कार्तिक शुद्ध १५
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
कार्तिक शु. १५ हा दिवस त्रिपुरी पोर्णिमेचा म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवसाचें महात्म्य पुराणग्रंथांतून सांपडतें. पूर्वी त्रिपुरासूर नांवाचा एक दैत्य फार उन्मत्त झाला होता. आपल्या राजधानीभोंवतीं तीन मोठे तट निर्माण करुन तो अजिंक्य झाला होता. इंद्रादिक देवांचेंहि त्याच्यापुढें कांहीं चालत नव्हतें, तेव्हा नारदाच्या सांगण्यावरुन सर्व देव शंकरास शरण गेले, व त्यांनीं त्रिपुर दैत्याचा नाश करण्यासाठीं शंकराला विनंति केली. शंकरानें ती मान्य करुन आपल्या प्रचंड सामर्थ्यानें त्रिपुरासुराचा नाश केला. तो दिवस कार्तिक शु. १५ हा होता. या विजयाची स्मृति आजपर्यंत भारतीयांनीं कायम ठेविली आहे. या दिवशीं सर्व शिवालयांतून दीपोत्सव करण्यांत येत असतो. कांहीं प्रांतांत हा दिवस शिवाच पुत्र स्कंद किंवा कार्तिकेय याचा जन्मदिवस म्हणून पाळतात; आणि तत्प्रीत्यर्थ त्याच्या मूर्तीची पूजा-अर्चा करण्यांत येते. तारकासुराचा नाश करणारा हाच वीर असून तो अतिशय सुंदर होता. या विजयाची स्मृति आजपर्यंत भारतीयांनीं कायम ठेविली आहे. या दिवशी सर्व शिवालयांतून दीपोत्सव करण्यांत येत असतो. कांहीं प्रांतांत हा दिवस शिवाचा पुत्र स्कंद किंवा कार्तिकेय याचा जन्मदिवस म्हणून पाळतात; आणि तत्प्रीत्यर्थ त्याच्या मूर्तीची पूजा-अर्चा करण्यांत येते. तारकासुराचा नाश करणारा हाच वीर असून तो अतिशय सुंदर होता. दक्षिण हिंदुस्थानांत शिवासाठीं कृत्तिका नांवाचा महोत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. सर्वत्र उत्कृष्ट प्रकारचा साज-शृंगार करुन मिरवणूक, महापूजा, वगैरे उत्सव मोठ्या प्रमाणावर होत असतात. "सुमारे पंचवींस हात उंचीचा खांब देवळासमोर उभा करुन त्यावर कापूर व इतर ज्वालाग्राही पदार्थ घालून तो पेटवून देतात. तिरुवण्णामल्ली, त्रिचनापल्ली, तिरुलन्नी, इत्यादि ठिकाणीं जेथें जेथें टेकडी आहे अशा ठिकाणी दीपोत्सव करण्यांत येत असतो." पुराणांत सांगितलेल्या त्रिपुरासुराच्या वधाचा उल्लेख रुपकात्मक असावा असें कित्येकांचें मत आहे. "क्रोध, लोभ व मोह हे (असुर) प्रबल झाले म्हणजे इंद्रियांना (देवाना) त्रास देतात, तेव्हां इंद्रियें आत्म्यास (शिवास) शरण जातात आणि मग तो आत्मा एकाच बाणानें त्रिपुरांना (स्थूल, सूक्ष्म व कारण या तीन शरिरांना) व्यापून असणारे कामक्रोधादि जे असुर त्यांचा वध करतो. अशी कल्पना रुपक सोडविताना करण्यांत येते.
----------------------
कार्तिक शु. १५
(२) ‘गीतांजली’ स नोबेल पारितोषिक !
शके १८३५ च्या कार्तिक शु. १५ रोजीं आशियाचे कविसम्राट म्हणून ओळखले जाणारे रवीन्द्रनाथ टागोर यांच्या गीतांजलीला जगप्रसिद्ध असें नोबेल पारितोषिक मिळाल्याचें जाहीर झालें ! भारतास मिळालेला हा पहिलाच मान होता. या योगानें रवींद्रबाबंचीच नव्हे तर सर्व हिंदुस्थान देशाची मान अधिक उंच झाली. हिंदुस्थानच्या पारतंत्र्याच्या काळांतहि उच्च प्रकारचें काव्य निर्माण होतें याची साक्ष युरोपियन लोकांना पटली. वास्तविक पाहतां ‘गीतांजली’ तील विषय भारतीयांना परका नव्हता. परंतु भौतिक शास्त्रांच्या प्रगतींत सुखा मानून वणवण करीत भटकणार्या पाश्चात्य पांथस्थांना गीतांजलींतील अमृतवर्षाव अत्यंत सुखमय वाटून नवचैतन्य देणारा भासला. गीतांजलि हें काव्य रवींद्रबाबूंनीं सन १९०९ मध्यें बंगाली भाषेंत रचलें, पुढें चार वर्षानंतर त्याचें इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध झालें. इतर भारतीय साधुसंतांनीं अध्यात्म-तत्वज्ञानावर अफाट वाड्मय निर्माण केलें आहे. गीतांजलींत सुद्धां हाच विषय टागोर यांनी आपल्या उच्च कल्पनाशक्तीच्या साह्यानें अत्यंत मिष्ट केला आहे. भक्तियुक्त अंत:करणानें जीं गीतकुसुमें टागोरांनीं परमेश्वराच्या चरणीं वाहिलीं त्यांतील १०३ अथवा मूळ बंगालींतील १५७ गीतांचा समुदाय म्हणजे ‘गीतांजलि’. याला रवींद्रबाबूंच्या प्रतिभेचें एक दिव्य विजयतोरणच म्हणजें इष्ट होईल. सर्व विषय अध्यात्मपर असूनहि कलापूर्ण मांडणी, सौंदर्ययुक्त दृष्टि, आणि कल्पनारम्य असा गॄढवाद यांमुळे ‘गींताजलि’ म्हणजे उत्कृष्ट असें भावमधुर स्तोत्रकाव्य झालें आहे. गीतांजलि वाचून अनेक लोकांच्या मनांत निर्माण झाला आहे. सदा सर्वदा युद्धाच्या अग्नितांडवांत होरपाळून निघणार्या पाश्चात्य समाजाला तर ‘गीतांजलि’ एक अमोल असा ठेवाच वाटला. लीनता, भूतदया, स्वदेशप्रेम, आणि स्वर्गीय आनंद या गुणचतुष्टयावर टागोरांची काव्यसंपदा साकार झाली आहे. जगांतील बहुतेक सर्व भाषांतून गीतांजलीचीं भाषांतरें झालीं आहेत.
- १३ नोव्हेंबर १९१३
N/A
References : N/A
Last Updated : September 30, 2018
TOP