कार्तिक वद्य ३०
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
"बलवंतरावास छातींत गोळी लागली ! "
शके१६८२ च्या कार्तिक व. ३० रोजीं पानिपत येथें अहंमदशहा अब्दाली आणि मराठे यांचा मोठा संग्राम होऊन मराठ्यांचा विजय झाला. परंतु त्याच दिवशीं प्रसिद्ध योद्धा बळवंतराव मेहेंदळे हा गोळी लागून पडला. यापूर्वी कार्तिक शु. १५ ला जनकोजी शिंदे यानें अब्दालीचा चांगलाच मोड केला होता. तो डाव मनांत ठेवून कार्तिक व.३० ला कांही निवडक अफगाण व रोहिले यांच्या फौजा, अमावस्येच्या अंधार्या रात्रीं संधि साधावीं असा बेत करुन मराठ्यांवर चालून आल्या. वीस हजार स्वार घेऊन बळवंत राव मेहेंदळे गनिमांवर चालून गेला. सायंकाळी चार वाजतां लढाईस तोंड लागलें. तास-दोन तास गोळागोळी होऊन तोफांचा मारा सुरु झाला. ‘हर हर महादेव’ अशी गर्जना करुन स्वत: मेहेंदळे सर्वांच्या पुढे आले. या हातघाईंत "बळवंतरावांस छातींत गोळी लागली. तसे घोड्याखालीं पडले. तो त्याजकडील (शत्रूकडील) माणसें धांवलीं. त्यांतील एकानें तोंडावर तरवारीचा वार केला. दुसर्यानें गळा कापून शिर नेऊं लागले. तो पांचसात राऊत धाऊन आले. खंडेराव नाईक निंबाळकरानें शवावर पडून तरवारीचें घाव सोसले, पण शव गिलच्यांच्या हातीं लागूं दिलें नाहीं. गळा अर्धा कापला होता. तसेंच आणून दहन केलें. समागमें स्त्री अग्निप्रवेश गेली. - " या सार्या प्रसंगाचे हृदयद्रावक चित्र रा. चिंतामणराव वैद्यांनी आपल्या ‘दुर्दैवी रंगू’- ,मध्यें सरसपणें रेखाटले आहे. हा प्रकार झाल्यानंतर शिंदे-होळकर यांच्या फौजा शत्रूवर तुटून पडल्या आणि त्यांनी पुन्हा एकदां अब्दालीचा पराभव केला. बळवंतराव मेहेंदळे हे उत्कृष्ट सेनानी होते. यापूर्वीही यांनी कांही पराक्रम केले होते. नानासाहेबांच्या विरुद्ध ताराबाई व दमाजी गायकवाड असतांना ज्या मंडळींनी गेंड्याच्या माळावर गायकवाडांचा पराभव केला त्यांत मेहेंदळे होते. यांनीच कर्नाटकांत स्वारी करुन होसकोटें, मुळबागल व कडपनाथ हीं ठिकाणें काबीज केलीं होतीं.
- ७ डिसेंबर १७६०
N/A
References : N/A
Last Updated : September 30, 2018
TOP