मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे|

कृष्णचरित्र १

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥८०३३॥
काग बग रिठा मारिले बाळपणीं । अवघी दैत्य खाणी बुडविली ॥१॥
तो मज दावा तो मज दावा । नंदा नंदन जीवा आवडे तो ॥२॥
गोवर्धन गिरी उचलिला करीं । गोकुळ भितरी राखियेलें ॥३॥
वधुनि भौमासुरा आणिल्या गोपांगना । राज्य उग्रसेना मथुरेचें ॥४॥
पांडव जो हरी राखिले कुसरी । बिबरा भितरी चालविले ॥५॥
तुका ह्मणे हा भक्तांचा कृपाळ । दुष्टजना काळ नारायण ॥६॥

॥८०३४॥
भोगियेल्या नारी । परी तो बाळब्रह्मचारी ॥१॥
ऐसी ज्याचे अंगीं कळा । पार न कळे वेदाला ॥२॥
बळीबळी थोर थोर मोडोनियां केले चूर ॥३॥
वांकडी कुबज्या । सरसी आणियेली वोजा ॥३॥
मल्ल रगडिला पायीं । गज झुगारिला बाहीं ॥४॥
जिवें मारियेला मामा । धांवे भक्ताचिया कामा ॥५॥
तुका म्हणे पूर्ण । दावी भक्तीची विंदानें ॥६॥

॥८०३५॥
मुळाचिया मुळें । दु:खें वाढती सगळें ॥१॥
ऐसा योगियांचा धर्म । नव्हे वाढवावा श्रम ॥२॥
न कळे आवडी । कोण आहे कैसी घडी ॥३॥
तुका म्हणे थीत । दु:खें पाववावें चित्त ॥४॥

॥८०३६॥
जो का निर्गुण निराकार । तेणें धरियेले अवतार ॥१॥
निर्गुण होता सुगुणा आला । भक्तीसाठीं प्रगटला ॥२॥
जो का त्रिभुवन चाळक । तो हा नंदाचा बाळक ॥३॥
सोडविलें वसुदेव देवकीसि । अवतार धरिला तिचे कुशीं ॥४॥
मारियेला कंस राणा । राज्यीं स्थापिलें उग्रसेना ॥४॥
तुका ह्मणे देवाधिदेव । तो हा उभा पंढरिराव ॥५॥

॥८०३७॥
बालपणीं हरी खेळे नानापरी । गोपाळ हाकारी नेणें मुळ ॥१॥
खुळ खुळ घुले हिंदोळ कवडे । चंपे चंप खडे खत गोटया ॥२॥
हुतुतु हुमरी हमामा ते गाडे । नाचे पळे उडे पोरां सवें ॥३॥
चक्र ही भोंवरे लगोर्‍या वाघोडे । चिखलांत गडे एकी बेकी ॥४॥
चिरघोडी पाठी लगोरिया इटु । हाणोनियां दांडूउर्ध्व मुखें ॥५॥
चकर मोहरी वाजवी घुमरी । पांवा नानापरी वाजवीत ॥६॥
हेटी मेटी लंड हेंड लोण पाट । सुरकाडी थाट साल भेंडी ॥७॥
डोळिया झांकणी निसर हें बोंडी । निंबू टिंबू भेंडी एकदम ॥८॥
लकुटा चिमुटा खणाण उठती । सेल हातीं घेती हातोहोतीं ॥९॥
चुकउनी खेळे दुपट उडाणे । नाचे गाय गाणें खेळियाचें ॥१०॥
तुका ह्मणे हरी खेळे परिवारें । गौळियांचीं पोरें मेळउनी ॥११॥

॥८०३८॥
गौळीयांचीं पोरें मेळउनी मेळ । चिमणें गोपाळ हरीसखे ॥१॥
चिमणी घोंगडी चिमणीसी काठी । पाहियल्या पाठीं शिदोरिया ॥२॥
चिमणीसी जाळी खांदां वनमाळी । गाई खेळ मेळी सोडियल्या ॥३॥
चारियल्या गाई गोपाळांचे छंदें । बैसला विनोदें वृक्षातळीं ॥४॥
गोपाळ म्हणती स्वामी देव देवा । खेळ हा मांडावा आवडीचा ॥५॥
सर्व गडियांसी तुका म्हणे हरी । रडिची ते परी खेळूं नका ॥६॥

॥८०३९॥
मुखीचें उच्चिष्ट हिरोनियां खातां । विस्मित विधाता देखोनियां ॥१॥
दिधलें गोपाळा तो नाहीं कोणासी । विसर मानसी सुरवरां ॥२॥
देव ऋषी मुनी सिद्ध हे चारण । शिव मरुद्‍गण चंद्र सूर्य ॥३॥
तुका ह्मणे तेथें आले सुरवर । आनंदनिर्भर पहावया ॥४॥

॥८०४०॥
रुसला गोपाळ नेघेचि कवळ । चोळोनियां डोळे रडे फुंदे ॥१॥
काम घेतां आम्हा हातीं गाई वाळी । आम्हा वनमाळी दुरी धरी ॥२॥
आवघ्यांसी दिलें फार फार हातीं । आह्माह्सी विपत्ती पोटापाठीं ॥३॥
गाय व्याली तिचा रांधिला खर्वस । फार देसी त्यांस मज थोडा ॥४॥
अवघ्या गोपाळीं मांडियेला खेळ । मजवरी पुस डाई आणी ॥५॥
यमुनेचे जळीं क्रिडा मांडियेली । बुडिया सकळीं दिल्या तेव्हां ॥६॥
तैसें मज नये तुह्मासी खेळतां । दिलें अवचिता ढकलुनी ॥७॥
नेणें तरी पोहूं बुचकळ्या खाये । नाहीं कोणी साह्य तयाठायीं ॥८॥
तुका ह्मणे तेव्हां नाम आठवलें । तेणें आणियलें तडियेसी ॥९॥

॥८०४१॥
अंतरल्या दूरी अवघ्या अक्रूर । न दिसेचि पर कोणी तेथें ॥१॥
वेडावला परी पाहे दिशा दाही । खुणा पाहे मही पाऊलांची ॥२॥
देखे गोपाळांची असंख्य गाईचीं । न येति भ्रमाचीं अनुमानें ॥३॥
संतांचिये खुणें जिवीचें जतन । नामाचें चिंतन लक्षी डोळां ॥४॥
अनंत अपार शुद्ध सकुमार । मंडित साचार उमटलें ॥५॥
ध्वजवज्रयुक्त पद्म अंकुशाची । रेषा दिव्य ज्याची प्रभा फांके ॥६॥
तेथें देखतांचिअ गुंतलिया वृत्ती । आठवूनी चितीं ध्यान करी ॥७॥
तन मन धन विसरला देह । जडलासे भाव चरणापें ॥८॥
तुका ह्मणे त्यांत नव वाहे चौथी । लाधली हे भक्ति गोपाळांसी ॥९॥

॥८०४२॥
गोपाळ गुंतले आवडीच्या खेळा । गाई त्या गोपाळा अंतरल्या ॥१॥
क्षुधेलिया पोरें दोपारींच्या वेळे । झालीं तीं विव्हळ पोटासाठीं ॥२॥
फिरती धरणी प्राण कासाविस । सांगावें कोणास तुजविण ॥३॥
तुका ह्मणे देव करिताती ग्लांती । भक्ताचिया प्रीति कळवळा ॥४॥

॥८०४३॥
आणा खडे गोटे उदंड सराटे । पसरावे वाटे येतीतया ॥१॥
धरितां ही तुह्मा वाळू सांडावरी । टाका मुखावरी डोळे भरी ॥३॥
बोलोनियां हरी गडियांसहित । प्रवेशला आंत चौर्यकर्मा ॥३॥
सांडोनियां खडे रिते कीं भरले । तेव्हां तें कळलें जैसें तैसें ॥४॥
आणोनियां दधि नवनीत दुध । वांटीतो गोविंद गोपाळांसी ॥५॥
समग्र भरिलीं करुनियां रीतीं । घालुनी पालथीं शुद्धबुद्धी ॥६॥
निजल्या गौळणी त्यांसी करी रळ्या । जाग्या चेवविल्या सकळ ही ॥७॥
घरभरीं पोरें दाटलीं अपार । धरितां सत्वर पळों लागें ॥८॥
डोळां पडे माती सरांटे रुपले । तुका ह्मणे केलें नवल हें ॥९॥

॥८०४४॥
पोरें गलबला करिती घरांत । उठले समस्त सान थोर ॥१॥
धरा धरा चोर भरले बहुत । पळे हातोहात चुकवूनी ॥२॥
उंच स्थळी हरी बैसलाचि राहे । प्रभा फांकताहे कोटी भानू ॥३॥
तुका ह्मणे नेत्र पाहती दैवाचे । अनंता जन्मींचें केलें तप ॥४॥

॥८०४५॥
पसरुनी मुख । देवा झालासे हरीख ॥१॥
दहींभाताची शिदोरी । देवा आवडती परी ॥२॥
नवनीत गोळे । मुखीं लाविती गोपाळ ॥३॥
पक्वान्नाच्या जोडी । मिष्ट रुचीची आवडी ॥४॥
अमृताच्या धारा । मुखीं लोणियाचा झारा ॥५॥
आनंदें ढेंकर । देती तृप्तीचा उद्गार ॥६॥
देव जेऊनिया धाला । हृदयस्थ आनंदला ॥७॥
तुका ह्मणे धणी । झालीं नेत्रांचीं पारणीं ॥८॥

॥८०४६॥
वळी गाई धरी अधरीं पोंवरी । नाचताती फेरी गात गोप ॥१॥
धेनू धांवे वत्स सांडुनीयां दूरी । वाहावली शिदोरी पुच्छ पाठीं ॥२॥
वरती या माना हंबरती गाई । विसरल्या पाही तॄण पाणी ॥३॥
तुका ह्मणे तयां भाग्याचीं संचितें । ऐशिया भाग्यातें लाभ तया ॥४॥

॥८०४७॥
मजपाशीं भय तुह्मा काय कैंचें । जाऊं नका साच जवळूनी ॥१॥
ऐकोनियां सर्व लागती चरणीं । न कळे करणी गोविंदाची ॥२॥
गोपाळ त्या गाई नंद व्रज आई । निंबलोण बाहीं उतरिती ॥३॥
तेव्हां लोटलिया अश्रुचिया धारा । रुक्मादेवीवरा कृपा आली ॥४॥
तुका ह्मणे जेव्हां प्रेम सुख गोष्टी । वर्णी परमेष्ठी युक्ति थोडी ॥५॥

॥८०४८॥
तन मन धन वेधलें गोविंदीं । अखंड समाधी लागलीसे ॥१॥
लागली समाधी गोविंदहृदयीं । नाठवेचि काई दुजें मज ॥२॥
मज समाधान गोविलें हृदयीं । विसरलों पाही समाधीस ॥३॥
समाधीचें सुख तया पुढें कायी । सांडियलें पाही वारुनियां ॥४॥
वारियलें करीं गोविलें पदरीं । नाठवेचि परी दुजें मज ॥५॥
मज नाठवेचि गोविंदाचे गळें । हृदयीं गोपाळें वास केला ॥६॥
वास केला परी अखंड प्रकाश । हृदय अस्तास ठाव नाहीं ॥७॥
नाहीं तरी ठाव गोविंदा वेगळा सर्वात्मक कळा श्रुती नेणे ॥८॥
श्रुतीचें जें सार वेदांचें भांडार । नाम तें अपार तुका ह्मणे ॥९॥

॥८०४९॥
हरी देखोनि गोपाळ । संगें मिळाले सकळ ॥१॥
भाव भक्तीचा भुकेला । देव सांभाळी भक्तांला ॥२॥
भेट भावार्थाचे बळें । झाला गौळियाचा बाळ ॥३॥
तुका ह्मणे भक्तांसाठीं । देव धांवे पाठोपाठीं ॥४॥

॥८०५०॥
हरिसी गोपाळ ह्मणे लडिवाळ । लागे अळुमाळ क्षुधा मज ॥१॥
भुक हे नावरे लागली अनंता । तुजविण आतां सांगूं कोणा ॥२॥
ऐकोनियां ग्लांती हरी ह्मणे त्यासी । जाई बा घरासी भोजनाला ॥३॥
भोजनाचे काळीं आवडे पदार्थ । घेउनियां गुप्त येई मज ॥४॥
चोरोनियां माया न दावी दुजिया । झाडा घेतां तया जना कोण्ही ॥५॥
जिवें भावें धरी तर्क हा अंतरीं । आणुनियां करीं देई मज ॥६॥
तुका ह्मणे जाणे बाळाचें जीवन । माता दे आणून मागितलें ॥८॥

॥८०५१॥
गौळियाचे पोरीं आरंभिली चोरी । अवघी सामग्री शिदोरीची ॥१॥
घरीं नसे कोणी बाप बंधु माय । उतरडी पाहे उतरोनी ॥२॥
सलोण पापड सांडगे र्तिळव । नाना परीभव कुरवंडी ॥३॥
साजुक तें अन्न समग्र बांधीलें । बहुपरी केलें मोटेमाजि ॥४॥
घेउनियां शिरीं भयें पळे राना । मस्तकासी जाणा भार झाला ॥५॥
मागिलाचे भयें पुढें न चालवे । सांडावया जीव नेघे कांहीं ॥६॥
तेव्हां तेणें तुज आठविलें देवा । धांवोनियां जेव्हां वाहसी खांदीं ॥७॥
वाहियलें खांदी जाय घरा त्याच्या । जैसें होय ज्याच्या तैसें कांहीं ॥८॥
उतरली मोट सोडिले प्रकार । बैसविले फेरे गोपाळांचे ॥९॥
बैसउनी गडी कवळ घालीत । धालेपणें देत ढेंकरासी ॥१०॥
बहुत प्रकार मिष्ट मिष्ट रुची । आवडी जयाची तेंचि देत ॥११॥
सर्वाचें अंतर जाणतसां हरी । आवडी ज्यावरी तैसें देतां ॥१२॥
दाविती वांकुल्या वांकुडींच तोंडें । तया सुखापुढें सर्व तुच्छ ॥१३॥
एकमेकां हांसें करिताती चेष्टा । नसे श्रेष्ठ श्रेष्ठा आह्मा ऐसें ॥१४॥
तुका ह्मणे आम्हा नामाचेंनि बळ । फावलें केवळ भक्तिलाभ ॥१५॥

॥८०५२॥
उपजुनी येऊं । काला खाऊं शिदोरी ॥१॥
ऐसें वैकुंठीं तों नाहीं । गोड कांहें काल्याचें ॥२॥
एकमेकां देऊं मुखीं ॥ घालूं सुखी हुंबरी ॥३॥
तुका ह्मणे वाळवंट । भक्तां नीट उत्तम ॥४॥

॥८०५३॥
गोड अवघेंचि झालें । भरीं मागलिये आलें ॥१॥
साह्य झाला पांडुरंग । दिला अभ्यंतरीं संग ॥२॥
पावे थडी येतो वाव । मागें वाहताती ठाव ॥३॥
तुका ह्मणे गेले । जागे स्वप्नीं ते झाले ॥४॥

॥८०५४॥
गेलों मागया शिदोरी । माय घरीं गांजील ।
तुजवीण नेदी कोणा । जेंवीं खुणा सांगती ॥२॥
वांया केली येरझार । पुरे घर तुझिया ॥३॥
तुका आम्हा तूं वेगळा । जाणे कळा ह्मणोनी ॥४॥

॥८०५५॥
यशोदेसी मागे कुंथोनी भोजन । भावें नारायण भक्तांसाठीं ॥१॥
वासोनियां मुख दावी नारायण । ब्रह्मांड हें पूर्ण माजी देखे ॥२॥
गाई ते गोपाळ नंदज सुमती । दिसे कृष्ण मूर्ती ठायीं ठायीं ॥३॥
ओंवाळूनी दीठी सांडिली गोरटी । झणी माझी दृष्टी लागे माये ॥४॥
तुका ह्मणे माझी ओवाळूनी काया । सांडियली ययावरुनीयां ॥५॥

॥८०५६॥
नंदाच्या नंदनें । माझें मोहियलें मन ॥१॥
मज लावीयलें पिसें । केलें आपुलिया ऐसें ॥२॥
झालें ओवळें गोवळें । जन निंदिती सकळ ॥३॥
तुका ह्मणे संग झाल्या । दुरी नव्हे कांहीं केल्या ॥४॥

॥८०५७॥
अवघें हें झालें गोड । रसना रसातें सुरवाड ॥१॥
ग्रासोग्रासीं हरिनाम । हरी जन्मांतरींचा श्रम ॥२॥
सांगितल्या खुणा । तर्क उपजले मना ॥३॥
वाट पाहे गडी मासी । रसना गुंतली स्वादासी ॥४॥
तोंडीची तों राहे मिठी । हातीं वळियल्या मुठी ॥५॥
उठोनियां पळे राना । देव जाणतसे खुणा ॥६॥
तुका ह्मणे देव । जाणे अंतरींचा भाव ॥७॥

॥८०५८॥
दोहूं वोळलीचा पान्हा । मज कान्हा बोलीला ॥१॥
घ्याजी हेंगें क्षीर हातीं ॥ निगुतीं वाटावें ॥२॥
केलें सागितलें काम । नव्हे धर्म सत्तेचा ॥३॥
तुका ह्मणे नव्हे जुनें । ऐसें कोणें सोसावें ॥४॥

