आषाढ शुद्ध ५
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
वल्लभाचार्याचें निधन !
शके १४५३ च्या आषाढ शु. ५ रोजीं पुष्टिमार्गाचे प्रसिध्द संस्थापक वल्लभाचार्य यांचें निधन झालें.
तेलगू प्रांतांतील कांकरव गांवीं राहणार्या लक्ष्मणभट्ट नावाच्या कृष्ण यजुर्वेद पढलेल्या एका तेलंगी ब्राह्मणाचा हा मुलगा होय. लक्ष्मणभट्टाच्या बायकोचें नांव ‘एलमागार’ असें होतें. तिला घेऊन तो काशीयात्रेस जात असतां वाटेंतच ती प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. त्याचें नांव वल्लभ ठेवण्यांत आलें. वल्लभानें कांहीं दिवस मथुरेस व कांहीं दिवस वृंदावनांत वस्ती केली. असें भाविकतेनें सांगितलें जातें कीं, श्रीकृष्णानें वल्लभाला दृष्टांत दिला कीं, “कृष्णावतारीं माझे सवंगडी असलेले गोप पुन्हा या युगांत अवतीर्ण झाले आहेत व त्यांच्याशीं मला पुन्हा पहिल्याप्रमाणें क्रीडा करतां यावी यासाठीं त्यांना माझे भक्त अगर उपासक बनीव.” या संदेशाप्रमाणें वल्लभानें श्रीनाथजी या नांवानें प्रसिध्द असलेल्या कृष्णाच्या एका विशिष्ट अवताराशीं आपल्या पंथाची सांगड घातली. हा पंथ पुष्टिमार्ग या नांवानें प्रसिध्द आहे. वल्लभाचार्याचा सिध्दान्त थोडक्यांत असा आहे: “आदिपुरुइष अगर आत्मा एकटा असल्यामुळें त्यास बरें वाटेना; नाना रुपें धारण करावीं अशी त्यास इच्छा झाली. त्याप्रमाणें तो स्वत: अचेतन सृष्टी, जीव व अन्तर्यामिन् आत्मा झाला. यानें आपल्या अतर्क्य शक्तीनें चित् व आनंद हे दोन गुण अचेतन सृष्टींत इंद्रियांना अगोचर किंवा अदृश्य अशा स्वरुपांत ठेवले.”
आपल्या पंथाच्या प्रसारासाठीं संस्कृत भाषेंत वल्लभाचार्यानीं अनेक ग्रंथ लिहिले आहेत. त्यांपैकी वेदान्तसूत्र, अणुभाष्य, सुबोधिनी व तत्त्वदीप निबंध हे तीन फार प्रसिध्द आहेत. त्यांच्या सतरा लहान ग्रंथांपैकीं ‘सिध्दांतरहस्य’ सुप्रसिध्द आहे. वल्लभांचे चार व त्यांच्या मुलाचे चार असे आठ शिष्य व्रज प्रदेशांत प्रसिध्द असून त्याना ‘अष्टछाप’ अशी संज्ञा आहे. त्यांनीं व्रज भाषेंत अनके प्रकारच्या धार्मिक कविता लिहिल्या आहेत. यांच्या पुष्टिपंथाचे प्रवाहपुष्टि, मर्यादापुष्टि, पुष्टि पुष्टि, शुध्द पुष्टि असे चार प्रकार आहेत.
- १९ जून १५३१
N/A
References : N/A
Last Updated : September 24, 2018
TOP