आषाढ शुद्ध ६

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


इंगजी सत्ता दृढ झाली !

शके १६७९ च्या आषाढ शु. ६ रोजीं इंग्रजी सत्तेचा पाया हिंदुस्थानांत स्थिर करणारी प्रसिध्द अशी प्लासीची लढाई झाली.
अलिवर्दीखानानंतर त्याचा नातू मिर्झा महंमद ऊर्फ सिराज उद्दौला हा बंगालचा सुभेदार झाला. त्याचें आणि इंग्रजाचें मुळींच पटलें नाहीं. काइव्ह व वँटसन हे कलकत्ताकर इंग्रजांना मदत देण्यास आले, आणि त्यांनीं बंगाल्यांतील फ्रेंचांचें चंद्रनगर हें ठाणें काबीज केलें व काइव्हनें नबाबाविरुध्द कारस्थान उभारिलें. अलिवर्दीखानाचा जांवई मीरजाफर हा नबाबाचा सेनापति होता. त्याच्याशीं संधान बांधून बंगालची सुभेदारी त्यास देण्याचें आमिष काइव्हनें दाखविलें. या गुप्त कारस्थानास रंग येत असतांना उमीचंद नांवाच्या श्रीमान्‍ व्यापार्‍यास याचा सुगावा लागला; आणि कटाची गुप्तता राखण्याबद्दल त्यानें काइव्हपाशीं वीस लाख रुपयांची मागणी केली. परंतु काइव्ह त्याच्यापेक्षां सवाई होता. त्यानें या कराराचे दोन कागदे केले: एक पांढरा खरा व दुसरा तांबडा खोटा. खोटया कागदावर रकमेचा उल्लेख करुन खर्‍या कागदावर मात्र तो गाळण्यांत आला. त्यानंतर सर्व तयारी झाल्यावर काइव्ह चंद्रनगरहून निघाला आणि आषाढ शु. ६ रोजीं प्लासी येथें जाऊन पोंचला. नबाबाचें सैन्य तयार होतेंच. दोनहि सैन्यांची लढाई सुरु झाली. नबाबाच्या तोफखान्यानें इंग्रज फौजेवर जोराचा मारा केला. काइव्हचें सैन्य मातीच्या टेकडीमागें केलेल्या मार्‍यामुळें मात्र नबाबाचें फारच नुकसान झालें. पावसाचा कहर झाल्यानें सर्व दारुगोळा भिजून निरुपयोगी झाल्यामुळें नबाबाचें कांहीं चालेनासें झालें. त्याचेकडील मीरमदन नांवाचा इमानी सरदार गोळा लागून पडला. त्यामुळें नबाबाचा धीर खचून त्याच्या फौजेनें पळ काढण्यास सुरुवात केली. अशा प्रकारें या लढाईत इंग्रजांना जय मिळाला. या लढाईचें राजकीय महत्त्व फार मोठें आहे. मीर जाफर दुर्बल राहून खरी सत्ता काइव्हच्या हातीं आली. बंगालचा नबाब इंग्रजांच्या हातांतील बाहुले बनल्यामुळें प्लासीच्या लढाईचा दिवस म्हणजे हिंदुस्थानांतील इंग्रजी सत्ता दृढ करणारा दिवस समजला जातो.
- २३ जून १७५७

N/A

References : N/A
Last Updated : September 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP