भगवान गोपालकृष्ण - अध्याय १७ वा

प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.


नम: परम कल्याण । नम: परम् मंगल । वासूदेवाय शांताय । यदुनाम पतये नम: । विचार प्रभुकेशवांचे । सगुण साक्षात्कारा संबंधीचे । कथिलें संक्षेपे तुम्हां साचे । गताध्यायी श्रोते हो ॥१॥
सगुण साक्षात्कार योग । तुम्हां आम्हां जो दुर्लभ । लाभतो साधुसंता सुलभ । उत्कट भक्ती प्रेमानें ॥२॥
साक्षात्काराचे दिव्यत्व । लाभते तयांना संतत । कारण भक्त आणि भगवंत । रुप चित्कलेचे एकले ॥३॥
पुष्प आणि पुष्पगंध । जल आणि जलतरंग । मुळांत जैसे एकसंघ । तैसेच भक्त आणि परमात्मा ॥४॥
जैसी चंद्रिका आणि चंद्रकांत । दीप आणि दिपज्योत । तेवींच भक्त आणि भगवंत । अविभक्त सदाचे ॥५॥
म्हणोनी संत समागम । हाच मार्ग सर्वोत्तम । ईश प्राप्तीचा बहु सुगम । सर्व सामान्य साधकासी ॥६॥
पूर्व सुकृताचेनी पाडे । संत समागम आवडे । अन्यथा मन चारीकडे । धांवे फुटल्या बांधापरी ॥७॥
संत पदाची श्रीहरी । जोड दे निरंतरी । हीच आस अंतरी । मनी असावी अखंड ॥८॥
संतकृपा मग झालिया । माया मोह जाईल लया । बोधामृत तयांचे पिउनियां । चिन्मय खाणी दिसेल ॥९॥
संताचे धरी जो चरण । तयाचे संपूर्ण जीवन । निश्चये होते पावन । संशय मनीं नसावा ॥१०॥
आस प्रभु दर्शनाची । लागली असे जयासाची । तेणे संतपदाची । दृढ मिठी सोडूं नये ॥११॥
शरण आल्या भक्तासी । संत वा गुरु अहर्निशी । जोजविती माता जैसी । प्रेमें आपुल्या बाळकास ॥१२॥
मग आपुला सकलभार । तेच घेती स्वत:वर । जेणे आपणासी नंतर । उपाधि न राहे कशाची ॥१३॥
झुळुक येता वार्‍याची । गळती शुष्क पर्णे सहजची । तेवींच विषय विकारांची । झिरपणी मग होत असे ॥१४॥
शांति नीतीचे निर्झर । वाहावे अंतरी निरंतर । स्वानंदाचे निर्भर । मिळावे सुख भूतमात्रा ॥१५॥
याचसाठी संत विभूती । भूतळी अवतार घेती । सकल कल्याणार्थ कष्टविती । देह आपुला उपकारे ॥१६॥
निज कर्तव्याची जोपासना । विश्व बंधुत्वाची प्रेरणा । राखणें आस्तिक्य भावना । हीच शिकवण तयांची ॥१७॥
ईश्वरचरणी सश्रध्द । मानव होऊनी सुबुध्द । वर्तावा अनिरुध्द । कैवल्यधाम गाठावया ॥१८॥
हीच द्यावया शिकवण । संताचे होते आगमन । साधावया विश्व कल्याण । पुन:पुन: भूवरी ॥१९॥
नास्तिकांचे परिवर्तन । ईश्वर निष्ठेचे संवर्धन । शांति-सौख्य पखरण । हेंचि ब्रीद संताचे ॥२०॥
जो विश्वाधार विश्वंभर । व्यापुनि राहिला चराचर । अन्यथा जो अगोचर । निर्गुण निराकार म्हणोनी ॥२१॥
पै संताचेनी कृपापाडे । दर्शन तयाचे सुरवाडे । सगुण साक्षात्काराचे धडे । भक्ती मार्ग अवलंबिता ॥२२॥
सकल हे साक्षात्कार । सामान्यासी वाटती चमत्कार । संत सामर्थ्याचे अविष्कार । ऋध्दिसिध्दी प्राप्तिचे ॥२३॥
पै कल्पना ही तयांची । असे निखळ भ्रांतिची । खूण संताच्या अंतरीची । मूढांस केवी कळावी ॥२४॥
आस्तिक्य भावनेचा विकल्प । मनीं न यावा अत्यल्प । ईश निष्ठेचा संकल्प । रहावा अबाधित भक्तांचा ॥२५॥
नाम भक्तीचा महिमा । आकळावा सामान्य जना । हिच संताची धारणा । मनी असते दयार्णव ॥२६॥
परमार्थ साधण्या निर्मनस्क । संसारी न गुंतावे ऐहिक । नरदेहाचे व्हावे सार्थक । अपेक्षा हीच संतांची ॥२७॥
हीच ठेऊनी मनी आस । चमत्काराचे अमिष । दावुनी इच्छिती आशीष । संत आपुल्या भक्तांचे ॥२८॥
समर्थानी आपुला । ज्वर निज अंगातला । घोंगडी माजी ठेविला । लीला सामर्थ्ये काढोनी ॥२९॥
तव ती निर्जीव घोंगडी । भरोनी बहु हुडहुडी । उडूं लागली थडथडी । अतर्क्य करणी संताची ॥३०॥
श्राध्द दिनाचे अवसरी । विप्र न गेले नाथावरी । राहिले बसोन निर्धारी । बहिष्कृत कराया संतासी ॥३१॥
परी प्रभुचे लीला लाघव । दावी कैसा नवलाव । स्वर्गीचे पितरच सावयव । उतरले नाथा घरी जेवावया ॥३२॥
सुरुंगाच्या धडाक्यांत । गवसलेल्या भक्ताप्रत । सुरक्षित ठेऊनी कपारीत । रक्षिले गजानन स्वामीनीं ॥३३॥
शेगांवच्या या समर्थांनी । निर्जळ आडास आणीले पाणी । भक्त तारिले निर्वाणी । बुडत असतां नर्मदेंत ॥३४॥
असाच सद्गुरु केशवांचा । चमत्कार सांगतो साचा । जो सगुण साक्षात्काराचा । दृष्टांत बहु विलोभनीय ॥३५॥
श्रीमंत वासुदेवशेट वाणी । नामांकित उद्यमी । रावेर नामे ग्रामी । आहेत एक सावकार ॥३६॥
महाराजांचे हे अनुग्रहीत । शिष्योत्तम भाग्यवंत । जीवन जयांचे पुनीत । गुरुकृपे आहे झालेले ॥३७॥
घरीं यांच्या एकदां । माऊलीचा मुक्काम असतां । सगुण साक्षीत्वाची अद्भुतता । वाणी मंडळीस दाखविली ॥३८॥
सायंकाळचे सुवेळीं । महाराजांसवे भक्तमंडळी । बसली होती आनंदमेळी । पठण करीत हरिपाठ ॥३९॥
मग महाराजांनी मंडळीस । पाट सांगितला आणावयास । पाटावर निरांजनास । ठेवा म्हणाले केशवप्रभु ॥४०॥
निरांजनात कापूर । ठेवोनी अम्ग सत्वर । काडी लावा म्हणाले गुरुवर । वासुदेवशेट वाण्यांना ॥४१॥
प्रज्वलीत होता निरांजन । राधेगोविंद भजनी धून । लावून सुस्वर भजन । सुरू केले सगळ्यांनी ॥४२॥
भजनाच्या तालावर । निरांजन ते पाटावर । नाचू लागले सुंदर । अपूर्वाई केशवांची ॥४३॥
जड वस्तूत चैतन्य । निरांजनी झाले उत्पन्न । हें साक्षात्काराचे सगुण । रूप एक मोहक ॥४४॥
दृष्टांताची या आठवण । रावरेकरांना होते अनुपम । तेव्हां तयांचे नयन । पाझरती सुखाश्रू आजही ॥४५॥
धुळ्याचे कांही भक्तगण । मित्रमंडळीसह एक दिन । सोनगीरीस आले टांग्यातून । दर्शन घ्यावया ॥४६॥
मंडळी होती बहुश्रुत । अभ्यासु आणि सुशिक्षित । माध्यमिक कांही शाळेंत । शिक्षक होते त्यांतले ॥४७॥
महाराजांच्या संगतीत । दिवस गेला आनंदात । चर्चाही झाली बहुत । आध्यात्म विषयासंबधी ॥४८॥
मग ही सकल मंडळी । निघाली माघारी सायंकाळी । अनुभूती घेऊन आगळी । केशव प्रभुंच्या कृपेची ॥४९॥
निरोपाचा करून नमस्कार । मंडळी पडली बाहेर । तंव टांग्याची घोडी जाग्यावर । नसल्याचे दिखिले ॥५०॥
शोध केला बहुवस । परी घोडे नव्हते आसपास । विचार पडला मंडळीस । परतावे कैसे धुळ्यासी ॥५१॥
हळुहळु अंधार । वाढू लागला सभोंवर । मंडळीस पडला विचार । कुठें शोधावे अश्वासी ॥५२॥
वार्ताही केशवांच्या कानीं । सांगितली जाऊन कोणी । मग महाराज येऊनी । पुसते झाले वृतांत ॥५३॥
पाहुनी मंडळीस सचिंत । म्हणाले तयांना केशवदत्त । रहावें तुम्हीं निभ्रांत । लागेल ठिकाणा ॥५४॥
तैं माऊलीनें एका मुलास । बसवोनी आपुल्या बाजूस । सांगितले डोळे मिटावयास । राधे गोविंद म्हणोनी ॥५५॥
मुलाचे लागता ध्यान । कथन केले त्यानें तत्क्षण । घोडयाचे अचूक ठिकाण । पश्चिमेस किल्ल्याच्या ॥५६॥
घोडे आणिले शोधून । तात्काल टांग्यास जोडून । महाराजांसी करोनी वंदन । मंडळी गेली धुळ्यासी ॥५७॥
मुक्काम कसुंबे येथील । शंकर देवराम पाटील । गुजर एक सच्छिल । भक्त प्रिय केशवांचे ॥५८॥
सन एकोणीसशें बावन्नांत । झाले ते केशवांचे अनुग्रहीत । श्रध्दा तयांची नितांत । अवर्णनीय होती गुरुविषयी ॥५९॥
परंतु दिवस पाटलांचे । होते तंटे बखेडयाचे । खडग भाऊ बंदकीचे । टांगलेले होते मस्तकावरी ॥६०॥
खटले सहा फौजदारी । दिवाणी दावे त्याचपरी । हात धुवोनी माघारी । लागले होते तयांच्या ॥६१॥
गुरुमंत्र जे दिनीं । दिला त्यांना केशवांनी । त्यावेळी पाटलांनी । विनंती केली प्रभुंना ॥६२॥
महाराज तुम्ही दयाघन । शरण आलो तुम्हां लागुन । सोडवा मज आपत्तितून । भाऊबंदकी आणि वैरत्वाच्या ॥६३॥
यापुढे मम जीवन । रहावे तुमच्या पायी लीन । माया मोह वासनांचे क्षण । विरोनी जावे अवकाशी ॥६४॥
कोर्ट कचेरीचे पायी । जीव मेटाकुटीस येई । पैक्या परी पैका जाई । घांस न मुखी सुखाचा ॥६५॥
रोज चाले मारामारी । गोडी न राहिली संसारी । शांती सुख तीळभरी । राहिले न घरी कृपाळा ॥६६॥
हकीगत त्यांची माऊलीने । ऐकीली मोठया कळवळीनें । मग जवळ बैसवोनी आस्थने ।
म्हणाले-“पाटील काळजी नको” ॥६७॥
या शंकरराव पाटलांचे । जोशी प्रल्हाद रावजी नावाचे । कुलोपाध्याय परंपरेचे । होते त्यांच्या समवेत ॥६८॥
तयासीच महाराजांनी । सांगितले जा आंतूनी । आणा प्रसादाच भरोनी । ताट लवलाही बाहेर ॥६९॥
उपाध्यायांनी तत्क्षणी । प्रसादाचे ताट आणोनी । ठेविले माऊलीच्या चरणीं । “आज्ञा असावी म्हणाले” ॥७०॥
महाराजांनी ते ताट । त्यांच्याच हाती दिले परत । आणि म्हणाले हा प्रसाद । जा घेऊन गांवासी ॥७१॥
तुम्ही कुलोपाध्याय पाटलांचे । तसेच त्यांच्या भाऊबंदाचे । काम एक कुशलतेचे । करा जाऊन कुसुंब्यास ॥७२॥
प्रतिपक्षाच्या मंडळीस । नांवे हांक मारूनी तयास । वाटावे या प्रसादास । पुण्य हस्तें तुम्ही स्वत: ॥७३॥
मग महाराजांचा आशीर्वाद । पाटील घेऊन सौख्यप्रद । परतले तै कुसुंब्याप्रत । सदगदीत मनानें ॥७४॥
महाराजांच्या आज्ञेनुसार । कुलोपाध्यायांनी सत्वर । प्रसाद नेऊनी घरोघर । वाटिला सर्वां निजहस्ते ॥७५॥
याचवेळीं झाला चमत्कार । चोपडे तालुक्याचे फौजदार । बदलून त्यांचे जागेवर । आले दुसरे अधिकारी ॥७६॥
नांव तयांचे बागवान । सहिष्णु आणि बुध्दिवान । अभ्रष्टाचारी म्हणून । प्रख्यात होते लोकांत ॥७७॥
प्रत्यक्ष जावोनी कुसुंब्यात । घातली योग्य समजूत । सलोखा उभयपक्षांत । केला बागवान साहेबांनी ॥७८॥
मग वादी प्रतिवादीनीं । खटले काढोनी । वैरत्व त्याचें संपोनी । गेले मुळापासोन ॥७९॥
पहा कैशी संताची मात । पडतां तयांचा मस्तकीं हस्त । शंकर पाटलांचे दुरित । कर्पुरा सारखे विराले ॥८०॥
या खटल्यापायी तयांची । अमानत वीस हजाराची । भूर्दंड म्हणोनी साची । व्यर्थ गेली पाण्यांत ॥८१॥
परि केशवांच्या कृपेने । संसार त्यांचा सुखानें । चालला अव्याहतपणें । कमी न पडतां काहींही ॥८२॥
आर.डी.करमरकर नावांचे । प्राध्यापक महाविद्यालयाचे । महाराजांचे भक्त साचे । प्रसिध्द पुणें शहरात ॥८३॥
घरोबा तयांचा निकट । तेणें श्रीकेशवदत्त । भेट देती तयांना नित्य । जाऊनी घरी तयांच्या ॥८४॥
एकदां श्रीकेशवदत्त । सकाळी दहाचे सुमारास । प्राध्यापकाच्या समवेत । घरीं गेले तयांच्या ॥८५॥
केशवांचे पाहून आगमन । मुलेबाळे गेली हर्षून । महाराजांचे चरण वंदून । नेलें तयांना माडीवर ॥८६॥
बैठकीच्या खोलींत । बैसले श्रीकेशवदत्त । गादीवरी प्रशस्त । लोडास टेकून शुभ्रशा ॥८७॥
विचारपूस केली सर्वांची । चौकशी मुलांच्या अभ्यासाची । चर्चा धार्मिक विषयाची । झाली थोडी बहुत ॥८८॥
या वेळी कुंटुंबातली । हजर होती सर्व मंडळी । परी बाहेर होती गेली । मुलगी एक शाळेका ॥८९॥
तिज विषयी केशवांनी । विचारले बहु प्रेमानीं । नांव तिचे घेवोनी । दिसली नाहीं म्हणोन ॥९०॥
मग सकलांकडून । नम: परम कल्याण । घेतले महाराजांनी म्हणवून । उठले नंतर ते जावया ॥९१॥
निरोप त्यांचा घेतल्यावरी । मंडळी येवोनी माघारी । झणी बैसली पाटावरी । जेवावया दुपारचे ॥९२॥
ती मुलगीही आली घरीं । शाळा तिची सुटल्यावरी । तडक गेली माडीवरी । दप्तर आपुले ठेवावया ॥९३॥
तंव तिला केशवदत्त । बैठकीवर दिसले आसनस्थ । नयन मिटून ध्यानस्थ । रामकृष्ण गोविंद म्हणतांना ॥९४॥
तात्काळ तिनें वाकून । केलें तयांना नमन । तैं महाराज डोळे उघडून । “वा” म्हणाले “आलीस का” ॥९५॥
मुलगी मग लगबगीनें । उतरली आंतल्या जिन्यानें । वदती झाली आश्चर्यानें । वडीलांसी आपुल्या ॥९६॥
दादा तुम्ही बैसलांत । इथे कैसे हो नाही कळत । वरती पहा बैठकींत । महाराज आहेत बैसलेले ॥९७॥
वार्ता ऐकून ही अवचित । मंडळी झाली विस्मित । धांवत आली बैठकीत । माऊलीस पहावया ॥९८॥
वाटले तयांना कदाचित । महाराज आले असावे परत । मुलीस भेटण्या निमित्त । लळा तिचा म्हणोनी ॥९९॥
मंडळी जंव वरती आली । तंव अधिकच भांबावली । बैठकीवर माऊली । नाही ऐसे पाहून ॥१००॥
विचारती सर्व तिला । खरेंच का पाहिलेस माऊलीला । तंव म्हणाली मी खोटें कशाला । सांगू दादा तुम्हांसी ॥१०१॥
मी पायावर प्रत्यक्ष । ठेविले तयांच्या मस्तक । मग म्हणाले मज सकौतुक । जा बाळ आतां जेवावया ॥१०२॥
घटनेचा या अर्थ । जाणला मंडळींनी यथार्थ । केशव प्रभुंचा हा साक्षांत । चमत्कार होता दैविक ॥१०३॥
पहा संताचे विंदाण । दिले मुलीस दर्शन । अदृश्यपणें येवून । लीला लाघव केवढें ॥१०४॥
इति श्रीयशोधन विरचित । श्रीसद्गुरु केशव चरित । होवो सकलां सुखद । सतरावा अध्याय संपूर्ण ॥१०५॥
॥ इति सप्तदशो:ध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 03, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP