मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे|

द्रौपदी वस्त्रहरण

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥८२१४॥
अघटीत झालें नवल वर्तलें । सतीसी गांजीलें दुष्टाही तें ॥१॥
सत्वाचा सागर असे धर्मराज । वहातसे चोज बोलवेना ॥२॥
याज्ञसेनी बोले राया भीष्म द्रोणा । कां तुह्मी सांगाना कौरवांसी ॥३॥
गुरु द्रोण ह्मणे दुष्टासी संबंध । काय त्यासी बोध तुका ह्मणे ॥४॥

॥८२१५॥
द्रुपदतनया आणिली सभेसी । धरोनियां केशीं उभी राहे ॥१॥
दु:शासन चांडाळ महाक्रोधी खळ । पापाचें तें मूळ तेथें वसे ॥२॥
द्रौपदीमातेसी देखुनि मेदिनी । कांपली धरणी थर थरां ॥३॥
सुरवर देव मनीं चिंतावले । अघटित झालें तुका ह्मणे ॥४॥

॥८२१६॥
दुर्योधन रावो तृप्त झाला भारी । बैसे मांडीवरी द्रौपदी तूं ॥१॥
समस्त जिंकीले कोटि ऐरावत । ठाव अरण्यांत नेमियला ॥२॥
आतां तुझी दशा अती अवदशा । भोगवीन क्लेशां पांडवांसीं ॥३॥
कुमारे तुझी येतसे करुणा । नको जाऊं बना सुलक्षणे ॥४॥
पट्टराणी माझी होय तूं अस्तरी । बोले दुराचारी तुका ह्मणे ॥५॥

॥८२१७॥
पट्टराणी होय माझी निश्चयेसी । देईन सेवेसी भानुमती ॥१॥
आणिक ही दासी देईन तुजसी । वरावें मजसी प्राणसखे ॥२॥
मी हो असें तुझा सेवकचि जाण । करि विचारणा मना माजि ॥३॥
माझिये संगती सुख आहे फार । बोले तो उत्तर तुका ह्मणे ॥४॥

॥८२१८॥
द्रौपदीसी क्रोध आला । काय बोले पापिष्टाला ॥१॥
जळो तुझी जिव्हा झडो । तुझा प्राणरे बिघडो ॥२॥
नाश होईल तुझी काया । नरका जाशील तूं राया ॥३॥
बोले द्रौपदी निधना । तुका ह्मणे सत्य जाणा ॥४॥

॥८२१९॥
करुं नको चिंता । तुझी नवरी नेमिली आतां ॥१॥
गदा मांडीवरी । बैसे ते तुझी नोवरी ॥२॥
मंडप रणांगणी । फळ साडे शंख ध्वनी ॥३॥
वर्‍हाड मिळेल्क तें फार । विधवांतील सुंदर ॥४॥
मंगलसूत्र नाहीं । तुका ह्मणे सत्य पाही ॥५॥

॥८२२०॥
ऐकोनियां शब्द क्रोधावला भारी । पतिव्रता नारी ह्मणविसी ॥१॥
पांच पती तुला असती भ्रतार । बोलसि बडिवार सभेमाजि ॥२॥
वेश्येचे जातीची अससी कामिनी । चंचळता मनीं फार तुझ्या ॥३॥
द्रौपदीतें बोले नष्ट दुर्योधनु । सध्या मृत्यु जाण तुका ह्मणे ॥४॥

॥८२२१॥
बंधुराया आतां काय पाहतोसि । फेडावें वस्त्रासी करी नग्न ॥१॥
इची लज्जा सर्व दाखवी जनासी । सुहृद नयनासी सर्वाचिया ॥२॥
शब्द ऐकोनियां केला असे धांवा । धांवे तूं माधवा दीनबंधू ॥३॥
गोविंदा केशवा मुकुंदा ये हरी ॥ संकट निवारी तुका ह्मणे ॥४॥

॥८२२२॥
अनंता केशवा यावें वासुदेवा । देवाधीदेवा जगत्पती ॥१॥
नारायणा यावें पावे तूं श्रीधरा । यावें दामोदरा बंधुराया ॥२॥
आदीमूर्ती यावें पावे बा श्रीपती । धन्य तुझी कीर्ति त्रिभुवनीं ॥३॥
कृष्णारामा यावें पाहे बा हृषीकेशी । सांभाळी ब्रिदासी तुका ह्मणे ॥४॥

॥८२२३॥
येई आत्मारामा येई मेघश्यामा । सृष्टीकर्ता ब्रह्मा बाळ तुझें ॥१॥
सहस्त्रवदन शेष तो भागला । नाहीं त्या कळला अंत तुझा ॥२॥
संख्या नाहीं इंद्रा संख्या नाहीं चंद्रा । कोण गणी रुद्रा संख्या तुझी ॥३॥
ऐसे ते भागले माझी मती सान । येई तूं धांवोन तुका ह्मणे ॥४॥

॥८२२४॥
ऐसी ऐकोनी करुणा । धांवे वैकुंठीचा राणा ॥१॥
वायु पाठीसी लागला । तोही दुरी अंतरला ॥२॥
लगबगां येवोनियां । उभा राहे तो कान्हया ॥३॥
बहिणीचें समाधान । करी तेव्हां तुका ह्मणे ॥४॥

॥८२२५॥
आला हृषीकेशी न दिसे कोणासी । संतसज्जनांसी दृष्टी पडे ॥१॥
अभक्तां शोधितां कोटी वर्षे झालीं । नाहीं त्या देखिलें कृष्णाजीसी ॥२॥
द्रौपदीच्या भावा पावलासे देख । देखुनी धर्मराव संतोषला ॥३॥
आतां नाहीं आह्मा भय कदाकाळीं । रक्षी वनमाळी तुका ह्मणे ॥४॥

॥८२२६॥
दुर्योधन ह्मणे काय दु:शासना । पहासी नयना असोनियां ॥१॥
निरी आसडुनी वस्त्र तें फेडावें । जगी दाखवावे इचें ढोंग ॥२॥
आज्ञा होतां त्यास फेडियेलें वस्त्र । दुजा पितांबर देखियेला ॥३॥
हांसे तो चांडाळ इनें केलें ढोंग । सभेचा बेरंग तुका ह्मणे ॥४॥

॥८२२७॥
वदे दुर्योधन स्त्रियाचे चरित्र । वस्त्रामाजी वस्त्र नेसलीसे ॥१॥
कितीक निघती पाहूं हो तमाशा । नको धरुं आशा ममता ईची ॥२॥
त्यासी हो फेडितां निघालें पातळ । सोनें तें केवळ जाणिवेचें ॥३॥
देखिलें पाटाव अमोलचि साचें । मोल नव्हे त्याचें तुका ह्मणे ॥४॥

॥८२२८॥
सोनतपेंठीची साडी हो देखिली । सुवर्णी गुंफिली मोतियानें ॥१॥
मोतीचूर वस्त्र अमोल तें मोतीं । फांकलीसे दीप्ती सभेवरी ॥२॥
सूर्यप्रभा तेथें खद्योताप्रमाणें । ऐसें वस्त्र जाणे देखियेलें ॥३॥
नारायण पेठ आणिली भरणी । चाटी चक्रपाणी तुका ह्मणे ॥४॥

॥८२२९॥
खान्देश वर्‍हाड माळवा गुर्जर । कर्नाटक फार वस्त्रें देखा ॥१॥
छपन्न देशींची वस्त्रें नेसविलीं । वर मुद्रा केली अवतारांची ॥२॥
अठयायशी सहस्त्र होते ऋषेश्वर । प्रतिमा सुंदर रेखियेल्या ॥३॥
तेहतीस कोटी इंद्रादिक देव । रेखिले गंधर्व तुका ह्मणे ॥४॥

॥८२३०॥
चवदा भुवनें रेखिलींशी जाण । आकृती करुन ठसे दिले ॥१॥
ब्रम्हा विष्णु रुद्र अष्टवसु तेथें । तैसे मूर्तीमंत रेखियेले ॥२॥
आतळ वितळ सप्तही पाताळें । वरी नागकुळें रेखियेलीं ॥३॥
नवनाग कुळें वस्त्रावरी मुर्ती  कटींगु प्रगती तुका म्हणे ॥४॥

॥८२३१॥
नवखंड सारी काशी वाराणसी । ठसे त्या वस्त्रासी दिले असती ॥१॥
गंगा ते यमुना सरस्वती गोदा । मूर्तीमंत सदा वस्त्रावरी ॥२॥
कावेरी त्रिवेणी भद्रावती जाण । ठसे हे रेखून केली मुद्रा ॥३॥
द्रौपदी मातेचा न दिसे अंगुष्ठ । तुका म्हणे स्पष्ट उभा हरी ॥४॥

॥८२३२॥
जळांतल्या मुर्ती काढी नवलक्ष । परिवार मत्यक्ष्य रेखियेल्या ॥१॥
पक्षाची आकृती ठसे दहा लक्ष । रेखिलें प्रत्यक्ष वस्त्रावरी ॥२॥
श्वापदांचे ठसे वीस लक्ष कोटी । वीस लक्ष झाडें काढियेलीं ॥३॥
गिरी द्रोण ठसे साडीवरी दिले । दुजे नवविले तुका ह्मणे ॥४॥

॥८२३३॥
वैकुंठ कैलास काढी ब्रह्मसभा । रेखिला पद्मनाभा वैकुंठीचा ॥१॥
वरुण सभेची काढिली आकृती । पतिव्रता सती रेखियेली ॥२॥
सती तारामती सती अनुसुया । धन्य कृष्णराया तुका ह्मणे ॥३॥

॥८२३४॥
वैकुंठीची वाटी आणिली भरणी । केली पाठवणी बहिणीची ॥१॥
वस्त्रांचे ढिगार पर्वताप्रकार । घडले अपार कोण गणी ॥२॥
देवपितांबर शेवटीं नेसली । हात कोण घाली पितांबरा ॥३॥
लावितांची कर सुदर्शन मुक्त । करील नि:पात तुका ह्मणे ॥४॥

॥८२३५॥
दुर्योधनराव बहु कष्टी झाला । बोले त्या बंधुला पुरे करी ॥१॥
भागलासी बारे शिणलासी थोर । न कळे चरित्र ईश्वराचें ॥२॥
पुरे करीं आतां वस्त्रें हीं ठेवावीं । भांडारीं रक्षावीं बहु प्रयत्नें ॥३॥
दु:शासन गेला वस्त्रें झालीं गुप्त । कांहीं नाहीं तेथें तुका ह्मणे ॥४॥

॥८२३६॥
धन्य धन्य महाराज । केलें बहिणीचें काज ॥१॥
सभा विसर्जन झाली । सती एकांतीं बैसली ॥२॥
तुज सारिखा रे बंधु । तुका ह्मणे कृपासिंधु ॥३॥

॥८२३७॥
तुज नाहीं गांजियेलें । देवकीसे छळीयेलें ॥१॥
याचें उसनें घेईन । पांच वर्षे झालीं पूर्ण ॥२॥
धर्म वचना गुंतला । मौन्य धरोनी बैसला ॥३॥
अहो करितों कुळक्षय । तुका ह्मणे हो निश्चयें ॥४॥

॥८२३८॥
बाई करुं नको चिंता । त्यासी निर्दाळितों आतां ॥१॥
मज उशीर लागला । फट फावलीसे याला ॥२॥
जरी मी असतों येथें । खेळूं न देतों दुष्टा तेथें ॥३॥
तुज गांजियेलें बाई । तुका ह्मणे सुख नाहीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : July 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP