मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशव दत्त| अध्याय २२ वा केशव दत्त अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा भगवान गोपालकृष्ण - अध्याय २२ वा प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे. Tags : gopalkeshav dattakrishnamarathiकाव्यकृष्णकेशव दत्तगोपालमराठी अध्याय २२ वा Translation - भाषांतर नम: परम कल्याण । नम: परम् मंगल । वासूदेवाय शांताय । यदुनाम पतये नम: । षष्ठादी समारंभ नंतर । श्रीकेशवदत्त गुरुवर । धुळ्यासी आले सत्वर । ज्ञानेश्वर जयंती निमित्तें ॥१॥या समयी महाराजांनी । रुपये पंधराशें जमवूनी । देणगी दिली स्वहस्तांनी । ज्ञानेश्वरीच्या प्रसारार्थ ॥२॥महाराजांचे शिष्योत्तम । सद्गुरु श्रीमधुसूदन । यांसी दोंडाईस पाठवून । आणविली ही रक्कम माऊलीनें ॥३॥गोपालभाई गुजराथी । पावसकर, करमरकर प्रभृती । यांनी वर्गणी जमविण्याप्रति । सहाय्य केले केशवांना ॥४॥पुढें नित्यनियमानुसार । महाराज निघाले फिरतीवर । पुणे, मुंबई, पंढरपूर । क्षेम कुशलार्थ भक्तांच्या ॥५॥या वेळीं माऊलीनें । पंढरी दर्शनास आनंदानें । पाठविलें स्वखर्चाने बटु आणि आनंदा भिल्लासी ॥६॥राष्ट्रीय सेवक संघाचा । मेळावा अति उत्साहाचा । भिवंडीत झाला साचा । अध्यक्षतेखाली माऊलीच्या ॥७॥गीताजयंतीच्या उत्सवास । पुन्हां माऊली आली धुळ्यास । भक्त जनांच्या तई सौख्यास । उधाण आले पुनवेचे ॥८॥या जयंतीच्या प्रीत्यर्थ । प्रवचनें, व्याख्यानें, विख्यात । झाली बहु विचार परिलुप्त । गोरे, जोहरे प्रभृतिंची ॥९॥उत्साहमूर्ती पटवर्धन । वकील धुळ्याचे ख्यातनाम । राबले मित्रासह रात्रंदिन । पार पाडण्या कार्य हें ॥१०॥सातार्याच्या धर्मसभेने । याच वेळीं कीर्तने प्रवचनें । योजिली माऊलीची आदरानें । सुप्रसिध्द शहरीं या ॥११॥श्रीस्वामी करपात्रजींची । भेट बहुत सुखाची । झाली येथेच माऊलीची । भक्ती संगम अपूर्व ॥१२॥या वर्षाच्या अखेरीस । स्वाहाकार झाला अमरावतीस । मग केशवदत्त सोनगिरीस । परतले नित्याप्रमाणें ॥१३॥अठराशें बहात्तराच्या आरंभास । महाराज गेले औदुंबर दर्शनास । दर्शन घेऊन निजकार्यास । आरंभ केला माऊलीनें ॥१४॥संत वाङ्मय ग्रंथालयाची । स्थापना करून मोलाची । श्रीसद्गुरु केशवांची । स्वारी आली भिवंडीस ॥१५॥भिवंडीच्या मुक्कामांत । होमहवनादि अर्चनेंत । श्रीसद्गुरु केशवदत्त । कार्यमग्न झाले काही दिनीं ॥१६॥ब्रह्मपुरी, नंदुरबार । येथेंही केले स्वाहाकार । वर्ष शके त्र्याहात्तर । गाजले ऐशा कार्यक्रमे ॥१७॥यज्ञ, याग, प्रवचनें । कीर्तनें, कथा संमेलने । आयोजुनी माऊलीनें । जनजागृती साधिली ॥१८॥भिल्लादि वन्य जमातीत । राहूनी त्यांच्या समवेत । धर्मश्रध्देची दिव्य ज्योत । प्रज्वलीत केली अखंड ॥१९॥कार्य ऐसे हे महान । सातत्ये परिश्रम घेऊन । उसंत न घेता एक दिन । केले केशवांनी तीन तपें ॥२०॥रात्रंदिनी जनसेवेत । राबले हे महासंत । दीनजनांच्या कल्याणार्थ । स्वदेहासी विसरोनी ॥२१॥“जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ।देह कष्टविती उपकारे ॥तुकाराम॥तुकोबांची ही उक्ती । महाराजांनी स्वत:पुरती । सार्थ केली, ही प्रचिती । कार्य त्यांचे देईल ॥२२॥लोकोत्तर या पुरुषावर । प्रिती जनतेची अपार । गांवोगांवीचे भक्तावर । तिष्ठती त्यांच्या दर्शना ॥२३॥समाज वा धर्मकार्यासी । अगत्ये बोलवावे माऊलीसी । भक्त धरूनी आस ऐसी । उभे ठाकती सोनगिरी ॥२४॥माऊलीविना कार्यक्रम । यज्ञ याग होम हवन । वाटे तयांना रसहिन । रिझवी न मन तयांचे ॥२५॥तत्वता जरी धर्मप्रचार । उद्दिष्ट माऊलीचे महत्तर । परी राजकारणाचा आधार । अवश्य असावा म्हणती ते ॥२६॥या कारणे केशवदत्त । विचार आपुले तर्कशुध्द । निर्भिडपणें मांडित । राजकारणासंबधी ॥२७॥संतवाङ्मय, भगवतभक्ती । या दोन आदिशक्ती । नेतील भारता अभ्युदयाप्रती । श्रध्दा होती तयांची ॥२८॥भगवंताचे अधिष्ठान । हेच कार्य-यश-विधान । संतवाक्य हे प्रमाण । मानावे म्हणती केशव ॥२९॥श्रीकृष्ण भक्तीचा उपदेश । केला केशवांनी अवघ्यांस । तीच भक्ती पुनरुस्थानास । येईल कामी धर्माच्या ॥३०॥म्हणोनी प्रभु केशवदत्त । बोधिताती सकलांप्रत । मुखें म्हणारे संतत । गोविंद राधे गोविंद ॥३१॥भारत आपुली जन्मभूमी । संतसज्जनांची सुवर्णखनी । पूर्वसुकृते म्हणोनी । जन्मलो येथे दैववशे ॥३२॥कीर्तिपताका हिच दिगंत । उभवावी त्रिभुवनांत । आर्य धर्म हाच शाश्वत । एकपणे जाणावा ॥३३॥याच सूत्राकारणे केशवांनी । महाराष्ट्र अवघा फिरोनी । जागृती केली जनमनीं । अमोघ आपुल्या वक्तृत्वें ॥३४॥नामघोष कथाकीर्तनें । भजनें मेळावे प्रवचनें । हीच प्रबोधनाची साधने । योजिली प्रामुख्ये प्रभूंनी ॥३५॥भगवत भक्तीने ओतप्रोत । प्रवचने तयांची सुश्रुत । भक्त भाविकांच्या अंतरात । राहिली अखंड पूर्णत्वें ॥३६॥यज्ञयागाकडे प्रवृत्ती । माऊलीची जरी विशेषे होती । तरी सर्वसामान्याप्रती । भक्तीमार्ग म्हणती आचरावा ॥३७॥व्यवहारी या जगात । आग्रही म्हणती केशवदत्त । भक्तीमार्गा व्यतिरिक्त । अन्य न मार्ग मोक्षाचा ॥३८॥जे जे आपले विहित कर्म । ते ते कारणें निष्काम । हेच जीवनाचे वर्म । जाणा म्हणती केशव ॥३९॥निजकायीं असता निमग्न । प्रभूचे जो करी चिंतन । ऐहिक तयाचे बंधन । तुटेल अक्षय निश्चये ॥४०॥मोक्षप्राप्तीचा मार्ग सुलभ । संतसज्जनांनी दाविला स्वयंभ । तो आचरा रे प्रसभ । सांगती केशव पुन: पुन्हा ॥४१॥संत साहित्याच्या सागरात । डुंबा डुंबा रे संतत । तेणे तुमची सकल भ्रांत । जाईल पुरी विरोनी ॥४२॥ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी । वा तुकयाची अभंग वैखरी । नेईल तुम्हां पैलतीरी । उल्लंघोनि भवसागर ॥४३॥माऊलीने ही शिकवण । वारकरी भजने आयोजून । रुजविली अंत:करणातून । सहस्त्रावधी जनतेच्या ॥४४॥द्रव्य या निमित्ते जे जे । प्रभु केशवांना मिळाले निके । जनकल्याणार्थ ते ते । खर्च केले तयांनी ॥४५॥वस्त्र वा अन्नदान । औषधे वा विद्यादान । केले याच निधितून । माऊलीने गरिबासी ॥४६॥ये रिती या पुरुषोत्तमे । पस्तीस वर्षे निरलसपणे । जन जागृती सातत्याने । केली निखळ रात्रंदिन ॥४७॥माऊलीचे हे उपकार । अगणित किती आम्हावर । जाणीव तयांची निरंतर । हृदयी राहो आमुच्या ॥४८॥संतवाङ्मयाचा प्रसार । प्रकर्षे व्हावा घरोघर । यासाठीच हे संतवर । महाराष्ट्री जणू अवतरले ॥४९॥सकल उपनिषदांचे । नवनीता काढूनी साचे । दिले जगासी दिव्यत्वाचे । गीतारूपे प्रभूनी ॥५०॥हीच गीता तुम्हासी । होईल साधका मार्गदर्शी । नेईल अंती मोक्षासी । ज्ञान भक्ति वा कर्मयोगे ॥५१॥म्हणोनी गीतेच्या अभ्यासार्थ । श्रीसद्गुरु केशवदत्त । गीता तत्वज्ञान मंडळ धुळ्यात । स्थापन करिते झाले ॥५२॥फलाशा न धरावी अणूही । स्वकर्म अक्षयी । तेणे आत्मोन्नति लवलाही । होईल केशव ॥५३॥माऊलीने ही शिकवण । स्वये तत्वत: आचरून । दिली सकल जनां लागून । जीवनी आपुल्या अशेष ॥५४॥असो आता श्रोतेजन । अनुज्ञा तुमची अपेक्षून । कथा माझीच स्वये कथीन । भेट माऊलीच्या प्रसंगाची ॥५५॥एकोणीश्शे सत्तेचाळीसांत । माऊली सद्गुरु केशवदत्त । वास्तव्यास होती मुंबईत । कार्तिक मासी दादरला ॥५६॥ज्ञानेश्वरी उत्सवा प्रित्यर्थ । प्रवचने त्यांची आयोजित । ब्राह्मण साहाय्यक संघात । केली ज्ञानेश्वरसेवा मंडळाने ॥५७॥माऊलीच्या निरुपणावर । श्रोते लुब्ध होते अपार । संघाच्या आवाराबाहेर । होतसे दाटी भाविकांची ॥५८॥नित्यनेमे प्रवचनासी । येती भाविक बहुसंख्येनिसी । परि मज पामरासी । न वाटले कधी जावेसे ॥५९॥त्या काळी आस्मादिक । होते किंबहुना नास्तिक । धर्मश्रध्दा आध्यात्मिक । वावडे होते तयासी ॥६०॥सीताबाई नामे एक । अक्कलकोट स्वामींच्या अलौकिक । भक्त होत्या विख्यात । रहिवासी दादरच्या ॥६१॥या चरित्र लेखकाचे । आणि त्या बाईंचे नाते होते निकटचे । सासू आणि जामात ॥६२॥सीताबाई नियमितपणे । प्रभुकेशवांची प्रवचने । जात ऐकण्या श्रध्देने । ब्राह्मण साहाय्यक संघात ॥६३॥गोडी या प्रवचनांची । केवळ जणू अमृताची । घ्या एकदा तरी साची । आर्जवे म्हणती आम्हाला ॥६४॥परि चंद्रबिंब अंधासी । सप्तसूर बहिरटासी । कवित्व जैसे अरसिकासी । होतो आम्ही तैसेच ॥६५॥प्रवचनाच्या सप्ताहास । नाही गेलो एकही दिस । अहंमन्यता मूढास । कैसी सोडील जाण पा ॥६६॥पुढे माऊली केशवदत्त । अन्य कार्यक्रमानिमित्त । काही दिवस मुंबईत । राहिली खोपकरांकडे ॥६७॥पुनरपि सीताबाईंनी । आग्रहे मज विनवुनी । म्हणाल्या दर्शन या घेऊनी । महान या विभूतीचे ॥६८॥परि आम्ही खट्याळ । अप्रबुध्द अनिर्मळ । विनंती त्यांची सोज्वळ । मानावी केवी सहजपणे ॥६९॥बाईंनीच मग एके दिनी । स्वये मज हस्ते धरोनी । दर्शनासी नेले निक्षूनी । संत प्रभु केशवांच्या ॥७०॥ते समयी केशवदत्त । बसले होते निवांत । आसनावरी स्वस्थचित्त । अर्धोन्मिलित नेत्रांनी ॥७१॥पाहता आम्हा दोघांसी । हर्ष झाला तयांसी । पुसती मग बाईसी । कोण श्रीमान तुमच्या सवे? ॥७२॥तव आमुच्या सासूबाई । म्हणाल्या माझे हे जावई । दर्शनास आपुल्या लवलाही । आणिले आग्रहे धरोनी ॥७३॥अग सद्गुरु केशवदत्त । करोनी एक मंदस्मित । पुसते झाले मजप्रत । नांव, गांव, काम-धंदा ॥७४॥मी बैसल्या बैठकीवरून । म्हणालो नांव माझे यशोधन । सरकारी नोकरी हे साधन । उपजिविकेचे असे माझ्या ॥७५॥गोष्टी तई इतर । झाल्या बहुत विषयावर । तव माऊली गुरुवर । विचारी प्रश्न एक मिस्किलपणे ॥७६॥ईश्वराचे अस्तित्व । नसाल तुम्ही मानित । बुध्दिवादी तार्किक । कर्ते स्वयमेव सृष्टीचे ॥७७॥महाराजांच्या प्रश्नाची । खोच जाणून साची । म्हणालो या विषयाची । गती नाही मज फारशी ॥७८॥ईश्वराचे अस्तित्व । माझ्या पुरते मानितो सत्य । परि व्यक्तीपूजेबाबत । आहे मी पूर्ण विरोधी ॥७९॥यावरी प्रभुकेशवदत्त । व्याजोक्तिने म्हणाले मजप्रत । स्पष्टवक्ते आपण सत्यवंत । रामशास्त्र्या सारिखे ॥८०॥माऊलीचे हे उद्गार । भेदून गेले मम अंतर । मग अनाहुतपणे नमस्कार । घातला पायी तयांच्या ॥८१॥कृतीची ही नवलाई । पाहोनी माम सासुबाई । विस्मित झाल्या लवलाही । अघटीत कसे घडले हे ॥८२॥घेवोनि निरोप तयांचा । परतलो मी घरी साचा । स्फुल्लिंग एक विचाराचा । लेऊन अंतरी विशोधित ॥८३॥दुसरेच दिवशी केशवदत्त । अचानक आमुच्या दारांत । येऊन म्हणाले मजप्रत । येता का आम्हासवे बाहेरी? ॥८४॥वेळ होती सकाळची । बहुदा साखर निद्रेची । त्या कारणे अस्मादिकांची । शान गेली बिघडोनी ॥८५॥परि आमुच्या सौभाग्यवतींनी । घेतली वेळ सांभाळूनी । महाराजांना आदरे बसवूनी । पिटाळले मज स्नानासी ॥८६॥केशवगुरु त्या दिवशी । घेऊन गेले मजसी । मोडकांच्या गृहासी । अभियंते प्रसिध्द मुंबईचे ॥८७॥दुसरे दिवशी केशवदत्त । अचानक पुन्हा दारांत । येऊनी म्हणाले मजप्रत । येता का मजसवे बाहेरी? ॥८८॥होऊन पुनरपि नाखुष । म्हणालो रागाने माऊलीस । येतो करोनी स्नानास । बसा आपण खुर्चीवरी ॥८९॥श्रीस होते त्या दिनी । निमंत्रण दिलेले दांडेकरानीं । उद्यमीं एक ख्यातनामी । कॅमलिन कंपनीचे ॥९०॥तिसरे दिवशीही तोच प्रकार । पाहून चिडलो अनावर । परि विवेके घातला आवर । मनासी मोठया प्रयत्ने ॥९१॥येणे रिती दिवस सात । गेलो माऊलीच्या समवेत । मनाविरुध्द सतत । नेतील त्या ठिकाणी ॥९२॥वास्तविक एका संतांचा । लाभला होता भाग्याचा । सहवास आम्हां सुखाचा । दैववशे करोनी ॥९३॥परि अज्ञान अंध:कार । अधिष्ठीत होता मजवर । आकळिला नाही अधिकार । संत श्रेष्ठींचा त्यामुळे ॥९४॥लाज वाटे बहु मजसी । माऊलीसवे फिरावयासी । अनागरी बावळीशी । पाहून त्यांची वेशभूषा ॥९५॥सातवे दिवशी रात्रीस । म्हणालो मी कुंटुंबास । नकार देईन माऊलीस । सोबतीस उद्या सकाळी ॥९६॥परंतु अपेक्षेप्रमाणे । केशवांचे नाही झाले येणे । स्वस्थ चित्त राहिलो तेणे । मिटून डोळे पलंगावरी ॥९७॥रात्री आठाच्या सुमारास । माऊली येऊन आम्हांस । म्हणाली आजचा दिवस । यावे आम्हासंगे शेवटचे ॥९८॥पुनरपी आम्ही तुम्हास । नाही देणार सायास । वेळ नागरांचा खास । फुकट का घालवावा ॥९९॥माऊलीचे हे शब्द । घेऊन माझ्या मनीचा वेध । मनकवडेपणा त्यांचा निस्संदिग्ध । दाविला त्यांनी मजप्रती ॥१००॥कपडे करून त्वरित । निघालो श्रींच्या सोबत । कुठे जावयाचा त्यांचा हेत । पुसले न मी मुळीही ॥१०१॥दादरच्या वैद्य पथावर । आलो तेव्हा दूरवर । गर्दी लोकांची अपार । संघमंदिरा समिप पाहिली ॥१०२॥महाराज म्हणाले मजसी । आज आहे आपणासी । जावयाचे प्रवचनासी । त्याच गर्दीत मिळोनी ॥१०३॥महाराजांचे हे शब्द । ऐकून झालो पुरा सर्द । प्रवचनाची ही ब्याद । कुठून आली नशिबी ॥१०४॥इतुक्यात एका पोलिसाने । पाहूनी माऊलीस सौजन्याने । गर्दी हटवूनी त्वरेने । मार्ग दिला आंत जाण्यासी ॥१०५॥संघाच्या सभागृहात । श्रोते असंख्य शांतचित्त । दाटीवाटीने होते ऐकत । प्रवचन रसाळ वाणीचे ॥१०६॥तंव व्यासपीठावरून । अकस्मात शब्द आले सदगदित । श्रोते क्षमा असावी मजप्रत । थांबवितो प्रवचन क्षणभरी ॥१०७॥भाग्ये आपुले बहुथोर । म्हणून एक संतवर । आले आज येथवर । दर्शन द्यावया आपणासी ॥१०८॥राखावया तयांचा आदर । उभे रहावे सकलांनी क्षणभर । माऊलीस आणावे स्टेजवर । स्वयंसेवकासी अज्ञापिले ॥१०९॥संबोधणारी ही व्यक्ती । होती करवीरमठाधिपती । शंकराचार्य कुर्तकोटी । बुध्दिसागर धर्ममणी ॥११०॥ही प्रत्यक्ष गुरुमाऊली । जन्मजन्मांतरीची साऊली । आज माझ्या निरूपणा आली । भाग्य म्हणाले आमुचे ॥१११॥मग सद्गुरु माऊलीसी । आदरे धरोनी हातासी । कार्यकर्त्यांनी नेले स्टेजपासी । आसनस्थ व्हावया ॥११२॥मी मागेच रेंगाळत । राहिलो मध्येच तिष्ठत । होऊनी अति विस्मित । अधिकार पाहूनी केशवांचा ॥११३॥तव देखिले एक अघटित । माऊली सद्गुरु केशवदत्त । बोलावित होती मजप्रत । स्टेजवरी बैसावया ॥११४॥दिव्य दोन विभूती महान । झाल्या होत्या विराजमान । व्यासपीठावर समसमान । रवी चंद्र जणू तेजस्वी ॥११५॥तेथेच एक आसन । ठेविले होते अधिच आणून । कुणा अभ्यागतासाठी राखून । शेजारीच या सुभंगाच्या ॥११६॥मग केशवदत्त गुरुवर । म्हणाले मज सत्वर । “या बसा” ह्या आसनावर । विलंब नको प्रवचनी ॥११७॥माऊलीचे ऐकून हे उद्गार । मन माझे झाले सैरभैर । होऊनी बधीर । कापरे सुटले अंगासी ॥११८॥कुठे हे प्रज्ञावंत ज्ञानसिंधू । कुठे मी पामर अज्ञबिंदू । कुठे हे वीतरागी आनंदकंदू । पद्महस्ती महाजन ॥११९॥हे ज्ञाननभीचे भास्कर । नीती भक्तीचे आगर । किंबहुना प्रत्यक्ष ईश्वर । ठाकले माझ्या समोरी ॥१२०॥या महाभागांबरोबर । कैसा बैसू मी पामर । बैसल्यास माझी कदर । काय होईल जाण पां ॥१२१॥जे हिमनगाची उत्तुंगता । सकल सरितांची पवित्रता । चंद्रकलेची धवलता । शांति सुख परब्रह्म ॥१२२॥त्यांच्या समवेत बैसण्याची । योग्यता नव्हती खास आमुची । जाणून पायरी स्वत:ची । बैसलो मग पायी माऊलीच्या ॥१२३॥नयनी अश्रू घळघळा । लागेल वाहूं ते वेळा । अत्यानंदे दाटला गळा । पाहुनी अनुराग केशवांचा ॥१२४॥माऊलीस लेखुनी सामान्य । वागलो तयांसी फटकून । अनादर दाविला उपेक्षून । कर्म करंट्या सारिखा ॥१२५॥परि माऊलीने मजवरी । विसरून प्रमाद झडकरी । वर्षाव कृपेचा सरोभरी । केला जणू जाहिरपणे ॥१२६॥शंकराचार्य आणि केशवदत्त । यांच्या एकत्र सान्निध्यात । बैसण्याचा मान खचित । शुभंकर मज लाभला ॥१२७॥या अद्वितीय क्षणापासून । अनुतापे दग्ध होऊन । झालो केशवांच्या पायी लीन । भक्त म्हणून तयांचा ॥१२८॥पुढे सद्गुरु केशवदत्त । ज्या ज्या वेळी मुंबईस येत । त्या त्या वेळी समवेत । अवश्य मी राहतसे ॥१२९॥माऊलीचा कृपाहस्त । राहिला मस्तकी आमुच्या सतत । दिवस आजचे हे सुखद । आशीर्वाद केवळ तयांचा ॥१३०॥श्रीसद्गुरु केशवांची । आणि या चरित्र लेखकाची । भेट झाली अखेरची । व्यासांच्या घरी मुंबईला ॥१३१॥श्रीसद्गुरु केशवदत्त । एकोणीसशे बावन्नात । आले होते मुंबईत । उपचारासाठी कॅन्सरच्या ॥१३२॥भक्त त्यांच्या दर्शनास । येत होते रात्रंदिस । परंतु त्यांच्या भेटीस । मनाई होती डॉक्टरांची ॥१३३॥परि भाग्य या लेखकाचे । असावे कांही अनन्य साचे । तेणे गुरु माऊलीचे । लाभले मज पददर्शन ॥१३४॥पाहोनी मला उभा दारांत । व्यासांना म्हणाले केशवदत्त । सोडा या माणसाला आंत । भेटावया मजलागी ॥१३६॥खूणनेच मज दर्शवून । घेतले जवळी बसवून । पलंगावरी समीप आसन । होते त्यावरी माऊलीचे ॥१३७॥मग प्रभू केशवांनी । हस्त आपुला उचलोनी । मम मस्तकी ठेवोनी घर्षण केले कुंतलांचे ॥१३८॥आम्हा उभयता नयानांत । अश्रू होते अखंड वाहात । कसले आणि कशाचे ज्ञात । झाले नाही कुणाला ॥१३९॥काहीं क्षण मी भान रहित । विसरून माझे अस्तित्व । केशवांच्या पदी राहिलो रत । अनुभूती एक आगळी ॥१४०॥हाच समजून प्रसाद । होऊन मी सद्गद । माऊलीचा निरोप हृद्य । घेतला तोच अखेरचा ॥१४१॥केशवांचा कृपा आधार । राहिला मजपाठी निरंतर । त्या कारणे मी पामर । चरित्र लेखक झालो तयांचा ॥१४२॥बिज्ञाप्ति तुम्हां श्रोतेजन । नका मानू हे निवेदन । आत्मस्तुती वा आत्मकथन । कृपळू मज होऊनी ॥१४३॥केशवदेवे कृपा केली । सकळ कामना फळा आली । चरित्र रुपे आता माऊली । करो साऊली तुम्हा आम्हा ॥१४४॥इति श्रीयशोधन विरचित । श्रीसद्गुरु केशवदत्त चरित । होवो सकलां सुखद । बाविसावा अध्याय संपूर्ण ॥९७॥॥ इति द्वाविंशतितमोऽध्याय: समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : December 03, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP