कार्तिक शुद्ध ७

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


गुजराथ प्रांताचा बंदोबस्त !

शके १६५१ च्या कार्तिक शु. ७ रोजीं थोरले बाजीराव पेशवे यांनी गुजराथची व्यवस्था करुन गायकवाड व भिल्ल प्रांतास उपद्रव देऊं लागले तर त्यांचा बंदोबस्त करण्याची हमी घेतली. बाळाजी विश्वनाथानें आरंभलेला उद्योग बाजीरावानें पुढें चालविला. पहिलीं कांही वर्षे निजामचे पारिपत्य करण्यांतच बाजीरावानें घालविली. गुजराथ व माळवा या प्रांतांत आतां मराठ्यांचा शिरकाव होणार होता. शिवाजीनें सुरत लुटली त्या वेळेस मराठ्यांचें पहिले पाऊल गुजराथेंत पडलें. त्यानंतर खंडेराव दाभाडे मधून मधून गुजराथवर स्वार्‍या करीतच होते. निजामुत्मुल्क दक्षिणेंत स्वतंत्र झाला हें दिल्लीच्या बादशहास न आवडून त्यानें निजामचा गुजराथचा सुभा सबुलंदखान या आपल्या विश्वासू सरदारास दिला. परंतु त्याच्याकडून गुजराथची व्यवस्था नीट होईना. दाभाडे आणि बांडे हे वरचेवर स्वार्‍या करुन त्यास त्रास देऊं लागले. ‘मला मदत करा’ असा आग्रह बुलंदखानानें दिल्लीच्या बादशहाकडे सारखा धरला होता. पण महंमद्शहा कांहीच उत्तर देत नव्हता. तेव्हां खान अगदीं बेजार झाला. राज्याचा बंदोबस्त कसा करावा याचा उलगडा त्याला होत नव्हता. बाजीरावानें ही संधि साधली. त्यानें आपला वकील श्यामराव याच्याबरोबर बुलंदखानास निरोप पाठविला, "आम्हांस गुजराथची चौथाई वसूल करण्याचा हक्क द्या म्हणजे आम्ही प्रांताचा बंदोबस्त करुं -" याच वेळीं चिमाजीअप्पा हे गुजराथेंत उतरुन आपला पराक्रम गाजवूं लागले होते. त्यांनीं पटेलाद शहराची खंडणी वसूल केली व ढोलका प्रांत उध्वस्त करुन टाकला. दिल्लीकडून मदत येण्याची खानाची आशा संपली होती. आणि प्रांताची व्यवस्था तर होणें जरुरीचें होतें. शेवटीं बुलंदखान बाजीरावाशीं तह करण्यास कबूल झाला. गुजराथ प्रांताचे चौथाई-सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांना मिळून पंचवीसशें घोडेस्वार मराठ्यांनीं गुजराथच्या बंदोबस्तासाठी ठेविले. याप्रमाणें मराठी राज्यास गुजराथ प्रांत येऊन मिळाला.

- १७ आँक्टोबर १७२९

N/A

References : N/A
Last Updated : September 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP