कार्तिक शुद्ध १४
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
हरिहरांचे मीलन !
कार्तिक शु. १४ हा दिवस वैकुंठ चतुर्दशी या नांवानें प्रसिद्ध आहे. या दिवशीं श्रीविष्णु आणि श्रीशंकर यांची भेट झाल्याचें पुराणग्रंथांत नमूद आहे. सनत्कुमार खंडितेत अशी कथा आहे कीं, वैकुंठाहून श्रीविष्णु काशीक्षेत्रीं आला, आणि मणिकर्णिकेत स्नान करुन त्यानें काशीविश्वेश्वरास हजार कमलें वाहण्याचा संकल्प केला; पूजा सुरु असतां शंकरानें एक कमल दूर लोटून दिलें तेव्हां संकल्प पुरा करण्यासाठीं विष्णूनें त्या फुलाऐवजीं आपले नेत्रकमलच अर्पण केले ! विष्णुच्या भक्तीनें शंकर प्रसन्न झाला. या कथेंतील मर्म ध्यानीं धरणें आवश्यक आहे. भारतांत ऐतिहासिक कालापासून शिव आणि विष्णु या दैवतांच्या उपासकांमध्ये मतभेद निर्माण होऊन द्वेष, मत्सर, आदि दोघांची पुटें त्यावरुन चढूं लागलीं. नंतरच्या काळांत तर वीरशैव वीरवैष्णव, लिंगायत, गाणपत्य, नाथपंथी, महानुभाव, जैन, रामदासी, कापाळी, गोसावी, रामानंदी इत्यादि अनेक संप्रदाय निर्माण होऊन सर्वांच्या मुळाशी असलेला भारतीय संस्कृतीचा धागा लोक विसरुन जात होते. या सर्वं पंथांचें स्वरुप बाह्य दृष्टीनें भिन्न असलें तरी एकजिनसी असणार्या आपल्याच संस्कृतीची ही भिन्न अंगे आहेत, असें पटवून देण्याचे जे कांही उपक्रम झाले, त्यांत वैकुंठ-चतुर्दशीचे स्थान मोठें आहे. हरि-हरांत फक्त एका वेलांटीचा फरक आहे असाच उपदेश तुकोबांचा आहे. उत्तरेंत वा दक्षिणेंत शैव व वैष्णव यांची भांडणें असलीं तरी महाराष्ट्रांत मात्र त्यांचे नांवहि दिसून येत नाहीं. याचें श्रेय येथें रुढ झालेल्या भागवत धर्मास द्यावयास पाहिजे. या भागवत धर्मानें वारकरी सांप्रदायानें सर्व मतभेद मिटावेले, आणि ‘ज्ञानेश्वर,नामदेव, एकनाथ,तुकाराम’ सांगतात त्याप्रमाणें एकाच विठोबाला शिव. आणि विष्णु यांच्या स्वरुपांत पाहण्यास जनतेस शिकविलें.
N/A
References : N/A
Last Updated : September 30, 2018
TOP