मध्यखंड - जीवसृष्टी युक्त मानी देह उत्पन्न

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


सर्वातीतस्वरुपेऽपि सर्वसत्तातिगोऽपि वा ।
स्वसत्तापूरितं जगद्रूपो चात्मप्रकाशक: ॥१॥
आतां निर्धारु येथुनि । व्दितीय खंड मांडणी । जीवा पासुनि उभारणी । ब्रह्मवरी ॥१॥
जीव अविद्या सन्निधानें । जड होति जन्म मरणें । झांकोळे प्रकारे येणें । शुध्द वस्तु ॥२॥
ब्रह्म हेंमी जीव लेणें । पांति चटें जन्म मरणें । ईश्वरत्व हेम उणें । होये चि तेथें ॥३॥
ते ज्ञानाग्रीचेनि पुटें । अविद्या डांक पालटे । पाठि नाशे ना तुटे । शुध्द वस्तु ॥४॥
असो हें सर्व जीवांकारण । येकी नरयोनि प्रमाण । येथीच्या कर्मापासुन । गति आणि अवगति ॥५॥
नरदेहीं आचरावें । तें येरां योनी भोगावें । भोग पुरलियां हि यावें । ये चि योनि ॥६॥
येका नरदेहा वांचुनि । येरां समस्तां ही योनी । धर्माधर्म त्यांचा स्थानीं । कांहीं चि नाहिं ॥७॥
यास्तव सर्वांहोनि सार । मानवी देह महा थोर । याचें ज्ञान सविस्तर । करुं तुज ॥८॥
नरदेह येव्हडा समर्थु । मूळीं होवावया कोण अर्थु । तो सांगो पदार्थु । यथाविध ॥९॥
अनादि ब्रह्म साचारु । रुपा आला ईश्वरौ । ते ईश्वरीं विकारु । माया भासे ॥१०॥
स्वस्वरुपाभिमानें । दुसरें कल्पिलें तेणें । तो येणें चि दूषणें । लाजिला तो ॥११॥
जे मिं येकु दुजे कल्पितां ।हे चि लाज त्या अनंता । तेणें द्रविला निरुता । अंग स्वेदु ॥१२॥
त्या स्वेदाचें कौतुक । स्वेदें जालें उदक । त्या उदका ही अधीक । फेनु आला ॥१३॥
फेनाची मुद्रा आळुमाळु । ते चि जाली शर्कराकारवाळु । वाळुचे अश्मे भूगोळु । रुपा आला ॥१४॥
येथहि काहि होणें । ऐसें जो काल्पिलें तेणें । तो तेथीचें भावने । भैरव जाले ॥१५॥
अष्टधा प्रकृतिचे भाव । देवरुपी जाले ते देव । समर्थ ह्मणौनि भैरव । त्यासी ह्मणीजे ॥१६॥
हें ही जालयां कारण । नव्हे प्रजाचें उत्पन्न । मग त्याच्या मनापासुन । मनु जाले ॥१७॥
पंचतत्वाचे कारणगुण ।ते पंच महद्देव पूर्ण । हे पूर्वखंडी खुण । दाविली मागा ॥१८॥
यही याग करावे । हे आज्ञा केली देवें । ते आज्ञा अभावें । गेली तेथें ॥१९॥
जाला आज्ञेसी अव्हेरु । रुदना करी सर्वेश्वरु । तेथ चालिला पूरु । अश्रपाताचा ॥२०॥
त्याचे नेत्रजळबिंदू पासुन । जाले रुद्र उत्पन्न । त्याचें नव्हे प्रमाण । कीति ऐसें ॥२१॥
ऐसीया रुद्रा अपारा । समर्थ रुद्र अकरा । या ही मध्यें शंकरा ।रुप जाले ॥२२॥
ऐसें रुद्र देखोन । हर्षले देवाचे मन । त्या हर्षापासुन । ऋषि जाले ॥२३॥
मागील जाले ते सर्व । यासी ह्मणावे देव । जे जाले हर्षापासाव । तें ब्रह्मऋषि ॥२४॥
त्यासी करुनि संज्ञा । देवें दीधली आज्ञा । जे तुह्मी माझी प्रतिज्ञा । सीध्दि नेणें ॥२५॥
ते स्वबुध समर्थ । घालुनि वेदाचे अर्थ । पावावया पदार्थ । मांडीले यागीं ॥२६॥
तवं शिष्यें विनविले । जी देवा पासाव सर्व जले । परी वेद नाहीं सांगीतले । प्रगटले कैसे ते ॥२७॥
तवं एरु ह्मणें जाणिजसु । वेद देवाचा निश्वासु । या बोलाचा विश्वास । बहुतिं केला ॥२८॥
असो ते देव ऋषिश्वर । मंत्री होउनि सादर । मंत्रशक्ति जठर । चेतविले ॥२९॥
मंत्रें मुखें पसरत । मंत्राच्या आहुती घेत । ऐसें खवळले हुत । मंत्रशक्ति ॥३०॥
या हुताची ज्वाळ । उठे व्यापुनि अंत्राळ । चालिले धूम्रकल्लोळ । विशाळ तेथें ॥३१॥
त्या धूम्रापासाव घन । जाले दीर्घ उत्पन्न । जे वर्षाव आझून । करिती सृष्टी ॥३२॥
विस्फुलिंगा पासुन । ते चि विद्युचें प्रमाण । याग गर्जना आझून । अभ्रिं असे ॥३३॥
त्या मेघाचि वृष्टी । जळमय जाली सृष्टी । या नंतरें गोष्टी । परीस नीकी ॥३४॥
ते वृष्टीचा संबंधी । उत्पन्न जालीया औषधी । वनस्पति नानाविधि । भूमंडळी ज्या ॥३५॥
त्या पासाव जीव । उत्पन्न जाले हे सर्व । विकल्प धरीसी तरी भाव । परीस याचे ॥३६॥
जळ जमे नाशे जेथें । जीव कां वनस्पती उठे जेथे । ते काळी उत्पत्तिकर्ते । मुख्य जळ ॥३७॥
वेद वेदांत हॄषीकेशी । त्याची प्रमाणें आहे यासी । यागाची सृष्टी सर्वासी । हें चि मानें ॥३८॥
येका मनुष्या वाचुनी । उत्पन्न जालीया सर्व योनी । वनस्पती आदिकरुनी । धातुशीळा ॥३९॥
हे जालया रचना । न धाय देवाची वासना । कां जें यागु कराव्या कोण्हा । आहोता नाहिं ॥४०॥
पाठिं देवी मनविकारे । विभागुनि आपुली तेजें सारें । काढोनि रचीलीं सुंदरें । मानवी देहें ॥४१॥
देवाचें तेज गोठले । कोणा तेजाचें काय जालें । तें सांगों वेगळाले । आईक आतां ॥४२॥
विष्णु तेजें अंत: करण । चंद्र तेजाचें मन । बुध्दी दे आपण । आदिधाता ॥४३॥
जळशायी तेजें चित्त । रुद्राचा अहंकारु निभ्रांत । आतां सांगों आगत । इंद्रियांचें ॥४४॥
श्रोतव्येंसीं श्रवण । येती दिशा पुरुषा पासुन । त्वचा सहित स्पर्शन । वायुतेजाचें ॥४५॥
दृष्टी द्रष्टव्य तेज । यावया भानु बीज । जीव्हे रसयितव्य काज । जळाधीपतीचे ॥४६॥
गंधे सहीत घ्राण । यावया सुरवैद्य कारण । वाचे वक्तव्या हुताशन । दाता होय ॥४७॥
पूर्वाधीश सुरपति । तेथीचें चळन ये हातिं । चरणें सहित गति । उपेंद्राचि ॥४८॥
शीश्नी रति संतोशु । यावया प्रजापति शेषु । गुदी मलोत्सर्गु विशेषु । नैऋत्याचा ॥४९॥
महव्दायु पासून । देहि आले प्राण । पंच देवता गुण । पंचविषय ॥५०॥
यक्ष किन्नर देव । येर सर्व ही जीव । या मध्यें मानव । श्रेष्ठ केलें ॥५१॥
असें सर्वाचे विकार । येकवाटलें साचार । ते हें उभारले शरीर । जीव देह ॥५२॥
सुगंध वनिता वस्त्र भुवन । गीत तांबूल शय्या भोजन । चतुर्विध अन्न । याचिस्तव ॥५३॥
नृत्य वाद्य भक्ति धर्म । विधि निषिध कर्माकर्म । ज्ञानाज्ञान नेम । याचिस्तव ॥५४।
वेद शास्त्र पुराण । दया दान दमन विधान झ। फळें पुष्पें धान्य तृण । कंदे मूळें ॥५५॥
लेहें पेहे चोष्ये खाद्य । याचिस्तव सकळिकें । नेमिलीं पुण्य पातकें । एचि देहि ॥५६॥
मातु भगिनी दुहिता । पुत्र स्वसुर स्वजन पिता । विद्याविद्या समस्ता । याचि स्तव ॥५७॥
रिपु मित्र मृत्यु दासी । प्रवृत्ति व्यापार अनेक यांसी । येहीं सर्वां जीवांसीं । आळवावें ॥५८॥
हे अभीमानें जातिदारुण । असेंहीं देवीं जाणून । काळ रोग दु:ख विघ्र । यासी रचीले ॥५९॥
हे मानवी देखुनि सुटंक । सुखावले वृंदारक । मग ये देहीं सकळैक । थीरावले ॥६०॥
देवी आपुली स्थिती । नेमिली याचें चि हातीं । ते मनुष्या वाचूनी नेघती । सर्व काहीं ॥६१॥
पत्र पुष्प आदि करुन । शीरीं पडे येउन । ते नरसंकल्पावाचुन । त्या ग्राह्य नाहि ॥६२॥
एरां सर्वां जीवांहोन । केले मनुष्य कारण । येथ देवाचें ही गुण । पूर्ण असती ॥६३॥
यासी चतुर्वर्ण भाग । कर्मधर्म अनेग । एही करावे याग । हा नेमु जाला ॥६४॥
संतोशूनि जगदीशें । यांसीं निरुपीलें असें । तुह्मीं सर्व प्रयासें । यागकरा ॥६५॥
येणें चि तुमतें सिध्दि । हे चि तुह्मा अभिवृध्दि । यास्तव यज्ञकर्मि बुध्दि । ठेवा तुह्मीं ॥६६॥
श्रृति स्मृती संज्ञा । तेणे चि केली आज्ञा । याची न करावी अवज्ञा । तो चि ह्मणे ॥६७॥
जे लाविले आचार । ते चालवा निरंतर । असें प्रभूचें उत्तर । ठाईं होनि ॥६८॥
यास्तव स्वधर्मी असावें । समस्त यागातें चाळावें । वचन अगडेंसीं पाळावें । ईश्वराचें ॥६९॥
या चि करीतां बहुत । आहे इहपर हीत । जें आपणासी गुणवंत । ते चुकों नये ॥७०॥
असें हे मानवी कारण । ते देवी केलें उत्पन्न । यास्तव येथीचें ज्ञान । बोलों आतां ॥७१॥
हे मध्य खंड सकळ । करु देहज्ञान प्रांजळ । ते घ्यावया निश्चळ । बुध्दि पाहिजे ॥७२॥
त्या ब्रह्मदेवापासुन । जे जाले उत्पन्न । ते बोलिजती ब्राह्मण । शील्प शास्त्रीं ॥७३॥
देव मनु पासाव । जाले ते हे मानव । उदकें अन्नें जीव । सर्व जाले ॥७४॥
मन्वादि विश्वकर्मा । तो चाळी सृष्टी धर्मा । व्यापार भूत ग्रामा । लाविले तेणे ॥७५॥
॥ इति सृष्टी उत्पन्न ॥
श्री सिध्देशाचेनि प्रसादें । आदिचामुंडेचेनि वरदे । त्रिंबकामुखें ये पवित्र पदें । विस्तारती ॥७६॥
इतिश्री चिदादित्ये प्रकाशे श्रीमव्दालावबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे मध्यखंडे विवरणे जीवसृष्टी युक्त मानी देह उत्पन्न नाम व्दितीय कथन मिति ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP