आषाढ वद्य १४
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
आषाढ व. १४
‘सांवता पांडुरंग - स्वरुपीं भीनला !’
शके १२१७ आषाढ व. १४ या दिवशीं पंढरपुरजवळच्या अरणभेंडी येथील प्रसिध्द भगवद् भक्त सांवता माळी यांनीं समाधि घेतली. याच्या समाधीचें वर्णन एका अभंगांत सांपडतें; -
“उठोनि प्रात:काळीं करुनिया स्नान । घालुनी आसन यथाविधी ॥१॥
नवज्वरें देह झालासे संतप्त । परि मनीं आर्त विठोबाची ॥२॥
प्राणायाम करुनी कुंभक साधिला । वायु निरोधिला मूळतत्त्वीं ॥३॥
बारा शतें सतरा शालीवान शक । मन्मथ नामक संवत्सर ॥४॥
ॠतु ग्रीष्म कृष्ण आषाढ चतुर्दशी । आला उदयासी सहस्रकर ॥५॥
सांवता पांडुरंग - स्वरुपीं भीनला । देह समर्पिला ज्याचा त्यासी ॥६॥
तेराव्या शतकांत पंढरीचा विठ्ठल ‘लेकुरवाळा’ झाला होता. ज्ञानेश्वर, नामदेव यांचें प्रभावी नेतृत्व लाभून प्रत्येक ज्ञातीमध्यें एक एक महान् संत निर्माण झाला; आणि हिंदु समाजाला बांधीव स्वरुप येऊं लागलें. कोणतीहि व्यक्ति एका विशिष्ट पायरीवर येऊन पोहोंचली म्हणजे तिची जात लोपून जाई. ‘देव भावाचा भुकेला । यातिकूळ नाहीं त्याला ॥’ असा सर्वाचा भाव असल्यामुळें जातीभेदाचें स्वरुप कमी होत होतें. सांवता माळी सर्वाचा भाव असल्यामुळें जातिभेदाचें स्वरुप कमी होत होतें.सांवता माळी बागकामाचें आपलें कर्तव्यकर्म करीत असतांच ‘वैकुंठींचा देव आणूया कीर्तनीं । विठ्ठल गाउनी नाचो रंगीं ॥’ ऐवढा आत्मविश्वास प्राप्त करुं शकले. सबंध बागकामच जणुं हरिरुपानें त्यांना दिसे. “माझी विठाई, ‘कादा, मुळा, भाजी, लसूण, मिरची, कोथिंबिरी’ या रुपानें नटून आली आहे. तिची सेवा नको करायला ?” अशी त्यांची भावना असे. यांच्या अभंगांतून भक्तीचा जिव्हाळा व अनुभवाची साक्ष दिसून येते. यांच्या जीविताचें मर्म असें होतें: -
“नामाचिये बळें न भीऊं सर्वथा । कळिकाळाच्या माथा सोटे मारूं ॥
वैकुंठींचा देव आणूया कीर्तनीं । विठ्ठल गाउनी नाचो रंगीं ॥
सुखाचा सोहळा करुनी दिवाळी । प्रेमें वनमाळी चित्तीं धरुं ।
सांवता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा । तेणें मुक्ति व्दारा, वोळंगती ॥
- १२ जुलै १२९५
N/A
References : N/A
Last Updated : September 24, 2018
TOP