कार्तिक वद्य १

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


महात्मा फुले यांचें निधन !

शके १८१२ च्या कार्तिक व. १ रोजीं महाराष्ट्रांतील आद्य समाजसुधारक व स्वयंस्फूर्तीनें समतावाद प्रतिपादिणारे महात्मा ज्योतिबा गोविंद फुले यांचे निधन झाले. सातारा जिल्ह्यांतील कटगुण हें यांचे मूळ गांव. यांचे आजोबा शेटीबा हे उदरनिर्वाहासाठीं म्हणून पुण्यास आले. यांच्या तीनहि मुलांनी माळी कामांत कौशल्य दाखवून पेशव्यांच्या येथें फुलें देण्याच्या कामगिरींत लौकिक संपादन केला, म्हणूण यांचे नांव फुले असें पडलें. शिक्षणास सुरुवात झाल्यावर ज्योतिबांनीं वा.ब. फडके यांचे मांग जातीचे गुरु लहूजीबुवा यांचेजवळ दांडपट्टा व नेमबाजी यांचें शिक्षण घेतलें. ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या सेवावृत्तीनें व कार्यनिष्ठेनें हे चांगलेच भारावले गेले होते. बहुजनसमाजाला साक्षर करावें व त्याला सत्यधर्माचें ज्ञान करुन द्यावें असा विचार यांच्या मनांत येऊं लागला. सन १८५१ मध्यें यांनी बुधवार पेठेंतील चिपळुणकरांच्या वाड्यांत मुलींची शाळा काढली. या कामीं यांना व यांच्या पत्नींना समाजाकडून अत्यंत त्रास झाला; परंतु यांच्या या अभिनव कार्याबद्दल यांचा जाहीर सत्कार झाला. व सरकारनें वेताल पेठेंत अस्पृश्यांकरितां दोन शाळा यांनीं स्वत:च्या खर्चानें काढल्या. विधवाविवाहाचा प्रसार करुन फुले यांनीं तसा एक विवाह घडवूनहि आणिला. तसेंच पतित मुलींच्या हातून भ्रूणहत्येचें पातक घडूं नये म्हणून यांनीं ‘बालहत्या - प्रतिबंधक गृह’ काढलें. यानंतरची यांची महत्त्वाची कामगिरी म्हणजे १८७३ मध्यें यांनीं आपल्या विख्यात अशा सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ब्राह्मणांची मध्यस्थी दूर होऊन सामाजिक गुलामगिरी दूर व्हावी असा उद्देश या समाजाचा होता. समाजशास्त्रज्ञांनी अभ्यासपूर्वक जे सिद्धान्त शोधून काढले ते यांनीं स्वयंस्फूर्तीनें प्रतिपादिले. ब्राह्मण व वेदपुराणादि ग्रंथांवर प्रखर हल्ला करुन सबंध समाजरचनाच बदलून टाकण्याची दिशा यांनीं दाखविली. ‘ब्राह्मणांचें कसब’, ‘गुलामगिरी’, ‘जातिभेदविवेकसार’, ‘इशारा,’ ‘शेतकर्‍याचा आसूड’ वगैरे पुस्तकें यांनीं लिहिलीं आहेत.

- २७ नोव्हेंबर १८९०

N/A

References : N/A
Last Updated : September 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP