मध्यखंड - आत्माप्रतिपादन

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


सत्यं सत्यं पुन: सत्यं शरीर ज्ञानब्म्धनं ॥
वंध्यातनयसर्वांग भ्रमादन्योम्यविद्यते ॥१॥
अरें हे देह आरुतें । ऐसें जाण रे निरुतें । या चि मध्ये आत्मयातें । नेमु नये ॥१॥
आत्मा आधारीं ना षट्‍दळी । मणिंपूरींना अनाहत कमळीं । विशुध्द चक्रीं भ्रूमंडळीं । तेमुं नये ॥२॥
हा आत्मा कोण्हे काळीं । बांधला नये अष्टदळीं । ब्रह्मरंध्रीं महास्थळी । नेमस्त नसे ॥३॥
कंदु लिंग कुंडळनी । सुषुम्णणा लंबिका त्रिवेणी । चोहटा सत्रावीं मूर्ध्री । नातुडे बापा ॥४॥
त्रीकूट श्रीहठ गोल्हांट पुरीं । भ्रमरगुंफा पूर्णगीरी । बहु सून्याचे भरोवरी । नातुडॆ आत्मा ॥५॥
आत्मा सर्वत्रीं असे । निर्धारें मानीं तु ऐसे । एकदेशी येकवासे । राहे ना हा ॥६॥
देह हाडाचा मेळु । मास त्वचेचा गोळु । हा चालवी सकळु । परीश्रमु नेणे ॥७॥
रोमरोमीची वेदना । तैसी चि सुखें नाना । या सर्वांचा जाणना । तो जाण रे आत्मा ॥८॥
॥ इति थान मान निरसन ॥ऽऽ॥
====
तुं ह्मणसी श्रेष्ठ स्थूळ । तरी हें सर्व ही वोफळ । आत्में वाचुन केवळ । अनोपकारी ॥९॥
तुं ऐसें ह्मणसी । साविकार आत्मयासी । तरी हे थूळाचें भोग ऐसी । निष्ठा असे ॥१०॥
तैसें याचि साहि उर्मिं शिष्यवरा । आत्मया नाहिति साचारा । या जीवा प्राणा मना शरीरा । नेमें असती ॥११॥
या थूळाचें कार्य कारण । तें आत्मदेवा सर्व ज्ञान झ । हें बापुडें अचेतन । वर्तवी आत्मा ॥१२॥
ह्मणसी थूळ सर्व जाणें । तरि चित्ताग्रीते का नेणें । आत्मगती नाशनें । हा धर्मु याचा ॥१३॥
जो आत्मा येथें असे । तो चि हें सर्वज्ञ दीसे । हे आत्म चि चाळि जैसें । नापिक गृह ॥१४॥
फेडीली हेमाची त्वचा । आकरु दीसे लाखेचा । तेवि आत्मेंविण थूळाचा । अकारु असे ॥१५॥
॥ इति थूळ निरसनं ॥ऽऽ॥
====
आतां कोण्हि मतिभ्रष्ट । ह्मणती लिंगदेह वरीष्ठ । परी यव्दिषईं नीष्ठ । वचन आहे ॥१६॥
थूळा सांडने अंगीकरणें । हें ह्मणों घेतलें येणें । तरी जेथ सुख इच्छवे मनें । तेथ दुख तें काई ॥१७॥
येणें चळति इंद्रियें । ऐसें मानि निश्चयें । परी तुं प्रतिबिंब न्याये । पाहे यातें ॥१८॥
हें समर्थ नव्हे लिंग देह । येथ न मनी गा संदेह । आपुलें हि ज्ञान गुह्य । जाणें चि ना हे ॥१९॥
हिरण्यगर्भाचें अंश । येथ भासती सर्वस । या चि स्तव अविनाश । बोलों नये ॥२०॥
॥ इति लिंग देह ॥ऽऽ॥
====
तिसरें देह कारण । ह्मणसी सर्वाचें जाण । परि सर्वाद्य ऐसें प्रमाण । पावे ना हें ॥२१॥
लिंग देह स्वप्री जागरी । ते नसे निद्रेचां भरीं । हें निद्रे नेमिलें तरी । ज्ञान नाहिं ॥२२॥
ज्यासी मूळि चि हेतु नसे । तें सर्वज्ञ होईल कैसें । यासी लाउ नये पिसें । समर्थपणाचें ॥२३॥
आत्मा सर्वातें जाणें । तें हे काहिं ची नेणें । आत्मदेवाची भूषणें । न सजती यासी ॥२४॥
जेथ सुषुप्ती अवस्था । आणिकि हि अज्ञान वेवस्था । कारणदेह समस्ता । विषइं अज्ञान ॥२५॥
॥ इति कारणदेह निरसनं ॥ऽऽ॥
====
आतां देह महाकारण । जें आठवाचें लक्षण । यासी हि आत्मा प्रमाण । देऊं नये ॥२६॥
हें मायेचे प्रतिबिंब असे । गेलेम ज्ञान प्रकाशे । विस्मृति हेतु प्रवेशे । ते हे देह ॥२७॥
हे हो करावया समर्थु । सर्वों परी आत्मनाथु । एवं यां चौदेहासी शुध्दार्थ । मानूं नये ॥२८॥
॥ इति महाकारण देह नि०॥ऽऽ॥
====
आतां कोण्हिं घेती पक्षु । जे सर्वादि जीव प्रत्यक्षु । येणें हिं मते दक्षु । ज्ञाता नव्हे ॥२९॥
जीव समर्थु असता । तरि विस्मृति कां पावता । प्राणापानीं भ्रमतां । मानिता श्रमु ॥३०॥
आणि देहांति जीव नसे । महासीध्दि नेमिलें ऐसें । आहे तरी गर्भवासे । भ्रमितु होय ॥३१॥
जो आपुला हितार्थ नेणें । ना वारिना जन्ममरणें । ऐसा तो समर्थपणें । वाखाणू नये ॥३२॥
जैं काक विसावते चंद्रि । महाद्रि तरते समुद्रिं । कां प्रळयाग्रिचां भद्रिं । नांदते तरु ॥३३॥
तैंसा च या जीवासी । एती श्रेष्ठ दशा ऐसी । यास्तव या नश्वरासी । मानू नये ॥३४॥
॥जीवनिरसन ॥ऽऽ॥
====
येक ह्मणती आत्मा हंसु । तरी तो शब्दु श्वासोश्वासु । करी निर्गमु प्रवेशु । दोहिं शब्दिं ॥३५॥
प्राण घ्राणव्दारें । चालती जें दोनि अक्षरें । तो हंसु ये उत्तरें । पूर्वप्रणति असति ॥३६॥
हा स्थितिप्रळयातें नेणें । मां सुखदु:ख काय जाणें । जो वर्ते पराधीनपणें । अनादि नव्हे ॥३७॥
प्राण चि आत्मा हें वचन । बोलतां वाचेसी दूषण । हें चि मानिति ते जन । हीनविवेकी ॥३८॥
हें सर्व प्राणाधीन । प्राण शरीरा कारण । या प्राणदेवा वाचुन । सर्व वावसें ॥३९॥
या प्राणाचें आधारें । चळती सर्व साकारें । वेदिं यासी चि साचारें । रुप केलें ॥४०॥
परी गा स्वप्र जाग ना सुषुप्ती । प्राणाचि येकी चि गति । मारितां रक्षितां वित्पत्ति । नकळे तया ॥४१॥
क्षुधा तृषा प्राणु जाणें । ये हिं वाउगीं प्रमाणें । ये श्वासाकरितां पचनें । होति देहीं ॥४२॥
व्दारे झरती जेणें । तो अपानु मलमूत्रातें नेणें । स्वादु जंभन बोलनें । हे उदाना न कळे ॥४३॥
नाडी शिरा गात्रें चाळकु । तो समानु नेणें हा विवेकु । व्यान सर्वाग व्यापकु । परी व्याप्यातें नेणें ॥४४॥
यासी आत्मतंतु कारण । याचे कळे चळती प्राण । यास्तव हे पराधीन । पर नव्हती ॥४५॥
॥ इति प्राणनिरसन ॥
====
पूर्ण सदा अंत:करण । निर्विकल्प घेति ज्ञान । हे व्योमा कार्य पुराण झ। परी विष्णूचा उलथां ॥४६॥
हें गुह्य ज्ञातारा गुज । चतुर्विध कारण बीज । परी गा सर्वथा हे मज । श्रेष्ठ न गमे ॥४७॥
समर्थे होईजे अंत:करणें । तरी यातें चि चालावें कवणें । देहिची पूर्वापर ज्ञानें । न कळति यासी ॥४८॥
आईक मनाचे खेळ । चाळि हें सर्व जगडाळ । आणि नभापरीस सकळ । व्यापक होय ॥४९॥
हें आपुलें वहिलेपणा । डोई काढु नेदी पवना । हें प्रतापें हुताशना । दाहों पाहे ॥५०॥
हें सर्वत्रीं सन्मीळ । यास्तव मागां घाली जळ । धारणें कठिणत्वें बळ । भूमिचे हरी ॥५१॥
मन जीवाचें जीवन । मना नेमिति जीवपण । या मनासी हें ची मन । चाळक असे ॥५२॥
संसार मनाचा अग्रिं वसे । ब्रह्म मनें प्रकाशे । कर्माकर्म वसे । मनाचां ठाईं ॥५३॥
यास्तव कपाळी शैव शांभव । आणिक ही महानुभाव । येही सर्वापरी सर्व । मन प्रतिष्ठिलें ॥५४॥
परि हें मन सर्वज्ञ ह्मणीजे । तरिं आठविं विसरु कां उपजे । सुख ईछी तरी दुजे । दु:ख कां पावें ॥५५॥
विश्व बुध्दीं वर्त्तत । बुध्दिं आत्मा प्रकाशत । ऐसें घेतलें मत । बुध्यादिकीं ॥५६॥
बुध्दी सर्वज्ञ ह्मणीजे । तरी बुध्दिसी अबुध्दी कां उपजे । हे सर्व ही चाळिजे । एकें आत्मेंनि ॥५७॥
देह गात्रांचि मेळिं । अहंकार कवळोनि चाळि । करि हरी पाळि । समर्थु हा चि ई॥५८।
तरि अहंकारें अहंकारु निरसे । मुख्य बंधन आहाच असे । यास्तव ये उव्दसे । मानावी मतें ॥५९॥
चित सर्वज्ञ जैसें तैसें । आत्मा तत्विं समरसे । आत्मा चित सरीसें । गणों नये ॥६०॥
॥ इति अंतकरणादि निरसनं ॥ऽऽ॥
====
जें श्रोत्रिं आइकणें । तें आत्मयांचे चि करणें । त्वचेंचें सर्व ही जाणें । हा चि देवो ॥६१॥
येकां पुरुषां चक्षुज्ञान । सर्वासार हे लोचन । पाहातां जें जें चीन्ह । तें नेत्री दिसे ॥६२॥
येथीं चि सौदर्यपण । या चि मध्यें सर्व वर्ण हरिहर । धातादि करुन । येथें चि घेणें ॥६३॥
हें चि येका मह्द्रुज । परि मज मानितां बैसें लाज । यासी असनें नाशनें नीज । उघड झांपी ॥६४॥
चक्षुविण जीवजात । केव्हां ते जाले आत्मरहित । लक्षां परी हीनमत । या ज्ञाताराचें ॥६५॥।
रसना सर्वज्ञ सारे । घेउनी उठे शरीरे । नाना स्वादास्वाद आधारे । इचेंनि उठती ॥६६॥
परि आत्मयोगें शब्द स्वाद । ते हें जाणें एवंविध । आत्मयोगें गंधागंध । घ्राण घेते ॥६७॥
॥ इति ज्ञानेंद्रिय पंचक निरसनं ॥ऽऽ॥
====
जैं हे वाचा फांटा चढे । तैं ईश्वरेंसि तुकी खडे । साच लपौनि पवाडे । आपुलें दावीं ॥६८॥
जैं हे प्रपंच निरसी । तैं ब्रह्म चि प्रकाशी । बेदशास्त्र पुराणासी । हें चि मूळ ॥६९॥
निर्धारुं पाहे आत्मयातें । तो हें वाचा इंद्रिय आरुतें । मुख्य चौं वाचाते । प्रकाशी आत्मा ॥७०॥
आलिंगनें नमनें अर्चनें । कर इंद्रियें न होति पूणें । पूर्ण आत्मा तेथ चरणें । किउतें गमन ॥७१॥
शीश्न सर्वाकारण । जाणें सुरतसुख गहन । जया पासाव उत्पन्न । सर्व सृष्टी ॥७२॥
वित्त प्राण अमृत पदें । नीचें जेथीचें आनंदे । आत्मक्षीरार्णवविधें अनुबिंदे । कामसुखें ॥७३॥
जेथ सुर पदांची बळीं । तेथ यासी कोण कवळी । याची परी गुदमंडळी । मानू नये ॥७४।
॥कर्मेद्रिय पंचक नि०॥
====
आइक शब्दा पासून । चाले वेद शास्त्र पुराण । मंत्र स्तोत्र गायन । गीत पदें ॥७५॥
हा सर्वां आणि द्शा । परि नये आत्मप्रकाशा । स्पर्श तो हि तैसा । न गणावा तेथ ॥७६॥
रुप पाहातां प्रमाणीं । सर्वांते शोभा आणि । परी आत्मदशेची सीराणि । रुपा राहे ॥७७॥
रसें आत्मा नेणिजे । तैसा चि गंधें ने धीजे । हे विषयपंचक ठेवीजे । येकी सवां ॥७८॥
॥ इति विषय पंचक नि०ई॥
====
आत्मा पूर्ण बोलतां । हे भूमि भरैल तुझीया चित्ता । मूर्त्ति प्रतिमा अनंता । ये भूमि चि अंगे ॥७९॥
स्वर्गें दीपे पाताळें । शैळ सागर तीर्थें स्थळें । हें सर्व भूमि वेगळें । गणों चि नये ॥८०॥
एवं सर्वाद्य श्रेष्ठ मही । परि आत्म विषईं समर्थ नाहि । पुढील जल धर्म तोही । आईक आतां ॥८१॥
हें सर्वाचें बीज मूळ । सर्व पाळक आणि सन्मीळ । तीर्थे गंगादि सर्वजळ । पवित्रकर्ते ॥८२॥
तरी मुख्य जळ नाशीवंत । यासी धरीतां कोण हीत । आतां तेज सर्व प्रकाशवंत । येक ह्मणती ॥८३॥
ग्रह तारा शशी भानु । प्रकाशु तेजा ची पासूनु । दाता हर्ता हुताशनु । हे तेजाचें अंग ॥८४॥
हें आत्म रुपीं असतें । कां आत्मयातें प्रकाशीतें । तरी शुध्दसत्वात्मक हें बोलतें । कासया वेद ॥८५॥
वायुं सर्वत्रीं सर्वगतु । ब्रह्मादि जीवातें पाळितु । हा शोषीता सदंतु । पुरोनि उतला ॥८६॥
यां वात तत्वाचें पीसें । आत्मयां न लवी वावसें । तें भरें वोहटे ऐसें । अपूरें नव्हे ॥८७॥
खं ब्रह्म हें वचन । आत्मा निजे गगन । हें सुख दु:ख विहीन । सर्वा ही व्यापक ॥८८॥
आत्म देवा आकाशा । प्रमाण नव्हे सहसा । मृन्मय पात्रीं जैसा । अमृतरसु ॥८९॥
एवं पंच तत्वें सकळें । वर्त्तती येकें आत्मकळें । तो आत्मा कोण्हाचेंनि चळें । ऐसा नव्हे ॥९०॥
मही आधारुं सर्व लोकां । या ची धरीलें ब्रह्मादिकां । परी आत्मया अणुमात्र टेकां । न लगे ची ईचा ॥९१॥
सन्मीळ सारिखें सकळां । वरी पाळनधर्म जळां । परी हें आत्मयां कोण्हे वेळां । पाळी ना गाळी ॥९२॥
तेज प्रकाश नवाळी । अंति ब्रह्मांड हि जाळी । परी आत्मदेवा कोण्हे काळी । दावी ना दाही ॥९३॥
शोषीता पोषिता पाळिता । वासुं सर्वांते चाळिता । तो आत्मविषई न्यूनता । सर्वे परी ॥९४॥
सर्व व्योमी सामावे । व्योमें व्यापिली सर्वें । ते आत्मया कोण्हें भावें । व्यापी ना वाडी करी ॥९५॥
॥पंच तत्व नि०॥
====
असो हें गुणा पासाव शरीर । गुणें चळे साकार । या गुणत्रयाविण येर । कांहि चि नसे ॥९६॥
रसो राजस सृष्टीकर्त्ता । शांति सात्विक पाळिताएं । उग्र तामसु संहर्ता । हें याचें कर्म धर्म ॥९७॥
तैसा आत्मा जाणें तानें । कहिं काळांतरि नेणें । वंध्या पुत्राचें साजनें । गुणज्ञाना हे ॥९८॥
॥ इति गुणत्रय निरसनं ॥ऽऽ॥
====
समस्तां मूळ ऊँ कारु । तेथूनी सर्व ही डंबरु । हा ब्रह्म एकाक्षरु । सृष्टीकर्ता ॥९९॥
ऊँ मित्येकाक्षरंब्रह्म । हें आदि प्रभुचें वर्म । सृष्टी शब्दाची सीम । हा चि देव ॥१००॥
प्रबुधी नाना मतें । ब्रह्म चि नेमिलें यातें । परी या ऊँ कारा परुतें । परम तत्व ॥१॥
॥ ऊँ कार निरसनं ॥
====
हे अविद्या चि आत्मा रुपा आणि । हे सर्व ही अविद्ये पासुनी । ब्रह्मी अविद्या जेवि गगनी । रेखा उमटे । २॥
हे कार्य कारणीं अविद्यमान । तरी ईसी कोणतें प्रमाण । या मृगजळाचें लक्षण । आरोप ईसी ॥३॥
हें अविद्या स्वभावें नसे । आहे तरी ब्रह्मीं निरसे । ये अविद्येचें पीसें । लागो नये ॥४॥
अविद्या नाहिं निर्धारी । महामाया याची परी । जें देखीजे साकारीं । सर्वगत ॥५॥
हें पूर्णेसी परीपूर्ण । नसे अधीक ना न्यून । निर्गुणासी चेतवन । चेतवीति हें चि ॥६॥
हें महब्रम शबळ । या ची रचिलें जगडाळ । मायेसी ईश्वरु वेगळ । मानू नये ॥७॥
हे समर्थ सर्वगुणी । परी आत्मा नव्हे भर्वसेनि । जैसा क्षीराब्धि विषाची योनि । परि तो विष नव्हे ॥८॥
॥ इति अविद्या माया निरसनं ॥ऽऽ॥
====
ये माये पासाव सर्वेश्वरी । रुपा आलि देह च्यारी । तेहिं आत्मविषईं निर्धारीं । पाहों आतां ॥९॥
थूळ देह विराटु । पुरुष ढीशाळ अचाटु । आदि मध्यें सेवटु । न कळे याचा ॥११०॥
अत्मप्रलयाविहीन । यासी प्रळय निर्माण । स्थिति संहार उत्पन्न । देहमात्रां ॥११॥
आईक हिरण्यगर्भु सार । जें देवतामय शरीर । पिंड ब्रह्मांड साकार । चळे जेणें ॥१२॥
अविनाश पूर्ण । ऐसें येकाचें वचन । हें हिं नश्वर छिन्न भिन्न । आत्मा नव्हे ॥१३॥
अहंकार देह कारण । विश्व चळे जेथुन । पिंड ब्रह्मांड सगुण । विस्तारलें जेथें ॥१४॥
जैं माया प्रगटे गुण क्षोभिणी । तैं यातें कोण मानी । आत्मा नव्हें भर्वसेनि । हें चि निकें ॥१५॥
चौथें माया महा कारण । यातें हि आत्मा न ह्मण । कां जे महामाया लीन । आत्मस्थानी होय ॥१६॥
आत्मा सच्चिदानंद । हा चि बोइलु प्रबध्दु । कां जे शाश्वत अभेदु । पदत्रयीं ॥१७॥
ते जें वेगळें गणिजे । तो तो आत्मा न ह्मणिजे । निर्धारीं पूर्ण देखीजे । तैं चि फावे ॥१८॥
हा सर्व ही आत्मा जाण । आतां सांडी भेदभीन्न । वेगळें घेतां प्रमाण । सुख कैचें ॥१९॥
पत्र पल्लव गणना । शब्द न येति प्रमाणा । तो तरु ‘तरु ’ या वचना । आटोपे जैसा ॥२०॥
तेवि येक चि सर्वां मिळोन । देखीजे तें विश्रांतिचें लक्षण । वेगलें घेतां नित्य पूर्ण । हातिचें जाय ॥२१॥
यास्तव कथनचा कथनी । बोलिजे निर्धारु वचनी । त्रिंबकु ह्मणें हे मांडणी । बाळबोधाची ॥२२॥
इतिश्री चिदादित्यप्रकाशे श्रीमव्दालावबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे मध्यखंडे आत्माप्रतिपादन नाम व्दादश कथन मिति ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP