मध्यखंड - जीवप्रलय

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


॥ यदा विद्यागुणै जीवो मुक्त स्त्यक्त्वा मनोगुणान्‍
जीवस्यास्तंगते तत्र स्वयमात्मा प्रकाशते ॥१॥
आतां त्वंपदाचा वेचु । निरसुं पृथक्‍ प्रपंचु । हा पक्षु अति उच्चु । बहुतां मध्यें ॥१॥
हें कथन मनोहर । आहे शुध्द आणिक सार । जेणें उकले शरीर । तें हें चि सूत्र ॥२॥
हें कथन मोक्षोपाय । येणें चि पूर्णता होय । सर्व देवाचे ठाय । येथ गीवसणें ॥३॥
सायुज्यता देवांची । देहीं आहे साची । भक्तां अभक्तां हें चि । पद लाभे ॥४॥
देहासी च्यारि प्रळये । हें शास्त्रोक्त वचन आहे । परी पूर्ण ज्ञाना नये । प्रळय भेदु ॥५॥
जो देह ज्ञान विसंचु । तो चि जीवा देहाचा वेचु । याही परीस उचु । पदार्थु नाही ॥६॥
जागृती स्वप्री निद्रा । या अवस्छा गा शीष्येंद्रा । हे प्रळय ह्मणता ज्ञानमुद्रा । विसंचु पाहे ॥७॥
देहांति जरी जीवा । हा ही पक्षु नाणावा । आणिजे तैं जाणावा । सिध्दांत गेला ॥८॥
ब्रह्मांडी वेचती जीव । हें तुज सांगो सर्व । देह प्रळयो नाव । ज्यासी ह्मणीजे ॥९॥
थूळीं पंचवीस गुण । ते सुक्ष्मी होति लीन । त्या सूक्ष्मातें ग्रासून । भूतें उरती ॥१०॥
पाठीं पंच महाभूतें । सांडीति या देहातें । या अनुक्रमासी निरुतें । धरुनि देवों ॥११॥
तैं घ्राणीं होय गंधत्यागु । गुदीं जाणवे मलोत्सर्गु । श्वासा क्षरा वियोगु । प्राणु धरी ॥१२॥
तैं अहंकारु सांडी अहंता । देहा जाणवे विकळता । भूलयो पावतां । असें होय ॥१३॥
ते क्षिति आपीं नाशे । तें आप आगिं दिसें । यासी यमधर्म असे । जन बोले ॥१४॥
पाठिं ते जळ तेजीं रीघे । हा ही लयो सांगो वेगें । चित्त तेव्हां वियोगें । चित्तभ्रमु होयें ॥१५॥
तैं अपानु स्वस्थानिचा सरे । तेणें झरति सर्व व्दारें । जिव्हा स्तंभे नुरे । शब्दस्वादु ॥१६॥
शीश्नी रतव्यगत । कदाचित्‍ द्रवे शुक्रित । रसु वितळे शोणित । जळ गेलिया ॥१७॥
एवं पंचकेसी पाणी । सोषी देहीचा वन्हि । हा जळनाशु बुधजनी । वोळखावा ॥१८॥
पाठिं तेज होय बळी । ते रक्त महोदि निवळी । मग निगे तेयेवेळी । वायुचे मागें ॥१९॥
तेव्हां शुध्दि बुध्दि विरे । तणें प्राणी घुमारें । सर्व स्मरु विसरे । गळका बैसें ॥२०॥
चंद्रि लागे नयनी । रुपें सांडवे प्राणी । ताठा पडे चरणी । उदान बैसे ॥२१॥
महा घोराचें लक्षण । एवं बुध्दि उदान चरण । रुप आणिक नयन । ये आटति पवनी ॥२२॥
वात वियोगु शरीर । तैं समानु सांडी बिढार । लवणें राहाती हस्त शीर । स्तब्धती तेणें ॥२३॥
तेव्हां स्पर्श तो हि चळे । तेणें शीतोष्ण न कळे । धुगी राहे अनीळें । निगतां वेळी ॥२४॥
वायो कल्पुनि आकाश । सांडी शरीराचि आश । तेव्हां होय निश्वास । आपण सर्व ॥२५॥
तें गगन सर्वा सार । जेव्हां निघे बाहिर । तेव्हां खुंटति व्यापार । व्योमपंचकाचे ॥२६॥
तैं शब्द वाचा आटे । श्रृति श्रवणी नुमटे । समूळ अंत:करण तुटे । व्यानें सहीत ॥२७॥
असें नाशल्या गगन । होय देह अचेतन । थूळ लिंग कारण । विसंचु पावे ॥२८॥
पंचविसा तत्वां सहित । नाशु पावती पांच ही भूतें । पाठीं उरती प्रेतें । होउनि देहें ॥२९॥
असें हें सर्व हि सरे । परि अविनाश वस्तु येकी उरे । ते जाणवी ज्ञातारें । उदास नोंबलों ॥३०॥
ये चि वस्तुपासुनि । वोळखावे आत्मज्ञानी । येरें आंधळी बोलणीं । प्रमाण हीनें ॥३१॥
देहिचा आत्मा जो नेणें । तो परमात्मा काय जाणें । त्यांसी जें बोलणें । तो तो शीणु ॥३२॥
जो हा आत्मा न संडी स्वगृह । तो कदाचित्‍ सचेत होय देह । तेथून भूत समूह । पुनरपी उठे ॥३३॥
तो आत्मा स्थान भ्रंशे । तै चि देह फुगे नाशे । तो चि देह प्रळ असें । वोळखावें ॥३४॥
असया परवडी । भूतें भूत उनाडी । पाठीं आत्मा हीं सांडी । या शरीरातें ॥३५॥
कां समर्थ आत्मराजें येकें । देहें सांडावीं कौतुकें । तो आधी चि उठति कटकें । पंचभूतांचि ॥३६॥
जैसा थीरे थीरे नृपवरु । निघतां काढी परिवारु । भूतवेचु प्रत्याकारु । तैसा चि असे ॥३७॥
जैं अकस्मात्‍ येकसरा । राजा निघे बाहिरा । तैं धांवणे घडे परीवारा । त्याचि सवें ॥३८॥
तैसें चि गा भर्वसेन । आत्मया उत्क्रमण । नव्हे आत्मगती वाचून । देहपातु ॥३९॥
आमच्या वडीलांचा पक्षु । आत्मा ब्रह्मरंध्रि प्रत्यक्षु । हां न कळतां मोक्षु । बोलों नये ॥४०॥
जो अहंतेचेंनि भरें । धेडी उचलीये शरीरें । ज्या पासूनी चराचरें । होत जातें ॥४१॥
तो हा ब्रह्मव्दारामधिं । आहे देखावा प्रबुधीं । हा केधवां कोणे संधी । लपों नेणें ॥४२॥
देह प्राणाचे आधारे । हा अदृष्ट पक्षु घेति बा रे । कां जें प्राणें सांडि हि शरीरें । सचेते होती ॥४३॥
श्मशानी गेलेयां हि शवे । पुनरपी होति सजीवे । एवढें हें सामर्थ्य नेदावें । प्राणकीटा ॥४४॥
अथवा समाधिकाष्ठिचा अंती । इंद्रियें प्राणेंसी वेचती । तैं आत्मचक्रवर्तीं । तो चि उरे ॥४५॥
अथवा गर्भी पांचवा मासीं । प्राणु अंगीकारीं देहासी । हा न संचरतां कोण्हें अशी । वृध्दि होय ॥४६॥
तरि गा नादबिंदु मिश्रीतु । असी पूर्वाचार्याची मातु । या चि खुणा आदिवंतु । जाण आत्मा ॥४७॥
असो या त्या प्रसंगीं । आत्मा चि कारणु जगीं । हें येवढें गुह्य तुझा आंगी । जडीलें आह्मीं ॥४८॥
हें माझें बापें माहेरें । प्रत्यक्ष शंकरें । येरवीं आखरिकें उत्तरें । साधि नव्हे ॥४९॥
॥ इति देह विसंच ॥ऽऽ॥
====
आतां आइक मृतें चिन्हें । जे शंभे बोलिलें कालज्ञानें । तें प्रगट करुं वचनें । स्वल्पामध्यें ॥५०॥
जैं भ्रुरेखा गुप्त होती । तैं सत्पान्हें काळ प्रवृत्ति । नाईकतां अंतर श्रृति । हें चि संख्या ॥५१॥
अंग कंपे येक सरिसें । कां अकस्मात विस्मृति बैसे । तैं उडान कीजे हंसे । अष्टमा दिवसीं ॥५२॥
हें चि प्रमाण नेत्रपटळा । जै अधरु अगोचरु होय डोळा । तैं दिवस पांच जीवाळा । जीवा असे ॥५३॥
नासाग्र सांडी दीठी । तैं तीजां वारि हंसु उठी । येका दिवसाचे पोटी । रसना जाय ॥५४॥
तिचें होय कृष्ण शरीर । तैं ते राखे पंचवार । काळें दातें शरीर । काळांचा मुखी ॥५५॥
वदनी वारुणा नेदिं जळ । छाया सांडी आपुलें मूळ । तो दिवसु सकळ । रामचिंतनी ॥५६॥
दीपु चले कां बिंब पसरे । कां शब्द न निगति बाहिरें । तैं त्यासी वोषद दुसरें । रुद्र नाम ॥५७॥
आपुली दिसे दीर्घ मुर्ती । तैं दिवस दोनि तीनि जन संगती । मळ मूत्र जाय विस्मृति । तैं नेट पडला ॥५८॥
अकस्मात्‍ द्रुष्टी पुढें । दिसे विदूप रुपडे । तैं मूळ आलें गाढें । भूतांतकाचें ॥५९॥
माथां घालिजे पाणि । पाहिजे दूरस्थां लोचनी । तडुन फुटे तै तीनि । रात्री उरती ॥६०॥
अंगुळें वळूनी करु ठेविजे। अनामिका लंब दिजे । ते उचले तै त्रिरात्री मध्यें बीजे । हंसु करी ॥६१॥
मध्यमा फीरुनी दडपावें । तै महिषारुढ वेंगी होवावें । नेत्रातळी खांच तै जाणावे । यमकूप ॥६२॥
पापिणिका मणगटें । धरीला केशु उपाटे । तै वास्तव्य खुटे । मृत्यु लोकीचें ॥६३॥
असी चिन्हे उठती । तैं मेळु सांडी महाभूतीं । प्राणचि उत्क्रमगती । आणिक हि असे ॥६४॥
आंग कापे येक सरिसें । वदन घ्राण शोके तैसें । तैं जाणावें भवसें । वेचला आयु ॥६५॥
संपूर्ण चाले सूर्यगति । वामेचा हारपे निशापति । तैं पंधरा दिवसां गति । जीवाचि असे ॥६६॥
बाहिर शैत्य दीसे । अंतरी दाघु वसे । तैं थोडे चि दीवसे । यमां भेटिजे ॥६७॥
मळ मूत्र रक्त रेत । बाहिर पडे समवेत । तैं मासा येका निभ्रांत । प्राणु वेचे ॥६८॥
आइक छायापुरुषाचे लक्षण । शिष्या करुं निरुपण । स्वस्थ करुनि अंत:करण । आपुली छाया पूजावी ॥६९॥
शुध्द स्पटिक संकाश । व्यापुनी धरणी आकाश । हें चिंतुनि छायेस । पाहिजे नेटें ॥७०॥
पाटिं गगनीं पाहावा । श्वेतु दीसे तो सर्व ही बरवा । श्याम दीसे तो जीवा । घातु सांगे ॥७१॥
दीसे प्रसन्न रुप पींवळा । तो लक्ष्मीराज्याचि कळा । आरक्त दीसे डोळां । तो रक्त दावी ॥७२॥
जैं न दिसे कंठ स्थान । तैं षष्मासाचें गमन । शिर नसे तैं मरण । मासा येकाचें ॥७३॥
जैं समूळ सर्व न दिसे । तैं तात्काळ देह नासे । दक्षिणकरें यमफासे । बंधूसी पडती ॥७४॥
वामकरुं कां कटी । न दीसे तै भार्या निवटी । छिद्र पडे पोटी । तै नाशला पुत्र ॥७५॥
जैं न दीसती चरण । तै सांगे देशभ्रमण । राजा तो हि भिक्षाटण । कराव्या निगे ॥७६॥
जो चपळपणें हेलावें । तेणें स्थानभ्रष्ट करावें । दिसे न दिसे तैं जाणावें । दुर्घष्ट पुढें ॥७७॥
यालागीं श्वेत स्वांगे निर्मळु । असा तो सर्वदा सफळु । जो पाहातां पापाचा मळू । राहों नेदी ॥७८॥
देश स्वामीचे पाहिजे । तैं छायेवरी सत्य श्रावणी अक्षता टाकिजे । मग सांगीतली चिन्हे जाणिजे । रायाचा ठाई ॥७९॥
असा छाया पुरुष आणि कालज्ञान । श्रीशंकरे स्वमुखें आपण । हें केलें निरुपण । आदिमाते ॥८०॥
॥इतिकालज्ञान छाया पुरुष ॥ऽऽ॥
====
असो या जीव देहाची आटी । होय विराटाचा पोटीं । ते ही आतां परीपाटीं । उकलोनि देउं ॥८१॥
त्वचा आणि केश । अस्थि शिरा मज्जा मांस । हें ग्राशी सर्वस । वसुंधरांते ॥८२॥
लाळ मूत्र श्रोणित । स्वेदु आणि शुक्रीत । या पाचातें समूळ ग्रासीत । आप तत्व ॥८३॥
क्षुधा तृषा विश्रांति । चौथा आलस्य पांचवी कांतीं । यांची होय शांति । महातेजी ॥८४॥
धावन चळन आकोचन । निरुंधन प्रसरण । या पांचाचें अशन । वायु करी ॥८५॥
काम क्रोध मोह भय शोक । नभि मिळे हें पंचक । हें थूळ आटे आणिक । पुढील कथा ॥८६॥
तत्वाचे निजगुण । ते देवता पंचकी होती लीन । कां जें विषयाकारण झ। कथिलें मागां ॥८७॥
मलोत्सर्गु राक्षस नेति । रतव्य नें प्रजापति । उप इंद्र पादगति । नेती अंती ॥८८॥
करकर्म सुरेश्वरें । वाचा नेईजे जठरें । घ्राणकार्य निर्धारें । दश्र घेती ॥८९॥
स्वादें सहित रसना । गिवसीत जाय वरूणा । व्याप्तीसी पवना । त्वचा मिळे ॥९०॥
दृष्टी दृष्टव्य नयनी । धुंडोनि घे तरणी । जाणें श्रोतव्येंसी श्रवणी । दिशांतरा ॥९१॥
प्राणादि पंच पवन । ते नागादि पंचकारण । या दाहाचें संचरण । ब्रह्मांड पवनी ॥९२॥
जेणें व्दारें येति । तें तेथें चि निमति । हें शंकरमति । गोरक्ष ह्मणें ॥९४॥
अहंकार जाय वृषभवहनी । चित्त मिळे शेषशयनी । बुध्दि बोधव्य चतुराननी । लीन होय ॥९५॥
चंद्रमा शोषी मना । विष्णुनें अंत:करणा । हे प्रसिध्द विवंचणा । पूर्वज बोलिले ॥९६॥
जे देहीजे अभिमानी । ते च्यार्‍हि चहुं देवतातें लक्षुनि । जाती गा भर्वसेनि मूळस्थाना ॥९७॥
प्रलयीं हारपे सुषुप्ती । स्वप्रातें वोढी स्थिति । उत्पत्तीसी जागृती । भेटी जाये ॥९८॥
रज राजस अहंकारी । सत्व सात्वीकांचां घरी । तम तामसाअं भीतरी । समरस होय ॥९९॥
प्रकृति आपुलें विकारे । मूळ प्रकृतीसि भरे । पूर्ण चैतन्यीं संचरे । पृथक्क्‍ चैतन्य हें ॥१००॥
पिंड वेचती ब्रह्मांडी । अविद्या पडे माये तोंडी । या जीवाची वासोंडी । शिवुसेवी ॥१॥
एवं कारणी कार्य मिळे । जेथील तेथें वितुळे । आलें गेलें न कळे । कोण उरले ॥२॥
असा देहाचा व्यापारु । जो दिसे साकारु । तो होय निराकारु । देहपातिं ॥३॥
एरि जनविवंचना । ते न ये ची शंभूच्या मना । ये आपुलाल्या निजस्थाना । गिवसीते जाति ॥४॥
हे त्वं पद निभ्रांत । तत्पदीं होय शांत । एवं मूळ भूमिका गिवसीत । जाति सर्वें ॥५॥
जें इंद्रियें विसंचु लाहे । तो ची तेथीचा व्यापारु जाय । थूळ विसंचे होय । व्यापारा नाशु ॥६॥
लिंग देहा विसंचु होय । तेणें सर्व हेतु जाये । घुमारलेंपणें राहे । तो कारणीं संगुं ॥७॥
महाकारणी हेतु असे । जैं तेथे हि विसंचु बैसे । तैं निजधामिं प्रवेशे । श्री महाराज आत्मा ॥८॥
यास्तव आत्मविद जनी । मोडिली संश्रृति खाणि । कां जे ये परीचि आटणि । देखिली तेहिं ॥९॥
ज्याचें आंगीं शासन । तो हें मानिल प्रमाण । येरां पाठकां गुरुविण । गम्य कैचें ॥१०॥
ज्ञानार्णवीचें जीव पाणी । यासी पुनर्जन्माची हळनी । न पवति गा भर्वसेनि । वेचु जालेया ॥११॥
असा वेचु जालेया अचेत । उरले नाशेल प्रेत । तें नाशलयां निभ्रांत । दुजें नव्हे ॥१२॥
कां जो विसंचला मेळु । तो चि नये केवळु । हा अन्योय सकळु । यावा असे ॥१३॥
जो विसंच विलयो । तो चि सर्वही प्रळयो । हा चि पुरे समयो । साकाराचा ॥१४॥
इति देहप्रळयो ॥ऽऽ॥
====
हा देह विसंचु सुरसु । जेव्हां पडेल अवकाशु । तेव्हां मानूनि विश्वासु । पढावा सुखें ॥१५॥
हा पडता श्रवणी । करी संसारभाजनी । तैं जन्ममरणाचा डोलणी ई। तो न पडे कहिं ॥१६॥
जन्मा आलेयां येक वेळां । देखे विसंचु सकळां । तो अजन्म पद हींदोळा । साच पहुडे ॥१७॥
हे विसंचीक शरीर । प्राणप्रयाणी नर । स्मरतां न पवती घर । चित्तभ्रमाचें ॥१८॥
विनश्यति विकार वेळे । जैं हें सविवर कळे । तैं सर्व पदा आगळे । ब्रह्म लाभे ॥१९॥
जेवि होमितां आहुति । पुनरपि करि न येति । तेवि वेचली देहस्छीति । संसारु ने घे ॥२०॥
संशयरहित ब्रह्मार्पण । जर्‍हिं होय मरण । तर्‍हिं येक कारण झ। असे येथें ॥२१॥
जन्म मरणाचें दुथडे । हें जैं जीवा साच घडे । तैं नि:काम ते ही विरुढे । सत्य जन्मु ॥२२॥
जें अनाश्रित कल्पिलें । किं न पिकों ह्मणूनी पेरीलें । अथवा कृष्णार्पण ह्मणौनि घातलें । शुध्दभुमिके ॥२३॥
परि तें सलोळ बळें । अंकुर घेउनी गाहाळे । हें अवश्यमेव फळें । तैसिं ते कर्में ॥२४॥
जर्‍हिं ईश्वरी बुध्दी जाली । कर्मे संशयें सांडिलि । तर्‍हिं देह विसंचे भली । दशा जोडे ॥२५॥
जो घे जीवाचा गळाळा । तो जि वमुनि देणे गळां । असा नोहे दुबळा । आत्मधि ॥२६॥
जर्‍हिं हें साच वचन । तर्‍हिं देहविसंचु कारण । कां जे निश्चयाचें उत्थापन । येणें नव्हे ॥२७॥
जर्‍हिं साच जन्ममरणें । तर्‍हिं हीं सत्य यें प्रमाणें । कां जे देह वेचूनि घेणें । पूर्ण पद ॥२८॥
असा हा देहविसंचु । गांठीं बांधवा मानुनी साचु । तरी उभय अर्थी प्रपंचु । वस्तु होय ॥२९॥
सर्वदि अस्माधानि । विसंचु पडावा श्रवणी । शरीर उत्क्रमणी । विशेषें भला ॥३०॥
निवर्त्तली याफ़्चा दहनी । कोण्हि उचारी स्मशानी । तर्‍हि तो नाशलाहि प्राणि । मोक्षु पावे ॥३१॥
पढतां दशहादि उत्तरकर्मि । तो नाशला उध्दरे ये वर्मि । पतितु भ्रष्टु अधर्मि । तो मोक्षु पावे ॥३२॥
तीर्थि श्राध्दिं पार्वणि । ह्मालयादि पींडदानीं । दे विसंचु भलतेनी । उचारावा ॥३३॥
बृहदार्णिकीं वेदीं । हा चि निर्धारु असे वेदीं । देहविसंचु प्रबुध्दीं । उचारावा ॥३४॥
तैं पूर्वजांच्या पांति । अजन्म पदातें पावति । असतां नसतां संसृती । विसंचु भला ॥३५॥
जै पूर्वज पितृस्थानी । तैं जन्मे कोण प्राणि । जन्मु घेतला तैं पींडदानी । कोण भोक्ता ॥३६॥
जन्म कां पितर स्थान । हें मानावें प्रमाण । तैं भूत सृष्टी संचरण । कोणाचें असे ॥३७॥
इत्यादि नाना विचारु । वरिगणेंसी निर्धारु । देह विसंचु साचारु । करुंन घेणें ॥३८॥।
जन्मा आलेयां येक वेळां । वेचलें देखावें सकळ । तैं बोधु नसे तर्‍हिं केवळ । पद जोडे ॥३९॥
हें अपूरें देह वेचितां । लाभे सर्वाची सायुज्यता । आणि वस्तुचिं पूर्णता । आंगी बैसे ॥४०॥
ह्मणौनि सर्वही प्रकारें । वस्तुज्ञान विचारें । देहविसंचु चातुरें । आदरें घेणें ॥४१॥
जंव वश शरीर सचेत । तंव विचारावें स्वहित । येणें नश्वरें आदिवंत । अविनाश घेणें ॥४२॥
धरुनि नावेचां आधारुं । उत्तरावा गंगापारु । तेवी करे न पवीजे संसारु । येणें देहें ॥४३॥
जैसें कां कूपीचें जळ । करे न पवीजे केवळ । यासी पाहिजे बळ । रजोपात्राचे ॥४४॥
तैसें ब्रह्म सखोल । आहाचें मतें नलगे बोल । हळुवें आखरीक बोल । नातळति यासि ॥४५॥
यास्तव बहुतांच्या उपकारा । कृपा उपजली शंकरा । उघडावया मोक्ष व्दारा । हे कीलि दिधली ॥४६॥
असीं पूर्वप्रणीतें वचनें । गुरुची जें गुह्यज्ञानें । तें उजळिलीं येणें । बाळबोधें ॥४७॥
यास्तव श्रोते हो आदरें । तुह्मीं घ्यावीं हें उत्तरे । माझी भक्ति प्रत्याक्षाकारें । सफळ करा ॥४८॥
मी कां जी बोलों अधिक । तुह्मी शब्दरत्नाचें परीक्षक । माझे कष्ट सार्थक । तुह्मा करीता ॥४९॥
यास्तव त्रिंबकु विनवी प्रेत्नें । ये मध्यखंडीचि शब्दरत्नें । भूषणें करावीं यत्नें । श्रवणपुरुषा ॥१५०॥
इतिश्री चिदादित्यप्रकाशे श्री मव्दालावबोधे । ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे मध्यखंडे जीवप्रलय नाम पंचदश कथन मिति ॥१५॥

इति श्रीमद्भैरवात्मज त्रिंबक विचचित श्रीमव्दोध मध्यखंड संपूर्णमस्तु ॥ शुभमस्तु ॥ श्रीमब्रह्मार्पणमस्तु ॥
शके १५७५ विजयसंवत्सरे मार्गशीर शुध्द ३


N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP