतां तया कोपलासी ॥१॥न कळोनी तूज घडों पाहे दोषी । ब्रह्महत्या रासी हरीभक्तां ॥२॥दिलें किंवा बळें घेतों ऐसें पुसे । वचनासरीसें वांया जाय ॥३॥बळीलागीं पुसे कसौ हा वृत्तांतु । तो ह्मणे उचीतु दिलें द्विजा ॥४॥तुका ह्मणे माझ्या पूर्वजांचा ठेवा । आला तोचि देवा दान केलें ॥५॥॥७९८६॥न विचारी मनीं निषेधिलें मज । तुजवरी माझें कृपा वज्र ॥१॥आवडसी बहू प्राणाही परता । आणीक मी आतां काय सांगूं ॥२॥बहु झाले मागें भक्त पुढें होती । तुज ऐसा जोडा नाहीं मज ॥३॥माझिया भक्तांचें न देखवे ऊणें । ह्मणोनियां येणें आतां राया ॥४॥तुका ह्मणे तेव्हां बोलिले अनंत । भक्तवेळाईत पाडुरंग ॥५॥॥७९८७॥विचारी आपुल्या मानसीं प्रल्हाद । आटोपे मुकुंद कोणे रीती ॥१॥न्यून तेथें पूर्ण घेई कां करोनी । पुढें ऐसें कोणी छळूं नका ॥२॥कृपा आली देवा भक्तां करी सुखी । पाऊल मस्तकीं ठेवियेलें ॥३॥तुका ह्मणे ब्रह्मयासीं जो दुर्लभ । तो हा झाला लाभ बळीराया ॥४॥॥७९८८॥पायीं विराजत शोभिवंत माथा । धन्य धन्य भक्तांमाजी बळी ॥१॥प्रल्हाद तो ह्मणे तान्हया आईक । न सोडी मस्तक लाभ झाला ॥२॥न सोडी मस्तकीं धरिला जो पाद । हरी बा गोविंदा जिव गेल्या ॥३॥आवळूनि पाय धरियेला शीरीं । न सोडी मी तरी जीवासाठीं ॥४॥तुका ह्मणे केला भाव एक बळी । दडपिला तळीं पाय माथां ॥५॥॥७९८९॥नेउनियां पाय ठेवी रसातळीं । उचलितां बळी न सोडीच ॥१॥झाडितां न सुटे पडलें संकट । काढितां न सुटे नारायणा ॥२॥काय करुं यासी न सोडीच पाय । ह्मणे धन्य होय भक्तराजा ॥३॥नाहीं कोणी मज भेटें भक्त राज । गोंवियेलें मज न सुटेचि ॥४॥तुका ह्मणे कृपावंत नारायण । माग तेव्हां ह्मणे अपेक्षित ॥५॥॥७९९०॥धन्य वंश राया धीरत्व उदार । जगीं दानशूर वंश तुझा ॥१॥माग अंतीं कांहीं पदार्थ दुर्लभु । कीं मी हें स्वयंभू देत असें ॥२॥मागावया अर्थ न दिसे दुसरा । आणिक दातारा तुजवीण ॥३॥राहसी तूं जेथें मज ठेवी तेथें । क्षण भर रीतें स्थळ न हो ॥४॥मज ठेवावया नेसी जरी घरीं । तेथें तुह्मां द्वारीं द्वारपाळ ॥५॥तुका ह्मणे यासी न व्हावें अन्यथा । ऐसी भाक माथां ठेवी माझे ॥६॥॥७९९१॥देव ह्मणे राया न देखे चि भक्त । शोधितां ही प्रांत ब्रह्मांडाचा ॥१॥आवडसी मज जिवाही आगळा । क्षण मी वेगळा न वजें रे ॥२॥माझा अवतार असे हा अमर । तोंवरी साचार देह तुझा ॥३॥॥७९९२॥नेउनी ठेविला रसातळीं बळीं । राजआज्ञा पाळी देव त्याची ॥१॥सत्य आचरणें केला सार्वभौम । न्याय नीत नेम आज्ञा पाळी ॥२॥देव सखा जया रक्षी मागें पुढें । काय त्या बापुडे कळीकाळ ॥३॥सुरवरें पुष्पवृष्टी केली बरी । धन्य तो संसारीं बळी राय ॥४॥तुका ह्मणे भावें बांधियला देव । वैकुंठीचा राव दारवंटीं ॥५॥॥७९९३॥धन्य तोचि प्राणी प्रसवली माता । धन्य तोही पिता जया वंशीं ॥१॥धन्य त्याचें कुळ वंशवंशावळी । साधे वनमाळी जन्मो जन्मीं ॥२॥पिता पुत्र पौत्र जन्मला कुमर । तेणें विश्वंभर गोंवियला ॥३॥धन्य ज्याची भक्ती धन्य ज्याची शक्ती । तिहीं लोकीं कीर्ति वाखाणिती ॥४॥तुका ह्मणे धन्य तयाचें शरीर । नित्य निरंतर देवकार्यी ॥५॥ N/A References : N/A Last Updated : July 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP