कार्तिक शुद्ध १२
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
"ताराबाई रामराणी" हिचें निधन !
शके १६८३ च्या कार्तिक शु. १२ रोजीं मराठेशाहीतील प्रसिद्ध राज्यकारणी बाई, छत्रपती राजाराम यांची स्त्री ताराबाई भोसले यांचे निधन झालें ! राजारामाच्यानंतर ताराबाईनें रामचंद्रपत अमात्य, शंकराजी नारायण, धनाजी जाधव, इत्यादींच्या मदतीनें आपल्या मुलास-शिवाजीस गादीवर बसविलें. व राजसबाईस कैदेंत टाकलें. पुढें शाहूची मुक्तता झाल्यावर आपापसांतील वैर अधिकच वाढलें. मराठे सरदारांत फूट पडली. सत्ता कायम टिकविण्यासाठी तिने अनेक कारस्थानें केलीं. शौर्य आणि मुत्सद्देगिरी यांविषयी परकीयहि ताराबाईची वाखाणनी करतात. "नवर्याच्या मागें औरंगजेबाला तोंड देण्याचें कार्य हिनें अधिकच तडफेनें पार पाडले. मोंगली मुलखावर हल्ले चढवून मराठ्यांचा आर्थिक प्रश्न सोडविण्याचे काम हिच्याच कारकीर्दीत सुरु झालें. मराठेशाहींतील अव्वल दर्जाच्या मुत्सद्यांची जूट हिनें शेवटपर्यंत टिकविली होती; आणि पराक्रमांत हिनें केव्हांच हार खांल्ली नाहीं." ताराबाईचा पराक्रम एका तत्कालीन कवीनें एका पद्यांत वर्णन केला आहे.
"दिल्ली झाली दीनवाणी । दिल्लीशाचें गेलें पाणी ।
ताराबाई रामराणी । भद्रकाली कोपली ॥
रामराणी भद्रकाली । रणरंगी क्रुद्ध झाली ।
प्रलयाची वेळ आली । मुगल हो सांभाळा ॥
वसे रत्न सिंहासनीं । भोसल्यांचा शिरोमणी ।
शिवराज चिंतामणी । दिनमणि उदयें -"
परकीय मुसलमानांनीहि ताराबाईची वाखाणणी केली आहे. तिनें होतकरु मराठे सरदारांना उत्तेजन देऊन त्यांना नर्मदेच्या उत्तरेस मोंगली मुलखांत पाठविलें आणि पुढील राज्यविस्ताराचा पाया घातला. खुद्द ताराबाई एकाच किल्ल्यावर राहत्र नसे, तर ठिकठिकाणीं हिंडून ती बादशहाच्या हालचाली पहात असे आणि त्या अनुरोधानें आपलें युद्धविषयक धोरण ठरवीत असे. पुढें रामराजा गादीवर आला, तेव्हां हिला कैदेत पडावें लागलें, आणि याच अवस्थेंत या शूर आणि धोरणी स्त्रीचा कार्तिक शु. १२ रोजीं अंत झाला !
- ६ नोव्हेंबर १७६१
N/A
References : N/A
Last Updated : September 30, 2018
TOP