भगवान गोपालकृष्ण - अध्याय ११ वा
प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.
नम: परम कल्याण । नम: परम् मंगल । वासूदेवाय शांताय । यदुनाम पतयेनम: । महाराज केशवदत्त । कांही काळ सोनगीरीत । राहोनी, निघाले प्रचारार्थ । भागवतधर्म खेडोपाडी ॥१॥
आषाढी कार्तिकी एकादशीची । वारी केली पंढरीची ॥ मिरविली पताका भक्तीची । खांद्यावरी वैष्णवोत्तमे ॥२॥
ज्ञानेश्वरीचे प्रवचन । रात्रीं कथा कीर्तन । विठठलाचे नामस्मरण । अखंड सत्र चालविले ॥३॥
चंद्रभागेच्या वाळवंटी । वारकर्यांच्या आले भेटी । विठठल श्रीरंग जगजेठी । हरी कीर्तनीं नाचावया ॥४॥
ऐक्य, समत्व, विश्वबंधुत्व । सामान्य जनीं प्रस्थापित । संतानीच जें केले आजपर्यंत । तेंच करिती केशवप्रभु ॥५॥
खेडोखेडीं करावा प्रवास । वस्तीस राहावे चारदोनदिस । प्रवचनें करावी सुरस । भक्तीमार्गा लावावे जनांसी ॥६॥
रावापासोनी रंका वेरी । सामान्य व राजमान्यावरी । दृष्टी ठेवावी समांतरी विचार पूस सर्वांची करावी ॥७॥
हरिभजनाची आवडी । अध्यात्माची असावी गोडी । हीच शिकवण घडोघाडी । देती महाराज सर्वत्र ॥८॥
प्रापंचिक कटकटी । कौटुंबिक खेकटी । ठेवोनीं न्यायान्याय दिठी । महाराज सोडवित लिलया ॥९॥
गरजु गरिब असाह्य । व्याधिग्रस्त चिंतामय । करिती तयांना सकल साहाय्य । केशवदत्त दयाळु ॥१०॥
शिरतां गांवाच्या वेसींत । भोंवती जमती असंख्य भक्त । शोक मोह विरहित । केशव गुरुंच्या समीप ॥११॥
वाटे तयांना पर्वणी । आली सुखें चालोनी । चैतन्याचा वासरमणी । उगवला जणुं गांवांत ॥१२॥
आनंदानें सकलजन । निघावे केवळ न्हाऊन । अमृतडोह उचंबळुन । यावा प्रमोद उधळावया ॥१३॥
महाराज कुठेही अन्य । ग्रहण न करीत अन्न । स्वहस्तेंच निज भोजन । शिजवीत स्वयें सर्वदा ॥१४॥
कधीं एकादा साहाध्यायीं । असलाच बरोबर समयीं । तयारी पवित्र हस्ते देई । करून स्वैपाकाची तयाना ॥१५॥
केशवदत्तांची राहणी । असे अत्यंत संयमी । डामडौल वस्त्र प्रावर्णि । नावडे कधीं तयांना ॥१६॥
वेष असावा, बाबळा । अंगीं असाव्या नानाकळा । तैसेचि ते भासविती सकळां । महायोगी असोनी ॥१७॥
खादीचे जाडे भरडे । पेहरावे शुभ्र कपडे । मुंडासेवजा शिरीं फडकें । पायीं जोडा पुणेरी ॥१८॥
नेसूचे शुभ्र धोतर । उपरणें अंगावर । गंध मुद्रा भालावर । मूर्ती दिसे तेजस्वी ॥१९॥
गळां तुळशीची माळा । भालीं वैष्णवी उभा टिळा । अंगी असाव्या नानाकळा । तैसेच ते भासविती सकळां ॥२०॥
मध्यम उंची स्थूल शरिर । सतेज कांती वर्ण गौर । दृष्टि तरल मधुर स्वर । वर्णन काय करूं गुरुंचे ॥२१॥
असती जरी अंगी स्थूल । चटपट तयांची हालचाल । चालण्याची गती चपल । सामान्य जना न साधावी ॥२२॥
दृष्टी चौकास तयांची । नेत्रीं आर्द्रता प्रेमाची । ध्यान मग्न परी सदाची । कल्याणकारी भाविका ॥२३॥
अर्धोन्मिलीत इंदिवर । पापण्या दिसाव्या चंद्रकोर । ब्रह्मतेजाचा व्हावा साक्षत्कार । नेत्री तयांच्या पाहता ॥२४॥
ब्रह्मचर्याचे तेजोत्तम । मुखकमलीं वसे अप्रतिम । स्तिमित होती भक्तजन । दिपती डोळे प्रकाशें ॥२५॥
न लागे सांगावया कुणा । केशवांच्या संत खुणा । कुणीहि भाविक तत्क्षणा । जाणे अधिकार तयांचा ॥२६॥
खेडोपाडी खानदेशीं । पदयात्रा केली सुखैषी । गोरगरीबां मायेशी । पोटी घेतले केशवांनी ॥२७॥
लोकशिक्षणाचे देऊन धडे । सामाजिक अभिवृध्दिकडे । घेऊन गेले रोकडे । केशवदत्त तयांना ॥२८॥
घेतां हरीनाम मुखीं । पावाल तुम्हीं सर्व सुखी । मुरली-मनोहर रुक्मीणीपती । क्षेम करील सकलांचे ॥२९॥
महाराजांचा ऐसा आशिर्वाद । मस्तकीं पडला जयांच्या सुखद । तयांच्या घरीं महानंद । वास करोनी राहिला ॥३०॥
केशवदत्तांची कीर्ति आतां । सर्वत्र जाहली पाहतां पाहतां । गांवोगावीं मग एकच वार्ता । चाले केशवदत्तांची ॥३१॥
खानदेशाप्रमाणें । मुंबई कल्याण भिवंडी ठाणें । येथेंहि त्याचें जाणें येणें । प्रतिवर्षी होत असे ॥३२॥
दर्शने देऊनी निज भक्ता । लाविती तयांना परमार्था । दीन दु:खी श्रांत आर्ता । आशीर्वचनें सुखविती ॥३३॥
येतां सद्गुरु घरासी । वाटे ऐसे भक्तगणांसी । कीं प्रत्यक्ष हृषीकेशी । ठाकले उभे दारांत ॥३४॥
होई तयांना समाधान । भेटले जणु चितधन । कृतार्थ वाटे झाले जीवन । परब्रह्म भेटीनें ॥३५॥
साधुसंत येती घरा । तोची दिवाळी दसरा । तेवींच वाटे या भकवरां । केशवांच्या आगमने ॥३६॥
एकोणीसशें वीस पर्यंत । निजगुरू सेवाव्रत । होते प्रभु केशवदत्त । वर्षें अकरा सातत्यें ॥३७॥
बहुत भक्ती प्रीतिनें । अरुणी एकलव्याच्या निष्ठेनें । सेवा केली बालकरामे । राहूनी जवळी तयांच्या ॥३८॥
आध्यात्माचे दिव्यज्ञान । भक्ती मुक्तीचे प्रबोधन । योग साधना समाधी साधन । झाले याच काळी तयांचे ॥३९॥
सकल विद्येचे आगरु । झाले केशवदत्त प्रभु । गोविंद महाराज सद्गुरु । प्रसन्न होतां तयांसी ॥४०॥
गुरु शिष्य असतां एके ठाई । गंगा जमुनेचा भास होई । आनंदवन भरून जाई । अमृतानंदे दशदिशा ॥४१॥
याच दीर्घ काळांत । सोनगीरीचे महत्व । अखिल महाराष्ट्रांत । सर्वतो मुखीं जाहले ॥४२॥
आनंदवनीं आनंदाचे । दिवस ऐसे मांगल्याचे । पाहाणे नित्य भाग्याचे । लोभल कैक सुभगांसी ॥४३॥
असो आतां श्रोतुजन । चरित्र कथेचें अनुसंधान । तूर्त इथेच सोडून । वृत्तांत अन्य परिसाजी ॥४४॥
वियोग गुरु-शिष्यांचा । होणार आता कायमचा । नियम केवळ नियतीचा । देवादिकांही अनिवार्य ॥४५॥
गोविंद गुरु योगी महान । या अध्यायीं अदृष्यमान । होणार ही वार्ता कथन । करणें आली मजवरी ॥४६॥
शरिर हें नाशिवंत । जरा मरण जरी युक्त । जाणतो, परी व्यथित । होतो पामर म्हणोनी ॥४७॥
ना तरी संत हे नित्य । जन्म मरण विरहित । वास करिती अनित्य । अनुग्रहाप्रीत्यर्थ भूवरी ॥४८॥
स्थूल देह जरी तयाचा । पंचतत्वासी मिळतो साचा । परी खेळ केवळ आभासाचा । लौकिकी दाविती आपणांसी ॥४९॥
आजही भारतांत । असती ऐसे कित्येक संत । जे घेवोनी चिरंजीवपद । दुरितांचे दु:ख वारिती ॥५०॥
संत हे काळावरती । सदैव सत्ता गाजविती । काळच स्वयें तयाप्रती । वंदी गुलाम होवोनी ॥५१॥
ज्ञान चैतन्याची खनी । उधळोनी दो हातांनी । संतगुरु गोविंदानी । दिली सकलां अशेख ॥५२॥
मारुतीच्या मंदिरांत । गुरु गोविंदा समवेत । बैसले असता केशवदत्त । काय घडलें एके दिनीं ॥५३॥
मूर्तीस मारुतीच्या महाराज । हंसून म्हणाले सहज । हे हनुमान बजरंग । सवाल एक पुसूं कां? ॥५४॥
तेवती माझी जीवनज्योत । करावी लीन तुमच्यांत । मनीं उद्भवला आंताहेत । आज्ञा आपुली काय असे? ॥५५॥
तंव गुरुगोविंदांनी । एक चित्त होऊनी । स्थीर मुद्रा लावोनी । कपीध्वजासी पाहिले ॥५६॥
मग म्हणाले सस्मित होऊन । ऐका ऐका सकल जन । आतां आमुचे मकान । रिते होईल लवकरी ॥५७॥
अर्थ या उद्गारांचा । आशय महाराजांचा । ध्यानीं आला त्वरित साचा । उमजले भविष्य जाणते ॥५८॥
शके अठराशें बेचाळीसांत । गोविंदगुरु होते त्रस्त । वात विकारे अस्वस्थ ज्वरहि अंगी राहतसे ॥५९॥
याचवेळीं केशवदत्त । आळंदीस जाणे विचारांत ॥ होते पालखी समवेत । पंढरपुरी जाण्याच्या ॥६०॥
आज्ञा गुरुंची घ्यावया । जंव लागले ते श्रींच्या पाया । तंव महाराज म्हणाले तया । ‘अबी ठैरो मत जाना’ ॥६१॥
प्रकृती असतां अस्वस्थ । बाह्योपचार करिती फक्त । न घेती कधीहि ओखद । पोटांत गुरुगोविंद ॥६२॥
स्थूल देहाचे ममत्व । न ठेविती कधीही संत । जनवात्सल्या प्रीत्यर्थ । जड देहें वावरिती ॥६३॥
शारिरिक सुखदु:खाची । धरिली न तयांनी कधीक्षितीं । स्नान, ध्यान उपासनादि ।नामस्मरण नित्य चालू असे ॥६४॥
ज्येष्ठ वद्य षष्ठीचे दिवशीं । प्रात:काळच्या समयासी । महाराज सकल भक्तांनिशी । बैसले होते मंदिरांत ॥६५॥
हरि नामाचा गजर । चालला होता एकस्वर । मग आरतीही सुस्वर । टाळमृदुंगात उभी राहिली ॥६६॥
त्याचवेळी धरणगांवकर । किसनशेट भक्तवर । इत्यादि मंडळी हजर । नंदुरबारची जाहली ॥६७॥
गोविंद महाराजांची प्रकृती । आज जरा बरी होती । त्याच कारणें हे येती । होते समीप भक्तांच्या ॥६८॥
लावोनी भाव समाधी । दंग होते भजनानंदीं । चित्त स्थिरावले परमानंदीं । आत्मरूप पाहोनी ॥६९॥
दोन प्रहरापर्यंत । महाराज होते ध्यानस्थ । त्या अवधिंत केशवदत्त । आले जवळी तयांच्या ॥७०॥
मग उघडोनी आपुले नयन । केशवासी म्हणाले चिदघन । तीर्थ, प्रसाद भोजन । झाले काय सकलांचे ॥७१॥
साधू, तडी, तापसी । संन्यासी अतिथी यांसी । प्रसाद मिळाल्याची चौकशी । नित्येच करित गोविंद ॥७२॥
मग गुरु गोविंदाची स्वारी । उठोनी तेथून झडकरी । केशवांनी धरोनी स्वकरी । अश्वत्थवृक्षापासी पातली ॥७३॥
येवोनी बजरंगा समीप । म्हणाले गोविंद हे अंजनीसुत । आज आमुची दिव्यज्योत । स्वरूपीं तुमच्या मिळावी ॥७४॥
अन्नदान, विद्यादान । संपूर्ण व्हावे सेवादान । इतुकेच असावें वरदान । शिष्योंत्तमासी माझिया ॥७५॥
मग गुरुगोविंदावर । येऊन बैसले ओसरीवर । सकल भक्त संभार । भोंवती जमला तयांच्या ॥७६॥
मग गुरुगोविंदांनी । दर्याद्र नेत्रीं अवलोकुनी । सकलां हात उभवोनी । आशिर्वाद दिला सुखाचा ॥७७॥
मग मदनभाई यांसी । म्हणाले आणावे वेगेसी ॥ ‘भगवती’ आमच्या तलवारीसी । पूजनार्थ या स्थळी ॥७८॥
आणोनी भगवती तलवार । ठेविली गुरुंच्या गादीवर । मग केशवांना म्हणाले संतावर । अनावृत्त करा शस्त्रासी ॥७९॥
असिलता काढिली म्यानांतून । करोनी तियेसी वंदन । दिली चौरंगावरी ठेवून । पूजेसाठीं आदरे ॥८०॥
मग भाऊराव कुळकर्ण्यासी । उठा म्हणाले स्नानासी । तयारी करणें तुम्हांसी । पुजेची आमुच्या भगवतीची ॥८१॥
स्नान करोनी विहिरीवर । भाऊराव आले सत्वर । पूजा साहित्य होता तयार । पुजिली भगवती गोविंदानी ॥८२॥
मुद्रेवर तयांच्या आनंद । समाधानाचा होता ओसंडत । परी अंगी तयांच्या किंचित । स्वेद सुटूं लागला ॥८३॥
कांही वेळानें गुरुगोविंद । वाटू लागले अस्वस्थ । तंव म्हणाले केशवदत्त । मंडळीस बोलवा गांवातल्या ॥८४॥
वातावरण झाले गंभीर । घाम येऊं लागला अपार । भक्तगण झाला चिंतातुर । प्रकृति विषयी तयांच्या ॥८५॥
मथुरादास, बाबुशेट । महाराजांचे भक्त निकट । आले मुलाबाळां सकट । आनंदवनीं लगबगा ॥८६॥
महाराजांच्या आजाराची । वार्ता पसरली चिंतेची । रीघ लागली लोकांची । सोनगीरीच्या किल्ल्याकडे ॥८७॥
पाहोनी जन सभोवती । गोविंद म्हणाले तयांप्रती । संचित कां होता मजविसी । नरदेह सदा नाशिवंत ॥८८॥
वसनें झालिया जीर्ण । घ्यावी लागतात नवीन । तेवीच आत्मा जुनें टाकून । शरिर नवें घेतसे ॥८९॥
मजविषयीं न व्हावे संचित । सोडा मनीचा खेद वा खंत । आठवा अखंड भगवंत । गोविंद गोविंद गावोनी ॥९०॥
यापुढें हा बालकराम । वारस माझा म्हणून । गादीवर माझ्या बसून । आधार तुम्हांसी होईल ॥९१॥
मग नाम भजनाचा घोष । चालला असता संतत । आंबे मागवून प्रसाद । लहान मुलां देवविला ॥९२॥
श्रींची ही अखेरची । कृति निरवा निरबिची । पाहोनी भक्त मंडळी तयांची । व्याकुळ झाली दु:खाने ॥९३॥
अंधार यावा दाटून । चंद्रबिंब जावे झांकळून । पृथ्वीनें धरावा श्वास रोखून । तेविच वाटले अवघ्यांसी ॥९४॥
महाराजांचा समाधी काळ । आला आतां निश्चये जवळ । जाणोनी हे जन सकळ । दु:खार्णवी बुडाले ॥९५॥
कीं सुटावा झंजावात । वृक्ष उन्मळावा अकस्मात । मस्तकीं पडावा प्रपात । तेवीच झाले सकळांसी ॥९६॥
महाराजांनी एकदां फिरून । दृष्टी फिरविली सकलांवरून । मग दोन्हीं बाहु उभारून । शांत केले सकलांसी ॥९७॥
म्हणाले प्रिय भक्त हो । स्थिर रहो आनंदमें रहो । गोविंद गोविंद गाया करो । संदेश माझा सकलांसी ॥९८॥
एवढे त्यांनी बोलून । नेत्र घेतले मिटून । मग रामनाम उच्चारून । चिरंतन समाधी लाविली ॥९९॥
ऐसे हे जगदोध्दारक । सकल सौभाग्य प्रतिपालक । संतश्रेष्ठ अलौकिक । स्वस्वरूपी मिळाले ॥१००॥
समाधि यांची सोनगिरी । मारुती मंदिरा शेजारी । आनंदवना माझारी । दिसेल भाविका आजही ॥१०१॥
या पवित्र समाधीवर । विनम्र होती जे भक्तवर । तयानां संतवर । आशिर्वाद देती सुखाचा ॥१०२॥
वारितील सकल आपदा । देतील सुख संपदा । म्हणोनी या संतसंदा । ठेवा अखंड हृदयांतरीं ॥१०३॥
या समाधि मंदिरांत । येतात जे दर्शनार्थ । तयानां कधी अद्भुत । साक्षत्कार होतो आगळा ॥१०४॥
मुखें म्हणतां गोविंद गोविंद । पिंगा घालतो एक भृंग । सुपुष्पांचा सुगंध । दरवळतो समाधित आजहि ॥१०५॥
अनुभूती ही महान । घेणें असेल जर श्रोतृजन । मग सश्रध्द होऊन पूर्ण । सोनगीरीस जा एकदां ॥१०६॥
इति श्री यशोधन विरचित । श्रीसद्गुरु केशवदत्त चरित । भक्त भाविका होवो सुखद । अकरावा अध्याय संपूर्ण ॥१०७॥
॥ इति एकादशोऽध्याय: समाप्त ॥
N/A
References : N/A
Last Updated : December 02, 2016
TOP