कार्तिक वद्य ४
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
पं. मालवीय यांचें निधन !
शके १८६८ च्या कार्तिक व. ४ रोजीं आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हिंदी पुढारी, बनारसच्या विख्यात हिंदु विश्वविद्यालयाचे जनक व कळकळीचे सार्वजनिक कार्यकर्ते पं. मदनमोहन व्रजनाथ मालवीय यांचें निधन झालें ! जुन्या कर्मठ आचारविचारांच्या ब्राह्मण घराण्यांत अलाहाबाद येथें शके १७८३ मध्यें यांचा जन्म झाला. यांचें शिक्षण संपल्यानंतर गव्हर्नमेंट हायस्कूलमध्यें थोडे दिवस शिक्षकाचें काम केल्यावर मालवीयांनीं हिंदुस्थान नांवाचे पत्र काढिलें. पुढें इंडियन युनियन, अभ्यदय, लीडर,‘हिंदुस्थान टाइम्स, या पत्रांचे संपादकत्वहि वेळोवेळीं यांनी स्वीकारिलें होतें. सन १८८५ च्या कलकत्ता येथील काँग्रेसमध्यें यांनी पहिलें राजकीय भाषण केलें. लाहोर, दिल्ली व कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनांचें अध्यक्षस्थान यांना मिळालेलें होतें. सन १९०२ मध्यें प्रांतिक असेंब्लीमध्यें व सन १९१० मध्यें मध्यवर्ती असेंब्लींत हे निवडून गेले. मालवीय हे हिंदुस्थानांतील हिंदूंचे मोठे पुढारी होते. हे हिंदुमहासभेच्या संस्थापकांपैकीं एक असून प्रयाग व पुणें येथील अधिवेशनांचे अध्यक्षहि होते. मदनमोहन मालवीय यांच्यांत नव्याजुन्यांचे उत्कृष्ट मिश्रण झालेलें होतें. हिंदु शास्त्रें, धर्म व संस्कृत भाषा यांचें शिक्षण देणार्या प्राचीन विद्यापीठाच्या कल्पनेला शास्त्रीय ज्ञानाच्या अध्ययनाची यांनीं जोड दिली व हिंदु विश्वविद्यालयाचा पाया घातला. हिंदु संस्कृतीच्या अभ्यासाबरोबरच इतर आधुनिक तीस शाखांचे शिक्षण देणारें हे विद्यापीठ जगप्रसिद्ध आहे. "स्नानसंध्या, गीताभागवतादिकांचा नित्य व्यासंग, पापभीरु व शुचिर्भूत वृत्ति, कपाळीं चंदनाचा ठसठशीत तिलक, पांढरा स्वच्छ पोषाख आणि देश व धर्म यांबद्दल काम करण्याची तत्परता या गुणांमुळें मालवीयांबद्दल सर्वांना आदर वाटे. " यांच्या चारित्र्याला नैतिक अधिष्ठान असल्यामुळें विरोधकहि मालवीयांना फार मान देत असत. ‘हृदयाचे मृदु, तत्त्वाचे खंबीर, धार्मिकतेची मूर्ति अशा यांच्या व्यक्तिमत्वामुळें यांच्याबद्दल लोकांना अतिशय पूज्य भावना वाटत असे.’
- १२ नोव्हेंबर १९४६
N/A
References : N/A
Last Updated : September 30, 2018
TOP