आषाढ वद्य १३
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
संत नामदेवांची समाधि !
शके १२७२ च्या आषाढ व. १३ या दिवशीं पंढरीच्या विठ्ठलाच्या सगुण भक्तीचा प्रसार करणारे प्रसिध्द भगवद् भक्त श्रीनामदेव हे समाधिस्थ झाले.
तेराव्या शतकामध्यें महाराष्ट्रांत भक्तीचा जो डांगोरा पिटला जात होता, त्याचें बरेंचसें श्रेय नामदेवाकडे आहे. नगर जिल्ह्यांतील नेवासें गांवीं याच काळीं ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी अवतरली होती. पांडुरंगाचा निस्सीम सगुणभक्त नामदेव याचेसह आपण तीर्थयात्रा करावी अशी प्रेरणा ज्ञानदेवांना झाली. आणि “तुझिये संगतीचें नित्य सुख घ्यावें । सार्थक करावें संसाराचें ॥” असें नामदेवांना विनवून ज्ञानदेवादि मंडळींनीं उत्तर हिंदुस्थानची तीर्थयात्रा पूर्ण केली. भागवत धर्मांचा प्रसार सार्या भारतांत झाला. परंतु नामदेवाची थोरवी आणखी एका दृष्टीनें मोठी आहे. ज्ञानदेवादि भावंडांचें प्रयाण झाल्यावर नामदेव कांहींसे उदास झालें. उत्तरेंत र्म्लेच्छ राज्य होऊन धर्माचा र्हास होत होता. तें पाहून नामदेव पांचपन्नास वारकर्यांसहित परत उत्तरेंत गेले. पंजाबपर्यत त्यांनीं विठ्ठलभक्ति पोंचविली ! हिंदी भाषेंत कवनें केलीं, त्यांपैकीं कांहीं शीखांच्या ‘ग्रंथसाहेबां’ त संग्रहीत केलेलीं आहेत. पंजाबांत गुरुदासपूर जिल्ह्यांत ‘घोमान’ गांवीं नामदेवाच्या पादुकाची पूजा आज सहाशें वर्षें चालू आहे. ‘बाबा नामदेवायी’ म्हणून त्याच्या अनुयायांना नामाभिधानहि प्राप्त झालें. जुनागडचे नरसी मेहता आणि शीख पंथाचे प्रवर्तक नानक यानीं नामदेवांच्या भक्तीची आणि अभंगवाणीची प्रशंसा केली आहे. आजहि पंजाबांत या नामदेवांचे अनुयायी हजारोंनीं दिसतात. तेव्हां तेराव्या शतकांतील ‘भोळया - भाबडया’ वारकरी संताची ही कामगिरी अपूर्व नाहीं असें कोण म्हणेल ?
नामदेवाचें पूर्वज यदूशेट हे शिंपी जातींतील होते. यांच्यापासून पांचवा पुरुष दामाशेटी. यांच्या बायकोचें नांव गोणाई. याच दांपत्यास शके ११९२ मध्यें जें पुत्ररत्न झालें तेच प्रसिध्द नामदेव होत. बालपणापासूनच नामदेव विठ्ठलभक्तींत रंगून गेले, ... याच दिवशीं मराठी वाड्गमयांत प्रसिध्द असलेली ‘नामयाची दासी जनी’हिनें सुध्दां समाधि घेतली.
- ३ जुलै १३५०
N/A
References : N/A
Last Updated : September 24, 2018
TOP