नम: परम कल्याण । नम: परम् मंगल । वासूदेवाय शांताय । यदुनाम पतयेनम: । शके अठराशे बेचाळिसांत । गुरु गोविंद झाले समाधिस्त । देह तयांचा आसनस्थ । भूगर्भीं विसावला ॥१॥
द्युमणि जातां अस्ताचळीं । चंद्ररूपे दिसावा उदयाचळीं । तेवींच गुरू गोविंदाचे स्थळीं । केशवदत्त भासले ॥२॥
महाराजांच्या नंतर । सोनगीरीचा कारभार । घेतला आपुल्या शीरावर । केशवांनी विश्वासे ॥३॥
स्वगुरुंच्या कार्याचे । बध्दकर वचन पूर्तीचे । बांधिले तयांनी साचे । कंकण हातीं आपुल्या ॥४॥
आनंदवनीची सारी सूत्रें । कौशल्ये हालविली स्वहस्तें । जोडिलें प्रेमानंदाचें नातें । अवघ्यांसी घेऊनी एकत्र ॥५॥
गुरू गोविंदाच्या समाधीची । पूजा अर्चा आरतीची । केली सांज सकाळची । सुव्यवस्था केशवांनी ॥६॥
काकडा, आरती भूपाळी । नित्य व्हावी प्रात:काळी । पूजा नैवेद्य माध्यान्हकाळीं । योजना केली उत्तम ॥७॥
सायंकाळी समाधीत । प्रार्थना व्हावी सांधिक । पठण करावा हरिपाठ क्रम दिला घालूनी ॥८॥
गोविंद गुरुंच्या पश्चात । श्रीगुरु केशवदत्त । राहिले आनंद वनांत । नित्य ऐसे कार्यंरत ॥९॥
येणें रिती केशवदत्त । काहीं काळ सोनगीरीत । राहून धर्म प्रचारार्थ । प्रस्थान ठेविती आनंदवनीं ॥१०॥
गोविंद गुरुंच्या पश्चात्त । श्रीगुरु केशवदत्त । फिरले जन कल्याणार्थ । नित्यनेमें प्रतिवर्षी ॥११॥
दुसखेडे, कुकुरमुंडे, कुंझर । झोडगे, डामरखेडे, राबेर । धुळें, भुसावळ, बर्हाणपूर । स्थळें त्यांच्या भेटीची ॥१२॥
एरंडोल, शहादे, शिंदखेड । न्याहाळोद, धरणगांव शिरुड । येथील भक्तांची ओढ । प्रतीक्षा करी तयांची ॥१३॥
उत्राण, तळोदें त्र्यंबकेश्वर । भिवंडी, मुंबई, पंढरपूर । भडोच पुणें, नासिकशहर । ठिकाणें त्यांच्या भक्तांची ॥१४॥
ऐसा भक्तांचा परिसर । फिरले महाराज वर्षे चार । स्वगुरु निर्याणानंतर । धर्मकाजा सातत्यें ॥१५॥
गोविंदगुरुची आज्ञाप्रमाण । केशवांनी आदरे मानून । विद्या, सेवा, अन्नदान । विपुल केलें सर्वत्र ॥१६॥
शके अठराशे सेहेचाळिसात । समारंभ एक सुशोभित । भव्य आणि उदात्त । गुरू अर्चनेचा जाहला ॥१७॥
उघडोनी समाधि गुरुंची । ब्रह्मरंघ्र- भेदादि विधिंची । केली शास्त्रोक्त उपचारांची । अर्चा केशवांनी समारंभे ॥१८॥
सिध्द पुरुषाच्या देहाचे । दर्शन अभिनव साचे । पुनरपि व्हावें हें भक्तांचे । केवढे पहा महाभाग्य ॥१९॥
मुंडणयुक्त मस्तकावर । दिसले गोविंदाच्या अंकूर । केसांचे अंगुळे चार । चार वर्षाच्या अवधींत ॥२०॥
या चमत्काराची अनुभूती । भाग्यें जया मिळाली होती । ते दैववान किती । मोजदाद कैशी करावी ॥२१॥
आगरू अर्गजा मिश्रित । लवण कस्तुरी सुंगधीत । कर्पूरादि द्रव्यें समाधित । पसरली पुन्हां एकदां ॥२२॥
पुष्पें सुंगधीत नानापरी । वाहून तयांच्या चरणशीरीं । मग हरी नामाचे गजरी । शिळा लाविली समाधीची ॥२३॥
याच समाधि स्थानावर । चबुतरा एक सुंदर । संगमरवरी नक्षीदार । उभारिला भक्तांनी ॥२४॥
स्वगुरुंच्या इच्छेनुसार । याच पवित्र चबुतर्यावर । कृष्ण पाषाणाच्या सुंदर । पादुका स्थापिल्या केशवांनी ॥२५॥
पादुका स्थापनेनंतर । केशवदत्त गुरुवर । गोविंद गुरुंच्या गादीवर । बैसले जन संमतीनें ॥२६॥
सोनगीरीच्या परिसरांत । केशवदत्त झाले विख्यात । येऊ लागले दर्शनार्थ । असंख्य भक्त प्रतिदिनीं ॥२७॥
महाराजांच्या कारभारे । चैतन्य सुखाचे वारे । वाहू लागले मोदभरे । आनंदवनीं सर्वत्र ॥२८॥
गोविंद गुरुंची पवित्र । समाधि झाली महाक्षेत्र । ख्याति पसरली सर्वत्र । सोनगीर ग्रामाची ॥२९॥
आनंदवन संस्थान । झाले दर्शनीय ठिकाण । येऊ लागले भक्तजन । नतमस्तक व्हावया ॥३०॥
घ्यावें समाधीचें दर्शन । करावें केशवांसी नमन । शांती सुख समाधान । मागावें पायीं तयांच्या ॥३१॥
मग गुरु केशवांनी । जवळ तयांना बैसवोनी । कृपा कटाक्ष टाकोनी । क्षेम कुशल पुसावे ॥३२॥
मग कोणी भाविक जन । महाराजांच्या पायी लागून । करित आपुले दु:खकथन । निरसनाच्या हेतूनें ॥३३॥
तंब आर्ताच्या पाठीवर । फिरवून हात हळुवार । म्हणती तयांना सत्वर । जा काळजीं करूं नका ॥३४॥
संत केशवांचा आशीर्वाद । घेऊनी ते सश्रध्द ॥अंतरी होवोनी सुखद । जाती घरी आपुल्या ॥३५॥
कुणाची शारिरिक दुखणीं । कुणाच्या आर्थिक अडचणी । दूर करीत महाराज झणीं । मंत्र तंत्र सांगोनी ॥३६॥
असाच एक शेतकरी । उदास अती अंतरी । महाराजांच्या चरणावरी । मस्तक ठेवोनी म्हणाला ॥३७॥
महाराज माझे लेकरूं । रोग पिडीत अति जर्जरु । आज उद्यां पाहे मरू । शाश्वती न जगण्याची ॥३८॥
झाले वैद्यकीय उपचार । नवस सायास देवचार । परि अंगीचा तीव्र ज्वर । सोडीना यासी क्षणाभरी ॥३९॥
आतां इच्छा अखेरची । भेट व्हावी तया तुमची । येवढीच आपुल्या कृपेची । भिक्षा घाला दयाळा ॥४०॥
मज संगे यावें क्षणभर । जवळच्या खेडयावर । गाडी आहे बरोबर । न्यावया तुम्हांसी ॥४१॥
मम विनंतीचा अवमान । करूं नका दयाघन । विनंती हात जोडून । पुन्हां पुन्हां करितो मी ॥४२॥
मग महाराज म्हणाले तयासी । खंत करीतोस बा कशासी । सांगतो त्या उपायासी । जा आचरी सत्वर ॥४३॥
घरीं आतां परतुन । जाशील जेव्हां येथून । टरबूज एक हिरवे छान । घेऊन जा बरोबरी ॥४४॥
घरीं जाता टरबूजास । ठेवावे मुलाच्या उशास । मग दुसरें दिनीं तयास । समभाग कापावे ॥४५॥
अर्ध्या भागाचा अवशेष । प्रसाद दे अवघ्यांस । अर्धा अर्पी अर्पी याचकास । जो राहिल उभा तुझ्या दारीं ॥४६॥
महाराजांची आज्ञा प्रमाण । अनन्य भावे मानून । खेडूत मग सोनगीरीहून । त्वरित पातला घरासी ॥४७॥
आणिले तयांनी श्रध्देसहित । टरबूज एक हातोहात । मग मुलाचे उशागत । ठेविले मोठया भक्तीनें ॥४८॥
दुसरें दिनीं खेडूतानें । कापिले ते श्रध्देने । टरबुज आपुल्या हातानें । समान भाग करोनी ॥४९॥
अर्ध्या भागाचा प्रसाद । वाटिला सकल कुटुंबियांस । शेष भाग याचकास । देण्यासाठी ठेविला ॥५०॥
अर्धे टरबुज हातात । घेऊनी उभा दारांत । राहिला तो वाट पाहात । याचकाची उत्सुकें ॥५१॥
तोंच काळाकभिन्न उंचेला । माणूस दारीं उभा ठेला । म्हणाला माई भिक्षा घाला । लगबगीनें मज लागी ॥५२॥
तंव त्या शेतकर्यानें । झोळींत तयाच्या हातानें । टरबुज ठेविलें आनंदानें । पाणावल्या डोळ्यांनी ॥५३॥
क्षणार्धात तो माणूस । पाहतां पाहतां झाला अदृश्य । अचंबा वाटला खेडूतास । गेला कुठें तो याचक ॥५४॥
शोध करोनी पाहिला । सारा गांव धुंडाळिला । परी नाहीं गवसला । कोणाही गांवकर्या ॥५५॥
होऊनी तंव निरुत्साही । शेतकरी पातला स्वगृहीं । तैं पाहता झाला लवलाही । चमत्कार एक अपूर्व ॥५६॥
ज्वरें धरणीस खिळलेला । मुलगा तयाचा दीन दुबळा । पाहिला उठोनी बैसलेला । भिंतीस टेकून जवळच्या ॥५७॥
हात लाविता अंगास । ज्वराचा नव्हता मागमूस । स्वेदे भिजले होते खमिस । ठिगाळलेले फाटकें ॥५८॥
शेतकर्याचा आनंद । नव्हता गगनीं मावत । मुलास घेवोनी कवेंत । कृपा म्हणाला कैशवांची ॥५९॥
पुढें थोडयाच दिवसांत । मुलगा झाला खडखडीत । मग मायबापासहीत । सोनगीरी आला दर्शना ॥६०॥
संत महंताचा अधिकार । असतो पहा किती थोर । प्रत्यक्ष तो मृत्युवर । गाजवितात कधीं कधीं ॥६१॥
मानेभोवतीं प्रत्यक्ष । काळाचे पडता दृढ पाश । संत कृपेचा होतां अवकाश । आले मरण असे टळे ॥६२॥
असो ऐसे चमत्कार । येतील आतां वारंवार । ओघा ओघानें निरंतर । चरित्र कथेंत केशवांच्या ॥६३॥
पहिल्या वर्षीं अर्चेच्या । मनीं आलें केशवांच्या । समारंभास विष्णु यागाच्या । आयोजावें सोनगीरी ॥६४॥
याच शुभ्र प्रसंगी । भरवावी एक संधी । साधोनी ही सुसंधी । वर्णाश्रम परिषद भारतीय ॥६५॥
योजना आखिली सविस्तर । योजक घेऊनि बरोबर । संस्थानाच्या कमेटी समोर । ठेविली मग पसंतीसी ॥६६॥
महाराजांचा विचार । एक मते झाला पसार । दिवसही झाले मुत्र्कर । समारंभाच्या कार्याचे ॥६७॥
या महान कार्याचे । संयोजन कुशलतेचे । करण्यास कुकर मुंडयाचे । संतोजी महाराज पातले ॥६८॥
कार्यक्रमाची आखणी । संतोजी आणि केशवांनी । करोनी अति सुयोग्यपणीं । निमंत्रणें पाठविली सकलांसी ॥६९॥
वैयाकरणी, शास्त्री, पंडित । ज्योतिषि, वेदांती तर्कतीर्थ । कीर्तनकार, वादक नामवंत । बोलाविले अखिल भारती ॥७०॥
भागवत पंथीय वैष्णव जन । पाखंडी, कर्मकांडी सनातन । केलें सकलांसी पाचारण । विचार मंथन करावया ॥७१॥
चारी पिठाचे अधिपती । शंकराचार्य कुर्तकोटी । काव्यालंकार साहित्य श्रेष्ठी । निमंत्रिले सोनगीरीं ॥७२॥
सोनगीरीचा परिसर । घेवोनी नवा बहर । चैतन्याचा सुखकर । आनंदे नटला घरोघरीं ॥७३॥
आनंदवनीची पवित्र भूमी । सडासंमार्जनें करोनी । मंडप मंदिरें शृंगारूनी । गुढया तोरणें उभारिली ॥७४॥
उद्घाटनाचे शुभ दिनीं । जमल्या सकल सुहासिनी । डोई घडे घेऊनी । पायधुण्या संत सज्जनाचे ॥७५॥
पादप्रक्षालन करून । लाविलें तयांना कुंकुम । मग आरती ओवाळून । सुस्वागत केलें तयांचे ॥७६॥
वाजंत्री नाना परिची । चौघडा संबळ टिपरीची । सुरावट मधुर सनईची । नाद मुग्ध करी अभ्यागता ॥७७॥
काशीचे महामहोपाध्याय । अनंतशास्त्री राजेश्वराय । परिषदेसाठीं निहाय । आले होते सोनगीरी ॥७८॥
व्यंकटस्वामी, बुवाभागवत । प्रतापशेट श्रीमंत । गुजर, वाणी नामांकित । धुळे अमळनेरचे पातले ॥७९॥
विष्णु दिगंबर पलुस्कर । गायनाचार्य पंडित थोर । जाहले तयांचे सुमधुर । रागदारी गायन ॥८०॥
हजेरी समाधी समोर । लाविती कित्येक कलाकार । म्हणती आज खरोखर । चीज निज कलेचे जाहलें ॥८१॥
कथा कीर्तनें प्रवचन । नामघोष हरी भजन । कार्यक्रमें ऐशा संमेलन । गाजले बहुत सोनगीरी ॥८२॥
व्याख्यानें धर्मविचारांचा । सहज सुंदर सुबुध्दांची । चर्चा-सत्रे वादविवादांची । चालली होती अखंड ॥८३॥
सुरतरु पारिजातकानें । उधळावी आपुली गंध सुमनें । तेवींच या विद्वतजनें । विचार मांडिले परिषदीं ॥८४॥
काव्यमिमांसा उपमालंकार । न्याय विनोद शब्दालंकार । वेद वेदांताचा विचार । झाला बहुत साकल्यें ॥८५॥
यज्ञमंडपीं स्वाहाकार । वेदवेदोक्त मंत्रोच्चार । पवित्र धुमे अंबर । सोनगीरीचे दाटले ॥८६॥
एक सप्ताह हा कार्यक्रम । चालला अति उत्तम । सर्वदिनीं अन्नदान । अखंड सदावर्त उघडले ॥८७॥
व्यवस्था सुरेख जेवणाची । ठेविली होती मंडळीची । ददात न पडू दिली कशाची । कार्यकारी समितीनें ॥८८॥
अखेरचे दिवशीं विद्वानांचा । सत्कार मान-मान्यतेचा । केशवांनी केला आनंदाचा । वस्त्रें, महावस्त्रें देऊनी ॥८९॥
द्विजगणांची संभावना । करून विपुल द्रव्यदाना । संतुष्ट केलें तयांना । केशवांनी मनोमनी ॥९०॥
गीतादि ग्रंथवाचक । नाम जपजाप्य उपासक । तयांचेही केलें कौतुक । देऊनी धन मुक्त हस्तें ॥९१॥
अभ्यागतांच्या परतीची । तरतुद केली खर्चाची । मोकळी सोडीली पैक्याची । पिशवी केशवदत्तांनी ॥९२॥
आनंदवनाचे संस्थान । गुरुगोविंदांचे समाधिस्थान । याच कारणें म्हणोन । भाग्य गंगा येथें अवतरली ॥९३॥
या समारंभाचे निमित्तें । भारतातील अखिल क्षेत्रें । आली जणु एकत्रें । पुनीत कराया महाराष्ट्र ॥९४॥
शंकराचार्यादि श्रेष्ठींची । पाद्यपूजा करोनी साची । प्रार्थना केली तयांची । अभ्युदयार्थ केशवांनी ॥९५॥
शेवटी काल्याचे कीर्तन । वारकर्यांचे रंगले भजन । मग मालपुव्याचे भोजन । भंडार्याचे दिले सकलांसी ॥९६॥
होती अन्नपूर्णा प्रसन्न । नव्हते कांही कशाचे न्यून । विपुल करोनी अन्नदान । सहस्त्रावधी केले संतुष्ट ॥९७॥
विष्णुयागाचा प्रबंध । पार पडला निर्वेध । केशवांनी घेतले धन्यवाद । लाख लाख भाविकांचे ॥९८॥
या महान कार्यांत । खर्च झाला अगणित । परंतु तयाची तरतुद । केली कैशी केशवांनी ॥९९॥
संस्थान नव्हते श्रीमंत । नव्हती तयाची मिळकत । केवळ वर्गणी आणि देणगीत । दुरापास्त होते कार्य हें ॥१००॥
परंतु सिध्द पुरुषास । अशक्य असावे कशास । आश्चर्यकारक कथेस । विशद करितो भाविका ॥१०१॥
ऋध्दिसिध्दि दासी दोन्ही । उभ्या होत्या दोहो बाजुनी । सिध्द हस्त जोडोनी । आज्ञा झेलाया संताची ॥१०२॥
स्नान संध्या जपजाप्य । उकरोनी श्रीकेशवदत्त । मंदिरीं येऊनी बैसत । आसनावरी एका अद्भुत ॥१०३॥
मग महाराजांच्या पादपद्मा । भक्त करोनी वंदना । सकल करीत प्रार्थना । गुरूमुखें कथिल पुढील ॥१०४॥
ऐं क्लीं सौ: श्रीबालकृष्ण नम: ॥ तंव म्हणावे कुणी महाराज । तूप संपले आहे आज । आणावया पाहिजेत ।
रुपये तीस अदमासे ॥१०५॥
तैं महाराजांनी त्वरीत । आसनाखालीं घालावा हात । काढावे पैसे इच्छित । खरेदी कारणें वस्तुच्या ॥१०६॥
लागेल तेवढें धन । देत असे हें आसन । ठेवितां परी ते गुंडाळून । रितें दिसे इतरांसी ॥१०७॥
अलौकिकही सिध्दी । महाराजांनी कधीही । निग्रहें राबविली नाहीं । स्वहेतु कारणें कदापि ॥१०८॥
परि तें आसन ऐकेदिनी । मागितलें एका माऊलीनीं । म्हणोनी तें केशवांनी । अर्पण केलें तिजलागीं ॥१०९॥
संपत्तीचा निर्झर । हातीं असतां निरंतर । संत सज्जन लोकोत्तर । क्षिती न करिती तयाची ॥११०॥
केशवदत्तांनी योजिलेले । विष्णु यायादि कार्य पहिलें । पसायदानें सुखावले । भरत वाक्य म्हणोनी ॥१११॥
सोनगीरीच्या इतिहासांत । कार्य हें सुवर्ण रेखांकित । राहिल निरंतर स्मरणांत । भक्त भाविक जनाच्या ॥११२॥
इति श्रीयशोधन विरचित । श्रीसद्गुरु केशवदत्त चरित । होवो सकलां सुखद । बारावा अध्याय संपूर्ण ॥
॥ इति द्वादशऽध्याय: समाप्त ॥