कार्तिक वद्य १४

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


बादशहा अकबर यांचे निधन !

शके १५२७ च्या कार्तिक व. १४ रोजीं दिल्लीच्या मोंगल घराण्यांतील प्रसिद्ध सम्राट बादशहा अकबर याचें निधन झालें. याचा बाप हुमायून वनवासांत असतांनाच उमरकोट येथें सन १५४२ च्या आँक्टोबर १५ रोजीं अकबराचा जन्म झाला. लहानपणीं याला बर्‍याच संकटांतून मार्ग काढावा लागला. बुद्धि चलाख असल्यामुळें यानें स्वानुभवानें बरेंच शिक्षण घेतलें. हुमायूननंतर अकबर वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षीच राज्यकारभार पाहूं लागला. आणि आपल्या प्रभावी सामर्थ्यानें अकबरानें राज्याचा विस्तार केला. पंजाबांत सिकंदरशहा सूर, पूर्वेकडे महंमदशहा व हिमू, मध्यहिंदुस्थानांत व राजपुतान्यांत हिंदु हे सर्व अकबराचे शत्रु असतांना सुद्धा मोठ्या धीमेपणानें त्यांना तोंड देऊन बादशहानें आपलें साम्राज्य वाढविलें. पंजाब, ग्वाल्हेर, अजमीर, लखनौ, माळवा, चितोड, रणथंभोर, आदि सर्व ठिकाणी त्याचा अमल चालू झाला. आग्र्‍याचा किल्ला यांनेच पस्तीस लाख रुपये खर्च करुन बांधला. व सन १५६९ मध्यें फत्तेपूर-शिक्री हें शहर यानेंच वसविलें. अकबराची शेवटचीं वर्षे मात्र अत्यंत त्रासांत गेलीं. जिवाची नातलग मंडळी व मित्रांपैकी बरेच लोक मरण पावले, त्यामुळें याला फार दु:ख झालें. मुलांच्या पासून कधींच सुख मिळालें नाहीं. व उतारवयांत अकबर अगदी भ्रमिष्ट बनला व आजारी पडून कार्तिक व. १४ रोजीं मरण पावला. अकबराची राहणी अगदीं साधी असून तो फार नियमितपणानें वागे. गंगेच्या उगमाचा शोध यांनेच केला. अकबरास चित्रकलेची आवड फार होती. याचा मोठा गुण म्हणजे प्रजावात्सल्य होय.  सर्व धर्मांतील चांगल्या गोष्टी निवडून यानें     ‘दिने इलाही’ नांवाचा नवीन धर्म स्थापन केला. याच्या दरबारांत अनेक सद्‍गुणी माणसांचा संग्रह झाला होता. अकबर बादशहा सूर्याचा उपासक होता. बिरबलापासून तो सूर्यपूजा शिकला होता. हिंदूंना खुष करण्यासाठी यानें अनेक चांगलीं कृत्यें केली.

- १५ आँक्टोबर १६०५

N/A

References : N/A
Last Updated : September 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP