आषाढ शुद्ध २

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


स्वातंत्र्यवीरांचें साहस !

शके १८३२ च्या आषाढ शु. २ य दिवशीं स्वा. वी. सावरकर यांनीं मार्सेलिस बंदरानजीक बोटींतून समुद्रांत उडी टाकली !
हिंदुस्थानांत अशांतता पसरत आहे, त्याला कारण सावरकर असें समजून त्यांना लंडन येथेंच अटक झाली; आणि त्यांची रवानगी हिंदुस्थानांत करण्याचें ठरलें. ‘मोरिया’ बोट मार्सेलित बंदराच्या धक्क्यालगत उभी राहिली. काय करावयाचें तें निश्चितपणें ठरवून त्यांनीं पाहर्‍यावर असणार्‍या शिपायास ‘शौचकूपाकडे घेऊन चल’ म्हणून म्हटलें. शौचकूपओअंत गेल्यावर आपल्या अंगांतील Sleeping gown आंतील आरशावर सावरकरांनीं टाकून दिला. अंगावरील बहुतेक कपडे उतरवून त्यांनीं पोर्टहोलकडे उडी झोंकली. पोर्टहोलमधून जाण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु होता. याच वेळीं हा सावरकरांचा यत्न बोटीच्या क्वार्टर - मास्टरच्या ध्यानांत आला. त्यानें आरडाओरड केल्यामुळें बोटीवरचे शिपाई जागृत झाले. सावरकर पाण्यांत उडी टाकीत पोहत पोहत किनार्‍यापर्यंत निघाले होते. त्याच्यामागून क्वार्टर मास्टर व पोलिसहि त्यांचा पाठलाग करीत होते. किनार्‍यावर आल्यावर सावरकर ‘गाडी गाडी’ म्हणून ओरडूं लागले. तो त्यांना पाठलाग करणार्‍या पोलिसांनीं गांठलें; आणि त्यांना पकडून ‘मोरिया’ बोटीवर आणलें. पोर्टहोलमधून निसटून जाण्यासाठीं निकराचा प्रयत्न केलेला असल्यामुळें त्यांच्या छातीच्या दोनहि बाजूंची कातडी सोलून निघाली होती.
जवळजवळ साडेपांचशें यार्डाचें अंतर सावरकरांनीं समुद्रांतून तोडलें होतें. बंदरावरुन चाललेल्या ट्राम्स त्यांना दिसत होत्या. पण जवळ पैसा नव्हता.पोशाखहि जेमतेम, म्हणजे अशिष्ट माणसाप्रमाणें; त्यामुळेंच त्याना शिपांयाच्या हातीं शेवटीं सांपडावें लागलें. भारतांतील धडाडीच्या क्रांतिकारकाचाहा धाडसी प्रयत्न जरी फसला तरी त्यांच्या या पराक्रमामुळें सर्व जगाचें लक्ष त्यांचेकडे वेधून राहिलें. सावरकराच्या जीवितांत अनेक रोमहर्षक प्रसंग आले आहेत, त्यांतील हा एक आहे.
- ८ जुलै १९१०

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP