मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे| कृष्णचरित्र २ चरित्रे नृसिंहअवतारचरित्र प्रल्हादचरित्र श्रीवामन अवतारचरित्र परशुराम अवतारचरित्र श्रीरामजन्म श्रीरामचरित्र सीताशोक श्रीकृष्णजन्म कृष्णचरित्र १ कृष्णचरित्र २ कल्की अवतार कालयवनवध रुक्मांगद राजाचें चरित्र अंबऋषी राजाचें चरित्र भानुदास चरित्र श्रीयाळ चरित्र धांवा द्रौपदीचा मयुरध्वज चरित्र सुदाम चरित्र दामाजीपंताचें चरित्र चोखामेळ्याचें चरित्र चोखामेळ्याचें चरित्र दुसरें द्रौपदी वस्त्रहरण सांवतामाळीचरित्र हरिपाळचरित्र ८२४१ ते ८२५० ८२५१ ते ८२६० ८२६१ ते ८२७१ ८२७२ ते ८२८० ८२८१ ते ८२९० कृष्णचरित्र २ तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगचरित्रतुक्राराममराठीसंत कृष्णचरित्र २ Translation - भाषांतर ॥८०८१॥चोरी करी चक्रपाणी । घरी जागें नाहीं कोणी ॥१॥पोरें चिमटूनि वेगीं । केलीं हालउनि जागीं ॥२॥सासु निजलीया सुना । पिता पुत्र दोघांजणा ॥३॥चुना लावियली मसी । त्यांच्या सर्वाच्या मुखासी ॥४॥तुका ह्मणे धीटें । केलें बहुरुप चेष्टे ॥५॥॥८०८२॥कोंडिलासे माजघरीं । सर्व निरोधोनी द्वारीं ॥१॥खुणें बैसावें बाहेरी । आजि सांपडला हरी ॥२॥हागे हागे धरा करीं । चोर गवसिला चोरी ॥३॥धरा धरा घाला गांठी । जिवें न सोडावी मिठी ॥४॥तुका म्हणे काकूलती । देव येतो भक्तांप्रती ॥५॥॥८०८३॥एक एका देती शिव्या । पोरें शिकवाना केव्हां ॥१॥रानीं सांडुनियां गुरें । हरी बैसवित पोरें ॥२॥गाई ओढाळ धांवत । माझें बुडविलें शेत ॥३॥तुका म्हणे आतां तरी । होई सावधान बरी ॥४॥॥८०८४॥आन काय थोडी फार । परी पोरें खोडकर ॥१॥खेळा गुंतलेत सर्व । नंदाजीच्या कान्हासवें ॥२॥नाहीं मागिलांचें भय । घरीं मारी माझी माय ॥३॥तुका म्हणे दिला लाड । त्याच्या घरा आला नाड ॥४॥॥८०८५॥आम्ही शिणलों गोपाळा । कावी कळहा आणितु ॥१॥कोण धांवे तया मागें । दुरी लागे अंतरीं ॥२॥वेणु वाहोनी मुरारी । मग वरी परते ॥३॥आन ठायीं नाहीं ऐसें । अनारिसे सर्वत्रीं ॥४॥स्वर्गसुख तें बापुडें । पायापुढें वायसें ॥५॥तुका म्हणे वेधो मना । वरी माना गाईच्या ॥६॥॥८०८६॥पहांटे प्रहरीं । बैसे दळाया सुंदरी ॥१॥ध्यान आठविलें चित्तीं । उभी नकलिसे मुर्ती ॥२॥धरी आलिंगोनि पोटा । मुखी झाला असे फाटा ॥३॥तुका म्हणे नाहीं भिन्न । काम धंदा देवाविण ॥४॥॥८०८७॥दिले वांटुनिया गडी । डाव आला त्यासी चढी ॥१॥देवा न कळे विंदान । खेळावेगळा आपण ॥२॥भूमीवरी ठेवी इटी । दांडू हाणी बाहुनेटीं ॥३॥राजी आली असे कुरी । सेल बैसे पाठीवरी ॥४॥असे चतुर हा हरी । येऊं नेदी आंगावरी ॥५॥खेळा न पुरेचि धांव । दुणी चढे पोटीं हांव ॥६॥एक एकाचिया पाठीं । वरी बैसे जगजेठी ॥७॥ऊर्ध्व हाणी दांडू इटी । दाही दिशा हाणी पिटी ॥८॥पुंडलिक धणी । घाली दिगंतरी हाणी ॥९॥तुका म्हणे शहाणीं पोरें । जाणे अंतर निर्धारें ॥१०॥॥८०८८॥कांर गाई गेल्या हरी । बळा आली मजवरी ॥१॥आई मारिती हे गडी । सर्व अंतरलों जोडी ॥२॥कृपा आली नारायणा । धांव देई आलिंगना ॥३॥तुका ऊघडती डोळे । गाई देखिल्या गोपाळें ॥४॥॥८०८९॥हरी सांवळे सुंदर । ध्यानीं राहो निरंतर ॥१॥पुरे डोळ्यांची धणी । राधा तटस्थ अंगणीं ॥२॥डोळे मोडवी निराळी । खुणा दावी वनमाळी ॥३॥राहे चित्त हरीपायीं ॥ लाज सांडी घर सोयी ॥४॥पडे चिंतनीं हव्यास । जिवा न करी उदास ॥५॥तुका म्हणे शांतवृत्ती । भेद विसरली भ्रांती ॥६॥॥८०९०॥घाटी एकाचीं टोंकें । एक पिके साचारें ॥१॥ऐसा सवें गोंवळियां । भाव तयां सांभाळी ॥२॥उष्टें एकाचें तें खाय । एक जाय टाकोनी ॥३॥तुका ह्मणे बहु सोपें । मायबापें अनंत ॥४॥॥८०९१॥कृष्णासंगें गोपी झाडिती संसार । अविद्येचा केर निपटोनी ॥१॥कृष्णरुपी गोपी सर्वदा निश्चळ । तेणें मायाजाळ झाडियेला ॥२॥झाडिलें मीपण सांडिलें तूंपण । कृष्णरुप पूर्ण आठवूनी ॥३॥आठवूनी भाव झाडिलें अकर्म । कृष्ण सर्वोत्तम चित्तीं सदा ॥४॥तुका ह्मणे सर्व झाडिलें सकळ । कृष्णाची सकळ गाऊं गीतीं ॥५॥॥८०९२॥जैसा दिससी मुरारी । तैसा डोळियांमाझारी ॥१॥ऐसे धरुं नको रुप । होई सुंदर स्वरुप ॥२॥मायावश दिसे स्वप्न । साच न देखे नयन ॥३॥माता बोले ऐके कानीं । बाळ झाला जगदानीं ॥४॥तुका ह्मणे भक्ति श्रेष्ठ । देव चोखितो अंगुष्ठ ॥५॥॥८०९३॥पोरा लागलिसे चिंता । गाई न देखे धुंडिता ॥१॥नाहीं बुझाविता कोणी । रडे पडे फुंदे वनीं ॥२॥आतां सांगों तरी कायी । घरीं मारी माझी आई ॥३॥तुका आठवला देव । नामीं धरी दृढभाव ॥४॥॥८०९४॥हाका मारी वनमाळी । प्रेमें टाळी वाहोनी ॥१॥येणें सुख पुढें धांवें । भेटी सवें गोपाळीं ॥२॥घाली लोटांगण तळीं । वंदूं धुळी संतांची ॥३॥तुका ह्मणे हरी लाहो । ऐसा बाहो उभारी ॥४॥॥८०९५॥खेळे यमुनेचे तटीं । ह्मणे गडयांपें किरिटी ॥१॥मांडा निवडोनि गडी । खेळ वाउगे ते सांडी ॥२॥खेळामाजी रडूं नका । सेल येई जरी एका ॥३॥तुका ह्मणे हरी कान्हो । याचें वर्म आह्मी जाणों ॥४॥॥८०९६॥कान्हो धांव गेला चेंडू । खेळ मांडूं राहिला ॥१॥बळें आणीत हा जेव्हां । आड तेव्हां गुंतला ॥२॥आधीं माझा डाव । रडीभाव मानेना ॥३॥तुका ह्मणे उभा राहे । हरी पाहे भोंवतें ॥४॥॥८०९७॥खेळा गुंतले गोपाळ । डायी बळें आणवी ॥१॥राहे स्वयें एकीकडे । राजीं गडे गोंविले ॥२॥मागें स्थापीत आवडी । बळा धाडी बळ त्या ॥३॥देह बळ धरी कुरे । गाई पोरें वळाव्या ॥४॥तुका ह्मणे नारायणा । ना यज्ञा सांपडे ॥५॥॥८०९८॥गर्व हरी जगदीश । आला चेंडवाचे मिषें ॥१॥झाला उदय भाग्याचा । क्षय मागील दोषांचा ॥२॥होता निजला भुजंग । जागा करी पांडुरंग ॥३॥वमीं विखाचें गरळ । उठे अग्नीचा कल्लोळ ॥४॥मिठी घालुनी हस्तकीं । दोरी ओंवियली नाकीं ॥५॥तुका ह्मणे वरीवरी । रिघे बैसुनियां हरी ॥६॥॥८०९९॥ह्मणे गोपाळासी हरी । तुह्मी आणारे शिदोरी ॥१॥क्षुधा लागली खेळतां । बैसों नका जाऊं आतां ॥२॥आणा मोडुनियां घरीं । थोडें नका पोटभरी ॥३॥भलेपणीं मागा मागा । नेदी चोरुनियां भागा ॥४॥जें जें आवडतें तुह्मा । नका उष्टें आणूं आह्मा ॥५॥तुका ह्मणे सांगे हरी । तैसें वर्तिजेत पोरीं ॥६॥॥८१००॥घरा जावोनि गोपाळ । करी मागोनि कोल्हाळ ॥१॥द्यावें द्यावें लवकरी । रानीं राहिले श्रीहरी ॥२॥काय ऐकोनी वाक्यातें । बहु मारी झाली त्यातें ॥३॥येती काकुलती । एक पळोनियां जाती ॥४॥रडली मारितां । कोणा सांगावीं म्यां आतां ॥५॥तुका ह्मणे भक्तिवंतां । हरिसंग करा आतां ॥६॥॥८१०१॥जारे यशोदेसी मागा । क्षुधा लागली हें सांगा ॥१॥गोड गोड उष्ण अन्न । शुद्ध चवी त्या कारणें ॥२॥आणा मागोनि उदंडें । आशातुरे कांहीं पुढें ॥३॥तुका ह्मणे वेगें । मायेलागीं जाय मागें ॥४॥॥८१०२॥कान्हा आमुचा हा गडे । कोणाकडे जाईना ॥१॥काम सांगितलें करी । आज्ञाधारी वर्तणें ॥२॥पाय धरुनियां करीं । मज हरी सांभाळी ॥३॥तुका ह्मणे आज्ञा शिरीं । झाला तरी गडयासी ॥४॥॥८१०३॥बारे हुतुतू घालतां । खेळ सारावा अनंता ॥१॥खेळकर्यांसी बोलावा । गडयापुढें मागें देवा ॥२॥नाही तरी जाई मेला । डाव अंगावरी आला ॥३॥तुका ह्मणे आगळा तो । फळी फोडुनियां जातो ॥४॥॥८१०४॥सांपडतां माई माई । पडे काय लंडपायीं ॥१॥वेगीं पळोनियां जासी । दुजा आणुनियां देसी ॥२॥सावधान पळा पळा । पाहूं नका आतां बळा ॥३॥कोण हा दैवाचा । डाव जिंकील येथींचा ॥४॥तुका ह्मणे जिवां । याचसाठीं धरा भावा ॥५॥॥८१०५॥आरंभिली हेटीमटी । एका पायें पृथ्वी पिटी ॥१॥पृथ्वी लागलिया पाव । तयावरी आला डाव ॥२॥जया आंगीं जैसें बळ । तया लाधला हा खेळ ॥३॥तुका ह्मणे वीर तो ही । गडी न पडेचि डायीं ॥४॥॥८१०६॥गेला लाउनियां गोष्टी । नेत्र चुकउनी दृष्टी ॥१॥हरी सोडविले हात । पळे गोंउनि पहात ॥२॥पुढें केला आडा । तिचा पुत्र तिजपुढें ॥३॥चरफडे मरे मनीं । हरी पळाला गोंउनी ॥४॥पूर्वी यावें काकुलती । मोरो पाडिला पुढती ॥५॥तुका ह्मणे देवा । जना रांडवे हा हेवा ॥६॥॥८१०७॥भक्तकामकाजासाठीं । धांवे गाइचिया पाठीं ॥१॥शुद्ध समस्त कुमार । तेथें लोपला भास्कर ॥ भूमीपदेम उमटलीं । ध्वजवजांशें भरलीं ॥३॥तुका ह्मणे खुण ठाण । भक्त जाणे महिमान ॥४॥॥८१०८॥गोकुळासी आला । गाईपाठीं हा लागला ॥१॥वाजवी पोंवा मोहरी । नादें गाई चारी हरी ॥२॥कळंबाचे तळीं । हरी खेळे संवफळी ॥३॥चेंडू आकाशीं उडाला । तुका ह्मणे वरी गेला ॥४॥॥८१०९॥गोपाळांसी बोले हरी । चेंडू ध्यारे वरचे वरी ॥१॥मग हरी चेंडू टाकी । लाघव दाखवी जगजेठी ॥२॥डाव दे दे ह्मणती हरी । उडी टाकी डोहांतरीं ॥३॥काळियाच्या साठीं । तुका ह्मणे केली आटी ॥४॥॥८११०॥डोहीं बुडाला श्रीहरी । मात गेली राजद्वारीं ॥१॥सर्व समाचार कथिला । हरी पाताळासी गेला ॥२॥किती भाकावी करुणा । उपेक्षूं नका आह्मा दीना ॥३॥तुका ह्मणे परदेशी । आम्हा केलें हृषीकेशी ॥४॥॥८१११॥यमुनेचे थडी । माय धांवली तांतडी ॥१॥येरे येरे बा तान्हुल्या । तुजविण बाह्या शिणल्या ॥२॥ह्मणुनियां स्नेहें रडे । हात दावी डोहाकडे ॥३॥योगी ध्याती तुला । ह्मणे कां टाकीलें मला ॥४॥तुका ह्मणे काय केलें । अवघे गोकूळ मोहिलें ॥५॥॥८११२॥काळयासी झगटला । तंव तो निद्रिस्त देखीला ॥१॥आरत्या करोनी कामिनी । विनविती चक्रपाणी ॥२॥जरि हा निजुनी उठला । तरि तो ग्रासील गा तुला ॥३॥तुका ह्मणे शेषशायी । काळयासी खेळे डोहीं ॥४॥॥८११३॥जेणें धरिलें विश्व सकल । त्याच्या पुढें उभा गोपाळ ॥१॥हरे वेष्टीला सर्वागीं । तो न सांपडे योगयागी ॥२॥मिठी घातली परब्रह्मीं । तेणें सर्वांगीं झाला शापी ॥३॥वेसण घालूनी आणिला । तुका जयजयकार केला ॥४॥॥८११४॥अनंत ब्रह्मांडाच्या कोटी । सांठविल्या जेणें पोटी ॥१॥तो गवळ्यासि करी बोल । भक्ति भुलला केवळ ॥२॥राधिकेच्या घरा । हरी पातला सत्वरा ॥३॥मोठी घाई करी । बैल दोहीं तिचे दारीं ॥४॥तुका ह्मणे नाना छंदें । रंग खेळतो गोविंद ॥५॥॥८११५॥अहो हमामा हुंबरी । खेळूं जाणे नानापरी ॥१॥गोवळीं वेढियेला थोर । तृषें व्यापिलें शरीर ॥२॥हुंबरी घालिती यमुनेसी । ह्मणुनी पातले कांठासी ॥३॥तुका ह्मणे केला काला । ह्मणती एकत्र गोपाळा ॥४॥॥८११६॥ब्रह्मा पाहूं आला । गाई वत्सें घेउनी गेला ॥१॥हरी विचारी मानसीं ॥ आपण झाला गृहवासी ॥२॥वत्सें गई गोपाळ । हरी झालासे सकल ॥३॥तुका ह्मणे सत्यलोकीं । दोहीं ठायीं हरी झाला कीं ॥४॥॥८११७॥सोंगा छंदाचा कुसरी । हरी खेळे नानापरी ॥१॥नंद यशोदा ह्मणती । पूर्ण ब्रह्म हा श्रीपती ॥२॥ह्मणोनियां स्तवीला । धांउनी पोटीं धरिला ॥३॥तुका ह्मणे झाला । कणवाळुपणें भला ॥४॥॥८११८॥गोरस विकाया राधिका बैसली । परी ते भुलली देहभावा ॥१॥देखियला डोळां बैसला तो मनीं । उच्चारी वदनीं वेळोवेळां ॥२॥गोविंदासी बाई घ्यागे हा मुरारी । विकितें श्रीहरी कवतुकें ॥३॥आपुल्या देहाचा विसरला भोळा । गोविंदाची कळा कोण जाणे ॥४॥तुका ह्मणे हांसे देखोनियां जन । चित्त नाहीं मन तया ठाया ॥५॥॥८११९॥काय ते पवाडे नाहीं म्यां ऐकिले । गोपाळ रक्षिले वनांतरीं ॥१॥मावेचा वणवा होउनी राक्षस । लागला वनास चहुंकडे ॥२॥गगनासी ज्वाळा लागती तुंबळ । गोधनें गोपाळ वेडावले ॥३॥तुका ह्मणे तेथें पळावया वाट । नाहीं बा निपट ऐसें झालें ॥४॥॥८१२०॥प्रात:काळीं यशोदा माय जननी । ह्मणे उठे न्हाई चक्रपाणीं ॥१॥द्वारी गोपाळ गडी उभे राहती । हाका मारोनी तुजलागीं बहाती ॥२॥माझे आई सांवळे कृष्णाबाई । घेऊनी गोधनें वना सत्वर जाये ॥४॥तुका ह्मने अच्युता पुरातना । त्वां हिरोनी नेलें माझ्या मना ॥५॥॥८१२१॥करोइनियां टिरी आपुलें मांदल । वाजविती ताअळ दगडाचे ॥१॥दगडाचे टाळ त्यांचा कोण नाद । गातां गीतीं छंद ताल नाहीं ॥२॥ताल नाहीं ताला नाचतो गोपाळा । घननीळ सांवळा तयांमध्यें ॥३॥मध्यें तयां हरी तें रुप आगळें । मुनीवृंदें सकळें गाती तया ॥४॥तया आलिंगिती आपुलिया करीं । जाती भूमीवरी लोटांगणीं ॥५॥निज भाव देखे जयाचिये अंगीं । तुका ह्मणे संगीं क्रिडे तया ॥६॥॥८१२२॥सांवळें सुंदर । ध्यानीं राहे निरंतर ॥१॥डोळियांची पुरे धणी । राधा उभीसे अंगणीं ॥२॥डोळे मोडी हालवी बाळी । खुणा दावी वनमाळी ॥३॥मन जडलें हरिपायीं । लाज विसरे घर सोई ॥४॥चित्त चिंतनीं पडे गोवा । न करावा परता जीवा ॥५॥तुका ह्मणे वृत्ती । देह विसरली भ्रांति ॥६॥ ॥८१२३॥सुंदर चिमणा राजस । धरुनियां बाळवेष ॥न कळे ब्रह्मादिकांस । माया ब्रह्मव्यापक ॥१॥मिळउनी सकळ गोपाळ । नंद यशोदेचा बाळ ॥पोरासवें घननीळ । कांहीं करिती विचार ॥२॥चल जाऊं चोरुं लोणी । आजि घेऊं चंड धणी ॥वेळ लाविला अझुनी । काय करितां हो गडी हो ॥३॥आह्मी नेणो चिमणीं मुलें । ठावें नाहीं आई मारील ॥माझे मागें यारे उगले । तुकाही बोले सकळांसी ॥४॥॥८१२४॥आणिक काय थोडीं फार । परि तें पोरे खोडीकर ॥१॥खेळा गुतलेती सर्व । नंदाजीच्या कान्हासवें ॥२॥नाहीं मागिलांचे भय । घरीं मारील माझी माय ॥३॥तुका ह्मणे दिला लाड । त्याचा घडों आला नाड ॥४॥॥८१२५॥अधिकाजी मज । चाड नाहीं कांहीं काज ॥१॥तुझ्या नामाचें स्मरण । गडिया गोविंदाचें ध्यान ॥२॥आलों धांवें आतां तरी । दहिंभात पोटभरी ॥३॥तुका ह्मणे एके ठायीं । भाविकासी दुजें नाहीं ॥४॥॥८१२६॥आणिकांचा हेवा । नका करुं सुखें जेवा ॥१॥काय पाहिजे तुह्मासी । देतों इच्छिलें मानसीं ॥२॥येथें भरलें पुरतें । ज्याचें जैसें जैसें चित्त ॥३॥तुका ह्मणे उणें । येथें नाहीं कोण्या गुणें ॥४॥॥८१२७॥मागें पुढें पाहे । सांभाळुनी दोन्ही ठाय ॥१॥मागेम ठेविलिया उरी । मग पुरे करी हरी ॥२॥वरदळ सारूं । मोकळियां खेळ करुं ॥३॥ज्याचें लागे त्यासी । सांभाळावें बिरुदासी ॥४॥भाविकाची मोठी । आवडे उदारासी गोष्टी ॥५॥तुका ह्मणे कीर्ति । राखे मान दिली भक्ति ॥६॥॥८१२८॥खरियाचे पुढें । खोटें निवडिती कुडें ॥१॥सांडा देहाभिधान । चरणीं व्हावें लीन दीन ॥२॥जोडोनियां कर । उभे नुपेक्षी दातार ॥३॥संतीं सांगितली खूण । तया ऐसें येथें होणें ॥४॥तुका ह्मणे रसें । तृप्ती नामें सर्वागास ॥५॥॥८१२९॥खेळतां गाइलें गोपाळीं । बैसविल्या वृक्षातळीं ॥१॥सुखनिद्रा गोपाळास । भय नाहीं चिंता आस ॥२॥उठोनियां गेल्या गाई । कोणा कांहीं ठावें नाहीं ॥३॥तुका ह्मणे हरी । गोपाळासी जागें करी ॥४॥॥८१३०॥चला वळूं गाई गेल्या । पहा दुरी अंतरल्या ॥१॥खेळ खेळूं श्रम झाला । कोणें गुंतावें खेळाला ॥२॥गाई हांकारा रे भाई । घरीं मारील हे आई ॥३॥तुका ह्मणे कृष्णा । डोई ठेवितों चरणा ॥४॥॥८१३१॥गाई गेल्यानें अंतरीं । बला आली मजवरी ॥१।आई मारितील गडी । अंतरलों सर्व जोडी ॥२॥कृपा आली नारायणा । धांवे दिलें आलिंगना ॥३॥तुका ह्मणे उघडी डोळे । गाई देखिल्या गोपाळें ॥४॥॥८१३२॥देखोनी गोपाळ । भोंवते मिळाले सकळ ॥१॥भाव भक्तीचा भुकेला । हरी सांभाळीं भक्तांला ॥२॥मोठें भावार्थाचें बळ । झाला गवळियांचा बाळ ॥३॥तुका ह्मणे भक्तांसाठीं । देव धांवे पाठोपाठीं ॥४॥॥८१३३॥वांटोनियां दिले गडे । डाव आला त्यावरी चढे ॥१॥न कळे देवाचें विंदान । खेळून निराळा आपण ॥२॥भुमी ठेवी विटी । दांडू हाणी बहु नेटीं ॥३॥राजी आली कुरी । सेळ बैसे पाठीवरी ॥४॥खेळ न पुरेचि धांव । दुणी चढे पोटीं हांव ॥५॥एक एकाचिया पाठीं । वरी बैसे जगजेठी ॥६॥दांडू हाणी विटी । दाही दिशा पोरें पिठी ॥७॥भिरकावितां वरी । हानी धाडी दिगांतरीं ॥८॥तुका ह्मणे शिणली पोरें । जाणे अंतरीचें वरें ॥९॥॥८१३४॥जांभईचे मिषें मुखी विश्वरुप । दाविलें चिद्रुप यशोदेसी ॥१॥सवेंचि झांकिलें मोहन घातलें । श्रीकृष्ण तान्हुलें नंदाघरीं ॥२॥अपार जे लीळा माझ्या विठ्ठलाची । काय वाणूं त्याची एके मुखें ॥३॥तुका ह्मणे बहु शिणले वर्णितां । परी याची सत्ता न कळेचि ॥४॥ N/A References : N/A Last Updated : July 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP