त्रैलोक्यीं मणिमल्ल दैत्य सकळां आजिंक्य झाले मही.
तेहीं ब्रह्मणयज्ञहोमहवनें विध्वंसिलीं सर्वही. ।
आला ते समयीं सदाशिव स्वयें सांडोनि ब्रह्मांड हो,
तो हा पाहुं चला कृपाजलनिधी मल्हारि मार्तंड हो. ॥१॥
संगें घेउनि सप्त कोटि गण हे आले असे भूतळा.
खंडेराव म्हणोनियां अवगला शूरत्वतेची लिळा. ।
सक्रोधें मणिमल्ल मर्दुनि तयां केला पहा दंड हो,
तो हा पाहुं चला कृपाजलनिधी मल्हारि मार्तंड हो. ॥२॥
संतोषें गण सर्वदा उधळिती भंडार देवावरी, ।
झालासे विजयी म्हणोनि दिवट्या लावोनियां; पेंबरीं ।
केला वास शिवें, तळ्या उचलिल्या, निर्दाळिले लंड हो,
तो हा पाहुं चला कृपाजलनिधी मल्हारि मार्तंड हो. ॥३॥
घेतां हा अवतार दुष्ट दमुनी, सद्भक्त संरक्षिले,
गाई, ब्राह्मण, योग, याग, सकळै हे धर्म संस्थापिले. ।
गाती भक्त, ऋषी, मुनी, गण सदा सत्कीर्ति ऊदंड हो,
तो हा पाहुं चला कृपाजलनिधी मल्हारि मार्तंड हो. ॥४॥
प्रारंभीं स्थळ पेंबरीं, तदुपरी पालीस आला असे,
नळ्दुर्गीं तिसरें, विशेष चवथें हें जेजुरीचें दिसे; ।
ऐसी योजुनि स्थानकें विचरतो नव्खंड पृथ्वींत हो,
तो हा पाहुं चला कृपाजलनिधी मल्हारि मार्तंड हो. ॥५॥
शोभे दिव्य कळा सुरंग पिंवळा आपादपर्यंत हो.
धाले लोचन पाहतां मुखशशी तो म्हाळसाकांत हो. ।
अश्वारूढ, करीं सलंब झळके तें शस्त्र अखंड हो,
तो हा पाहुं चला कृपाजलनिधी मल्हारि मार्तंड हो. ॥६॥
ऐशा या कुलदैवतासि नमुनी जो नित्य भावें भजे,
त्याला काय उणें ? न मागत तरी अप्राप्त तेंही दिजे. ।
दासा देइल भुक्ति, मुक्ति समुळीं वारूनि पाखांड हो,
तो हा पाहुं चला कृपाजलनिधी मल्हारि मार्तंड हो. ॥७॥
मार्तंडाष्टक जो पढेल अथवा ऐकेल अत्यादरें,
त्याचें हा कलिकाळ दास्य करुनी राहील हो हें खरें. ।
तेथें शाश्वत रंगला निजसुखें नासूनियां बंड हो,
तो हा पाहुं चला कृपाजलनिधी मल्हारि मार्तंड हो. ॥८॥