भगवान गोपालकृष्ण - अध्याय १४ वा

प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.


नम: परम कल्याण । नम: परम् मंगल । वासूदेवाय शांताय । यदुनाम पतयेनम: । श्रीसद्गुरु केशवदत्त । होते महा विख्यांत । परम श्रेष्ठ कृष्णभक्त । भागवत-महा मंडळीं ॥१॥
नरसी मेहता जनाबाई । गौरांगप्रभु निताई । भक्त जैसे मीराबाई । तैसेच परम केशव ॥२॥
कृष्ण भक्तीचा स्थायीभाव । हाच तयांचा स्वभाव । अन्य न कशाचा ठाव । वृत्तींत असे तयांच्या ॥३॥
जिकडे पाहावे तिकडे । दिसे तयांना गोजीरे रुपडे । श्रीकृष्णजीचे सानुकडे । अधरी पांवा असलेले ॥४॥
जळीं स्थळीं पाषाणी । दिसावा तयांना चक्रपाणी । मयुरपिसे मस्तकी खोऊनी । रत्नमाला बिभुषीत ॥५॥
सावळा सुंदर मनोहर । यशोदेचा नंदकुमार । राधिकेचा यदुवर । दिसावा नयनी तयांच्या ॥६॥
जे जे पडावे तयांच्या कानी । तेच व्हावे साकारोनी । केवळ मधुमुरलीचा ध्वनी । कुंजवनांतील मुकुंदाचा ॥७॥
अंबरी दाटता वर्षाधन । मयुर तयांचे होई मन । थुई थुई नाचे आनंदुन । मेघ:शाम जणु दिसावा ॥८॥
वृंदावन विहीरीचे दर्शन । पुलकित करी केशवांचे मन । सकल काया कृष्ण होऊन । स्वये डुल्लती धुंद धुंद ॥९॥
तेणें श्रीकेशवदत्त । आणि प्रसन्नचंद्र भगवंत । या उभयांतर्गत । द्वैत कैसे राहावे ॥१०॥
निसर्गामाजी जे जे दिसे । ते ते तयांना कृष्ण भासे । श्याम सुंदराचे एकच पिसे । लागले होते तयांना ॥११॥
लतावेली वृक्ष थोर । उदधि नद्या निर्झर । किंबहुना अवघे चराचर । कृष्णमय भासे तयांना ॥१२॥
हिरवी पिवळी वनराई । गिरी शिखरांची निळाई । वाटे घननीळाच ठायी ठायी । विहार करी स्वच्छंदे ॥१३॥
कुमुमे प्रफुल्ल वेलीवरी । उमलावी रातोत्पले कासारी । तेवी केशव प्रभुंच्या अंतरी । श्रीकृष्ण प्रीती फुलतसे ॥१४॥
अवकाशीचे चकोर चंडोल । हंस पारवे सुरेल कोकीळ । विविध वाटती रुपे केवळ । श्रीकृष्ण प्रभुंची केशवांना ॥१५॥
काळविटासंगे रानीवनी । कळप-हरीणींचा पाहुनी । उभा राही केशवांच्या नयनीं । घन:श्याम गोपीसंगे ॥१६॥
याच निमित्तें केशवदत्त । निसर्ग रम्य ठिकाणी नित्य । रममाण होऊनी राहात । कृष्णरूप होऊनी ॥१७॥
नदीकांठ वा वनराई । डोंगर माथा निबिड घळी । निसर्ग सुंदर रम्य स्थळी । सहज समाधी लागे तयां ॥१८॥
गोकुळ वृंदावन प्रत्यक्षांत । साकार होई साक्षात । उन्मन होती कृष्णप्रेमांत । केशवदत्त तदाकारे ॥१९॥
राधे गोविंद राधे गोविंद । नामामृताचा घेवोनी छंद । पदन्यास करिती स्वच्छंद । प्रत्यक्ष राधा होवोनी ॥२०॥
डोई वरती घेती घडा । म्हणती मारू नको खडा । नाहीतरी शिकविन धडा । कागाळी करीन यशोदेसी ॥२१॥
सहज उभी अंगणात । पाहोनी वाजवी कृष्णकांत । वेणू मधुर कुंजवनांत । बावरले म्हणती बाई गे ॥२२॥
अपूर्व ऐसी भावसमाधी । लागता तयाना अनिर्वेधी । आत्मानंदात आत्मवेधी । मनराहे गुंतोनी तयांचे ॥२३॥
या अद्भूत वातावरणी । महाराज जाती विसरोनी । स्वत्व आपुले मुक्तपणी । तसेच सभोवतालीचें ॥२४॥
गोकुळ वृंदावन प्रत्यक्ष । नयनीं त्यांच्या सापेक्ष । उभे राही परोक्ष । कृष्णलीला दाखविण्या ॥२५॥
यशोदामाई प्रात:काळी । आळवूनी मधुर भूपाळी । उठी उठी म्हणे वनमाळी । पाहती प्रत्यक्ष केशव ॥२६॥
पेंद्या बोबड्या वाकड्या । घेऊन सवे सवंगड्या । कृष्णजी करिती खोडया । गोपींच्या, पाहती केशवदत्त ॥२७॥
हुतुतु हमामा चेंडु लगोर्‍या । गोपीगृही नवनीत चोर्‍या । श्रीहरीच्या लीला न्यार्‍या । हृतमंदीरी पाहती केशव ॥२८॥
राधिकेच्या पैंजणाचे । झंकार लेवूनी कानी साचे । हृदयीं त्यांच्या आनंदाचे । नर्तन चाले अखंड ॥२९॥
मुरलीचा ऐकूनी सुस्वर । गोपी होती सैरभर । म्हणती घन:शाम सत्वर । पहावा नयनी एकदा ॥३०॥
राधिकेचे गोरस मंथन । मंथनी चाले कृष्ण चिंतन । अवचित उभा यदुनंदन । सामोरे पाहती केशव ॥३१॥
प्रहर प्रहर या समाधित । केशवदत्त राहोनी स्थित । कालांतरे होती पूर्ववत । दिव्यत्वाची घेवोनि प्रचिती ॥३२॥
असो, ऐके दिनी केशवदत्त । गोविंद गुरुंच्या समाधीत । बैसले होते आनंदात । गोष्टी करीत भक्तासवे ॥३३॥
गोष्टी होत्या शिळोप्याच्या । हास्य विनोद सुखाच्या । आठवणीही गतकाळाच्या । कैक निघाल्या ते वेळी ॥३४॥
गोष्टी आल्या असता रंगात । धुळ्याचे मोरुअण्णा अकस्मात । आले दर्शना सोनगीरीत । केशवदत्त गुरुंच्या ॥३५॥
पाहोनी मोरुअण्णासी । महाराज तोषले मानसी । हांसोनी म्हणाले आता खाशी । बैठक जमली सुरेख ॥३६॥
धुळ्याच्या राम मंदिरी । मोरुअण्णा असोनी पुजारी । मन त्यांचे सोनगीरी । राहे गुंतून सदाचे ॥३७॥
ब्राह्मण सुशील विशोधित । नि:स्वार्थी निर्भिड विरक्त । ख्याति सर्वत्र धुळ्यांत । आजही आहे तयांची ॥३८॥
पट्टीचे मृदुंग वादक । गायनी गळा सुरेख । गाणीं, गवळणी अभंग कैक । ऐकावी मुखांतून तयांच्या ॥३९॥
केशवांना करूनी दंडवत । मोरुअण्णा बैसले भिंती लगत । तेव्हां महाराज तयाप्रत । म्हणाले, सांभाळून बसावें ॥४०॥
आहेत पावसाचे दिवस । विंचवाचा येथें बहू त्रास । न जाणो प्रसाद तुम्हांस । देईल एखादा वृश्चिक ॥४१॥
स्वभाव मोरुअण्णांचा । विंचवाच्या भितीचा । केशवांना होता ठाऊक साचा । म्हणोनि उपहासे बोलिले ॥४२॥
विंचवास देखतां दुरोनी । पळ काढावा तयानीं । पाठी लागावे जणु वाघानी । तेवी पळत सुटावें ॥४३॥
या विचित्र भयाचे निरसन । करावे ऐसे योजून । महाराज म्हणाले तया लागून । या मोरु महाराज असे पुढे ॥४४॥
मोरुअण्णांना केशवांनी । “मोरु महाराज” संबोधुनी । जवळ आपुल्या बैसवोनी । हात फिरविला पाठीवर ॥४५॥
त्याच क्षणापासून । झालें तयांचे नामानिधान । “मोरु महाराज” म्हणून । रूढ तोंडी सकलांच्या ॥४६॥
मग केशवदत्त खिशांतून । तपकीरीची डबी काढून । एक दीर्घ चिमूट ओढून । म्हणाले सकलां लक्ष द्यावे ॥४७॥
शीत उष्ण सुखदु:ख । भयभिती राग विवेक । एकाच मनाचे खेळ अनेक । लीला नाटकी भासती ॥४८॥
या मनो व्यापारापासोनी । सावध असावे सकलांनी । संयम तीव्र राखोनी । ठेवावे अंकित ते आपुल्या ॥४९॥
मन हे अति अपचल । नावरे आवरितां चंचल । परि प्रयासे होते सबल । हरि चिंतनी गुंतविता ॥५०॥
ईश चिंतनी असतां निमग्न । विरते सकल देहभान । जाणीव नेणीव हारपून । एक तल्लीनता लाभतसे ॥५१॥
रामकृष्णीं रंगता मन । देहाचे हरपते देहपण । मग दु:ख वेदनांचे संवेदन । तल्लीनता लाभतसे ॥५२॥
मग केशवदत्त महाराज । मोरु महाराजासी म्हणाले सहज । आध्यात्मिक तुमची संध्या आज ।
ऐकावी वाटे मानसी ॥५३॥
महाराजांच्या मनीचा हेत । ऐकोनी मंडळीही समस्त । होवोनी बहु उल्हासित । मोरु महाराजांस आग्रह करी ॥५४॥
सकलांच्या विनंतीचा । मान राखोनी साचा । मोरुअण्णांनी खुंटी वरचा । पखवाज खाली काढीला ॥५५॥
अनावृत्त करुनी पखवाज । गवसणी ठेविली बाजूस । मग मांडी मोडूनी खास । थाप मारीली वाद्यावरी ॥५६॥
बोटे तयाची चपलख । फिरली पखवाजी अबलख । दृत गतीतील रागालेख । घुमले समाधीत गोविंदाच्या ॥५७॥
मग सुरेल गळ्यानी । मोरुअण्णा महाराजांनी । आळविली तन्मयमनी । आध्यात्मिक संध्यापुढील ॥५८॥
“झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम हृदयीं प्रगटला ॥धृ०॥
गुरुकृपा निर्मळ भागिरथी । शांति क्षमा यमुना सरस्वती ।
अशी पदे एकत्र जेथे येती । स्वानुभव स्नान हे मुक्त स्थिती ॥१॥
सद्बुध्दिचे घालुन सिध्दासन । वरी सद्गुरुची दया परिपूर्ण ।
यमदम विभूती चर्चुनी जाण । वाचे उच्चारुनी केशव नारायण ॥२॥
बोध पुत्र निर्माण झाला जेव्हां । ममता म्हातारी मरूनी गेली तेव्हां ।
भक्ती बहिण धाऊनी आली गांवा । आतां संध्या करू मी कैसी केव्हां ॥३॥
सहज कर्मे झाली ती ब्र्ह्मार्पण । जग नोहे अवघा हा जनार्दन ।
ऐसे ऐकून निवती साधूजन । एका जनार्दनी बाणली निजखूण” ॥४॥
मोरु महाराज एकचित । गात होते वरील गीत । वाहवा म्हणाले केशवदत्त । आनंद सागरा भरती ये ॥५९॥
अद्भुत या तंद्रीत । रंगला हा कलावंत । रंगले सारे भगवत भक्त । भान न कुणा कशाचे ॥६०॥
ब्रह्मानंदी लागली टाळी । मग देहाते कोण सांभाळी । हरी भजनाच्या कल्लोळी । अवघे झाले एकरुप ॥६१॥
मोरु महाराज होते गात । परि मांडिला तयांच्या डसत । असावे कांहीसे वाटत । होते तया मधे मधे ॥६२॥
असतील मुंग्या वा मत्कुण । मनी ऐसें समजून । मांडी मधेच खाजवून । बोटे पुनश्च फिरती पखवाजी ॥६३॥
कालांतरे संपता भजन । मोरु अण्णानी मांडिवरुन । पखवाज ठेविला उतरवून । भूमीवरी शांतपणें ॥६४॥
तव घडले काय अघटीत । विंचवाची पोरें सहा-सात । बाहेर पडताना अवचित । मृदुंगातून दिसली अवघ्यासी ॥६५॥
पखवाजाच्या वाद्यात । होती ही विणावळ वसत । मधुन मधुन प्रसाद । देत होती वादकासी ॥६६॥
परंतु तयांचे लक्ष । भजनी असतां पूर्ण दक्ष । हा अनाहुत वृश्चिक दंश । केवी बाधावा तयांसी ॥६७॥
विंचवाची ही फलटण । तुरु तुरु चालणारी विलक्षण । पाहून तेथले अवघे जन । विस्मित झाले क्षणभरी ॥६८॥
बघुनी ही सारी गंमत । हांसोनी म्हणाले केशवदत्त । “अहो मोरु महाराज महासंत । कोण चावले मांडिला?” ॥६९॥
मोरु अण्णांना पटली खूण । मांडीस होते डसले कोण । नव्हत्या मुंग्या वा मत्कुण ।जहरी दंश होता वृश्चिकांचा ॥७०॥
केशवांना करून नमस्कार । मोरु अण्णा म्हणाले सत्वर । महाराज तुम्ही संतवर । लीला तुमची काय जणू ॥७१॥
मांडीस चावले नि:शेष । होते ते विंचवांचे दंश । परी जाणीव तयांची विशेष । नाही झाली ईश कृपे ॥७२॥
दु:ख वेदना भयभीती । मनाचेच हे खेळ असती । परी मन गुंतता भगवतभक्ती । विसर पडे तयांचा ॥७३॥
तुमच्या ह्या उक्तीचा । अनुभव आला मज साचा । संदेह आता कशाचा । उरला नाहीं मुळी मज ॥७४॥
संतकृपा झाली जयावर । ते भक्त सुदैवी थोर । व्याघ्र व्याळ प्राणि भयंकर । न करिती अपाव तयांना ॥७५॥
मन हें हट्टी चंचल धावते । वार्‍यावरी अपचल । त्यास बांधोनी निखळ । आवरावे निग्रहें ॥७६॥
यांसी ठेवता काबूत । ऐहिक जीवनाची अनंत । दु:खे जळतील नितांत । केशवदत्त म्हणाले ॥७७॥
पहा संताचे विंदाण । दावूनी व्यवहारी खूण । आत्मज्ञानाचा सगुण । साक्षात्कार घडविती ॥७८॥
मग सद्गुरु केशवदत्त । म्हणाले विबुध समस्त । लक्ष द्यावे स्वस्थ चित्त । गोष्टी ऐका हिताच्या ॥७९॥
गर्जा एकदा राधे गोविंद । मना लावा हाच छंद । तेणेच तुमचा भवबंध । तुटेल निश्चये कायमचा ॥८०॥
जीव सृष्टी माजी नरजन्म । जाणा सुजन सर्वोत्तम । लक्षचौर्‍यांशीं योनी फिरुन । भाग्ये मिळतो एकदां ॥८१॥
हा न ये फिरफिरुन । मनीं हे नित्य जाणून । सावध व्हा सूज्ञजन । सलगीचे सांगणे तुम्हांसी ॥८२॥
नरतनु ही उत्तम । अनंत गोते खावून । लाधली आपणांस परम । हरिकृपे करोनी ॥८३॥
जाणीव याची नित्य ठेवा । श्रीहरीला अंतरी साठवा । तरीच जन्म मरणाचा ठेवा । रिता होईल आपैसे ॥८४॥
कुकर्म कधी न करावे । मूढ संगात न राहावे । षङरिपुसी दूर ठेवावे । उध्दार आपुला करावा ॥८५॥
चिंता दारा धनाची । विषवल्ली ही दु:खाची । न खंडिता मग सुखाची । शर्करा कैसी मिळेल ॥८६॥
करावा संत समागम । विषय वासना सांडोन । सार्थक आपुलेच आपण । मानव कुडी साधावे ॥८७॥
प्रापंची नसावी प्रीती । वा लाभहानीची क्षिती । चित्त असो द्यावे परमार्थी । जोडावया नारायण ॥८८॥
संशयी न रहावे । काम क्रोधासी खांडावे । शांती दयेसी वरावे । आत्मोन्नती साधावया ॥८९॥
काळाचा नसे भरवंसा । पळे तो पवन जैसा । तरीच हरीभक्ताचा वसा । आकळावा तात्काळ ॥९०॥
विहित कर्म करावे । फळी आसक्त नसावे । यशापयशी समत्व पहावे । सांगती सकल साधुजन ॥९१॥
नको व्रते नको नियम । देहा दंड वा इंद्रिये दमन । निष्काम करणे प्राप्त कर्म । मोक्षदायक दुसरे नसे ॥९२॥
जे उपजे ते नाशे । सृष्टीचा हा नियम असे । तेणेच या देहाचे । पिसे लागों देऊं नका ॥९३॥
स्वकर्म करितां, श्रीहरीचे । नाम घ्यावे नित्य वाचे । तेणें तुम्हा भवभयाचे । न उरेल कारण ॥९४॥
प्रात:समयी उठावे । दर्शन श्रीहरीचे घ्यावे । सद्गुरुचे स्मरण करावे । दिवसा होण्या कार्यरत ॥९५॥
निजकर्म आचरिता । मनाची न व्हावी विचलता । अर्पण करावे ते तत्वत: । जगन्नियंत्या प्रभूस ॥९६॥
सगुण वा निर्गुण । अंतर्यामी अधिष्ठान । ईश्वराचे नित्य ठेऊन । वर्तावे जगी धर्माने ॥९७॥
नसावा आपपर भाव । वृत्ति ठेवावी सात्विक । कार्यकारणी करावा विवेक । हीच उपासना जीवनाची ॥९८॥
निशिदिनी भजावे प्रभुला । निदान येईल हे कामाला । मोक्ष अंती हाताला । लागेल नि:शेष जाणावे ॥९९॥
हृदयीं बोल हे अमृत । धरा म्हणाले केशवदत्त । आणि हरी नामाच्या गजरांत । संपली बैठक समाधीतली ॥१००॥
इति श्रीशोधन विरचित । श्रीसद्गुरु केशवदत्त चरित । होवो सकलां सुखद । चौदावा अध्याय संपूर्ण ॥१०१॥
॥ इति चतुर्दशोऽध्याय: समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP