मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशव दत्त| अध्याय ७ वा केशव दत्त अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा भगवान गोपालकृष्ण - अध्याय ७ वा प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे. Tags : gopalkeshav dattakrishnamarathiकाव्यकृष्णकेशव दत्तगोपालमराठी अध्याय ७ वा Translation - भाषांतर नम: परम कल्याण नम: परम मंगल । वासुदेवाय शांताय यदूनां पतये नम: । गताध्यायीचे अनुसंधान । राखोनी पुढील कथा कथन । भक्तीभावे तुम्हां करीन । श्रोतृजन ऐकावे ॥१॥महाराजांचे एक प्रवचन । भावार्थी जयाचे विवेचन । हेत ऐसा मनीं योजून । हा अध्याय लिहिला असे ॥२॥शिवालय पांजरा कांठीचे । वाटुं लागले गैरसोयीचे । म्हणोनी कार्यक्रम प्रवचनाचे । होऊं लागले शहरांत ॥३॥खोळ गल्लीतील राममंदीर । होतें प्रशस्त आणि सुंदर । तेथेच प्रवचनें ज्ञानेश्वरीवर । करीत महाराज यापुढें ॥४॥महाराजाचें निरुपण । जणूं अमृताचे सिंचन । तृप्त होती आर्तश्रवण । भक्तीसुधा पिवोनी ॥५॥श्रोतवृंद अपार । भरोनी राहिला मंदीर । प्रवचनासी झाला अधीर । केशवदत्त प्रभुंच्या ॥६॥राममंदीराच्या परिसरांत । प्रवेशंता केशवदत्त । दाटी लोटली अद्भुत । पादवंदनासी तयांच्या ॥७॥होऊनी मग आसनस्थ । म्हणाले प्रभु केशवदत्त । प्रभुचिंतनी एक-चित्त । व्हावें श्रोतेसज्जन हो ॥८॥राधे गोविंद राधे गोविंद । वाजवा टाळी एकसंघ । होऊं भजनी सकळ दंग । माधव मुंकुद मुरारीच्या ॥९॥विष्णव संताचे श्रेष्ठत्व । तयांच्या कार्याचे महत्व । विश्वशांतीचे आदितत्व । विषय आज प्रवचनाच्या ॥१०॥अखिल जगाच्या विकासाची । आदि जननी जाणा एकची । संस्कृति केवळ भारताची । अन्य न कुठली साधका ॥११॥तिच्या ज्ञानाचा प्रकाश । प्रकटला आहे सर्वत्र । साहित्य ग्रंथादि वाङ्मयांत । नीतिमत्तेचेहीं जगाच्या ॥१२॥जगताकडे सवत्सल । धेनु हृदये निर्मल । पाही सदा केवळ । संरवाङ्मय भारताचे ॥१३॥पवित्र आणि तेजस । विचारांचा सुधारस । या देशीच निखालस । स्त्रवला संतमुखानें ॥१४॥संत जनांची शिकवण । नि:स्वार्थी लोक कल्याण । अभ्युदयाची उभवण । केली संतानी अशेष ॥१५॥महाराष्ट्र धर्माचे रक्षण । सौख्य शांति नीति सवर्धन । भागवत धर्माचारें करून । साधिले मराठी संतानी ॥१६॥उस्कटलेली धर्म घडी । बुध्दानंतर अवघडी । बसविली अति सुरवडी । आचार्य आणि संतानीं ॥१७॥अनंत आपत्तीचें मेघ । आले या देशी संघाट । परि संतवाङ्मय विद्युत । दाखवि प्रकाश धैर्याचा ॥१८॥या प्रकाशें न्याय सत्ता । संस्कृति, शांतता, स्वायत्तता । राहिली अभेद्य सर्वथा । केवळ कृपा संताची ॥१९॥सहज लोक भाषेंत । बोलूनी बोल पवित्र । भक्तिप्रेमाचे नवनीत । दिले संतानी सकलांसी ॥२०॥परांच्या कल्याणार्थ । स्वदेह झिजवूनी सार्थ । जीवन आपुलें कृतार्थ । केले संतांनी कृपाळुवाणें ॥२१॥“पाणी मुद्दल झाडाजाये । तृण ते प्रसंगी जिये । एका बोलिले होये । सर्वाहि हिता” ॥ज्ञाने ॥ हा संसाररूपी महावृक्ष।व्याप्ति जयाची सकल विश्व । तयाची पानें, फळे, पुष्प । जगती केवळ मुळाधारें ॥२२॥परि मूळ म्हणजे नीतिधर्म । विश्वबंधुत्व सुकर्म । शिंपीचा तेच सुवर्म । ‘सुखें’ येती तरारोनी ॥२३॥याच विचाराचे वर्धन । करिती साधु संतजन । निष्काम कर्म सेवेतून । जग-कल्याण कारणें ॥२४॥दुष्टदुर्जनांचा काळ । भक्त-जन प्रतिपाळ । आश्रय जयांचा सर्वकाळ । भगवंत तोच जाणावा ॥२५॥“कृष्णा धांवरे लवकरी । त्रिभुवन हरुषेभारी” । प्रेमवृत्ती ऐसी सकलांतरी । वाढविली केवळ संतानीं ॥२६॥प्रभुगुणांचे संकीर्तन । जे राखोनी अनुसंधान । वर्तति आपुले जीवन । ते परम् कल्याण पावती ॥२७॥प्रभुकृपेच्या छत्राखाली । होतील यशाचे तेच वाली । वृथा न ही संतबोली । ग्वाही देति महाराज ॥२८॥नित्य करितां प्रभुस्मरण । आसक्तिची होईल सोडवण । विश्वप्रपंची दिसेल कृष्ण । सत्य वाणी संतांची ॥२९॥“मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदू ऐसे । दया तेची नांव भृतांचे पाळण । आणिक निर्दाळण कंटकाचें ॥”तुकयाचे हे उद्गार । असुद्या मनीं निरंतर । तेणें होईल प्रतिकार । असत्य आणि अधर्माचा ॥३०॥हीच गीतेची शिकवण । अर्जुनासी केली कथन । ठेवा तयाची आठवण । केशवदत्त म्हणाले ॥३१॥श्रीकृष्ण जयाचे आराध्य दैवत । ते वैष्णव महासंत । धर्म आणि राष्ट्र संवर्धनार्थ । शिकवण देती कर्तृत्वशाली ॥३२॥एकनाथांनी परचक्राचा । स्वयें क्षात्रवेष करून साचा । संहार केला रिपुचा । प्रसन्न झाले जनार्दन ॥३३॥श्रीशिवछत्रपतीनां । स्वराज्याची प्रेरणा । रक्षावया गो ब्राह्मणा । दिली रामदास गुरुंनी ॥३४॥तुकोबांचे संकीर्तन । रामदासाचे प्रबोधन । येणे शिवशक्तीचे वर्धन । आनंदभुवनीं जाहले ॥३५॥मावळे मराठे शेतकरी । वारकरी तैसेच धारकरी । एकत्र खङ्ग धरूनी करीं । सज्ज झाले क्षात्रधर्मा ॥३६॥धर्म आणि राजकारण । कौशल्यें ऐक ठायीं गुंफून । स्वराज्याचे सुराज्य करून दाखविले संत मंडळीनीं ॥३७॥मऊ मेणासारिखे । प्रसंगी होती वज्र जैसे । देश कार्य परत्वे । वर्तती संत सर्वत्र ॥३८॥जे जे ज्याचे विहित कर्म । आचरावे पाळुनी सतधर्म । जीवनाचे हेच वर्म । अन्य न दुसरें संत म्हणती ॥३९॥शांति, क्षमा, तपज्ञान । श्रध्दा विग्रह विज्ञान । पावित्र्य ऋतुजा ब्रह्मकर्म । ब्राह्मण तेची स्वभात: ॥४०॥शौर्य, धैर्य, प्रजारक्षण । रणीं झुंजणें रिपुहनन । दातृत्व, दक्षता सुलक्षण । हाची धर्म क्षत्रियांचा ॥४१॥शेती, व्यापार, गोरक्षण । स्वभावत: हे वैश्य कर्म । सेवाभावे अखंड वर्तून । राहणें उचित शुद्रांसी ॥४२॥जे ऐशा कर्म विभागीं दक्ष । लाभेल तयांना अंती मोक्ष । अनुभवाची ही साक्ष । संत देती गीतेची ॥४३॥भगवंताची ही शिकवण । भारती अखंड घुमवून । चातुवर्ण्य समाजाचें संघटण । केले कुशल संतानीं ॥४४॥ज्ञानदेव, नामदेव । संत महा वैष्णव । भक्ति प्रेमाचे वैभव । नामघोषें मिरविती ॥४५॥ऊन, पाऊस, अंधार । वादळ, वारा घनघोर । निराधारासी तई आधार । संतकृपा एकची ॥४६॥तेच देती आनंदाचा । प्रकाश अंतरी नित्याचा । राधे गोविंद प्रेमाचा । गोड अति जिव्हाळा ॥४७॥वृत्ती वैष्णवांची सदैव । अद्वैताची एकमेव । न ठेविती भेदभाव । अधम अथवा उत्तम ॥४८॥आम्रवृक्ष वा निवडुंग । राहती उभे एकसंघ । मही परी न मानी भेद । लेखी दोघां समसमा ॥४९॥ज्वालामुखी वा सुवर्ण मेरु । पृथ्वी दोघां आधारु । गाई व्याघ्राची तृषा हरु । सारखीच म्हणते सरिता ॥५०॥म्हणोनि संताचें अंत:करण । सर्व भूतमात्रासी राहे समान । आनंदाची दीप्ती क्षणोक्षण । वैष्णव देती चैतन्याची ॥५१॥वैष्णव चैतन्याचे सागर । ज्ञानतरुंचे आगर । श्रीकृष्ण प्रेमाचे निर्झर । सुख शांति पाझरती ॥५२॥भक्ती-गंगेच्या डोहांत । बुडी घेतील जे भक्त । ते अमर होतील निश्चित । सत्य म्हणती वैष्णव ॥५३॥ते तत्वदर्शी निरतिशय । सकलां करिती प्रकाशमय । भक्ति, प्रेम तयांचे निरामय । उभे करी ब्रह्म विटेवरी ॥५४॥“दो वरी दोनी । भुजा आलो घेवोनी । आलिंगावया लागुनी । तयांचें अंग ॥”ऐसे म्हणती भगवंत । जरी मज दोन हात । आलिंगवाया मम भक्त । चतुर्भुज जाहलो ॥५५॥संपूर्णत्वानें भक्तां पाहावें । चारी हस्ते आलिंगावे । वैकुंठ सोडून नित्य यावें । हीच लालसा प्रभु म्हणती ॥५६॥जनाबाईच्या झोपडींत । प्रभू होती प्रविष्ट । दळुकांडु लाविती हात । कैसे देव सुखावले ॥५७॥भक्ताचे करी काज । पुरवोनी तयाचे चोज । सोडी सकलांची लाज । भक्तासाठीं श्रीहरी ॥५८॥पूर आला पंढरीसी । पाणी चढले पायरीशी । तव धावले हॄषिकेशी । मदतीस जनाईच्या ॥५९॥पाऊस पडे मुसळधारा । सुसाट घोघो वाहेवारा । नामयाच्या चंद्रमौळीघरा । सावराया आले परब्रह्म ॥६०॥जिच्या चित्तांत लावण्यसुंदर । वासकरी मुरली मनोहर । ती कान्होपात्रा निरंतर । ध्यास धरी विठठलाचा ॥६१॥कांतिसंपन्न कान्होपात्रा । बळजबरी ओढूं नेतां । ‘धावां पांडुरंगा’ मोकलिता । स्वहृदयीं प्रभु ठाव देती ॥६२॥एकनाथाचे रांजण । घागरी स्कंधीं वाहून । भरिती स्वये प्रेमपूर्ण । द्वारकाधीश आजही ॥६३॥“लाडके लडिवाळ नामा माझें तान्हें । तयाला मजविणें कोण आहे ॥”ऐसी प्रीति भगवंताची । नामदेवा लाभली भाग्याची नागनाथाच्या देवळाची । कीर्तनी दिशा फिरविली ॥६४॥नाम संकीर्तनाचा गजर । ऐकून पितांबरधारी श्रीधर । अंबरांतूनी भूवर । उतरोनी नाचतो कीर्तनीं ॥६५॥दिंडयापताका घेऊनी हातीं । हर्षे वैष्णव तई म्हणती । अगाधि देवा श्रीपती । धन्य धन्य जाहलो ॥६६॥अंतरीची दिव्य आस । पाहावे तुजसी सन्मुख । लोचनीं दिसावे सुस्वरूप । अखंड तुझे माधवा ॥६७॥“नाम आठविता सद्गदकंठी । प्रेम वाढो पोटी ऐसे करी । रोमांच जीवन आनंदाश्रु येती । गात्री प्रेम तुझें”॥तुकाराम॥प्रभु भेटीची अपूर्व आस । पूर्णेंदु जैसा चातकास । जीवन वाटे तय़ास । तीच व्याकुळता संताची ॥६८॥भक्ति-प्रेमाचे दर्शन । घडेल ऐसे अनन्य । संस्कृती नीति धर्मसंपन्न । भूमीत केवळ भारताच्या ॥६९॥पाश्चात्य तत्वज्ञ यासाठीं । भारतीं घ्यावा जन्म म्हणती । वैदिक धर्माची हिच महती ।दुसरी याविण कुठली असे ॥७०॥असेल लक्ष्मी अमेरिकेत । वा भौतिक वैभव पश्चमेंत । परी जगन्नियंता लक्ष्मीकांत । यमुने कांठीच दिसेल ॥७१॥चंद्रभागेच्या तीरावर । हात ठेऊनी कटीवर । उभा राहिला प्रभुवर । युगे युगे याच देशीं ॥७२॥सदाचार धर्माचार । हाच अभ्युदयाचा आधार । तेणेंच शुध्द बिजांकुर । फोफावतो स्वभावत: ॥७३॥याच कारणें ही धर्मभूमी । साधुसंताची पुण्यभूमी । प्रज्ञावंताची कर्मभूमी । त्रिखंडात मान्यवर ॥७४॥संत सकळ विश्वाचे । निखळ सूर्य प्रकाशाचे । तापत्रयांच्या तिमिराचें । नाश करिती तात्काळ ॥७५॥हे दीपस्तंभ मार्गदर्शक । अंगीच्या शक्तीनें अद्भुत । मांगल्याचा देती प्रकाश । जगदोध्दारा कारणें ॥७६॥संत स्त्रवती अमृतवाणी । प्राशितां ती सुखें श्रवणीं । पतित उध्दरती तत्क्षणी । शांति सुखासी पावती ॥७७॥पेठा नामसंकीर्तनाच्या । संतानी बसविल्या सुखाच्या । ध्वजा-पताका धर्म भक्तीच्या । रोविल्या आनंदे ठायीं ठायीं॥७८।प्रभुचे अखंड चिंतन । हेच एक अनुसंधान । नामस्मरण संकीर्तन । विष्णवांचे वैभव ॥७९॥“कृष्ण विष्णु हरी गोविंद । या नामाचे निखळ प्रबंध । माजी आत्मचर्चा विशद । उदंड गाती” ॥ज्ञानेश्वरी॥म्हणती प्रभो प्रेमाचा । अखंड वर्षाव सुखाचा । व्हावा तुझ्या कृपेचा । हृदय संपुटी आमुच्या ॥८०॥तूच आमुचा आधार । येतां प्रसंग खडतर । तुजविणें कोण सांभाळणार । दयाघना आम्हांसी ॥८१॥केवळ तुझे चिंतन । इतुकेच आम्ही जाणोन । करितो नित्य स्तवन । प्रेम कृपा असावी ॥८२॥यासाठीं अनुदारपणा । नका ठेऊं नारायणा । येऊ द्या भक्ताची करुणा । प्रार्थना सदैव वैष्णवांची ॥८३॥सांवळे सुंदर मनोहर । रूप तुझे हरीहर । राहावें हृदयीं निरंतर । लक्ष्मीपते नारायणा ॥८४॥प्रभु तुम्ही वैकुंठीचे । आम्ही भक्त देहगांवचे । परी दर्शन आपुल्या चरणाचे । चुको न द्यावे कधीहि ॥८५॥शक्ति, भक्ति लक्ष्मीसवे । भूतळी तुम्हीं नित्य यावे । सुख ऐश्वर्य प्राप्त व्हावे । जो जो वांच्छिल तयास ॥८६॥माता प्रीतीचा कळवळा । काय विसरे आपुल्या बाळा । तेवीच तूं घननिळा । प्रेम देई आम्हांसी ॥८७॥तुझी पडता कृपा दिठी । मारू चरणारविंदी मिठी । ठाव तुझा जगजेठी । सोडू न कधीं कल्पांती ॥८८॥हे माझी मिराशी । ठाव तुझे पायांपाशी । हाच अभिमान उराशी । जतन करीन दयाघना ॥८९॥वैष्णवांची ही वाणी । अमृतमय बोलणी । वैभवाची सुरम्य लेणी । अंतरीं असु द्या श्रोतेजन ॥९०॥भक्तियोग आणि अध्यात्म । दोन्ही जरी अभिन्न । मार्ग तयाचे भिन्न भिन्न । ते परिसा म्हणती केशव ॥९१॥करितां निर्गुण उपासना । सर्वोत्तम योगाची साधना । ही ज्ञानवंताची धारणा । गीतेंतहि विशद ॥९२॥करणें सगुण उपासना । मार्ग सोपा सामान्य जनां । भक्तीयोगे येणे जाणा । साध्य होतो संत म्हणती ॥९३॥सर्व जगतास कारण । सद्रुप आहे परब्रह्म । अनंततातहि एकच चैतन्य । शिकविती संत सुलभपणें ॥९४॥जे पाहिले ते भगवद भूषण । ऐकीले ते भगवदनाम । सकल सृष्टि शुध्द चैतन्य । तेजाचाच तेजोनिधी ॥९५॥विश्वांत सामावले चैतन्य । चैतन्यांत परब्रह्म । चैतन्य परब्रह्म एकसम । अविभक्त किंबहुना ॥९६॥“तैसे विश्व येणें नांवे । हें मीचि पै आघवे । घेई चंद्रबिंब सोलावे । न लगे जेंवि” ॥ज्ञानेश्वरी॥भगवंत सांगती या परी । अणुरेणुंत मीच जरी । राहिलो भरोनी सरोभरी । परि भक्तासी होतो सगुण ॥९७॥ज्ञानयोगी ज्ञानानें । जाणती मज सकल गुणे । इतरांसी मम दर्शनें । भक्ति मार्गेच होतील ॥९८॥सांवळा होऊनी विठठल । शामसुंदर घननीळ । रूपें जैशी जो इच्छिल । ठाकेन उभा तैसाची ॥९९॥सगुण भक्तीचा सुबोध । सोपा आणि तत्वशुध्द । केला तुम्हां मी विशद । मार्ग म्हणती केशव ॥१००॥धर्म अर्थ काम मोक्ष । हा चतुर्विध पुरुषार्थ । ध्यानीं ठेवोनी यथार्थ । भक्तिमार्ग आचरावा ॥१॥पाप ताप आर्त दैन्य । होईल तयांचे निरसन । घेतां संताचें दर्शन । त्रिवार सत्य जाणावे ॥२॥जागृति देवात्मक शक्तीची । लाभेल भाविका नित्याची । तळमळ अपूर्णता चित्ताची । शमेल जातां शरण तया ॥३॥आनंदाचे उत्कट भाव । स्वानंदाचे वसंत वैभव । पहाल श्रोते अभिनव । संतपदीं लीन होता ॥४॥भगवत भाव सर्वांभूती । हेची ज्ञान हेची भक्ती । अनिर्वैध जे जाणती । वैष्णव तयास म्हणावें ॥५॥स्वधर्माचा प्रकाश । विश्वांत असावा अशेष । सुख-शांतीचा हेमकलश । वर्षावा अमृत सकलावरी ॥६॥उदय व्हावा सौभाग्याचा । संतकृपे सुभंगाचा । आशीर्वाद ऐसा सुखाचा । मागणें देवा तुजपाशीं ॥७॥हीच प्रार्थना प्रभुचरणीं । केली केशव प्रभुनी । मग राधे गोविंद नाम घोषांनी । सांगता झाली प्रवचनाची ॥८॥भक्तीभावे जे जे । गातील वैभव विष्णवांचे । तेहि त्या प्रभुचे । प्रिय होतील अनित्य ॥९॥इति श्री यशोधन विरचित । श्रीसद्गुरु केशवदत्त चरित । भक्त भाविकां होवो सुखद । सातवा अध्याय संपूर्ण ॥११०॥॥ इति सप्तमोऽध्याय समाप्त॥ N/A References : N/A Last Updated : December 02, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP