आषाढ शुद्ध ४

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


ग. कृ खापर्डे यांचें निधन !

शके १८६० च्या आषाढ शु. ४ रोजीं सुप्रसिध्द वकील, विव्दान्‍, वक्ते व सार्वजनिक कार्यकर्ते गणेश कृष्ण खापर्डे यांचें निधन झालें.
वकिलीला लागणारे विव्दत्ता, मोहक वाणी हे गुण यांच्याजवळ होतेच. पण याचबरोबर सार्वजनिक कार्याची हौसहि यांना भरपूर होती. सन १८९२ मध्यें नागपूर येथें भरलेल्या सामाजिक परिषदेचें अध्यक्षस्थान व सन १८९७ मध्यें उमरावती येथें भरलेल्या राष्ट्रीय सभेचें स्वागताध्यक्षपद यांना मिळालें होतें. याशिवाय मुंबई, मद्रास व काशी येथील काँग्रेसमध्यें लाँर्ड कर्झनच्या धोरणावर यांनीं केलेलीं उपरोधिक भाषणें प्रसिध्द आहेत. लोकमान्य टिळकांचे हे अनुयायी असून ‘मी एका लोकमान्य टिळकाखेरीज कोणाचाहि अनुयायी जन्मात झालों नाहीं !’ असें हे अभिमानानें म्हणत असत. सन १९०७ सालच्या सुरतेच्या काँग्रेसमधील यांची कामगिरी महनीय आहे. मराठीइ, उर्दू, हिंदी, संस्कृत, वगैरे भाषांप्रमाणेंच गुजराथी भाषेंतहि आपलें मोहक, विनोदी व परिणामकारक वक्तृत्व गाजवून यांनीं तेथील वातावरण बदलून टाकलें. १९०८ सालीं टिळकांना शिक्षा होतांच अपील वगैरे करण्यासाठीं हे इंग्लंडला रवाना झाले.
सन १९१७ मध्यें भारतमंत्री माँटेग्यू यांना राजकीय सुधारणा करण्यासाठीं एक काँग्रेस डेप्युटेशन भेटण्यास गेलें, त्यांत यांचें नांव होतें. माँटेग्यू सुधारणा अमलांत आल्यावर ‘कौन्सिल आँफ स्टेट’ मध्यें हे निवडून आले व तेथें यांनीं उत्कृष्ट कामगिरी बजावली. काँग्रेस डेप्युटेशनमधून हे इंग्लंडला गेले तेव्हां आपल्या इंग्रजी वक्तृत्वामुळें यांनीं मोठा लौकिक मिळवला. ‘हिन्दी मार्कटेन’ म्हणून तेथील वृत्तपत्रें यांना संबोधूं लागलीं.
“यांच्या उंच, भव्य शरीरयष्टीप्रमाणेंच यांचा पोषाखहि नेहमीं भपकेदार व वैशिष्टयपूर्ण असे. विशेषत: यांचा भरजरी फेटा डोक्यावर श्रीच्या वेलांटीप्रमाणें मोठया भपकेदारपणें उभवून डोक्याला लपेटलेला असे. त्यामुळें त्यांच्याकडे कोणाचेंहि लक्ष सहज वेधून राही. औदार्यपूर्ण व खर्चिक वागणूक, डौलदार पोषाख, आणि भारदस्त खुमासदार भाषण यांमुळें यांना लोक ‘वर्‍हाडचे नबाब’ या टोपण नांवानें संबोधीत असत.
- १ जुलै १९३८

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP