आषाढ शुद्ध १०

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


गुलाबरावमहाराजांचा जन्म !

शके १८०३ च्या आषाढ शु. १० रोजीं असामान्य साधु पुरुष गुलाबरावमहाराज यांचा जन्म झाला.
उमरावतीपासून दहाबारा मैलांवर असणार्‍या लोणी ( टाकळी ) या गांवीं यांचा जन्म झाला. हे नऊ महिन्यांचे होतांच यांचे डोळे जाऊन यांना कायमचें अंधत्व प्राप्त झालें. लहानपणीं आई वारल्यानंतर यांचें पालनपोषण आईच्या आईनें केलें. यांची श्रीज्ञानदेवावर अत्यंत निष्ठा. एके दिवशीं श्रीज्ञानदेवांनीं स्वप्नांत येऊन दृष्टांत दिला कीं, “वैदिक धर्म व कृष्णभक्ति यांचा प्रसार करा.” त्यानंतर यांनीं स्वत:ला ‘ज्ञानेश्वरकन्या’ व ‘कृष्णपत्नी’ अशीं नांवें घेऊन आपल्या कार्यास सुरुवात केली. यांची कवित्वशक्ति अपूर्व होती. बसल्या बैठकीस हजारबारशें ओव्या अगदीं सहज निर्माण करुन हे इतरांना भगवत्‍ प्रेम चाखवीत असत. यांच्या बुध्दीचें वैभवहि मोठेंच होतें. सांख्य, योग, वेदान्त, वैद्यक, व्याकरण, आदि विषय हे शिकवीत असत. हे मधुराव्दैताचे पुरस्कर्त असून यांची ग्रंथसंपत्तिहि पुष्कळ आहे. संप्रदायसुरतरु, भागवत - रहस्य, प्रेमनिकुंज, साधुबोध (व्यवहारधर्मबोध ), अभंग - गाथा, आदि ग्रंथ यांच्या सांप्रदायाचें तत्त्वज्ञान विषद करणारे आहेत. पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांचा परिचयहि गुलाबरावांना उत्तम प्रकारें होता. प्लेटो, अँरिस्टाँटल, साँक्रेटीस, कँट, हेगेल, मिल्ल, इत्यादि तत्त्ववेत्त्यांच्या ग्रंथांचें विवरण हे सुबोधपणें करीत. “यांच्याकडे पाहिलें कीं हा पुरुष मूर्तिमंत चमत्कार आहे असें वाटे. हे बोलूं लागले कीं भक्तिमार्गाचा नुसता पाऊस पडे. हे चर्चा करुं लागले कीं यांची निर्दोष वादसरणी, विलक्षण ज्ञान व युक्तिवाद पाहून मन कुंठित होई. यांची अत्यंत मधुर वाणी ऐकून चित्त नागासारखें डोलूं लागे ... अव्यंग कर्म, विशुध्द ज्ञान, अलोट भक्ति या तिहीचें एकीकरण यांच्यांत झालेलें होतें. पण याशिवाय अर्वाचीन चिकित्सक दृष्टीलाहि ज्याचा उलगडा होत नाहीं अशा कित्येक गूढ गोष्टी यांच्याजवळ होत्या.” असें कै. ल. रा. पांगारकर यांनीं म्हटलें आहे. अवघ्या चौतिसाव्या वर्षी यांनीं समाधि घेतली.
- ६ जुलै १८८१
-----------------

आषाढ शु. १०
दादाभाई नवरोजीचें निधन !

शके १८३९ च्या आषाढ शु. १० रोजीं राष्ट्रसभेच्या आद्य संस्थापकांपैकीं एक, स्वराज्य या राजकीय ध्येयाचे जनक आणि अर्थशास्त्राच्या साह्यानें सरकारविरुध्द लढणारे पहिले जहाल टीकाकार दादाभाई नवरोजी यांचे निधन झालें.
यांचें शिक्षण मुंबईत एल्फिन्स्टन इन्स्टिटयूटमध्यें झाल्यावर तेथेंच त्यांनी शिक्षक व प्राध्यापक म्हणून काम केलें. मुंबईत यांनीं स्टूडण्ट्‍स लिटररी अँण्ड सायण्टिफिक्‍ सोसायटी स्थापून तिच्या गुजराथी व मराठी शाखा काढल्या. सन १८५५ मध्ये ‘रास्त गोफ्तर’ हें गुजराथी साप्ताहिक यांनींच काढलें. सन १८५५ राजकीय कामगिरीस आरंभ केला. सन १८६७ मध्यें ईस्ट इंडियन असोसिएशन स्थापन करुन तिच्यातर्फे हिंदुस्थानविषयक निबंध वाचणें व व्याख्यानें देणें वगैरे कार्ये सुरु झालीं.
राज्यकारभारांतील दोष मांडण्यापासून ते स्वराज्य हें ध्येय जाहीर करुन त्याकरतां प्रयत्न करणारी प्रमुख संस्था असें स्वरुप देण्यापर्यंतच्या काँग्रेसमधील प्रत्येक स्थित्यंतरांत यांनीं प्रामुख्यानें भाग घेतला. कलकत्ता, लाहोर व पुन:कलकत्ता या तीन अधिवेशनांचे हे अध्यक्षहि होते. राष्ट्राच्या जीवनांत इतर कोणत्याहि गोष्टीपेक्षां आर्थिक व शैक्षणिक बाबींना अत्यंत महत्त्व असतें ही गोष्ट यांनींच लोकांपुढें प्रथम ठळकपणें मांडली. ‘पाँव्हर्टी अँण्ड अन - ब्रिटिश रुल इन इंडिया’ हा यांचा अत्यंत महत्त्वाचा असा अर्थशास्त्रीय ग्रंथ होय. हल्लींची ब्रिटिश सत्ता ‘जेवढें उकळतां येईल तेवढें उकळून घ्या’ अशा स्वरुपाची आहे. हिंदुस्थानप्रमाणें ती इंग्लंडलाहि घातक आहे. सध्यांच्या हिंदुस्थानच्या विपन्न स्थितींत एक पैचाहि फायदा हिंदुस्थानच्या पदरांत पडूं न देतां लक्षावधि रुपयांचें मालाच्या रुपानें शोषण चाललें आहे. हें यांनीं आंकडयांनीं सिध्द करुन दाखविलें आणि त्यावर परिणामकारक उपाययोजना सुचवून मालक- गुलाम या नात्यापेक्षां सहकार्याच्या भावनांनीं हिंदुस्थानाकडे पाहण्याची सूचना यांनीं सरकारला दिलीइ.  England`s dutries to India, Financial Administration of India हे यांचे ग्रंथ प्रसिध्द आहेत.
- ३० जून १९१७

N/A

References : N/A
Last Updated : September 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP