भगवान गोपालकृष्ण - अध्याय १८ वा

प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.


नम: परम कल्याण । नम: परम् मंगल । वासूदेवाय शांताय । यदुनाम पतये नम: । श्रीसद्गुरु केशवदत्त । साहित्यिक प्रज्ञावंत । झाले सर्वत्र प्रसिध्द । “ज्ञानेश्वर वैभव” ग्रंथानें ॥१॥
जैसे सुवर्ण चंपक । देखणे आणि सुवासिक । तेवींच हें पुस्तक । प्रसाददायक वाचकांसी ॥२॥
ज्ञानदीपीकेची निवडक । प्रवचनें तयांची मौलिक । गुंफीलेली कलात्मक । दिसतील या प्रबंधी ॥३॥
ज्ञानदेवरूपी ज्ञानार्क । उदेला मराठी प्रकर्ष । शांती प्रेमाचा उत्कर्ष । भूतमात्रा साधावया ॥४॥
ज्ञानदेवांचे मनोगत । सर्वसामान्य माणसाप्रत । पोहोचवावें हेंचि ईप्सित । आंतरिक होतें केशवांचे ॥५॥
म्हणोनी श्रीकेशवदत्त । फिरले खेडयापाडयांत । गीतातव नितांत । मायबोलीत सांगण्या ॥६॥
महाराजांच्या या ग्रंथातून । मौक्तिके कांही वेंचून । ठेवितो तुम्हांपुढें रसिकजन । भावार्थ तयाचा जाणावया ॥७॥
मानवदेह हा अशाश्वत । मिथ्या आणि नाशिवंत । पडूं नये तयाच्या लोभांत । शिकवण ही गीतेची ॥८॥
जे जे उत्पत्ती पावते । ते ते लयाला जाते । लया गेलेले पुनरपी येते । रहाट गाडया सारिखें ॥९॥
सूर्योदय आणि सूर्यास्त । हे जैसे नित्य नियमित । जन्म मरणही तद्वत । खेळ पाठशिवणीचा ॥१०॥
जन्म मृत्यु जरा व्याधि । तापत्रय नाना उपाधी । मोहमाया सुखदु:खादि । नरदेहा अंगत ॥११॥
विहित कर्में करावी निष्काम । असोनी नित्य उदासीन । सुख दु:खें मानावी समान । जीवनमुक्ती साधावया ॥१२॥
विषय वासनांचे चिंतन । मन जयाचे करीते अजाण । नाशास होतें कारण । दुर्गतीस न्यावया ॥१३॥
आसक्ती नसावी देहाची । न दारा, धन सुताची । कांस धरावी शाश्वताची । परम चैतन्य जे अबाधित ॥१४॥
जन्मरहित आणि शाश्वत । अनादि आणि अनित्य । चैतन्यें व्यापिले जगत । तेच केवळ अविनाशी ॥१५॥
विकार वासना सांडून । इंद्रिये ठेवावी स्वाधीन । रहावे चित्ती प्रसन्न । निजानंद लाभावया ॥१६॥
उचित जें स्वकर्म । आचरणें हाच स्वधर्म । त्याग तयाचा हें कुकर्म । पापदायक जाणावे ॥१७॥
निजधर्म आचरिता । मृत्यु जरी आला अन्यथा । तरी तो कल्याणप्रद तत्वता । मोक्षदायक निखिळ ॥१८॥
काम क्रोध धनंतर । महापापी निष्ठुर । वैरी, रजोगुणी क्रुर । मानवाच्या प्रगतीचे ॥१९॥
हे विषय दरीचे वाघ । भक्ती पंथाचे मारेकरी मांग । अथवा ज्ञानराशीचे भुजंग । ज्ञानदेव स्वये म्हणती ॥२०॥
बुध्दि इंद्रिये आणि मन । हेंच तयांचे वसतीस्थान । झाकारिते जीवीचे ज्ञान । गुंतवोनी मोहांत ॥२१॥
विषय वासनांची दृढमिठी । पडते शुध्दज्ञाना भोवती । परि इंद्रिये दमनें ती निश्चिंती । सुटते निग्रहे साधका ॥२२॥
मन बुध्दि आणि इंद्रिये । जिंकिली संपूर्ण जयानें । शुध्द ज्ञानें तयानें । प्रभुपद संपादिलें ॥२३॥
काम संकल्प सोडूनी । कर्मे करितात जे ज्ञानी । ज्ञानाग्नींत ती जाळूनी । म्हणती तया पंडित ॥२४॥
ऐसा हा पुरुषपरम । जे प्रत्यक्ष परब्रह्म मनुष्यरूपे निगमागम । अवतरले जाणा महीवरी ॥२५॥
कर्म मार्ग जरी विविध । परि ज्ञानांत होती एकविध । म्हणोनी ज्ञानाचाच विशोधित । शोध घ्यावा मानवा ॥२६॥
ज्ञानासारिखे परम । पवित्र न अन्य साधन । गिवसण्या कैवल्य धाम । शांती सुखाचे अविनाशी ॥२७॥
विषयी अनासक्त मन । प्रियाप्रिय न मानी आन आन । आत्मज्ञानाचे सुलक्षण । अक्षय सुख प्रदायक ॥२८॥
माती दगड वा सुवर्ण । मानापमान शीत उष्ण । मानिती जे समसमान । मन जिंकिले तयांनी ॥२९॥
महाभाग ऐसे अजात । निर्विकार स्वरुपी राहूनी स्थित । ब्रह्मज्ञानाचे प्राशून अमृत । “युक्त” होती सर्वार्थें ॥३०॥
असा हा युक्त पुरुष । योगारुढ होवोनी सर्वंकष । प्रभुस मिळतो नि:शेष । एकरूप होवोनी ॥३१॥
घेऊनी प्रकृती आसुरी । नराधम विषय विकारी । अज्ञाने त्या श्रीहरी । दुरावती मायावशे ॥३२॥
परंतु आर्त आणि जिज्ञासु । ज्ञानी आणि अथार्थु । चतुष्ट्यहे हितार्थु । आकळिती प्रेमें भगवंता ॥३३॥
या चौघामाजी निरंतर । राहतो प्रभुपदी तत्पर ज्ञानी एकच भक्तवर । प्रिय श्रेष्ठ तो भगवंता ॥३४॥
प्रापंचिक जे ज्ञान । म्हणती तयास विज्ञान । ते मृगजळा समान । आभासवत जाणावे ॥३५॥
जिये ठिकाणीं बुध्दिचा । वा शिरकाव न होईल विचाराचा । हुरूप मोडतो तर्ककुतर्काचा ।
शुध्द ज्ञान त्या म्हणावे ॥३६॥
लाभते हे जया लागून । अपूर्व ऐसें शुध्दज्ञान । भवसरिता तो तरून । प्रभुसी होतो एकरूप ॥३७॥
म्हणोनी साधका अनन्य । जावे श्रीहरीला शरण । चुकवावया जन्म मरण । सायुज्य मुक्ती साधावया ॥३८॥
अनन्यभावें चिंतून । भजतात जे भक्त जन । तयांचा सकल योगक्षेम । तोच एक चालवितो ॥३९॥
आचार विचाराचे संस्कार । असतील जेथें शुभंकर । तेथेचं भक्तीचे निर्झर । वाहताती निर्मळ ॥४०॥
देहेंद्रियासहित मन । बुध्दि चित्त अंत:करण । प्रभुसी करणे अर्पण । आध्यीत्मिक क्रांती होय ती ॥४१॥
जे भक्तीप्रेमाने आर्त । तयासी तो भगवंत । सोडून आपुले वैकुंठ । येतो धांवत भेटावया ॥४२॥
किंबहुना होऊनी किंकर । दासानुदास ईश्वर । राहतो उभा दारावर । बळी जैशा भक्ताच्या ॥४३॥
दळुकांडू  लागे जनाबाईसी । भक्त कैवारी । वैकुंठ वासी नाथाघरी जीवनासी । वाही पाणक्या होऊनी ॥४४॥
सर्वदा जे भक्तियुक्त । आचरिती आपुले कर्मनित्य । नामसंकीर्तनी राहून रत । प्रिय ते जाणा हरीसी ॥४५॥
भूतमात्राची सकल दु:खें । तयाच्याच नाम घोषे । विलया जाती सर्वंकषे । ब्रह्मसुखा पाचारूनी ॥४६॥
सेवा सहस्त्र जन्माची । होईल जेव्हां साची । तेव्हांच प्रभु नामाची । गोडी लागते मनुष्या ॥४७॥
मग ते निर्विकार निर्गुण । विश्वचालक परब्रह्म । स्वयें येते धाऊन । भेटावया भक्तासी ॥४८॥
कृष्णहरि राधेगोविंद । याच नामाचा लागावा छंद । गिवसावया परमानंद । प्रभुपदाचा अक्षय ॥४९॥
अखंड ध्यास आणि ध्यान । हेंच भगवत प्राप्तिचे साधन । गवसले जया परिपूर्ण । प्रभुपदेच त्यास पावली ॥५०॥
मानव हा कर्माधिन । कर्मे ही इंद्रियाधीन । ठेवोनी स्वरूपानुसंधान । वर्तावी ती निष्कामे ॥५१॥
जीवनांत नित्य प्रभुचें । चिंतन जो करील वाचे । जीवन स्वास्थ्य तयाचे । अबाधित राहील ॥५२॥
मंदिरे सकलांच्या अंतरी । उभवोनी राजस गोजिरी । मूर्ति ज्ञानदीपीकेची साजरी । स्थापिली सुशोभित ज्ञानदेवें ॥५३॥
हिंडणार्‍या सैरभर । रानोमाळी वासरा खैर । भेटविती ज्ञानेश्वर । गीता माऊली वात्सल्यें ॥५४॥
“गीता निष्कपट माय । चुकोनी तान्हें हिंडे जे वाय ।
ते मायपूत भेटी होय । हा धर्म तुमचा” ॥ ज्ञानेश्वर॥
विश्वची हे सकल । मानावे आपुलेच घरकुल । बंधुत्वाचे नाते निखळ । वाढवावे सर्वांभूती ॥५५॥
सर्वांठायी समत्व । ठेवणें, राखोनी ममत्व । दिव्य हें गीतातत्व । प्राकृति कथिले ज्ञानदेवे ॥५६॥
पाणी आपुले सरिता । देते कुणाही तृषार्ता । भेदभाव न धरिता । दुष्ट वा सुष्टांसी ॥५७॥
राव वा रंकाचे प्राण । मृत्यु न जाणी आन आन । हा उत्तम हा अधम । भेद न करी धरित्री ॥५८॥
स्वधर्माचे आचरण । करीतात जे निष्ठापूर्ण । ऐश्वर्ये युक्त ते होवून । विषयासक्त न राहती ॥५९॥
जो न करी देवता पूजन । स्वधर्मे ईश्वराचेस भजन । अतिथीस अन्नदान । प्रभुपदास तो दुरावतो ॥६०॥
जया गुरुभक्तीचा कंटाळा । विषयवासनी जिव्हाळा । लौकिकी सुखाचा लागे लळा । निमंत्रील महासंकटें ॥६१॥
स्वधर्मा म्हणोनी न सोडावे । स्वैर इंद्रिया आवरावे । षड्रिपूसी निर्दाळावे । शस्त्र हरिनामाचे घेवोनी ॥६२॥
मुखीं जयाच्या हरिनाम । नयनी वसे मेघ:श्याम । भक्त ऐसा अनुपम । आवडे बहु केशवांसी ॥६३॥
विषयाची त्यजुनी आठवण । बुध्दि करी प्रभुस्मरण । ईशभक्तीचें हें भूषण । परम श्रेष्ठ जाणावे ॥६४॥
म्हणोनी प्रभु प्राप्तिस्तव । भक्तीप्रेमाचा एकमेव । मार्ग बहु अभिनव । ज्ञानदेवे सांगितला ॥६५॥
सर्वव्यापि आणि सर्वज्ञ । जाणोनी मला जे सुज्ञ । भजतील मज अनन्य । “प्रिय मला” म्हणे भगवंत ॥६६॥
कथा ऐशा भक्तांच्या । सांगतिल सकल सुखाच्या । देवताच त्या आमुच्या । देवच सांगे प्रत्यक्ष ॥६७॥
तेच माझे परमतीर्थ । तेच माझे पवित्र क्षेत्र । तेच माझे पूर्ण दैवत । उलटीच खूण प्रभूची ॥६८॥
विश्वचैतन्य शामसुंदर । निराकार निरंतर । आत्मसुखाचा धनंतर । वर्षाव करो अविरत ॥६९॥
सर्व सुखाचा आगरु । बाप रखुमादेवीवरु । विश्वात्मका विश्वेश्वरु । वरदान एवढे द्या म्हणती ॥७०॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मे सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो ते लाहो । प्राणिजात ॥ज्ञानेश्वर॥
ज्ञानेश्वरांचे हे ज्ञान वैभव । साहित्य कला अभिनव । केशवांनी तुम्हां आम्हांस्तव । दाविले ग्रंथी आपुल्या ॥७१॥
ज्ञानदीपीकेचे अमृतकण । केशवांच्या भाष्यांतून । सारभूत आणि प्रमाण अल्पांशें कथिले तुम्हांसी ॥७२॥
साधावया निज उत्कर्ष । श्रोते तुम्ही सहर्ष । मनन करा अहर्निष । शांतिसुखास्तव श्रध्देने ॥७३॥
महाराजांचे आणखी एक । सुबोध आणि मौलिक । आध्यात्मावरील पुस्तक । प्रतिक त्यांच्या प्रतिभेचे ॥७४॥
“रुक्मिणीरमण मंगल” । श्रीकृष्ण विवाहावरील । आध्यात्मिक टीकेचे कुशल । लेणें एक सुरेख ॥७५॥
भागवताच्या दशम स्कंधात । अध्यांय बावीस ते चौपन्नात । रुक्मिणीस्वयंवर वृत्तांत ।
कथिला विलोभनीय नाथांनी ॥७६॥
नाथासारिखे महासंत । प्रज्ञाच केवळ मूर्तिमंत । वाग्विलासिनी प्रत्यक्षांत । उतरली या अवनीवरी ॥७७॥
कवित्व त्यांचे अमर । ज्ञाननिधी रत्नाकर । आध्यात्म विद्येचे माहेर । तुळणेसी, तुळा न होय ॥७८॥
रुक्मिणी स्वयंवराचे रुपक । स्वरुपी रंगवोनि आध्यात्मिक । व्यक्ति, विभूती, प्रासंगिक ।
स्थळ, काळ रिती, रिवाजे ॥७९॥
वधू ती माता रुक्मिणी । वर श्रीकृष्ण सुलक्षणी । प्रकृति पुरुष ते दोन्ही । अनुक्रमे लाक्षणिक ॥८०॥
विवाह विधी सम्यक । जिवा शिवाचे ऐक्य । परि भाषा आध्यात्मिक । संत श्रेष्ठ नाथांची ॥८१॥
शिशुपाल हे सामर्थ्याचे । अधिभौतिक ऐश्वर्याचे । आसुरी सुख संपत्तिचे । प्रतिक एक समर्पक ॥८२॥
देवी रुक्मिणी सुंदरी । वरावया स्वयंवरी । श्रीकृष्ण ठेवि हृदयमंदिरी । अनस्यूत निर्धारे ॥८३॥
परि तिच्या पांच बंधुसी । वाटे तिनें शिशुपालासी । पर्णावे अव्हेरू न यदुवरासी । जो, न राजा चक्रवर्ती ॥८४॥
जीवाचे शिवासी ऐक्यत्व । विवाहाचा हाच अर्थ । माया ब्रह्माचे विलिनत्व । तत्वबोध आध्यात्मिका ॥८५॥
परि संयोग जीवाशिवाचा । होऊ न द्यावा साचा । चंग बांधिती नित्याचा । पंच ज्ञान आणि कर्मेंद्रिये ॥८६॥
रुक्मीसारिखे बंधू पंचम । शाल्व जरासंधादि राजे विक्रम । रुक्मिणी यदुवर विवाहसंगम ।
विरोधिती जैशा परी ॥८७॥
स्वयंवराच्या मंडपांत । उभा देखोनी कृष्णकांत । शिशुपालादि राजे मदांध । क्रोधाविष्ट जाहले ॥८८॥
विकट करोनी तदा हास्य । म्हणती या गौळीयास । भीमकीचा लागावा ध्यास । वर्तन केवढें अश्लाध्य ॥८९॥
करोनी प्रभुसी दुरुत्तर । म्हणती तूं तर नवनीत चोर । आम्ही क्षत्रिय कुळीचे थोर । धनुर्वाडे प्रचंड ॥९०॥
अट्टाहासे जर रुक्मिणी । वरील येथे यदुमणी । संग्राम ठिणगी तत्क्षणी । उडेल जाणा म्हणती ते ॥९१॥
टाळावया हा अनर्थ । विचार करी कृष्णनाथ । स्वयंवर मंडपी रक्तपात । होऊं न द्यावा किमपिही ॥९२॥
मग पूर्व संकेतानुसार । प्रभुनें गाठिलें अंबिकामंदिर । रुक्मिणीस घालोनी रथावर । शीघ्र तेथुनी पळाले ॥९३॥
तव शिशुपालादि महावीर । भीम पराक्रमी धनुर्धर । रथी चढोनी सत्वर । पाठलाग करिती प्रभुचा ॥९४॥
“आम्ही प्रचंड धनुर्वाडे । रणकर्कश रणगाडे ।
नोवरी घेऊन आम्हापुढे । कोणीकडे पळशील” ॥ एकनाथ ॥
ऐकोनी तयांचे हे उद्गार । श्रीरंग केला रथ स्थिर । लक्ष साधून निर्विकार । वेधिले शत्रु अचूक ॥९५॥
संगर उसळला भयंकर । रणी पडले वीर अपार । रुक्मि शिशुपालांचा अहंकार । धुळीस मिळाला क्षणार्धे ॥९६॥
दांती तृण धरोनी । शरण आले वीरमणी । अधोवदन मग होवोनी । कौडिंण्य पुरा पातले ॥९७॥
राक्षस विवाह विधीचा । अवलंब करोनी साचा । शारंगधरे महा संघर्षाचा । टाळिला धोका कौशल्यें ॥९८॥
मग प्रभास क्षेत्री आले घेऊन । रुक्मिणीस कृष्ण भगवान । आनंदले सकल जन । गुढया तोरणे उभविली ॥९९॥
तंव भीमष्क राजानें । लग्न सोहळा ऐश्वर्याने । ब्राह्मपध्दतीप्रमाणें । साजरा केला प्रभासपुरी ॥१००॥
जांवयाचे पायधुणे । गृहप्रवेश आंबा शिंपणे । वधुवरांनी प्रतिज्ञा घेणे । सोपस्कार झाले नानाविध ॥१०१॥
एवं जीवशिवासी एकत्र । आणावयाचे कार्य पवित्र । विवेकरुपी सुदेव विप्र । करून दावी कुशल ते ॥१०२॥
अखेर प्रकृति पुरुषांत । पावते कैशी विलीनत्व । आध्यात्मिक हे सिध्दत्व । कथिले नाथांनी भागवतीं ॥१०३॥
रुक्मिणी स्वयंवराचे संगरात । शिशुपलादि राजे पराजित । कां व्हावे हे केशवदत्त । स्पष्ट करीती या ग्रंथी ॥१०४॥
शक्ती तामस वा राजस । नाश पावते नि:शेष । हाच या युध्दाचा निष्कर्ष । प्रतिपादिती केशव ॥१०५॥
चितशक्तीपुढे कैचा । व्हावा विजय तयांचा । तेथें नवविधा शक्तीचा । एक मात्र उपाव ॥१०६॥
ग्रंथामाजी या टीकात्मक । ऐश्वर्य नाथांचे आध्यात्मिक । उकलोनी दाविती केशवदत्त । अमृतवाणीनें आपुल्या ॥१०७॥
एकदांतरीं हें पुस्तक । वाचावे तुम्ही साधक । विनंती मी लेखक । करितो तुम्हां आदरे ॥१०८॥
इति श्रीयशोधन विरचित । श्रीसद्गुरु केशव चरित । होवो सकलां सुखद । अठरावा अध्याय संपूर्ण ॥१०९॥
॥ इति अष्टदशो:ध्याय: समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 03, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP