आषाढ शुद्ध ८
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
‘तख्ताची जागा’ हस्तगत झाली !
शके १६५५ च्या आषाढ शु. ८ रोजीं परकीय सत्तेंत असलेला रायगड किल्ला श्रीनिवासराव प्रतिनिधि यांनीं ताब्यांत घेतला.
राजारामाच्या मृत्यूनंतर औरंगजेबास हुरुप चढून त्यानें एकामागून एक असे किल्ले हस्तगत करण्यास सुरुवात केली. परंतु मराठयांनीं सुध्दां मोठया शिताफीनें जवळजवळ सर्व किल्ले परत मिळविले. परंतु पुढें मराठयांचा सर्व कारभार सातारा येथून चालू झाल्यामुळें रायगडचें महत्त्व कमी झाल्यासारखें झालें. त्याचा फायदा जंजिर्याच्या सिद्दीनें घेण्यास सुरुवात केली. राजापुरी, तळगड, घोसाळगड, बिरवाडी, रायगड, इत्यादि ठाणीं सिद्दी याकूतखानानें काबीज केलीं. दरम्यानच्या काळांत ब्रह्मेंद्रस्वामी आणी सिद्दी यांचे मोठें वितुष्ट येऊन स्वामी धावडशीस येऊन राहिले. आणि सिद्दीचे पारिपत्य करण्यासाठी सारखा आग्रह सुरु झाला. बाजीराव पेशवे यांची या कामगिरीवर नेमणूक झाली. त्यांनीं मोठा पराक्रम गाजवून गेलेलीं ठिकाणें हस्तगत केलीं. तरी सुध्दां अंजनवेल, गोवळकोट, विजयदुर्ग, जंजिरा, रायगड व उंदेरी हीं महत्वाची ठाणीं शत्रूच्याच हातांत होतीं. शाहूनें सिद्दीचा समाचार घेण्यासाठीं श्रीनिवासराव प्रतिनिधीचीहि योजना केली. प्रतिनिधि यांनीं कारस्थान रचून हा विख्यात असा रायगडचा किल्ला, मराठयांच्या ‘तख्ताची जागा’ आषाढ शु. ८ रोजीं आपल्या ताब्यंत घेतली. शाहूमहाराजांना ही वार्ता समजल्यावर त्यांनीं प्रतिनिधींना स्वहस्तें पत्र लिहिलें “घेतल्या स्थळाचें संरक्षण होय तें करणें आम्ही ईश्वरी इच्छा आहे तर श्रावणांत रायरी व बाजे किल्ले पाहावयास येऊं. रा. शिवाजीमहाराज, व. रा. आबासाहेब संभाजीमहाराज, व काकासाहेब ( राजाराममहाराज ) व ताराबाई यांस कोणास न जाहलें तें कार्य चि. फत्तेसिंगबाबा व रा. प्रधान यांनीं केलें ही कीर्त जगत्रयीं व निजाम उल्मुल्क व दिल्लीपावेतों जाहली. हा लौकिक जेणेकरुन कायम राहील तें करणें. ‘अनारंभो मनुष्याणां प्रथमं बुध्दिलक्षणम्’ जें सांगणें तें जातेसमयीं सांगितलेंच आहे.” रायगड हस्तगत झाल्यामुळें पंतप्रतिनिधींचें वजन बरेंच वाढलें.
- ८ जून १७३३
N/A
References : N/A
Last Updated : September 24, 2018
TOP