आषाढ शुद्ध १२
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
दाहिर राजाचा वध !
शके ६३४ च्या आषाढ शु. १२ रोजीं महंमद कासीमनें सिध देशाच्या दाहिर राजावर स्वारी करुन त्याचा वध केला !
प्राचीन काळापासून भारताशीं अरब लोकांचा व्यापार होता. या वेळीं बगदाद येथें वलीद खलीफा गादीवर होता. सिंध देशच्या राजाशीं दाहिरशीं मुसलमानांचें भांडण निघालें. सिध देशांतील देवल नामक बंदरांत मुसलमानांचे एक हजार लोक रजपुतांनीं पकडून ठेवले होते. त्यांची मागणी मुसलमानांचे दाहिरकडे केली. पण देवल बंदर त्याच्या ताब्यांत नसल्यामुळें फौजेनिशीं देवल येथील देवालयावर हल्ला केला. देवल हस्तगत झाल्यावर त्यांतील ब्राह्मण मुसलमानी धर्म स्वीकारीनात म्हणून कासीमनें सतरा वर्षावरील सर्व ब्राह्मणांची कत्तल केली व इतरांस गुलाम म्हणून स्वदेशीं पाठविलें. त्यानंतर कासीमनें दाहिवर स्वारी केली. उभयतांची मोठी लढाई होऊन तींत तो मरण पावला; तरी त्याच्या शूर राणीनें सर्व फौज एकत्र करुन पुन:एकदां निकराचें युध्द केलें, पण तिला अपयश आलें. आणि शेवटीं सिध देश इस्लामी राज्याच्या ताब्यांत गेला.
दाहिर हा चचाचा मुलगा असून जातीनें तो ब्राह्मण होता.
या दाहिर राजास दोन मुली होत्या. त्यांना पकडून कासीमनें खलीफ बलीट् यास नजर म्हणून पाठवल्या. त्यांनीं आपल्या बापाचा वध करणारा कासीम याचा विलक्षण पध्दतीनें सूड घेतला. वडील मुलीवर खलीफाची मर्जी बसली. तेव्हां ती बोलली ‘मजवर कासीमनें बलात्कार केला असल्यामुळें मी भ्रष्ट झालें आहें.” खलीफास कासीमचा अत्यंत संताप आला, आणि त्यानें कासिमास ठार मारुन त्याचें प्रेत दमास्कस येथें आणवलें; तेव्हां मुलीस मोठा आनंद होऊन ती उद्गारली, “माझ्या बापाचा घात करणार्या दुष्टाचा चांगला सूड घ्यावा एवढयाचसाठीं मीं हा आरोप त्याजवर केला. मी भ्रष्ट नाहीं !” मुलीचें हें खोटें वर्तन पाहून खलीफानें तिलाहि ठार मारिलें. पातिव्रत्यापेक्षां मरण पत्करणें तिला श्रेयस्कर वाटलें.
- २० जून ७१२
N/A
References : N/A
Last Updated : September 24, 2018
TOP