मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशव दत्त| अध्याय ३ रा केशव दत्त अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा भगवान गोपालकृष्ण - अध्याय ३ रा प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे. Tags : gopalkeshav dattakrishnamarathiकाव्यकृष्णकेशव दत्तगोपालमराठी अध्याय ३ रा Translation - भाषांतर श्रीगणेशाय नम: । श्रीसरस्वतयै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: । श्रीगोविंदाय नम: ॥ श्रीसद्गुरु केशवदत्ताय नम: । श्रीसद्गुरु मधुसूदनाय नम: । संत हे सुखाची साऊली । ममत्वतेची माऊली । गातसे गाऊली । भक्ताप्रेमें बुझावूनी ॥१॥संत हे स्वप्रकाशु । तारांगणीचे सुधांशु । बोधचंद्रिका वर्षु । आनंदघन कृपाळु ॥२॥जगत कल्याणा कारणे । संताचे भृवरी येणें । भूतां समत्वें पाहाणें । दुजा भाव न तया ॥३॥जावें संताचिये गांवा । प्रत्यक्ष देवू पाहावा । अनुताप आपुला हरावा । पायीं तयांच्या लागूनी ॥४॥संतांच्या नयनांतून । पाझरती प्रेमकिरण । लाभतो तयांतून । अनुग्रह पसावो साधकांसी ॥५॥संत ही सौभाग्य सरिता । वाहते दुथडी अमृता । जियेमाजी प्रक्षाळिता । जीवनमुक्ती लाधेल ॥६॥हे पंचमहाभूतातित । सिध्दात्मे या सृष्टींत । स्थूलरूपें निमित्त । वास करिती भक्तकाजा ॥७॥म्हणोनी जे संतपदी शरण । होईल तयांचे परम कल्याण । हा विधीलिखित नियम । संशय न धरी साधका ॥८॥असो मागील अध्यायीं आपण । श्रीगुरुगोविंद लीलावर्णन । अति आदरें केलें श्रवण । संतोष होतसे मानसी ॥९॥हे उन्मनीं अवस्थेत नांदती । आत्मानुभवांत विहरती । रुपें तयांची पालटती । कधी शांत वा कधीं उग्र ॥१०॥गुरुगोविंदाचे स्मितहास्य । लाभले सद्भाग्यें जयास । स्पर्शले परिणाम तयास । आनंदाचे निरंतर ॥११॥कधीं प्रक्षुब्ध होऊन । घेती फडाफडा मारून । अन्याय जुलुम दुवर्तन । वाढले कां पुसती देवासी ॥१२॥दुष्ट दुर्वर्तनी जनांस । लागावी सन्मतिची आस । म्हणोनी प्रयश्चित्त घेती स्वत:स । उलटी खूण संताघरी ॥१३॥नेत्रीं ये आरक्तता । खदिरांगार जैसा पेटता । हातीची रुद्रकाठी आपटतां वाटे भुई दुभंगेल ॥१४॥महाराजांचा हा अवसर । संचारला कां रात्रीं जर । उग्रता तयाची गंभीर । वर्णन करणें अशक्य ॥१५॥पाहूनी या रुद्रावतारा । लोक पळती सैरावरा । टाकूनी आपल्या वस्त्राप्रावर्णा । म्हणती स्वामी कोपले ॥१६॥जगीं ज्या ज्या घडती गोष्टी । त्या पुटपुटती स्वयेंच ओष्टीं । मग लाऊन दूर दृष्टी । न्याहाळती तारांगणे ॥१७॥कालांतरे होती सावध । उठले वादळ होई निश्रब्ध ॥ तै अश्वत्थवृक्षाच्या सन्निध । येऊनी बैसती शांतपणें ॥१८॥अश्वत्थ वृक्षास पुसती । हे मानव ऐसे कैसे वर्तती । कैसी होईल तया उपरती परोपकारी तुज जैसी ॥१९॥वृक्षवेलीसवें संवाद । कथिती तया आत्मबोध । परि इतरे जनांस सुबोध । होई सहजभावें तयांच्या ॥२०॥मग स्थिर चित्तें बसून । लोकां म्हणती हंसून । कां रे पळाला भिऊन । यारे जवळी माझिया ॥२१॥सकळांसी घेऊनी सवे । मारुती मंदिरासमीप यावे । रामगुणानुवाद गावे । होरी गीत म्हणावें सुरांत ॥२२॥थाळी पितळेची एके हाती । ठेका धरूनी वाजवीती । गोविंद नामाची धरा प्रिती । सांगती सकळां आर्जवें ॥२३॥तयांचा राग वां अनुराग । लाभला ते महासुभग । जया आला हा सुयोग । मुक्त झाले भवताप ॥२४॥सदवर्तन आणि सदाचार । जीवनाचे हेच सार । ठेवूं नका तया दूर । सांगती महाराज सकळांसी ॥२५॥टाकोनी मनीचा अहंभाव । हृदयीं हो धरी सद्भाव । तयापाशीं ठाके देव । निश्चित म्हणती महाराज ॥२६॥दर्शन सहज समाधीयोगाचे । लाधले जया गुरुगोविंदाचे । ते भाग्यवंत जाणा साचे । पूर्व सुकृते करोन ॥२७॥महाराजासवें भजन । सुखसंवाद वा भोजन । लाभले ते सारे सतजन । आत्मसुखासी भेटले ॥२८॥वामनरावजी पराडकर । दगडुशेट वर्शीकर । कुळकर्णी आणि इतर । नांवे किती सांगावी ॥२९॥सद्गुरु गोविंदाचे चरण । धरिता झाली जयाची उज्जवण । ऐसे भक्त कीर सतजन । कथा ऐका तयांची ॥३०॥धुळ्याचे ऐक मान्यवर । वामनवराव पराडकर । निर्देश जयाचा केला वर । भक्त थोर बाबजींचे ॥३१॥माय जैसी बालकासी । धेनु जैसी वासुरासी । माया तैशीच वामनरावासी । करिती महाराज अतिप्रेमें ॥३२॥चित्त आणि वित्त आपुलें । श्रीचरणी अर्पण केले । महाराजांसी पूजिलें अर्चिले । तपाहूनीही अधिक ॥३३॥साहुनी अनंत अडचणी । निष्काम केली सेवा तयांनी । लीन होऊन गुरुचरणीं । कृपाप्रसादा पावले ॥३४॥गुरुगोविंद हेच आपुले । मानिती भाग्य वा ऐश्वर्य भले । सरोभरी सुखी झाले । उजाळे स्वामी कृपेच्या ॥३५॥आपल्या सुपुत्राचा व्रतबंध । सोनगीरी केला गुरुसन्निध । बटूच्या मस्तकीं राहावा सिध्दहस्त । हिच कामना तयांची ॥३६॥महाराजांचे हे लाडके भक्त । राहती त्यांच्याबरोबर नित्य । त्या कारणें आत्मानुभव-सुख । लाभलें पराडकरासी ॥३७॥महाराजांच्या समाधीनंतर । हे परमभक्त पराडकर । धुळे शहरीं अखेर । पंचतत्वासी पावले ॥३८॥दुसरे भाऊराव कुळकर्णी । काया आपुली अर्पूनी चरणीं । महाराजांचे सेवेकरणी । नोकरी सोडीली सरकारी ॥३९॥सोळा सतरा वर्षे सतत । राहिले स्वामी-कार्यात रत । गोविंद भक्तीविणे चित्त । ध्यास न धरी कशाचा ॥४०॥सोनगीरीच्या उत्सवांत । भाऊरावांचेच असे नेतृत्व । जिवापाड करूनी मेहनत । कार्यक्रम केले यशस्वी ॥४१॥सोनगीरीचे आनंदवन । हेंच त्याचें नंदनवन । गुरुसेवा करावी रात्रंदिन । निधीध्यास हा तयांचा ॥४२॥आल्या गेल्याची ठेवावी व्यवस्था । दाखवोनी अंतरीची आस्था । ममत्वें पुसावें समस्तां । हवे नको असेल तें ॥४३॥हाच आपुला संसारक्रम । म्हणती कुळकर्णी सवर्म । विहीत हें माझें कर्म । यथासांग पार पडो ॥४४॥सांजसकाळी पूजाआरती । महाराजांची तेच करिती । नैवेद्य दाऊनी तयाप्रती । जेऊं घालती गोविंदा ॥४५॥महाराजांची अन्नग्रहण । केल्याविना न घेती जेवण । घडे कधीं उपोषण । गुरुंच्या संगे तयासही ॥४६॥मालपोव्याचा पदार्थ । आवडे महाराजा अत्यंत । म्हणोनी हाच प्रसाद । वाटिती सकळां भाऊराव ॥४७॥भाऊरावांच्या भक्तीची खूण । गुरुगोविंदे अंतरी जाणून । दिला एक तेजस्वी बाण । कुळकर्ण्यासी पूजावया ॥४८॥महाराजांच्या आठवणी । जपून ठेविल्या तयांनी । नोंद आपुल्या लेखनी । केली अत्यंत मौलिक ॥४९॥महाराजाचे हे परमभक्त । श्रध्दवान आणि निष्ठावंत । झाले एकाएकीं दिवंगत । सोनगीरी देह ठेविला ॥५०॥तारांगणीचे एक नक्षत्र । निखळले ऐसे अवचित । येऊनी महाराजा सन्निध । ज्योतीस ज्योत मिळाली ॥५१॥सोनगीरीचे पितांबरशेट । महाराजांचे भक्त श्रेष्ठ । गुरुसेवा केली एकनिष्ठ । भाऊरावांसमवेत ॥५२॥महाराजांच्या समाधीचे । तसेच अन्य इमारतीचे । ठेऊन देखरेख काम साचे । केलें तयानीं कळकळीनें ॥५३॥यानीं गोविंद गुरु-पदी । देह ठेविला भाऊरांवा आधीं । त्यजुनी जन्ममरणाच्या उपाधी । चिर:शांतिस पावले ॥५४॥पराडकरांचे परमस्नेही । दगडूशेट वर्शीकरहि । महाराजांचे सेवेकरी । होते श्रध्दाळु आणि प्रेमळ ॥५५॥गुरुगोविंद चरणारविंदी । राहोनी सदा आनंदी । नाचावे बागडावे ब्रह्मानंदी । राहे न भान देहाचे ॥५६॥महाराजांचा प्रेमानुग्रह प्रसाद । लाधला जयांना सुखद । त्या पुण्यवंताची हकिगत । अनुवादिली मी तुम्हांप्रती ॥५७॥या भक्तरुपी तारकांत । दिव्यत्वाची एक ज्योत । प्रकाशली सतेज । शुक्राची जैशी चांदणी ॥५८॥सुरतरुमाजी मंदारवृक्ष । पक्ष्यांमाजी राजहंस । तारामंडळी चंद्रहास । तैशीच होती विभूती ही ॥५९॥महाराजांचे कंठमणी । सकलशास्त्र सुलक्षणी । जहाले पुढे संतशिरोमणी । केशवदत्त नामे प्रसिध्द ॥६०॥हेच आपुले चरित्रनायक । महाराजांचे परमशिष्य । गुरुशिष्यांची भेट अलौकिक । ऐका श्रोते दत्तचित्तु ॥६१॥नित्यनैमित्त्यिकें आणि आरती । पूजा चालली असतां यथामति । क्षणैक उठोनी महाराज म्हणती ।“बच्या आया है उसको ले आना” ॥६२॥ सेवेकर्यांसी याचा मतितार्थ । उमगला नाहीं यथार्थ । तव महाराज होऊनी क्रोधार्त । म्हणती शब्द तेच पुन्हां ॥६३॥“गुंगे क्युं तुम हो गये । बच्चेको जल्दी ले आवे । मंदीर में नदी किनारे । मेरा बालक बैठा है” ॥६४॥गुरुगिरा ही दुर्बोध । करीता विचार सुबोध । झाला कांहीजणा प्रबोध । म्हणती धुळ्यासी चलावे ॥६५॥धुळ्याच्या नदीकिनारीं । देवळांत कोणीतरी । वार्ता ऐकली होती खरी । साधुपुरुष आल्याची ॥६६॥महाराजांची तै घेऊनी आज्ञा । भाऊराव कुळकर्णी निघालें जाण्या । या सिध्दासी सोनगीरी आणण्या । धुळ्याहून सत्वरी ॥६७॥नदीच्या तीरावर सुंदर । होते एक शिवमंदीर । आले तेथें भाऊराव । प्रथम शोध कराया ॥६८॥परंतु त्या राऊळीं । नाही गवसले कुणीही । म्हणोनी भाऊरावांनीं । मोर्चा अन्यत्र वळविला ॥६९॥पद्मनाभ स्वामीचे मठांत । उतरले आहेत एक संत । कळलें भाऊराव निश्चित । आले मठांत झडकरी ॥७०॥मठाच्या सभामंडपी । तेज:पुंज एक तपस्वी । आसनस्थ दिसला तयांसी । प्रभू चिंतनी निमग्न ॥७१॥गौरकाया रूपसुंदर । नेत्र जैसे इंदीवर । शुभ्र वस्त्रें अंगावर । दिसले व्यक्तीमत्व प्रसन्न ॥७२॥वीस वा एकवीस वर्षांचे । वय असावें बहुधा त्यांचें । परि वैराग्यवृत्तीचे । आगळे तेज मुखावरी ॥७३॥उघडीतां तयांनी आपुले नेत्र । सेवेकरी आणि भक्त अन्यत्र । करूनी तया प्राणिप्रात । बैसले जवळी तयांच्या ॥७४॥मूर्ती तरुण ब्रह्मचारी । विवेकी, विरागी, सुविचारी । प्रवचनें ज्ञानेश्वरीवरी । करिती रसाळ आणि सुबोध ॥७५॥लौकिक तयांचा धुळ्यांत । वाढला शुक्लेंदुवत । म्हणती लोक साक्षांत । दिवाकर ज्ञानाचे उदेलें ॥७६॥या महाभागासी दंडवत । घालिती साष्टांग रस्त्यांत । तिष्ठती कैक दर्शनार्थ । मार्गावरी तयांच्या ॥७७॥मुखीं सदा राधेगोविंद । प्रभुनामाचा अखंड छंद । ब्रह्मांनंदी होऊनी दंग । भावसमाधी लागतसे ॥७८॥भावपूर्ण तयांचे भजन । ऐकोनी समस्त श्रोतृगण । विसरून जाई देहभान । एकरूप होई तयांसी ॥७९॥ज्ञानेश्वरीचे निरुपण । उघडोनी कुठलेही पान । आपल्या विशिष्ठ्यें करून । सांगावे अमृतवाणीने ॥८०॥असो तव आपुले मानस । भाऊरावे कथिले तयास । आम्हासंगे सोनगीरीस । चालावे म्हणती कृपाळा ॥८१॥गुरुगोविंदाचे निमंत्रण । बहु सलगीचे आवतण । आलो घेऊनी सारेजण । सेवेकरी म्हणाले ॥८२॥मूळ माहेरचे एकाएकी । यावे आसावल्या लेकीं । तैशी जाहली तयांची स्थिती । लोचनीं अश्रू दाटले ॥८३॥संत जाणती संतांची खूण । काय जाणवी ती आपण । हर्ष होऊनी मनोमन । ‘येतो आम्ही’ म्हणाले ॥८४॥घेऊनी सवे या सिध्दास । मंडळी आली सोनगीरीस । बहु भाग्याचा तो दिवस । वैशाख शुध्द षष्ठीचा ॥८५॥गंगा मिळावी यमुनेला । किंवा कृष्णामाई कोयनेला । तैसा संगम जाहला अपूर्व भगवत-भक्तांचा ॥८६॥एक प्रत्यक्ष चंद्रमा । दुजी तयाचीच प्रतिमा । संभ्रम जाहला इतरेजना । अद्वैत रूप पाहुनी ॥८७॥एक वैराग्याचा मेरु । दुसरा शांतीचा सागरु । एक भवताप-हरु । लोक कैवारु दुजा असे ॥८८॥एक प्रत्यक्ष माऊली । दुजी तयांची साऊली । एक ज्ञान दिपावली । दुजा प्रकाश शांतीचा ॥८९॥देखोनी ही दिव्य मूर्ती । महाराज मनीं संतोषती । स्नेहें धरोनी तयासी हातीं । बैसविले अपुल्या सन्निध ॥९०॥म्हणाले हा बालकराम । माझा परम शिष्योत्तम । आनंदवनीचा कल्पद्रुम । इथेच राहील यापुढें ॥९१॥हा माझा आध्यात्मिक वारस । जरी शिवदत्त दरबारीचा सेवक । स्वीकराले माझे शिष्यत्व ।अनुज्ञा तयांचीच यायासी ॥९२॥तव केशवदत्त उमजले । शिवदत्ताचे उद्गार भले । विनम्र होउनी आपुलें । मस्तक ठेविलें गुरुचरणीं ॥९३॥भेट ही जीवा-शिवाची । पर्वणी भाग्याची । वृष्टी जाहली सुमनांची । सुखावलें संत-द्वय ॥९४॥महाराजांची आज्ञा प्रमाण । केशवदत्तांनी तई मानून । वास्तव्य आपुले आनंदवन । निरंतर केले सोनगीरीं ॥९५॥हीच ज्ञानाची परं-ज्योत । तेजें पाजळली सर्वत्र । हेच आपुले चरित्रनाथ । केशवदत्त सद्गुरु ॥९६॥तयांसी सुरस चरित्रकथा । सांगेन मी तुम्हा भक्तां । अती सादरें श्रोते एका । शेषग्रंथी रसिकत्वे ॥९७॥इति श्रीयशोधनविरचित । श्रीसद्गुरु केशवचरित । होओ सकलां सुखद । अध्याय तिसरा संपूर्ण ॥१८॥॥ इति तृतीयोऽध्याय: समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : December 02, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP