भगवान गोपालकृष्ण - अध्याय २३ वा
प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.
नम: परम कल्याण । नम: परम् मंगल । वासूदेवाय शांताय । यदुनाम पतये नम: । श्रीसद्गुरु केशवांची । समाधिस्त चिरंतन होण्याची । वाट हळू हळू पश्चिमेची । झुकत होती क्षितीजाकडे ॥१॥
याच वेळी प्राचीवर । दुसरे एक संतवर । कार्यधुरा त्यांची स्कंधावर । घेण्यासाठी उदेले ॥२॥
नांव तयांचे मधुसूदन । माऊलीचे एक शिष्योत्तम । अपरिग्रही मनोरम । सर्वसंग परित्यागी ॥३॥
केशवांचा आणि तयांचा । परिचय घडला सुखाचा । अचानक भाग्यश्रीचा । ज्योतिषशास्त्रानिमित्ते ॥४॥
संसाराचे वावडे । होते तयांना रोकडे । ऐके दिनी अचानकपणे सोडिले धन दारा सुतासी ॥५॥
आकर्षक व्यक्तिमत्त्व । नितळकांती बुध्दिमंत । उंच पुरे प्रज्ञावंत चतुरस्त्र । होती व्यक्ती ही ॥६॥
नासिका सरळ सुशोभित । नेत्र कमळे विकसित । मुख राही सदा सस्मित । मिस्कील भाव ठेवोनी ॥७॥
पुढे केशवांनी वारंवार । नेले तयांना बरोबर । जाणून तयांचा अधिकार । गावोगावी आपणासवे ॥८॥
केशव प्रभुंच्या सान्निध्यात । राहून तयांना नित्य । कार्याची माऊलीच्या साद्यंत । माहिती गवसली प्रत्यक्षपणें ॥९॥
ज्योतिषशास्त्राचे ज्ञान । अजमावे त्यांचे म्हणून । शेअर बाजारी पाठवून । प्रचिती पाहिली केशवांनी ॥१०॥
तिथल्या एका शेटजीस भेटा म्हणाले तयांस । ज्योतिष पाहून सल्ल्यास । द्या उद्याच्या वायद्याचे ॥११॥
मधुसूदनाच्या सल्ल्यनुसार । वाणिकाने केला व्यवहार । जमेच्या बाजूस नफा अपार । नोंदला त्याने त्यादिनी ॥१२॥
पुनरपी महिन्यांनी । सांगितले त्यांना प्रभुंनी । या त्यांच्याकडे जावोनी । क्षेमकुशल आणावया ॥१३॥
मग त्या व्यापार्याने आवर्जून । सन्मान त्यांचा करून । रुपये तीनशे देऊन । पाठविले आदरे माघारी ॥१४॥
मधुसूदनानी ती रक्कम । केली माऊलीस अर्पण । तई महाराज म्हणाले हसून । ठेवा हे पैसे तुम्हासी ॥१५॥
श्रीसद्गुरु केशवदत्त । नित्यनेमे होते उतरत । पंढरपूरच्या वारीत । उत्पाताकडे तेथल्या ॥१६॥
एकेवर्षी माऊली । अशीच असता उतरली । मधुसूदनांना म्हणाली । जाऊन येतो बाहेरी ॥१७॥
आम्ही येईपर्यंत । बसा येथे स्वस्थचित्त । राधे गोविंद स्मरण करीत । आमुच्याच गादीवरी ॥१८॥
परंतु माऊली केशवदत्त । परतली नाही रात्रीपर्यंत । तेव्हा मधुसूदना पडली भ्रांत । कुठे गेली माऊली ॥१९॥
चौकशी करिता उत्पातापाशी । उत्पात म्हणाले तयासी । सोडूनी माऊली पंढरीसी । गेली केव्हाच एकटी ॥२०॥
मग मधुसूदनाच्या आले ध्यानी । की श्रीप्रभु केशवांनी । प्रत्यक्ष पांडुरंगाच्या साक्षीनी ।दिली निज गादी तयांना ॥२१॥
तोच तयांच्या लोचनांत । अश्रू दाटले असंख्यात । घालून मग प्राणिपात । जयजयकार केला गुरुचा ॥२२॥
तव मधुसूदनांचे नामकरण । पूर्वाश्रमींचे बदलून । मधुसूदन महाराज म्हणून । केले केशवांनी सोनगिरी ॥२३॥
जोडे स्वत;चे ब्राह्मणी । दिले तयांना केशवांनी । बंडीही स्वत:ची प्रेमानीं । चढविली अंगी तयांच्या ॥२४॥
पुढे केशवांच्या कार्यार्थ । गांवोगावीं असतां फिरत । पत्र माऊलीचे अवचित । गेले एका मुक्कामी ॥२५॥
पत्रात तयांना केशवांनी । लिहिले होते स्वहस्तानी । अंत्यविधी तयांचा कोणी । कुठे आणि कसा करावा ॥२६॥
मुंबईत समाधिस्थ । झाले जर केशवदत्त । सर्वोत्तमभाई त्यांचे शिष्य । करतील विधी शेवटचा ॥२७॥
अन्य ठिकाणी वा धुळ्यास । माऊलीचा अंत झाल्यास । कार्य शेवटचे निश्चिंत । मधुसूदनांनी करावे ॥२८॥
इति श्रीयशोधन विरचित । श्रीसद्गुरु केशवदत्त चरित । होवो सकलां सुखद । तेविसावा अध्याय संपूर्ण ॥२९॥
॥ इति त्रयोविंशतितमोऽध्याय: समाप्त ॥
N/A
References : N/A
Last Updated : December 03, 2016
TOP