आषाढ शुद्ध ७
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
“ईश्वरें मोठा घात केला !”
शके १६९९ च्या आषाढ शु. ७ रोजीं नारायणराव पेशवे यांची पत्नी व सवाई माधवराव पेशवे यांची आई गंगाबाई हिचें निधन झालें.
ही साठे यांच्या घराण्यांतील होय. हिचें लग्न सिंहगडीं त्र्यंबकराव मामानें लावलें. नारायणरावाच्या वधानंतर गंगाबाई गरोदर असल्याचें समजल्यावरुन राघोबादादाच्या पक्षाच्या लोकांकडून हिला मारण्याचे प्रयत्न सुरु झाले. त्यामुळें हिचे संरक्षण करणें हें एक बारभाईचे कर्तव्य होऊन राहिलें. नारायणरावास माधवरावांनीं आपल्या हातीं सोंपविलें असतां त्याचा बचाव करणें आपणाला अशक्य झालें म्हणून सखारामबापू अगोदरच दु:खी होते. आणि आतां गंगाबाईस मारण्याचे प्रयत्न सुरु झाले तेव्हां आपण इतकी मंडळी पेशव्यांचें अन्न खाल्लेली जवळ असतां गंगाबाईच्या असहाय स्थितींत तिचा आपल्याकडून नुसता बचावसुध्दां होऊं नये, याबद्दल कारभारी मंडळीस खेद झाला. त्यामुळें अर्थातच चाललेल्या बारभाईच्या कारस्थानास जोर आला. शनिवारवाडयांत गंगाबाईची अवस्था अत्यंत वाईट आहे असें निश्चित होतांच पुष्कळ वाटाघाटी झाल्यावर सखारामबापूनें नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांच्या साह्यानें बाईस शनिवारवाडयांतून माहेरी साठे यांच्या घरी जाण्याच्या निमित्तानें बाहेर काढून लगोलग पालखींत बसवून बंदोबस्तानें पुरंदर किल्ल्यावर पोहोंचतें केलें. तेथूनच शके १६९६ माघ शु. ५ रोजीं गंगाबाईच्या नांवानें कारभार सुरु झाला. यानंतर येथेंच वैशाख शु. ७ ला गंगाबाई प्रसूत झाली. आणि तिला मुलगा झाला. हाच महाराष्ट्राचा आवडता पेशवा सवाई माधवराव. याच्या वयाच्या चाळिसाव्या दिवशींच याला पुरंदर किल्ल्यावर पेशवाईचीं वस्त्रें प्राप्त झालीं. या मुलाच्या आयुष्यांतील अत्यंत दु:खद प्रसंग म्हणजे गंगाबाईचा मृत्यु होय. “ईश्वरें मोठा घात केला. श्रीमंत लहान आहेत, मातुश्री पांघरुण होतें ते गेलें, निरुपाय गोष्ट भगवंते घडविली. किल्ल्यावरच दहन झालें. रावसाहेब बाईसाहेबांस पुसतात, कोठें आहेत ? तेव्हां सांगतात देवास गेली आहेत. ‘त्यास आणवा’ असें म्हटल्यावर आणवितों असें सांगून विसरी पाडितात.” बालपेशव्यावरील हा प्रसंग करुणरम्य नाहीं असें कोण म्हणेल ?
- १२ जुलै १७७७
N/A
References : N/A
Last Updated : September 24, 2018
TOP