धनाजी जाधवाचा मृत्यु !
शके १६३२ च्या आषाढ व . ५ रोजीं आपल्या अद्भुत पराक्रमानें पडत्या काळांत मराठेशाहीला सांवरुन धरणारा प्रख्यात वीर धनाजी जाधव याचा अंत झाला.
धनाजी हा लखूची जाधवाच्या वंशांतील असून शंभुसिंगाचा मुलगा होता. याचा जन्म १५७२ शकांत झाला व तो १५९५ शकाच्या उभराणीच्या लढाईत प्रसिध्दीस आला. संभाजीच्या वधानंतर महाराष्ट्रांत मराठयांनीं मोंगलांना तोंड देण्याचा ज अव्दितीय पराक्रम केला त्यांत धनाजीच्या शौर्याची ख्याति विशेष आहे ‘हीं माणसें प्रतिसृष्टि निर्माण करतील’ असा शिवाजीनें याचा गौरव केला होता. धनाजी जाधवास मोंगल सैन्य फार घाबरत असे. याच्या कर्तबगारीविषयीं ताराबाई म्हणते, “जाधवराव कैलासवासी स्वामीचे संपूर्ण कृपेस पात्र झाले ते आपल्या कर्तृत्वावरी व हुकोलबारदारी एकनिष्ठेवरी झाले. राज्याभिवृध्दीविषयीं त्यांहीं कांहीं सामान्य कसाला, श्रमसाहस केला नाहीं. जीविताची तमा न धरतां स्वामिकायीच तत्पर राहून, कैलासवासी स्वामींनीं जे समयीं हुकूम केला, ते समयीं कर्नाटकांत फौजांनीं धाऊन जाऊन, स्वामीस प्राप्त झालीं संकटें निरसन करुन, स्वामिगौरवाचें सुख त्यांहींच अनुभविलें, व सेवाधर्मेकरुन त्यांहींच कैलासवासी स्वामींस संतुष्टविलें. तेव्हां स्वामीस मशारनिल्हेविना दुसरे प्रिय कीं प्राण ( कोणी) होतें असें नाहीं. सर्व प्रकारें कार्यास येतील हा भरवसा दृढ मनीं मानिला होता. औरंगजेबासारखा शत्रु पराभव पावल्याचें यश मशारनिल्हेस प्राप्त झालें.” संभाजीच्या वधानंतर महाराष्ट्रांत मोंगलांचा सूड घेण्याची विलक्षण बुध्दि निर्माण झाली होती. शत्रूला नकोसें करुन सोडण्याइतपत पराक्रम धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे या जोडीनें केला. परंतु खेदाची गोष्ट ही कीं, दोघांच्यांत एकोपा सहसा टिकला नाहीं. पुढें शाहूनें राज्यपद स्वीकारल्यानंतर वसुलाच्या सर्व खात्याची देखरेख धनाजी जाधवच पाहत होता. १६३२ च्या सुमारास रांगण्याची मोहीम पार पडून येत असतां वारणा नदीकांठी वडगांव येथें हा वृध्द व अनुभवी सेनापति मृत्यु पावला.
- २७ जून १७१०
----------
आषाढ व. ५
कान्होजी आंग्र्यांचें निधन !
शके १६५१ च्या आषाढ व. ५ या दिवशीं मराठी राज्यांतील प्रसिध्द मुत्सद्दी व धडाडीचे दर्यावर्दी सरदार कान्होजी आंग्रे यांचें निधन झालें.
संभाजी, राजाराम यांच्या बिकट कारकीर्दीत कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमानें मोंगलांना नकोसें होऊन गेलें होतें. राजारामाकडून सुवर्णदुर्गावर नेमणूक झाल्यावर त्यांनीं मराठेशाहीच्या पडत्या काळांत पश्चिम किनार्याचें संरक्षण उत्तम रीतीनें केलें. यामुळें त्यांना ‘ध्वजवृन्दाधिकारीइ’, ‘सरखेल’ इत्यादि किताब मिळत गेले. मराठयांच्या आरमाराचें हे मुख्य अधिपति झाल्यानंतर इंग्रज, फिरंगी व मुसलमानांचें आंग्र्यांपुढें कांहीं चालेनासें झालें होतें.
“ तळकोंकणांत पुंडावे होऊन प्रांत वैराण पडला. महाराष्ट्र धर्मं राहावा ऐसें नव्हतें. त्या वेळेस फिरंगी व हबशी हेहि प्रांतांत धर्म - उच्छेद करीत होते. तेव्हां ‘सरखेल’ साहेबांचे पुण्यप्रतापें स्वरक्षणार्थ थ्रोर थोर मातबर सरदार जमा होऊन शामलाची क्षिति केली. आणि श्रमेंकरुन कोंकणांत धर्म रक्षिला.सरखेलसाहेब यांनीं धर्मस्थापना केलीइ. ही कीर्ति या लोकीं व परलोकीं जाऊन उरली आहे.” अशा अर्थाचा मजकूर आंग्रे यांच्या थोरवीबद्दल जुन्या कागदोपत्रीं सांपडतो. मुंबईच्या गव्हर्नरास कान्होजी आंग्रे यांनीं ठणकावून लिहिलें कीं - “आमचें राज्य जुलूम, बलात्कार, चांचेगिरी यांजवर चाललें आहे, असें म्हणणें तुम्हां व्यापार्यांना शोभत नाहीं. शिवाजीमहाराजांनीं चार बादशहांबरोबर लढाया केल्या आणि स्वपराक्रमानें राज्य स्थापन केलें. याप्रमाणें आमच्या राज्यसत्तेचा प्रारंभ आहे. ह्याच साधनांच्या योगानें आमचें राज्य टिकलें आहे. हें चिरकालिक आहे कीं नाहीं याचा विचार तुम्हींच करावा. जगांत चिरकालिक असे कांहींच नाहीं.” कान्होजी हे तुकोजी आंग्रे यांचे चिरंजीव. पहिल्यानें जोशी नांवाच्या ब्राह्मणाकडे गुरें वळण्यांत बालपण गेलें. परंतु याची तरतरी पाहून त्या ब्राह्मणानें याला हत्यारें वगैरे पुरविलीं व याला चांगलें तयार केलें. त्यानंतर अचलोची मोहिते, सुवर्णदुर्गाचा किल्लेदार यांचेकडे कान्होजीला नौकरी लागली. त्या वेळीं यांनीं हबशाच्या मुलखावर अनेक वेळां हल्ले केले होते.
- ४ जुलै १७२९
--------------
आषाढ व. ५
“कळी उमलली जों न...”
शके १७३२ च्या आषाढ व. ५ रोजीं मेवाडचा राणा भीमसिंग यांची अत्यंत रुपवान, सुशील व सद्गुणी मुलगी कृष्णाकुमारी विष पिऊन मरण पावली.
उपवर झालेल्या कृष्णाकुमारीला अनेक राजांच्या मागण्या आल्या. जोधपूरचा मानसिंग व जयपूरचा जगत् सिंह यांच्यांत भांडणें लागलीं. अमीरखान राणा पेंचांत पडला. कन्या मानसिंहाला द्यावी कीं जगत् सिंहाला द्यावी, अशा व्दिधा मन:स्थितींत आपल्या प्रिय कन्येचा बळी घेण्याचेंच त्यानें ठरवलें. ठरल्याप्रमाणें जवानसिंह पाजळलेलीं कटयार घेऊन कृष्णाकुमारीच्या महालांत गेला. पण सात्त्विक, निपराध, सौंदर्यमयी कृष्णाकुमारीकडॆ पाहतांच त्याच्या हातून कटयार गळून पडली. “समरांगणावर समबल अशा शत्रूच्या उरांत प्रवेश करणारी कटयार गळून पडलीइ. “समरांगणावर समबल अशा शत्रूच्या उरांत प्रवेश करणारी कटयार त्या कोमल, सुंदर, निष्पाप स्त्रीच्या हृदयाचा ठाव कशी बरें घेणार ?” शेवटीं तिच्याकडे विषपेला पाठवण्यांत आला. आपल्या आईस तत्त्वज्ञानाचा उपदेश केल्यावर पित्यावरील संकट टळावें म्हणून तिनें तो पेला पिऊन टाकला. परंतु तिला तें विष पचलें नाहीं. तीनहि वेळीं विष उलटून पडलें. शेवटीं जालीम विषाचा पेला हातीं घेऊन कृष्णा उद्रारली “परमेश्वरा, आतां तरी विषाचा परिणाम होऊं दे, आणि मला तुझ्या चरणाजवळ ने” विषप्राशनानंतर कृष्णाकुमारी कायमचीच शांत झाली. कृष्णाची दीन आई वेडी झाली.
‘कृष्णा कृष्णा’ करीत अन्नत्याग करुन ती मरण पावली.
या प्रसंगावर विनायक कवींनीं सुंदर कविता केली आहे. सुरवातीसच ते म्हणतात: -
“कळी उमलली जों न पावली पूर्ण विकासाला,
अदय कराचा तोंच जीवरी पडला कीं घाला ।
सुनील गगनीं चमकूं लागे सुंदर इंदुकला
तोंच तिचा निर्घृण राहूनें धरला हाय गळा ।
भीम नृपाला प्रियतर बाला कृष्णा वेल्हाळा ।
नडली, पडली बली अकालीं, त्यायोगें काळा ॥”
- २१ जुलै १८१०