मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशव दत्त| अध्याय १५ वा केशव दत्त अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा भगवान गोपालकृष्ण - अध्याय १५ वा प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे. Tags : gopalkeshav dattakrishnamarathiकाव्यकृष्णकेशव दत्तगोपालमराठी अध्याय १५ वा Translation - भाषांतर नम: परम कल्याण । नम: परम् मंगल । वासूदेवाय शांताय । यदुनाम पतयेनम: । ज्ञानेश्वर हृदय केशवदत्त । कामसंकल्प रहित । जीवन त्यांचे प्रतीत । साहित्यी त्यांच्या होईल ॥१॥सगुण साक्षात्कार योग । स्वसंपादित तयांचा अमोघ । ग्रंथ तात्विक सुबोध । अमृत बोल वर्षला ॥२॥शके अठराशें त्र्याहत्तरांत । ज्येष्ठ मासीं आनंदवनांत । प्रकाशन सोहळा आनंदात । जाहला या पुस्तकाचा ॥३॥ग्रंथारंभीच्या निवेदनांत । विनम्रे म्हणती केशवदत्त । या ज्ञानसुधा कुंभात । न माझें कांही स्वत:चे ॥४॥ज्ञानदेवे कृपा केली । तेणे मज उपरती झालो । ज्ञान माऊलीचीच ओगळली । वाक सुमने रसिकांनो ॥५॥वृंदावनचंद्र यशोदानंद । श्यामसुंदर आनंदकंद । सगुण साक्षात्कारी परमानंद । लाभेल भाविका या ग्रंथी ॥६॥प्रभुपदारविंदी नित्य । राहावी प्रीती अनित्य । मानवांतरीची दिव्य ज्योत । प्रकाशावी आत्मतेजे ॥७॥संत दयेचा कृपाधन । उगवोनी सोनियाचा दिन । वर्षावा विवेकाचा घन । सौख्यंशांति ज्ञानप्रद सकलांसी ॥८॥हे गोकुलेंद्र पुरुषोत्तमा । पीतांबरधारी मेघ:श्यामा । शांती प्रीतीच्या उद्गमा । करी चित्तांत सकलांच्या ॥९॥या भरतभूचे स्वातंत्र्य । राखावया यर्थार्थ । शौर्य संपदा सामर्थ्ये । लाभो भारतीय पुत्रांना ॥१०॥तेजस शक्तीचे संवर्धन । नीति नियमांकित वर्तन । सकल हितेषु राजकारण । वर्तावे या मार्तृभूमी ॥११॥गोधन स्त्रीधन प्रजानन । शेती उद्योग विद्यार्जन । होवोत सुसंपन्न । इच्छिती केशव सद्गुरु ॥१२॥मागणें ऐसें उदात्त । केशवांनी निवेदनांत । प्रभुपाशी या ग्रंथात । केले आहे आर्जवें ॥१३॥पुस्तकाच्या प्रस्तावनेत । विचार मधुर भावनेत । दिसतील झालेले प्रकट । शंकरराव गोरे प्रभृतींचे ॥१४॥हे विद्वतप्रचूर गृहस्थ । निरिक्षक बहु नामांकित । होते शिक्षण खात्यांत । मुंबई प्रांती पूर्वीच्या ॥१५॥मधुर भाषेने सहज स्फूर्त । साक्षात्काराचे सत्यत्व । निवेदितात केशवदत्त । म्हणती गोरे प्रस्तावनी ॥१६॥प्रभु भेटीचे सत्यानुभव । वर्णनातीत अभिनव । संत दृष्टांत वैभव । ठाके मूर्तीमंत या ग्रंथी ॥१७॥श्रध्दावंतासी भगवंत । होऊनी कृपाळु नितांत । वांच्छिल्या सगुण रुपांत । दर्शन देतो सुरवाडे ॥१८॥संताचा तर पाईक । होवोनी वैकुंठ नायक । भोवती तयांच्या अशेख । राहतो वैकुंठ सोडोनी ॥१९॥तुका नामदेव रामदास । नरसी मेहता भानुदास । श्रीरामकृष्ण परमहंस । भक्तोध्दारणे किती सांगावी ॥२०॥न केवळ संताप्रती । साक्षात्काराची मिळे प्रतीती । सामान्य जनासही अनुभूती । मिळते संत कृपेनें ॥२१॥ऐसी कळवळ्यची जाती । करी लाभाविण प्रीती । संताच्या ऐशा विभूती । सद्भायें वावरती आजही ॥२२॥यासंदर्भी स्वानुभव । सांगती गोरे शंकरराव । ऐका श्रोते सुखेनैव । सश्रध्द होवोनी ॥२३॥गोरे आणि केशवांचा । स्नेह होता जिव्हाळ्याचा । तेणे नित्य भेटी गाठीचा । योग येतसे एकमेकां ॥२४॥महाराजांच्या विषयी । नितांत श्रध्दाहृदयीं । ठेवोनी आपुल्या अक्षयी । गोरे वर्तती जीवन ॥२५॥शके अठराशे बहात्तरांत । सोहळा बहु आनंदात । एकषष्ठीचा सोनगीरीत । साजरा झाला केशवांचा ॥२६॥समारंभास या विशोधित । सुदैवे होतो उपस्थित । केशवचरणी विनम्रीत । म्हणतात गोरे महाशय ॥२७॥महाराजांचे व्यक्तिमत्व । सरिते सारखे वक्तृत्व । चैतन्य साक्षात्काराचे दिव्यत्व । बिंबले मम अंतरी ये समयी ॥२८॥सुखाचीही शिदोरी । घेऊन आदरे बरोबरी । सोनगीरीहून माघारी । स्वस्थापना परतलो ॥२९॥मग एके दिनी रात्रीस । कारण नसतां विशेष । अकल्पित अति सुरस । देखिले गोरे साहेबानी ॥३०॥पहाटेच्या प्रहरांत । गोरे असतां निद्रिस्थ । प्रकाशमय दिव्यज्योत । पाहिली त्यांनी स्वहृदयीं ॥३१॥ज्योतीचे तेज पुंजाळले । तेजांत मग साकारले । सोनगीरीचे देवालय भले । प्रत्यक्ष त्यांच्या पुढयांत ॥३२॥मंदिराच्या प्रांगणात । गोरे होऊनी सुचिश्मंत । उभे जोडोन दोन हात । स्वयें पाहती स्वत:सी ॥३३॥तव तेजोराशी समर्थ । पीतांबरधारी केशवदत्त । देखिले त्यांनी निमिषार्धांत । ठाकलेले सामोरी ॥३४॥आज्ञापिले मग केशवांनी । या म्हणाले मज मागोनी । आदेश प्रमाण मानोनी । गोरे मागो चालती ॥३५॥चैतन्य त्यांच्या देहांतले । नयनी मग एकत्र झाले । देहभान विरोनी गेले । कैसे ते त्या कळेना ॥३६॥एका नियोजित ठिकाणीं । येताच प्रभु केशवांनी । कोनाडयांत हात घालोनी । सुवर्ण पादुका काढिल्या ॥३७॥तेज त्यांच वर्णनातीत । पाहोनी व्हावे विस्मित । शततारका जणु चमकत । वाटले तैसे गोर्यांना ॥३८॥मग सुहास्य वदने किंचित । पादुका त्या गोर्यांप्रत । देती प्रभु केशवदत्त । सुप्रसन्न होऊनी ॥३९॥पादुका पाहोनी स्वकरांत । गोरे झाले हर्षभरित । तव तें दृश्य अकस्मात । दृष्टी आड जाहले ॥४०॥अनुभूती ही महुर । गवसली जरी क्षणभर । तरी सौख्यगंध निरंतर । ठेवोनी गेली माघारी ॥४१॥कथा ऐशी दुसरी एक । ऐका श्रोते वास्तविक । सुरम्य आणि रोचक । गोविंद गुरुंच्या साक्षीत्वाची ॥४२॥सदर गोर्यांचे स्नेही एक । प्रेमळ आणि भाविक । दर्शना होऊनी उत्सुक । समाधीच्या आले सोनगीरी ॥४३॥स्वत:च्या बालपणी । पाहिले होते तयांनी । गुरु गोविंदासी स्वनयनीं । पहा केवढे भाग्ये हे ॥४४॥परंतु गेले कांही दिवस । पर ठिकाणी त्यांचा होता वास । त्या कारणे सोनगीरीस । पाय नाही फिरकले ॥४५॥अति उत्तम गायक । होता त्यांचा लौकिक । रेडिओस्टार म्हणून अधिक । ज्ञात होते लोकांसी ॥४६॥रात्रि समाधि मंदिरात । भजन तयांचे बहुश्रुत । ऐकोनी रसिक समस्त । झाले मुदित सुरवाडे ॥४७॥मग एका मित्रास । सवे घेवोनी निजावयास । गेले ते ऐसपैस । इमारतीत शेजारच्या ॥४८॥बिछाना तयार करून । पडले त्यावर दोघेजण । दिवा टाकिला मालवून । निद्रेची करीत आराधना ॥४९॥तोंच तयांच्या उशालगत । येवोनी कोणी अलगद । म्हणाले शब्द सुखद । धीर गंभीर वाणीने ॥५०॥“बहु दिनसे मिला । बच्च्या आनंद हुआ, आनंद हो ॥”मग दोघेही संभ्रमात । एकमेकां हालवित । म्हणाले अजी बोलतत । काय पुसती परस्पर ॥५१॥एकमेकां देवोनी ग्वाही । म्हणाले शब्द ऐसे कांही । मुखी माझ्या आलेच नाही । ऐकील जे उभयतां ॥५२॥तव बोलणार्या व्यक्तिस । शोधून काढावयास । पेटवून ते कंदिलास । लगबगीने निघाले ॥५३॥इमारतीचे दालन । बाहेरचे पटांगण । धुंडाळिले सर्वांगीण । परी न दिसले कुणीही ॥५४॥निराशेने दोघे जण । परतले नि:स्तब्ध होऊन । न होता आकलन । अघटीत ह्या घटनेचे ॥५५॥होते ते शब्द साक्षात्कारी । गोविंद गुरुंचे अशरीरी । श्रध्दावंतास कल्याणकारी । सौभाग्यप्रद अनित्य ॥५६॥असाच एक दृष्टांत । केशवप्रभुंचा अद्भुत । श्रोते परिसा नितांत । कथितो तुम्हां विनम्रें ॥५७॥नंदुरबार शहरांत । गोपाळ हिरजी कोरीट । सच्छिल अति गृहस्थ । वर्तती संसार सुखाचा ॥५८॥महाराजांचे हे परम भक्त । होते परंपरागत । भाविक आणि निष्ठावंत । सोनगीरीस येती प्रतिवर्षीं ॥५९॥महाराज आणि कोरीटांचा । घरोबा होता निकटाचा । म्हणोनी केशवप्रभुंचा । राबता असे त्यांचे घरीं ॥६०॥एकदा कोरीट मंडळी । यात्रेकारणे तोरणमाळी । सहकुंटुंब होती निघाली । प्रति सालाप्रमाणें ॥६१॥तोंच अचानक केशवदत्त । पातले तयाच्या बिर्हांडात । पाहती परी मंडळ समस्त । निघालेली बाहेरी ॥६२॥महाराज पुसती तयांस । कां कुठे ठेवितां प्रस्थानास । बळेच टाकून आम्हांस । निघालां काय एकटे ॥६३॥महाराजांचा हा प्रश्न । गोपाळ हिरजी ऐकून । मनी काय ते उमजून । पायी लागले तयांच्या ॥६४॥महाराज तुम्ही सर्वज्ञ । सर्वगामी विश्व-चैतन्य । निघालो कुठें हे विज्ञ । आहे तुम्हांसी ठाऊक ॥६५॥तेव्हां केशवदत्त हांसोनी । म्हणाले आतां आंतुनी । तांब्या एक या घेवोनी । पाण्यानें स्वच्छ भरलेला ॥६६॥तांब्यातील ते पाणी । स्वहस्ते महाराजांनी । ओंजळीत कोराटींच्या ओतुनी । म्हणाले काय दिसे आंत पहा ॥६७॥तोंच काय अघटित । डोकावतां त्या पाण्यांत । तोरणमाळची यात्रा प्रत्यक्षांत । दिसली कोरीट मंडळीना ॥६८॥दूरचित्र दर्शनाची । नव्हती ते वेळी सोय साची । परी अतर्क्ये करणी संताची । करतळी दाविले दूरदृश्य ॥६९॥पुढे केशवांचा आशीर्वाद । घेऊनी मंडळी सुखद । होवोनी अति मुदित तोरणमाळेस गेली यात्रेसी ॥७०॥कथा ऐशी प्रत्ययी । उद्बोधक आणि क्षेमदायी । सांगेन रसिका प्रत्यही । शेष चरित्री तुंम्हास ॥७१॥सगुण साक्षात्कार योग । महाराजांचा ग्रंथ सुबोध । जयाचा उल्लेखानुबंध । आरंभी मी केला असे ॥७२॥त्याच सूत्रांस अनुसरून । ऐका तुम्ही श्रोतेजन । प्रबंधाचे या विवेचन । दत्तचित्त होवोनी ॥७३॥उपमा अलंकार दृष्टान्त । शब्द लालित्य अर्थांकित । उपरोध निष्कर्ष सिध्दांत । गुणगौरव या ग्रंथाचे ॥७४॥भक्त आणि भगवान । अदृष्ट सृष्टि अचेतन । अन्योन्य त्यांचे कार्यकारण । कथिले आहे या ग्रंथी ॥७५॥विषयांची या चिकित्सक । मिमांसा अति तार्किक । सुलभ आणि सम्यक । केली आहे केशवांनी ॥७६॥ह्या ग्रंथातील सुविचार । आजही होतील मान्यवर । बुध्दिवाद्यासी चतुर । तर्कटी आणि जडवादी ॥७७॥धुंडिराज शास्त्री विनोद । न्यायरत्न प्रकांड पंडित । आदरे काय लिहितात । पहा रसिक ग्रंथाविषीं ॥७८॥सगुण साक्षात्कार योग । आहे आध्यात्मिक काव्य सुभग । बुध्दि वैभवाचे प्रतीक । सद्गुरु केशवदत्तांचे ॥७९॥सरलता सहजता । अद्वितिय सरसता । वैशिष्ठे ऐशी तत्वता । वर्णनातीत केशवांची ॥८०॥वागविलासाचे अभिनव । लेणे लेऊनी ज्ञानवैभव । शारदाच जणू स्वयमेव । सालंकृत आली प्रबंधी ॥८१॥साक्षात्कार म्हणजे मूर्तिमंत । प्रत्यय परत्वाचा इंद्रियनिष्ठ । म्हणती महर्षि न्यायरत्न ।निवृत्ति वा विकास अद्बैताचा ॥८२॥साहित्याचीही गंगा निखळ । हृदयी जियेचा प्रभव । वदती जोहरे भार्गव । अंतरी झाला केशवांच्या ॥८३॥जोहरे महाशय धुळ्याचे । सेवक गीता मंडळाचे । रसिक संतवाङमयाचे । नामवंत समीक्षक ॥८४॥संसारताप पिडितांना । हीच गंगा देईल जीवना । मग शांति सुखाची विंवंचना । न लागे करावया ॥८५॥विश्वोध्दारासाठी भगवंत । अवतरले सगुण रुपांत । लीला तयांच्या ग्रथीत । दिसतील या पुस्तकीं ॥८६॥साक्षात्कार योग सगुण । ग्रंथ केशवांचा विलक्षण । अभ्यासातील जो अर्थपूर्ण । जाणील मर्म तयाचे ॥८७॥अभिप्राय हा जोहर्यांचा । मार्मिक तत्व विवेचकांचा । अलंकार या पुस्तकाचा । अविभाज्य अमोलिका ॥८८॥गजानन गोपाळ रानडे । विद्वान मुंबापुरीचे गाढे । विवेचन करिती रोकडे । ग्रंथाचे तत्व विवेचक ॥८९॥सद्गृहस्थ हे बहुश्रुत । व्यापकरणाचार्य तर्कतीर्थ । व्यवसाय होते शिक्षक । आर्यन शाळेचे प्रसिध्द ॥९०॥वेदांताचे सर्वांगीण । व्यासंगी होते हे परिपूर्ण । वेदांताचार्य तया म्हणून । पदवी होती यथार्थ ॥९१॥सगुण निर्गुणाचे कोडे । सामान्य जनासी कानडे । उकलोनी सहज रानडे । दाखवितात ऐन्यापरी ॥९२॥परमेश्वराची कल्पना । यथार्थ नसते आपणां । तरीच तयांच्या स्वरुप सगुणा । शंकित राहतो माणूस ॥९३॥कांहीं म्हणती हा सगुण । कांहीच्या मते तो निर्गुण । परि वादातीत हा चैतन्य घन । सर्वसाक्षी गुणातीत ॥९४॥जे असे गुणातीत । ते कैसे होईल व्यक्त । म्हणून हा भगवंत । निर्गुणच म्हणती आग्रही ॥९५॥बीजामध्ये अव्यक्त । गुणही जे नसती मुळांत । ते लतावेली पल्लवांत । केवी दिसावे प्रश्न पडे ॥९६॥संयोगे पदार्थांच्या दोन । तिसराच होतो उत्पन्न । लेऊन गुणधर्म भिन्न । क्रियाही निर्गुण सगुणाची ॥९७॥जड चेतन पदार्थाची । लीला विवेकी साची । पहातील जे तयांची । खात्री होईल नि:शंक ॥९८॥जडातून चेतन । निर्गुणांतून सगुण । जन्म घेणें हा सृष्टिक्रम । संकेत जगन्नियंत्याचा ॥९९॥जो विश्वधात्रा अदृष्ट । सर्वव्यापि परी अविशिष्ट । तो सगुण निर्गुण उभयविध । प्रतिपादिती रानडे ॥१००॥कृष्णाजी विठठल सोमण । ज्योतिर्विद्या भूषण । पंचांगकर्ते म्हणून । प्रख्यात होते सर्वत्र ॥१०१॥पुरस्कार यांचाही मौलिक । तत्वनिष्ठ आणि वैचारिक । झाला आहे ग्रथीत । प्रबंधात या केशवांच्या ॥१०२॥केशवांचा हा दिव्यग्रंथ । वाक्सुधा जणु मूर्तिमंत । प्राशन करा तुम्ही सुबुध । परिशिलनें तयाच्या ॥१०३॥जो जो याचा भावार्थ । अनुभवील यथार्थ । जीवन त्याचे कृतार्थ । होईल सत्य हें त्रिवार ॥१०४॥इति श्रीयशोधन विरचित । श्रीसद्गुरु केशवदत्त चरित । होवो सकलां सुखद । पंधरावा अध्याय संपूर्ण ॥१०५॥॥ इति पंचदशोऽध्याय: समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : December 02, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP