कार्तिक शुद्ध ३
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
रामशास्त्री प्रभुणे यांचे निधन !
शके १७११ च्या कार्तिक शु. ३ रोजीं पेशवाईंतील सुप्रसिद्ध न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांचे निधन झालें. हे सातारा जिल्ह्यांतील माहुली येथील राहणारे असून जातीनें देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होत. वयाच्या वीस वर्षापर्यंत यांना विद्येचा गंधहि नव्हता. हे प्रथम सातारा येथील सावकार अनगळ यांच्या घरी शागीर्द होते. परंतु एकदां सावकारानें अपमानकारक शब्द बोलून यांचा पाणउतारा केला म्हणून हे काशीस गेले. तेथें प्रौढपणीहि यांनी अत्यंत श्रम घेऊन विद्या मिळविली. थोड्याच दिवसांत यांची धर्मशास्त्री म्हणून ख्याती झाली. नानासाहेब पेशव्यांच्या कारकीर्दीत सन १७५१ सालीं दरबारांत धर्मखात्यांत यांनी नोकरी धरली. आणि नंतर आठ नऊ वर्षांतच हे मुख्य न्यायाधीश बनले. हे अत्यंत नि:स्पृह आणि न्यायदानांत फार प्रसिद्ध होते. नारायणरावांच्या मृत्यूनंतर तपास करुन यानींच राघोबादादास देहान्तशासनाचें प्रायश्चित्त सांगितलें. " स्पष्टवक्तेपणा, नि:स्पृहता, राज्याविषयीं अनुपम निष्ठा यांच्या योगानें ते केवळ अद्वितीय न्यायाधीश झाले; एवढेंच नव्हे तर ती मराठेशाहींतील एक प्रचंड शक्तिच होती. सारस्वत ब्राह्मणांना इतर ब्राह्मणांप्रमाणें वागविणें, माधवराव पेशव्यांस कर्मनिष्ठेपासून निवृत्त करणें, प्रभूंच्या तक्रारी उदार वृत्तीनें सोडविणें, विधवापुनर्विवाहास उत्तेजन देणे, निरक्षर ब्राह्मणांची तरफदारी न करणें, आणि न्याय व राजकारण यांचा योग्य मिलाफ कायम ठेविणें, या त्याच्या गोष्टी ध्यानात ठेविल्या असतां त्या अवनतीच्या काळांत रामशास्त्री हे एक अलौकिक व कालदेश जाणणारे सुधारकहि होते हे ध्यानांत ठेवणें जरुर आहे. " रामशास्त्रींना दरमहा सुमारें १२० रुपये पगार मिळत असे. यांच्या चाळीस वर्षांच्या नोकरींत अनेक बाबतींत मिळून ५५९६८ रुपये यांच्या नांवावर खर्च पडलेले पेशवे दप्तरांत नमूद आहेत. वयाच्या साठपासष्टाव्या वर्षी रामशास्त्री कार्तिक शु. ३ या दिवशीं दिवंगत झाले. त्यांच्या उत्तरकार्यास पेशवे सरकारने ३२०० रुपये खर्च केले.
- २१ आँक्टोबर १७८९
N/A
References : N/A
Last Updated : September 30, 2018
TOP