कार्तिक वद्य ५
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
गंगाधरपंत नेवाळकरांचें निधन !
शके १७७५ च्या कार्तिक व. ५ या दिवशीं झांशीची राणी लक्ष्मीबाई हिचे यजमान गंगाधरपंत नेवाळकर यांचें निधन झालें. झांशीचे सुभेदार नेवाळकर यांचे घराणें मूळचें कोंकणांतील. पेशवाईच्या आरंभीं इतर अनेकांबरोबर हें घराणें धुळें जिल्ह्यांतील साक्री येथें येऊन स्थायिक झालें. रघुनाथराव नेवाळकर हे मुख्य पुरुष. याच घराण्यांतील प्रसिद्ध पुरुष म्हणजे गंगाधरराव नेवाळकर. झांशीचें नष्ट झालेलें वैभव पुन्हा एकदां निर्माण करावें असा यांचा प्रयत्न होता. हे स्वभावानें अत्यंत दयाळू असून शिस्तीचे मोठे भोक्ते होते. यांची द्वीतीय पत्नी म्हणजे प्रसिद्ध राणी लक्ष्मीबाई. सन १८४२ मध्यें मुलगा झाला. पुत्रजन्माचा आनंदोत्सव पुरा होतो न होतो तोंच हा एकुलता एक वारस परलोकास निघून गेला. पुत्रवियोगाचा धक्का राजास फारच जाणवला. वारंवार ते आजारीं पडूं लागले. राज्यांतील श्रमांमुळें संग्रहणीचा विकार जडला. नामवंत राजवैद्यांचे उपचार सुरु झाले, पण कांहीं इलाज चालेनासा झाला. दिवसेंदिवस गंगाधररावांची प्रकृति खंगतच चालली. राणी अहोरात्र पतिचरणांजवळ बसून चिंतायुक्त मुद्रेनें सेवाशुश्रुषा करीत होती. चिन्हें बरीं नाहींत असें पाहून आनंदराव नांवाच्या आप्तालाच दत्तक घेण्यांत आलें. लक्ष्मीबाई चिंतेने व्याकुळ झालेली असतांनाच कार्तिक व. ५ हा दिवस उजाडला; महाराजांनीं राज्याची निरवानिरव केली. ब्रिटिश सरकारनें राज्य नेवाळकरांच्या वंशाकडेच राहील असें आश्वासन दिलें; आणि याच दिवशीं महाराजांनीं कैलासवास केला ! मृत्यूची बातमी वायुवेगानें सर्व नगरभर पसरली. सर्वत्र हाहा:कार उडून राजवाड्यांत एकच हलकल्लोळ माजला. महाराणी लक्ष्मीबाईस दु:खाचा आवेग सहन न झाल्यामुळें तिचें देहभानच हरपलें ! पुत्रवियोगानंतर झांशीच्या राज्याची काय अवस्था झाली; राणी लक्ष्मीस कोणतें दिव्य करावें लागलें; हा इतिहास प्रसिद्धच आहे.
- २१ नोव्हेंबर १८५३
N/A
References : N/A
Last Updated : September 30, 2018
TOP