आषाढ वद्य १०
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
“पेशवाईचा शेवट झाला !”
शके १७७९ च्या आषाढ व. १० रोजीं सत्तावनच्या स्वातंत्र्य - समरांतील प्रमुख सूत्रधार आणि कार्यकुशल सेनापति धोंडोपंत उर्फ नानासाहेब पेशवे यांचा पराभव झाला.
स्वातंत्र्य - युध्दाचा वणवा पसरत चाललेला पाहून नानासाहेबहि क्रांतिकारकांना मिळाले आणि कानपूर येथें त्यांनीं इंग्रजांवर विजय संपादन केला. त्यानंतर झांशी, नीमच, नशिराबाद, राजपुताना, इत्यादि ठिकाणीं युध्द सुरु झालें. पाटणा, आरा, जगदीशपूर येथेंहि उटावणी झाली. अर्थातच आतां इंग्रजांचा प्रतिकारहि तितक्याच जोरानें होऊं लागला. मुंबईचा गव्हर्नर एल्फिन्स्टन यानें इराणच्या स्वारीवरुन परत आलेली फौज उत्तरेंत पाठविली. हँवे- लाँक व औट्रँम या वेळीं पर्शियाच्या स्वारींत गुंतले होते. त्यांना बोलावून त्यांच्याकडे सैन्याचें नेतृत्व देण्यांत आलें. जनरल नील एतद्देशीयांची हत्या करीत करीतच कलकत्याहून निघाला. त्यानें अलाहाबादचें ठाणें हस्तगत केलें. हँवेलाँक त्यास फत्तेपूर येथें येऊन मिळाला. दोघांनीं तें शहर बेचिराख केलें. त्यानंतर पांडु नदीच्या लढाईत बाळासाहेब पेशव्यांचा पराभव झाला. या निर्वाणीच्या प्रसंगीं नानासाहेबांनीं सामना देण्याचें ठरविलें; आणि ते आषाढ व. १० या दिवशीं आपल्या सैन्यासह अहीखा गांवांपाशीं तयार झाले. हॅंवेलाँकचें सैन्य समोरुन येतांच कानपूर व कँटोन् सेंट या दोन रस्त्याच्या मध्यावर अर्धचंद्रकृति व्यूह रचून नानासाहेबांची सेना सिध्द झाली. पेशव्यांचें हें कौशल्य पाहून कसलेला सेनापति हँवेलाँकहि चकित झाला ! युध्दाला सुरुवात झाल्यानंतर नानासाहेब पेशव्यांनीं जातीनें फार मेहनत घेतली. लढाई निकराची झाली; पण दुर्दैवानें तींत पेशव्यांचा पराभव झाला ! अत्यंत दु:खमय अंत:करणानें नानासाहेब ब्रह्मावर्तास निघून गेले. तेथील लोकांचा निरोप घेऊन आपल्या बायकामुलांसह ते नांवेंत चढलें. मध्यावर आल्यावर शेल्यांतील अमूल्य राजरत्नें गंगामातेस अर्पण करुन ते बोलले: “परमेश्वरा, दीडशें वर्षानंतर पेशवाईचा आज शेवट झाला.” तरीसुध्दां पुन: युध्द करण्याची धमक त्यांच्यांत होतीच.
- १६ जुलै १८५७
N/A
References : N/A
Last Updated : September 24, 2018
TOP