श्रीरामचरित्र
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥८००४॥
पोटीं भय आतां तुजला कशाचें । ध्येय हें शिवाचें प्रकटलें ॥१॥
प्रकटे अपार पापी मूढ जन । ऐकतां चिंतन देव तोषे ॥२॥
तोषोनियां लागतसे गुरुपाया । कौसल्या हे जाया नव्हे तुझी ॥३॥
तुझी भक्ति वाढ केली आली फळा । तो सुखसोहळा पाहे आतां ॥४॥
आतां करुं स्तुती श्रीराम रक्षिता । तारी निज भक्तां सत्ताबळें ॥५॥
बळें गेला लग्ना संगराचे पोटीं । तेथें तो कपटी घात करी ॥६॥
करी विघ्न तारुं बुडवी सागरीं । नवल निर्धारी पुढें झालें ॥७॥
सागराचे तटी ह्मणे परमेष्ठी । सावधान पोटीं दशरथा ॥८॥
दशरथ नाम ऐकतां रावणें । आणविला क्षण पोटीं जेव्हां ॥९॥
पोटीं तेव्हां देखे तेथें वधुवरें ॥ घेतलेंसे करीं शस्त्र तेव्हां ॥१०॥
वेगें आला क्रोधें उघडी लोचन । कोठें रे रावण मारुं आतां ॥११॥
आतां आणि वेगीं धनुष्यबाण । दुष्टाचें दंडण करुं पहा ॥१२॥
पहा ऋषि आला मागावया दाना । शांति करुं यज्ञा ऋषीचिया ॥१३॥
ऋषीलागीं पूजा सिद्धी नेउं पैंजा । राक्षसाच्या फौजा मारुं बळें ॥१४॥
मारूं बळें आतां ताटिका सुबाहु । द्विजालागीं देउं सुख मोठें ॥१५॥
मोठें पुढें काम ऋषीभार्या वनीं । लाऊन चरणी उद्धारुं ती ॥१६॥
उद्धारावीं वनें तृण पशू पक्षी । जयाचे अपेक्षी देऊं तया ॥१७॥
तया ऋषिसंगें जनकाचा याग । भंगोनीयां मग धनुष्यातें ॥१८॥
तेथें रावणाचा गर्व परिहार । पर्णिली सुंदर सीता देवी ॥१९॥
देव दुदुंभि या लागल्या अपार । तेव्हां कळे सर भार्गवासी ॥२०॥
भार्गव पातला आला गर्वराशी कोणें धनुष्यासीं भंगियेलें ॥२१॥
भंगियला गर्व तोषला भार्गव । दिला अभिनव आशिर्वाद ॥२२॥
आशिर्वाद दिला सुखी करी जन । देव बंदीहून सोडवावे ॥२३॥
वेगीं देवकार्या धांवे सोडवणें । सेविलें अरण्य निज बळें ॥२४॥
कागा मारी शिक्षा फोडीयला गळा । शिक्षा केली खळा राक्षसासी ॥२५॥
शिर उडविलें खरदूषणाचें । नासिक शुर्षेचें छेदियलें ॥२६॥
लंकेस रावण संन्यासाचे रुपें । हरी कुळदीप सीता देवी ॥२७॥
देवीच्या कैवारें जटायू मरण । करी उद्धरण राम त्याचें ॥२८॥
त्याच मागें जातां तुका ह्मणे राम । भेटी प्लवंगमा झाली दोघां ॥२९॥
॥८००५॥
दोघे शरणांगत आले श्रीरामासी । मारिलें वाळिसी एक्या बाणें ॥१॥
बाणलीसे भक्ति अंगदाचे अंगा ॥ श्रीरामें वोसंगा धरियला ॥२॥
धरियलें हातीं तारी सुग्रीवातें । वैराचें खंड तें झालें तेव्हां ॥३॥
तेव्हां वानरांची बोलाविली सेना । लंकेवरी जाणा पाठविली ॥४॥
विलंब न होतां धाडी हनुमंता । जाळियली वार्ता सीते सांगे ॥५॥
सांगे लंका जळे मागुती उदधि । लंघुनियां शुद्धि रामा सांगें ॥६॥
सांगे राम तेव्हां बांधावा सागर । आणिले अपार पर्वत ते ॥७॥
शिळा सेतु राम चरणाची ख्याती । तरुन पुढतीं ख्याती केली ॥८॥
झाली संख्या तेव्हां राम आला लंके । मारियलें मुख्य राक्षसांसी ॥९॥
मारी कुंभकर्ण इंद्रजीत राणा । होतां लक्षुमणा शक्तिपात ॥१०॥
आणविला गिरी दिव्य तो द्रोणाद्री । उठविली मांदी वानरांची ॥११॥
शिरें उडविलीं लंकाधिपतीचीं । मुख्य राक्षसांचीं छेदियलीं ॥१२॥
लिगाड तुटलें वैर तें खुंटलें । लंकाराज्य दिलें बिभीषणा ॥१३॥
बिभीषण केला चिरंजीव धुरु । राम नाम मेरु अक्षयी होतो ॥१४॥
तोडियली बेडी नव ग्रह सोडी । उभविली गुढी रामराज्य ॥१५॥
राज्य तें इंद्राचें पद ब्रह्मयाचें । देउनी तयाचें सुखी केलें ॥१६॥
केलें समाधान आणविली सीता । अयोध्ये मागुता राम आला ॥१७॥
आलासे भरत लागला चरणीं । फिटलीं पारणीं लोचनाचीं ॥१८॥
चिंता द्वेष दु:ख पळालीं बाहेरी । तुका ह्मणे घरीं जयजयकार ॥१९॥
॥८००६॥
रामा अयोध्येच्या राया । दिनानाथा रे सखया ॥१॥
पाप ताप विघ्न हरीं । दिनानाथा सुख करीं ॥२॥
भिल्लटीचिया रे उच्छिष्टा । स्वीकारिसी रे तूं भ्रष्टा ॥३॥
मी तों सलगीचें मूल । तुका ह्मणे तूं सखोल ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : July 18, 2019
TOP