कार्तिक वद्य १२
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
कन्हय्यालाल दत्त फांशी !
शके १८३० च्या कार्तिक व. १२ रोजीं बंगालमधील सुप्रसिद्ध क्रांतिकारक कन्हय्यालाल दत्त फांशी गेले. वंगभंगानंतर बंगाल्यांत एक प्रकारचें नवचैतन्य निर्माण झालें होतें. ‘युगांतर’ पत्राच्या संपादकाला कारावास दिल्यानंतर ‘वंदे-मातरम्’ पत्राच्या संपादकांची-बाबू अरविंद घोषांची तीच गत झाली. बंगालमध्यें क्रांतिकारकांचे जाळें विणलें जात होतें. बाँबची गूढ विद्या बंगाली वीरांना अवगत झाली होती. मुझफरपूर बाँब प्रकरणांतील खुदीरामबोस ११/०८/१९०८ रोजीं फांशी गेला. पुढें याच प्रकरणांतून अलीपूर बाँब खटला निर्माण झाला व त्यांत कन्हय्यालाल दत्त, विभूतिभूषण सरकार, अरविंद घोष, बारींद्र घोष, इंदुभूषण राँय, नरेन्द्र गोस्वामी, सत्येन्द्रनाथ बोस, आदि शिक्षित आणि सुसंस्कृत तरुणवर्ग सांपडला. या तरुणांनी बादशहाविरुद्ध बंड पुकारलें होतें. खटला सुरु होण्यापूर्वी नरेन्द्र गोस्वामी हा महत्त्वाचा साक्षीदार फितुर झाला. त्याचें प्रायश्चित्त त्याला मिळालें. हाँस्पिटलच्या आवारांतच त्याच्यावर गोळ्या झाडून सत्येन्द्र बोस व कन्हय्यालाल दत्त यांनीं त्याला यमसदनास पाठविलें. या भयंकर प्रकारामुळें सर्व भरतखंड हादरुन गेलें. ‘विद्रोह्याचा अंत’ या शीर्षकाखालीं बंगाली वृत्तपत्रांतून अग्रलेख लिहिले गेले. अर्थातच् या दोन क्रांतिकारकांवर खटले भरण्यांत आले. सत्येंद्र व कन्हय्या यांना फांशीची शिक्षा ठोठावली गेली. कार्तिक व. १२ रोजीं कन्हय्या दत्त फांशी गेले. या दोघांच्या नवलकथा आणि धैर्याच्या गोष्टी सर्व बंगालमध्यें प्रसिद्ध आहेत. कन्हय्या फांशी जाण्याच्या आधीं चारच दिवस बी.ए. ची परीक्षा उच्च श्रेणींत उत्तीर्ण झाला होता. थोरल्या बंधूनें गहिवरुन ही बातमी सांगितल्यावर कन्हय्या हंसून बोलले, "माझ्याबरोबरच डिप्लोमाहि फांशी द्यावा." फांशीं गेल्यानंतर कन्हय्याच्या देहाची मोठी प्रेतयात्रा निघाली. हजारों गीता या वीर युवकांवर फेंकण्यात आल्या. दहनानंतर त्याची चिमूट चिमूट राख शेकडों वंगयुवतींनीं पूजेसाठी म्हणून चांदीच्या डबींत भरुन ठेविली.
- २० नोव्हेंबर १९०८
N/A
References : N/A
Last Updated : September 30, 2018
TOP