अंबऋषी राजाचें चरित्र
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥८१५९॥
न लगतां कांहीं साधनांचे कष्ट । त्यांपाशीं वैकुंठ बसतसे ॥१॥
वसतसे सूर्य अंबऋषी भक्ती । हृषीकेशी अंतीं तोषविला ॥२॥
तोषविल हरी नाम निरंतरी । एकादशी करी व्रत सार ॥३॥
सार जाणे एक साधन द्वादशी । करी जोडा त्याशी नाहीं दूजा ॥४॥
दूजा मनीं भाव न धरीतां लेश । जोडिलें विशेष पुण्य गांठीं ॥५॥
गांठीं पुण्य सर्व भूतीं अन्नदान । अतिथीपूजन ब्राह्मणासी ॥६॥
ईचिये दास्यत्वें द्विजांचें अभीष्ट । प्रजा पाळीं निष्ट बाळा ऐशा ॥७॥
ऐसा दूजा भाव धरीत नभक्त । पुण्याचे पर्वत सांचियले ॥८॥
सांचियलें सुकृत इंद्रा पडे धाक । इंद्रपद देख घेईल हा ॥९॥
हरील सर्वस्व काय करुं यासी । छळणा कायासी करुं यातें ॥१०॥
यांतें छळी ऐसा कोण बळी असे । तुका ह्मणे वसे नाम मुखीं ॥११॥
॥८१६०॥
नाम मुखीं त्यासी भय नसे कांहीं । सुदर्शन पाहीं रक्षी तया ॥१॥
तयावेळे ऋषी क्षुधेला दुर्वास । ध्यान समाप्तीस होते काळीं ॥२॥
तये काळीं आला इंद्राचे मंदीरीं । पूजा उपचारीं तोषवीला ॥३॥
माग म्हणे मज इच्छीलें अभीष्ट । देईन जें श्रेष्ठ देवांस ही ॥४॥
हरतील राज्य आजि वाटे भज । राखा माझी लाज द्विजदेवा ॥५॥
देवासी नाटोपे भक्त अंबऋषी । छळोनी तयासी तप हरी ॥६॥
हरोन मी सर्व उठला सत्वर । पाहों दृढोत्तर भाव कैसा ॥७॥
कैसा नेमांतरीं पाहों साधनांचा । माझिया चित्ताचा पुरे हेत ॥८॥
हेत हा धरुनी छळूं आला भक्ता । तुका म्हणे चित्ता काय असे ॥९॥
॥८१६१॥
असे गांठीं भाव रक्षी तया देव । विघ्न होय सर्व निर्विघ्नतें ॥१॥
निर्विघ्न तें द्वारीं उदेलें अरीष्ट । पातलासे नष्ट छळावया ॥२॥
बरी ती पातली साधनाची वेळ । ऋषि नव्हे खळ उभा तेथें ॥३॥
तेथें स्नान संध्या विधी देवार्चन । सारिलें विधान वैश्वदेव ॥४॥
देव आला ऋषी दान देतां बळी । मागों आला छळी भोजनासी ॥५॥
शिरीं वंदि पाय म्हणे धन्य लाभ । पूर्व पुण्य उभें आजी माझें ॥६॥
माझें व्रत आजी साधन द्वादशी । सुर्योदर्यीं यासी नेम केला ॥७॥
केला अंगिकार नटळे नेमासी । तुका ह्मणे यासी टळो नये ॥८॥
॥८१६२॥
नये फिरों मागें बैसावें भोजना । मग स्वामी आज्ञा वंदूं माथा ॥१॥
माथा तुकी ऋषी नाहीं केलें स्नान । नेम देवार्चन साधनाचें ॥२॥
साधनाचा नेम आजी आम्हा द्यावा । नका करुं गोवा आजी स्वामी ॥३॥
सेवा स्विकारावी उठावें सत्वरी । स्नान मंत्रांतरीं नेम सारुं ॥४॥
सारुनी ठेवीलें पुढें उष्णोदक । माझा नेम एक गंगाजळा ॥५॥
जळ भागिरथी स्नान करोनियां । धीर तो ऊपाया क्षमा शांती ॥६॥
काहीं नाहीं पुढें करीत साधन । ठेवा विस्तारुन पात्र माझें ॥७॥
माझें म्हणे मुखें चित्त नाहीं शुद्धी । तुका म्हणे बुद्धी दुष्ट ज्याची ॥८॥
॥८१६३॥
त्याचवेळीं रवी अर्धबिंब डोळां । उगवली वेळा साधनाची ॥१॥
साधन करीतां ऋषी कोपताहे । न करितां जाय वेळा नये ॥२॥
वेळा साधूं पाहे वेदांचा विचार । उठला सत्वर साधनासी ॥३॥
शिरीं पाय वंदी अर्ध्य दे भास्करा । तुळसी सत्वरा पूजीतसे ॥४॥
सेवी तीर्थी दळ गळ्यांत तुळसी । केलें प्राशनासी कृष्णार्पण ॥५॥
पण तो साधीला झाली वाढवेळ । गेला पर्वकाळ म्हणे ऋषी ॥६॥
ऋषी पाहे तंव राजा बैसलासे । पुराण होतसे भागवत ॥७॥
भागवत ऋषी देखितां कोपीष्ट । त्राहाटिले जेठे तात्काळीक ॥८॥
तात्काळीक राळी उभे ते भ्यासूर । भजिलें साचार विश्व वाटे ॥९॥
वाटे आली ग्रासूं धांवें रायावरी । सुदर्शन करी देत होतें ॥१०॥
होते लोक तेथें पाहती लोचने । शक्ति येतां जाण जळाली ते ॥११॥
तेव्हां दुष्ट खळ चकीत मानसीं । तुका म्हणे यासीं करुं काय ॥१२॥
॥८१६४॥
करुं योजियला मागुता उपाय । करीं घेत तोय शापावया ॥१॥
पावलासी जय मज क्षुधिताती । दुष्टा नष्ट होसी पापमूर्ती ॥२॥
मूर्तीमंत राजा न बोलेचि कांहीं । म्हणे तुज दाही जन्म होती ॥३॥
होती बोल ऐसे ऋषी मुखीं वदे । तेव्हां उठे क्रोधें सुदर्शन ॥४॥
न सांवरे क्रोधें हरी म्हणे तया । धांव गा सखया ऋषीपाठीं ॥५॥
पाठीं धांवे अग्नी प्रज्वळीत ज्वाळा । ग्रासिल तात्काळ भय वाटे ॥६॥
वाटे काळ ग्रासूं पाहे एक वेळां । कांपे चळचळा दुर्वासया ॥७॥
यासी योजावया नाहीं दुजें शस्त्र । तुका म्हणे मंत्र नेणे नष्ट ॥८॥
॥८१६५॥
नष्ट पळतसे भयें दाही दीशा । न दिसे कोंबसा पाठीं घाली ॥१॥
घाली फेरे पळे तया पुढें इंद्र । कांपतसे रुद्र तया धाकें ॥२॥
धाक ब्रम्हा चंद्र सूर्य आणि यम । न देती न श्रमे उभे ठाके ॥३॥
ठाकों नेदी कोणी तिहीं त्रिभुवनीं हिंडला अवनी बहुकाळ ॥४॥
काळ भेणें रीघे वांचाया पाताळीं । शेषा आदि बळी वरुणातें ॥५॥
तेंचि कोण अंगीं समर्थ व्हावया । फिरे माघारया चक्रकाळ ॥६॥
काळ पाठी असे लागला धांवत । क्षणेक विश्रांत घेऊं नेदी ॥७॥
नेदी पाठी कोणी झाला कासावीस । पळे श्वासोश्वास पांगुळला ॥८॥
लागलें पाठीसी ग्रासूं पाहे आतां । शरण अनंता जाय वेगीं ॥९॥
वेगीं आला धापा देत बहु कष्टें । रक्षिलें वैकुंठ म्हणे बापा ॥१०॥
पामर जो खळ जरी म्हणे नाम । तुका म्हणे श्रम नाहीं पुढें ॥११॥
॥८१६७॥
पुढें येउनीयां पुसे जगजेठी । लागलेंसे पाठीं सुदर्शन ॥१॥
न पहावे मागें राहों नेदी उभा । वेगीं पद्मनाभा पाठी घाली ॥२॥
घालितां ही पाठीं नाटोपे हें मज । सांगतों मी गूज तुम्हा एक ॥३॥
एक अंबऋषी राया हें वांचून । नातोपेची कोणा दुजीयासी ॥४॥
यासी आतां क्रोध बहुत काळींचा । नावरेचि साचा तयाविण ॥५॥
विना एक तया कोणी नये साह्य । वेगीं तेथें जाय सोडवील ॥६॥
संगें बैसे द्वीज वाची भागवत । आला अकस्मात बहू क्लेशें ॥८॥
शरण हे वाणी पडतांची कानीं । तुका ह्मणे झणी सोडवीला ॥९॥
॥६१६८॥
लागलें जें पाठीं नायके सांगतां । न सोडी मी आतां पाठी याची ॥१॥
याचिया अन्याया नाहीं प्रायश्चित्त । छळियेले भक्त येणें बहु ॥२॥
बहु केले द्वेष पार नाहीं दोषा । न सोडीं सहसा पार याचा ॥३॥
याच्या अपराधा नाहीं अंत पार । अन्यायी हा फार ईश्वराचा ॥४॥
ईश्वराचे भक्त भाविक जे भोळे । कोपिष्टें छळीले नेणोनीयां ॥५॥
नेणें मी अन्याय करुं तरी कैसा । लोकांत दुर्दशा दुराचार ॥६॥
रिघाला शरण जोडी दोन्ही कर । करी नमस्कार ज्वलनासी ॥७॥
नासी भय ह्मणे देउनियां सूखा । मुक्त करी तुका क्लेशी ऐसा ॥८॥
॥८१६९॥
घातली पाखर वरी कृपावंत । माथां ठेवी हात दीनबंधू ॥१॥
बंध हे तुटले पाहतां लोचनीं । ह्मणे चक्रपाणी सुदर्शन ॥२॥
दर्शनेंचि मुक्त व्हावें ऐशी नीत । करुं गा उचित ग्रासावया ॥३॥
यानें विष्णुभक्तां शाप दिला नेम । होती दहा जन्म अघोर ते ॥४॥
घोर तें पातक शाप हा निर्भेद । दिधला हा खेद पावे तेणें ॥५॥
तेणें मज नये सोडितां ययासी । ह्मणे हृषीकेशी ऐक आतां ॥६॥
आतां अवधारा पुढील्या विचारा । मद्भक्तांचा करा झणी द्वेष ॥७॥
द्वेषियां निंदका करी निर्दाळण । दासांचें रक्षण सर्वस्वेंसी ॥८॥
शिक्षुनियां खळां लावीन मी सोयी । ब्राम्हण त्या गायी प्रतिपाळीं ॥९॥
पाळिलें वचन बोलिले ब्राम्हण । लागे जन्म घेणें दहा मज ॥१०॥
मज अजन्म्यासी जन्म तरी कैंचा । तुका ह्मणे वाचा ब्राह्मणाची ॥११॥
॥८१७०॥
केली कृपा देवें रक्षियेलें भक्ता । शिक्षिलें अभक्ता युगायुगीं ॥१॥
योगीयांचें युग उभें भक्तांसाठीं । आनंदली सृष्टी तिन्ही लोकीं ॥२॥
लोक हें फावलें पाहतां लोचनीं । फिटली पारणीं सकळांची ॥३॥
सकळां पातली साधना द्वादशी । पूजीलें देवासी ऋषीपंक्ती ॥४॥
पंक्तीसी भोजन झालें तें सन्मानें । राहिले आपण भक्तापाशीं ॥५॥
यासी अभिमान होतां ऋषीदेहीं । लज्जित तो पाही जाय वेगीं ॥६॥
वेगीं करा त्याग सांडावा हा राग । तुका ह्मणे संग संतसेवा ॥७॥
॥८१७१॥
सेवावया ऋषी जाय स्वस्थळासी । चक्राचें मानसीं भय वाटे ॥१॥
विनविलें देवा कृपा करी मज । सुदर्शन माझे पाठीं येत ॥२॥
तेंचि अवसरी मज करी मुक्त । जोडुनियां हात पायां लागें ॥३॥
लागे जाणें तुह्मा सांगतों तें करी । जाय तूं पंढरी चंद्रभागे ॥४॥
भागे शेवटील स्नान करा तेथ । होती जीवन्मुक्त जीवजंतूं ॥५॥
जतन जीवेंसी स्नान करी ऋषी । तेव्हां त्या भयासी मुक्त झाला ॥६॥
झाला ह्मणे अहंकार विरहीत । तेव्हां कृपावंत तुका ह्मणे ॥७॥
॥८१७२॥
दिली भेटी संत देवा नमस्कारी । निर्भय अंतरीं होता झाला ॥१॥
झाला जयजयकार तेव्हां भक्तां घरीं । कीर्ति दिगंतरीं होती झाली ॥२॥
झाली वृथा जयजयकार तेव्हां भक्तां घरीं । कीर्ति दिगंतरीं होती झाली ॥३॥
होती सुखी गातां नाम आईकतां हेंचि करा आतां सांगीतलें ॥४॥
सांगीतलें नाम व्रत एकादशी । तुका ह्मणे यासी चुकों नको ॥५॥
॥८१७३॥
महिमा न कळे वेदां मौनपण । मन हें पवन पारुषलें ॥१॥
सूर्य चंद्र ज्याच्या चालतील तेजें । कोणीकडे माझें काय तेथें ॥२॥
थोरपण वानी चारी मुखें वेद । माझी हे अबद्ध वाचा पुरे ॥३॥
किती वानी ब्रह्म कुमारी शारदा । मतीहीन मंदा कोण पाड ॥४॥
सहस्त्र करावया ध्यानस्त शंकर । ऋषी थोरथोर वर्णवेना ॥६॥
तुका ह्मणे तान्ह्यावरी करी सत्ता । सर्वसाह्य पिता बोल त्याचे ॥७॥
॥८१७४॥
तुजविण पावे कोणी । मज ऐसिया निदानीं ॥१॥
भुली पडली विषयसुखा । पात्र झालों महा दु:खा ॥२॥
विसरलों हीते । तेणें न कळे स्वहित ॥३॥
तुका ह्मणे राज्यमदें । शहाणे होताते अंध ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : July 18, 2019
TOP