॥८०५९॥
लागे माझे हातीं । पहा कवळ सांगाती ॥१॥
देव दिला खातो भात । आधीं करावें स्वहीत ॥२॥
धालें ऐसें पोट । वरी करुनी बोभाट ॥३॥
तुका ह्मणे घरीं । मग कैंची याचे परी ॥४॥

॥८०६०॥
दाई घालुनियां पोरें । त्यांचीं गुरें चुकवी ॥१॥
डोया फोडिल्या खेळतां । होय रिता आपण ॥२॥
मारी माया घेत जीव । नाहीं कींव अन्याया ॥३॥
तुका कान्होबातें मागे । तया अंगें कळेल ॥४॥

॥८०६१॥
मांडी यमुनेसी खेळ । म्हणे गोपाळ गडयांसी ॥१॥
मांडी हलसा हलस । सांडी कास मोकळी ॥२॥
नांव ठेवोनियां गडी । कोणी रडी न वजे ॥३॥
तुका लिळ्या घे तांदुळ्या । जिंकी खेळ्या आपुल्या ॥४॥

॥८०६२॥
काना तुम्ही आम्ही गडे । कोणाकडे फांकेना ॥१॥
भार वाहे शिदोरी । वळ वरी उठती ॥२॥
गाई सर्व दुध काढा । ढोंब पुढां मारित ॥३॥
तुका म्हणे ठोकूं त्याला । तुझ्या बोला मानीत ॥४॥

॥८०६३॥
इच्छी ब्रम्हादिक खेळ । ते अकळ धरिली ॥१॥
मोहरी पांवा वाहे कोटी । धांवे पाठीं गाईच्या ॥२॥
मागे उच्चिष्ठ तें देवा । हें सदैवां गोंवळ्यां ॥३॥
तुका ह्मणे जोडी झाली । ते माउली आमुची ॥४॥

॥८०६४॥
उडी वेंघोनि घालिशी । कळंबाशीं बुडखी ॥१॥
हरी बुडे बोंब घाला । घरीं त्याला सुचेना ॥२॥
भवनदी कळे पार । सर्प थोर विखार ॥३॥
तुका काय उग्या हाका । दावी लोकां हातींची ॥४॥

॥८०६५॥
सर्व मिळोनी कोल्हाळा । गेला गेला ह्मणती ॥१॥
रडे आपुल्या ती भावें । जयासवें ज्या परी ॥२॥
आह्मीं चुकलों खेळतां । गोपाळा त्या हातींच्या ॥३॥
तुका ह्मणे धांवे थटी । कोणी उडी न घाली ॥४॥

॥८०६६॥
आतां चला करुं काला । नका उशीर गोपाळा ॥१॥
काय गाई पाठीं चिंता । व्यर्थ न करी अनंता ॥२॥
घ्या घ्या ह्मणती शिदोरी । सर्व मिळोनी अंतरीं ॥३॥
तुका ह्मणे रानीं गाई । बैसती गोठणठायीं ॥४॥

॥८०६७॥
यमुनेच्या तिरीं । उभा राहिला श्रीहरी ॥१॥
यारे यारे नाचों पोरें । कांरे लाविला उशिर ॥२॥
चला जाऊं गाईसंगें । उगे कांरे फिरा मागें ॥३॥
करा अंगसंग । तुका ह्मणे पांडुरंग ॥४॥

॥८०६८॥
यमुने पाबळी । खेळ मांडी वनमाळी ॥१॥
कांरे मेळवी सत्वरें । पहा गौळियांचीं पोरें ॥२॥
चला खेळों वाळवंटीं । कानीं सांगे गुज गोष्टी ||3||
तुका ह्मणे धन्य भाग्य । दिला पांडुरंगसंग ॥४॥

॥८०६९॥
मागें झाले बहु खेळ । आतां बळ न दिसे ॥१॥
शक्ति जिवासी संचले । वोरसले सर्व ही ॥२॥
चला ह्मणे गेल्या गाई । माझी आई मारील ॥३॥
तुका ह्मणे हालवेना । नारायणा धांव घे ॥४॥

॥८०७०॥
विमळा अर्जुन द्वारी वृक्ष दोन्ही । रांगतां चरणीं उद्धरिले ॥१॥
आघासूर केशी मारियेली तटू । बैल तो वरिष्ठू वत्सासुर ॥२॥
काग बक आणि मारियला रिष्टा । असुर शकटा वधियेले ॥३॥
मारिले राक्षस बुडविले दुष्ट । दानव सुभट निर्दाळिले ॥४॥
तुका म्हणे ऐसी बाळपणीं कीर्ति । पुराणें गर्जती वेदश्रुती ॥५॥

॥८०७१॥
नको अधिकचि मज । चाड नाहीं कांहीं काज ॥१॥
तुझ्या नामाचें स्मरण । गडया गोविंदाचें ध्यान ॥२॥
आलों द्यावें आतां तरी । दहींभात पोटभरी ॥३॥
तुका म्हणे एके ठायीं । दुजें भाविकाचें नाहीं ॥४॥

॥८०७२॥
आतां आणिकांचा हेवा । नका करुं उगा देवा ॥१॥
काय पाहिजे तुम्हासी । देतो इच्छिलें मानसीं ॥२॥
येथें भरलें पुरतें । ज्याचें जैसें तैसेंचि तें ॥३॥
तुका म्हणे कधीं उणे । येथें नाहीं कोण्या गुणें ॥४॥

॥८०७३॥
माव ब्रह्मयानें केली । वत्सें चोरुनियां नेलीं ॥१॥
पाहे प्रताप आगळा । दाहीं ठायीं फांके कळा ॥२॥
गाई गोपाळासहित । क्रिडा सारी भगवंत ॥३॥
तुका म्हणे ऐशा खेळा । माया ब्रम्हांडाची लीळा ॥४॥

॥८०७४॥
गाई खेळतां गोपाळीं । कळपें सारीं वृक्षतळीं ॥१॥
सुख निद्रा गोपाळांस । भय नाहीं चिंता आस ॥२॥
गेल्या उठोनियां गाई । कोणा कांहीं ठावें नाहीं ॥३॥
तुका म्हणे तोचि हरी । जागें गोपाळांसी करी ॥४॥

॥८०७५॥
खांदां घेउनि कांबळी । गाई धांवोनियां वळी ॥१॥
हातीं घेउनियां काठी । वेणु वाहियेला ओंठीं ॥२॥
ठाण साजे जगजेठी । जाळें शिदोरीचें पाठीं ॥३॥
तुका म्हणे भक्तां सखा । वाहों नेदी कांहीं धोका ॥४॥

॥८०७६॥
चला चला गाई वळूं । मग सुखें सर्व खेळूं ॥१॥
दुरी अंतरल्यावरी । वनें वना पडे फेरी ॥२॥
गडी गाईतें हाकारी । वेगीं कृष्णासी पाचारी ॥३॥
पायां लागोनियां आंगा । तुका म्हणे पांडुरंगा ॥४॥

॥८०७७॥
गाई वळूं चला । नका करुं गलबला ॥१॥
खेळा काय गुंतलेती । पुढें कष्टचि मागुती ॥२॥
हरी बोलाविती हरी । गाई अंतरल्या दुरी ॥३॥
तुका ह्मणे लागे पायां । धांव म्हणे गा कान्हया ॥४॥

॥८०७८॥
आम्ही शिणलों दातारा । बहु केल्या येरझारा ॥१॥
विनविती देवराया । श्रम निवारी कान्हया ॥२॥
धांव धांव धांव कृष्णा । गाई अंतरल्या राना ॥३॥
मज काय नाटोपती । तुका म्हणे विश्वमूर्ती ॥४॥

॥८०७९॥
गाई दूर गेल्या राना । वळूं धाडी पोरां कान्हा ॥१॥
आली वळतीची पाळी । गाई म्हणे वनमाळी ॥२॥
आतां न दिसती गाई । वेडा हिंडे दिशा दाही ॥३॥
तुका म्हणे जाला शिण । आठवला नारायण ॥४॥

॥८०८०॥
खेळ खेळे जगजेठी । खुणा होतें पाहे दृष्टी ॥९॥
धांवा धांवा कृपा करा । एक देखतो अंतरा ॥२॥
बापा कृपाळु वचनीं । उतावेळ शिरोमणी ॥३॥
धांव घाली चक्रपाणी । धांवे मुख पसरोनी ॥४॥
मुखामुख मेळविलें । गुप्त आणिलें तें दिलें ॥५॥
तुका ह्मणे हातीं । घेत कवळ श्रीपती ॥६॥



N/A

References : N/A
Last Updated : July 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP