कार्तिक शुद्ध १३
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
अकबर आणि संभाजी यांची भेट !
शके १६०३ च्या कार्तिक शु. १३ रोजीं संभाजे राजे यांनी औरंगजेबाचा मुलगा अकबर याची पाली (पातशहापूर) येथें भेट घेतली. अकबर हा औरंगजेबाचा चौथा मुलगा. संभाजी व अकबर यांत चार महिन्यांचेंच अंतर होतें. अनुभवी सेनापतीच्या हातीं शिक्षण घेऊन शहाजादा अकबर युद्धकलेंत चांगलाच निपुण झाला होता. बापाचा विश्वास संपादन करुन त्यानें रजपुतांवर स्वारी केली होती. परंतु अकबराचें धोरण औरंगजेबास पसंत नव्हतें. संपूर्णपणें हिंदूंचा नायनाट करावा हें बापाचें कर्तव्य होतें. तें त्याच्या पुत्रास पसंत पडले नाहीं. दोघांच्या मनांत तेढ निर्माण झाली. औरंगजेबानें ‘भ्याड’, ‘नामर्द’, म्हणून अकबराची हेटाळणी केली. मानी अकबर चिडून गेला. रजपुतांनी त्याला भर दिली, "तुम्ही त्या थोर अकबराची वंशज आहांत. या सोन्यासारख्या संधीचा फायदा घ्या. आम्ही तुम्हांस मदत करतों." दुर्गादास यानें पुढाकार घेऊन अकबरास सिंहासनावर बसवून औरंगजेबास कैद करण्याचा प्रयत्न सुरु केला. औरंगजेब मनांतून घाबरला. पण कपटविद्येनें त्यानें वेळ निभावून नेली. रजपूत लोकांना पातशहाची कपटबुद्धि न उमगून ते अकबराविरुद्ध बिथरले व त्यांनी युद्ध चालू केलें. अकबराचा पराभव झाल्यावर दक्षिणेस संभाजीस त्यानें पत्र लिहिलें, "राज्य करुं लागल्यापासून हिंदूंस बुडवावे, असा औरंगजेबाचा निश्चय आहे .... सर्व लोक ईश्वराची लेकरें आहेत, राजा हा त्यांचा संरक्षक आहे, म्हणून लोकांचा उच्छेद करणें बाद्शहास योग्य नाहीं. औरंगजेबाची कृत्यें मर्यादेबाहेर गेलीं. ...... मी तुमच्याकडे येत आहें, दुर्गादास राठोड मजबरोबर आहेत. मजबद्दल आपलें मन नि:शंक असूं द्यावें. आपण दोघांनीं मिळून पातशहाचा पाडाव करुं - " संभाजीस मनांत धास्ती थोडी होतीच. नेताजी पालकर व हिरोजी फर्जंद यांना संभाजीनें अकबराकडे पाठविलें; आणि आपण स्वत: कार्तिक शु. १३ रोजीं पालीस जाऊन संभाजीनें अकबराची भेट घेतली. ‘समागमें सेना समुदाय हशम देखील होते. शहाजाद्याबरोबर दुर्गादास होते. बहुत सन्मान केला."
- १३ नोव्हेंबर १६८१
N/A
References : N/A
Last Updated : September 30, 2018
TOP