रामजन्म अध्याय १ ला

रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला.


रामजन्म अध्याय १ ला
गुरु, गणेश, सरस्वति मस्तकी । सहित साधुसमूह समस्त कीं ॥
नमुनि जोडुनियां द्वयहस्तकीं, । कथिन रामकथा ह्रदयस्थ कीं ॥१॥
स्वसुख भावुनि शंभु जपे सदा । न विसरे स्मरणी रत सर्वदा ।
गुज भवानिसि तें उपदेशिले । निजसुखेचि हलाहल सोशिले ॥२॥
निवृत्त गाती सुखसंभ्रमेसी । संसाररोगांतक साधकांसी ।
आकर्णितां रंजक भाविकांसी । हीना पशुघ्नाविण कोण त्रासी ? ॥३॥
तोचि राघवकथा अविनाशी । ऐकतांचि कलिकल्मष नाशी ॥
भुक्ति, मुक्ति, अधिकारापरत्वें । साधका फलद निर्मळ सत्वे ॥४॥
दशरथ रविवंशी जन्मला पुण्यराशी,
विबुध, मुनि पुराणी वर्णिती ज्या नरासी ।
सदयह्रदय चित्ती सर्वदा भूतमात्री,
अनुदिन रत शास्त्री, नातळे दोष गात्री ॥५॥
हरि गुरु सम लक्षी, साधुमार्गा निरीक्षी,
चतुर उभयपक्षी, लक्षणे युक्त साक्षी ।
अधिगत परमार्थी सांपडेना अनर्थी,
दशरथ पुरुषार्थी ख्याति झाली यदर्थी ॥६॥
विदितसकलविद्या वीरशार्दुलराणा;
अनुपम शरयुध्दी नाकळे शौर्य कोणा ।
अनुकुळसकलार्थी एक चिंता प्रजांची;
अनुदिन मन तेणे राजयालागिं जांची ॥७॥
एके दिनी वनविहार रिघे कराया,
तों नाढळे मृगसमूह कदापि राया ।
झाली निशी, धारत एक तडागपाळी,
तो पातलें विधिबळे लिहिले कपाळी ॥८॥
स्कंध पिता जननि घेउनि पूर्ण अंधा । वाराणसीहुनि निघे सुत सेतुबंधा ॥
" दे श्रावणा, उदक मागत रात्रिभागी. " । गेला तडाग अनुलक्षुनियां सवेगीं ॥९॥
झारी भरी निजकरीं द्विज अंधकारी; । कानी निनाद पडतां नृप बाण मारी ॥
भदे उरी; " हरि हरि हरि " हांक मारी । देईल कोण उभयांस सवेग वारी ? ॥१०॥
" हा हा ! " म्हणोनि धरणीवरि अंग टाकी । लक्षूनि तो विकल राय निमग्न शोकी ॥
बोले द्विजेंद्र " न चुके भवितव्य राया । धाता परंतु न शकेचि दुजे कराया ॥११॥
पाजूनि तोय उभयांसि न बोल कांही । जैं जाणवे त्वरित टाकिति देह पाही ॥
संकेत दाउनि कलेवर शीघ्र सांडी । राजा स्मरोनि शिवशंकर देत मांडी ॥१२॥
जसा गुंतला हंस आकंठ पंकी । स्मरेना दुजे राय तो मग्न शोकी ॥
जळें पूर्ण झारी नृपे वेग गेला । मुखी लावितां विस्मयापन्न झाला ॥१३॥
म्हणे " श्रावणा कां उदासीन चित्ते ? । न बोलोनि देशी कसा जीवनातें ॥
मुखें वक्र केली समाधान नाही । दिशा वाटती राजया ओस दाही ॥१४॥
वदे " पुत्र झाला असे स्वर्गवासी । त्यजा शोक चलेचिना यत्न त्यासी ॥
विवेके श्रुतीशास्त्रपंथा पहा हो । हरीचिंतने पूर्ण धैर्यं रहा हो ॥१५॥
दशरथ अभिधाने जन्मला सूर्यवंशी
नगर तरि अयोध्या पातलो पारधीसी ।
दिनकर गत झाला, स्थीर झालों तडागीं
उचित मज असे कीं राजधर्मप्रसंगी ॥१६॥
गुणी बाण लावोनियां अंधकारी । मृगे लक्षितां पातला ब्रह्मचारी ॥
भरी तोय जेव्हा वदे शब्द झारी । तया नादवेधेचि मी बाण मारी ॥१७॥
स्मरे शंकरा तो पडे शब्द कानी । त्वरे धांवलो सन्निधानी निदानी ॥
तृषाक्रांत मातापिता तोय देणे । वदोनी गिरा सांडिला प्राण तेणे ॥१८॥
त्यानंतरे श्रावणमाततातें । खेदे बहू आठविले सुतातें ॥
संतप्त शोके वचने अनेके । बोलोनि ते लोळति लिप्त पंके ॥१९॥
झाले जसे क्लेश विशेष आम्हां । त्यां पावसी निश्चित दु:खधामा ॥
राया धरी शाप अचूक ऐके । यमालया जासिल पुत्रशोके ॥२०॥
प्राणप्रयाणासि क्षणार्धमात्रे । करुनियां टाकियली स्वगात्रे ॥
त्यांची क्रिया सारुनि सांग राये । म्हणे अहा मी ठकलो अपाये ॥२१॥
तों आठवे कौतुक राजयाला । या शापवेशें मज लाभ झाला ॥
संतान झाल्यावरि शाप बाधी । पाठी पिडा, प्राप्त निधान आधी ॥२२॥
ससैन्य राजा नगरासि आला । समग्र लोकी अभिवंदियेला ॥
त्या आदरे वंदुनियां वसिष्ठा । केली पुजा सत्वर एकनिष्ठा ॥२३॥
सांगे तया वृत्त यथाविधीचे । तो बोलिला " निर्मित हे विधीचे ॥
स्वकर्म तें निश्चित पालटेना । न भोगितां किंचितही सुटेना ॥२४॥
झाला अनर्थ नगरीप्रति आणि देशी
विख्यात नागभुवनी अमरावतीसी ।
हत्यात्रयेंकरुनि दोष विशेष झाले
कोपेंकरुन अमरेंद्र विरुध्द बोले ॥२५॥
शुक्रासि बोधुनि निरोधुनि मेघमाला । स्वर्गाधिपे बहुत कष्टविलें नृपाला ॥
आल्या प्रजा शरण: दाविति खेद राया । सक्रोधारुप मग युध्द निघे कराया ॥२६॥
रथी बैसवी आदरे कैकयीला । असे शुक्र तेथे अती शीघ्र आला ॥
वदे रोधिला मेघ कां सांग माते । न पावें श्रमा शीघ्र जा आश्रमाते ॥२७॥
न मानूनि बोला म्हणे राजयाला । वृथा जल्पसी बोल हे कासयाला ॥
अवेशे तदा राव तो बाण सोडी । बळी शुक्र बाणे क्षणार्धैचि तोडी ॥२८॥
दशरथअंकालागिं हो थोर शुक्रे
करुनि बळ सरोषे भग्न केले स्वचक्रे ।
नृपवधु मग तेथे हस्त योजी प्रितीने
तृणवत तनु केली स्वामिकार्यास तीने ॥२९॥
परम हरुष राया, मानिली प्रीय जाया । अनुकुल तुज चित्ते मागसी ते कराया ॥
नमन करुनि भार्या बोल बोले तथास्तु । समय उचित तेव्हां प्रीय मागेन वस्तु ॥३०॥
परस्परे युध्द अपार केले । न देखिलेही श्रुतही न झाले ॥
पराक्रमी शुक्र प्रसिध्द जाणा । दुजा रवीवंशज वीरराणा ॥३१॥
द्विरदशसमुह जैसा सिंहधाके पळाला । त्यजुनि रण सवेगें शुक्र तैसा पळाला ॥३२॥
वरुनि यश अयोध्याधीश चित्ती विचारी । विकल नगरवासी देशदेशाधिकारी ॥
दुमदुमति दमामा चालिला हो स्वधामा । सुरवर नर तोषे वर्णिती कीर्तिधामा ॥३३॥
दशरथयशवार्ता दिक्पटी चित्र झाली । सकळ सुरसमाजी वर्तिकी कीर्ति नेली ॥
हरुनि सुरपतीते पौरुषे शीघ्र आला । अरुढवुनि विमानी थोअर उत्साह केला ॥३४॥
विशेष बंदीजन कीर्ति गाती । देती आशीर्वाद ऋषी द्विजाती ॥
नेऊनियां तो अमरावतीला । सिंहासनी उत्तम बैसवीला ॥३५॥
बृहस्पति स्वास्ति वदे सुहास्ये । राजा वदे पावन मी त्वदास्ये ॥
नमूनि इंद्रे गुरुवर्य याते । सांगे नसे संतति राजयाते ॥३६॥
" विभांडका आणुनि दीर्घ्य यत्ने । किजेल जै याग महत्प्रयत्ने ॥
होतील तैं पुत्र परोपकारी । चित्ती धरी ज्यां त्रिपुरांतकारी ॥३७॥
बोले गुरु शीघ्र उपाय पां हा । चिंतानले यासि बहूत दाहा ॥
विभांडकांचे मन आंकळेना । येईल कैसा मज हे कळेना ॥३८॥
वदत इंद्र उपाय सुचावला । उदित भाग्य तयासिच फावला ॥
मुनि विभांडक तन्मय जेधवा । हरण शृंगि ऋषीसुत तेधवां ॥३९॥
देवांगना नेउनि चित्त वेधणे । आणूनियां लग्न करुनि बोधणे ॥
येईल तो शोधित पुत्र आपुला । लक्षूनियां होईल पूर्ण बापुला ॥४०॥
सुरगुरुवचनाची अक्षरे कोण वर्णी ? । दशरथ निजनिष्ठे पूर्ण कर्णी अकर्णी ॥
अपरिमित सुवस्त्रे भूषणे रत्नमाळा । अमरपति समपी आदरे हो नृपाळा ॥४१॥
देऊनियां कुंजर आणि वाजी । सुरेंद्र रायाप्रति हो नवाजी ॥
शृंगीनिमित्ये शत अप्सरांला । देऊनि धाडी नृपती गृहाला ॥४२॥
जिंकूनि शुक्र अति अद्भुत जो तपस्वी । झाला नृपाळा जगतांत महायशस्वी ॥
उल्हास थोर नगरींत प्रजाजनांला । वंशी विशेष वरपुत्र अजासि झाला ॥४३॥
संतोषयुक्त गजरें निजराजधानी । शृंगारिली सुवसने बरवी प्रधानी ।
लंघूनिया गगनमंडळ कीर्ति गेली । यानंतरे परम पावन बुध्दि केली ॥४४॥
गेला वसिष्ठसदना नृपराजा भेटी । साष्टांग वंदुनि वदे अति नम्र गोष्टी ॥
आज्ञा शिरी धरुनि शुक्र समीप केला । भक्षावया द्विरद सिंह जस भुकेला ॥४५॥
सत्कीर्ति केवळ मुखें न कदा वदावी
वंचू नयेचि सहसा म्हणे युक्ति दावी ।
झाला प्रसंग जितुका निजवार्तिकांनी
केला असेल तितुका श्रुत सर्व कानी ॥४६॥
विशिष्ट की सूर्यकुळासि आला । वसिष्ठही सद्गुरु पूर्ण ज्याला ॥
जाणोनि इंद्रे बहु मान केला । बृहस्पति तुष्ट विशेष झाला ॥४७॥
झाले प्रसन्न वरि वंशपरंपराही । संयोजिली निकट देउनि अप्सराही ॥
हा सर्वही पदपदार्थ निवेदिला हो । आज्ञा समर्थ अपुली करणे मला हो ॥४८॥
यानंतरे काय उपाय दावा । राजा पुसे निर्णय जी वदावा ॥
बोले ऋषी निश्चय हाचि दीजे । पुत्रेष्टिचा मार्ग अवश्य कीजे ॥४९॥
बोले वसिष्ठ कृतनिश्चय हा पहा हो । वाचस्पतीवचनिर्णयसुप्रवाहो ॥
आणूनि शृंगऋषि लग्न करा विशेषे । येईल शोधित विभांडक पुत्रारोषे ॥५०॥
देखूनियां वधुवरे विभवे प्रशस्ते । संतोषरुप मख योजिल पुत्रहस्ते ॥
देवांगनांसि विनवी नृप नम्रभावे । जावे त्वरे ऋषिवरासह शीघ्र यावे ॥५१॥
नमुनि गुरु वसिष्ठा भावना एकनिष्ठा
धरुनि चपळ जाती राजयाच्या अभीष्ठा ।
त्यजुनि तनुज गुंफे तात गगेसि गेला,
तंव सुरवनितांनी लाघवी खेळ केला ॥५२॥
तळपत चपलांगे अंबरी वीज जैसी
स्मर भरबुनि अंगी शृंगि केला विलासी ।
सुरसरसविचित्रा नाचती स्वर्णगात्रा,
भुलवुनि ऋषिपुत्रा चालती पद्मनेत्रा ॥५३॥
न भरत घटिकाही शृंगि घेऊनि संगे
रिघति पुरअयोध्येमाजि नाट्यें सुधांगे ।
चपल नयनबाणे भेदिती अंतरंगा,
न लगत पळ पाडी व्याध जैसा कुरंगा ॥५४॥
अजतनयवरिष्ठा अंतरी एकनिष्ठा । वदत गुरु वसिष्ठा स्वामिया ब्रह्मनिष्ठा ॥
मज तव वरदाने शृंगि आला विभागा । त्वरित ऋषिविवाहा मंगलारंभ सांगा ॥५५॥
ऋषी शृंगि देवांगना अंतरंगी । विरागी जसा गुंतला कामसंगी ॥
नृपे अप्सरांलागि सन्मान केला । ऋषी शृंगि तो अंगनांचा भुकेला ॥५६॥
ब्रह्मऋषी ऋषिराजसुताते । थापटोनि करि सावध हाते ॥
अष्टदिशा अवलोकुनि पाहे । तों विपरीत दशा गमताहे ॥५७॥
पाप तरीच विभांडकबापा । अंतरलो मज देइल शापा ॥
त्या परिसोनि सुपावन गोष्टी । शृंगि आलिंगुनि तोष वसिष्ठी ॥५८॥
बोलत राजनिधीप्रति जाणा । सत्वर घालुनि धाव निशाणा ॥
सत्कुळिचि वधु रुपस आणा । थोर सुपात्र बरा ऋषिराणा ॥५९॥
आणुनि ज्योतिषि पंडित शास्त्री । लग्नविसी घटितार्थहि गोत्री ॥
लावुनियां ऋषिलागिं हारद्रा । अर्पिति सूत्र कटीं करमुद्रा ॥६०॥
मदगज गजराने शोभती सिंधुराने
क्वचित पुरविहारी धांवती एक राने ।
बहूत सुटति यंत्रे घोषही विप्रमंत्रे
घणघणघण घंटा दीर्घ वाद्ये स्वतंत्रे ॥६१॥
द्विजवरनिगमांचा मंडपी घोष झाला
अतिसमय द्विजी ॐ पुण्यहा शब्द केला ।
धिमिधिमिकि नगारे दुंदुभी नादवाद्ये
परमविधिविधाने दाविती गद्यपद्ये ॥६२॥
गनन भरि निनादे शब्द कोणी न जाणे
चरित जगदिशाचे वर्णिजे येथ कोणे ? ।
अघटित घटणा हे ईश्वरी मूळ माया
त्रिभुवन घटयंत्री लाविलें तें भ्रमाया ॥६४॥
कोण अयोध्यानगरनिवासी । जाळुनि भस्म करीन तयासी ॥
चालतसे पवनाहुनि वेगे । दुश्चित मानस पुत्रवियोगें ॥६५॥
प्रज्वळला वडवानळ जैसा । येत विभांडक सन्निध तैसा ॥
मंगळ घोष पडे निजकर्णी । विस्मितमानस घोष अकर्णी ॥६६॥
पूसतसे पशुपाळजनांला । उत्सव काय पुरीप्रति झाला ॥
शृंगऋषीप्रति आणुनि राजा । लग्न करी जठरार्ति हरा जा ॥६७॥
बोलति लोक विचित्रहि वाटे । देखिलियाविण साच न वाटे ॥
जाऊनि पाहिन जीव जिवाचा । देईन राजनिधीस सुवाचा ॥६८॥
वर्तिक सांगति विप्र गुणांचा । येत असे न कळे कवणाचा ॥
वाटत शेष सहस्त्रफणांचा । भाव गमे अरुणावरुणांचा ॥६९॥
होय विभांडक थोर ऋषेश्वर आमुचिया सदनाप्रति आला ।
दीन दयाकर केवळ शंकर चातक मी घन आपण माला ॥
भाग्य विशेष गमे सहसा गुरुराज वसिष्ठहि साह्य जहाला ।
वानिति भाट अचाट नभी ध्वनि दाशरथी रघुनंदन बोला ॥७०॥
राजनिधि विनवी गुरुलागुनि येत विभांडक सन्मुख जावे ।
येरु अवश्य वरोनि निघे अति सत्वर तो ऋषिसंनिध पावे ॥
राय करी अभिनंदन इष्ट वसिष्ठ विभांडक भेटति भावे ।
येउनि वंदिति पाय वधूवर सत्वर शोक लयाप्रति पावे ॥७१॥
शृंगि म्हणे मज चाळविले गगनीहूनि येऊनियां वनितांनी ।
लाघव लावुनि संगित गाउनि रुपहि दावुनि लागति कानी ॥
चाल सवेग खुणाविति बोलति मानस मोहिति पूर्ण निदानी ।
लग्नमिसें भ्रममोहपिसे न सुटेचि असे सुचिले सकळांनी ॥७२॥
काय करु । वद तात सुनिश्चित होत नसे मज वाटत कांही ।
हांसतसे ऋषिराज विभांडक जे लिहिले न चुकेचि कदाही ॥
कर्मकलाप फलाशाविवर्जित टाकिं अहंकृति सर्वहि पाही ।
स्थीर करी मन पूर्ण सनातन तो जगजीवन चिंतुनि राही ॥७३॥
यावरि तो ऋषिराज विभांडक चित्त सुचित्त करी महायोगी ।
लागतसे चरणी नृप दुश्चित इच्छित जेंवि सदौषध रोगी ॥
व्याकुळ मीन जसा जलहीन तसा अति दीन मि सांग उपाया ।
थोर तपोनिधि केवळ तूं विधि काय विलंब ? वदे ऋषिराया ॥७४॥
ब्रह्मऋषीस विभांडक बोलत तूं सकलांस वरिष्ठ विवेकी ।
मानिती शासन इंद्र नरेंद्रहि, सोम, सूर्य धरणीवर जो कीं ॥
राजनिधी अतिविव्हलमानस संततिवीण अभीष्ट नसे की ।
सार विचार करुनि अनुज्ञा वेद विधीवरि उत्तमश्लोकी ॥७५॥
मानुनि तोष विशेष वसिष्ठहि बोलत, धन्य ऋषी तव वाणी ।
थोर तपोबल निर्मल निश्चल पुण्य पवित्रहि शास्त्रपुराणी ॥
शृंगि ऋषेश्वर याज्ञिक मुख्य करुनि किजे बहु यज्ञशिराणी ।
आवडले मज उत्तम ही तुज याहुनि आन मनांत न आणी ॥७६॥
" आज्ञा प्रमाण करणे मज एकनिष्ठा । बोले विभांडक ऋषी हरुषें वसिष्ठा ॥
आज्ञापिलें निकट सत्वर पुत्रराया । " तूं योग्य यज्ञविषयी सहसा कराया ॥७७॥
यानंतरे शृंगि ’ तथास्तु बोले । आज्ञा शिरी वंदुनि पूर्ण डोले ॥
सांगे नृपा " सर्व पदार्थ आधी । आणूनियां मंडपकुंड साधी ॥७८॥
तो वीर पंचानन सूर्यवंशी । यामार्धमात्रेंचि पदार्थराशी ॥
करुनियां मूळ ऋषीस धाडी । ज्यांचे भये काळ मनी धडाडी ॥७९॥
प्रधान पाचारुनियां सवेगे । कर्तव्य तें राजनिधान सांगे ॥
" बोलविजे सर्व ऋषेश्वरांते । जे प्रीयपात्रें परमेश्वरांते ॥८०॥
वसिष्ठादि सप्तै ऋषी मुख्य जाणा । अगस्ती तथा व्यास दुर्वास आणा ॥
पराशर्य कौंडिण्य मैत्रेय यातें। भृंगु वत्स शांडिल्य उद्दालाकाते ॥८१॥
शुका वाल्मिका नारदा वामदेवा । ऋषी अंगिरा गर्गचार्या सदैवा ॥
समस्तांसि आणूनियां यज्ञ कीजे ॥ प्रतिष्ठानरुपे पुजा भान दीजे ॥८२॥
सकल मुनिवरांते आदरें सुप्रभावें
नमन दशरथें हो दीर्घदंडे स्वभावे ।
करुनि मज दथा हे शीघ्र यज्ञासि यावे.
वरद परमपोष्यालागिं देऊनि जावे ॥८३॥
दिगमंडळीच्या नृपतीस पत्रे । यथाक्रमे लेहुनियां विचित्रे ॥
पाचारिजे आदरयुक्त राजे । महत्व जेणे बहुधा विराजे ॥८४॥
अत्यादरे दशरथे वरराजयांते । केले प्रणम्य मख सांग करावयाते ॥
यावें त्वरें सकल घेउनि आप्तलोकां । होईल उत्सव निका नयनीं विलोका ॥८५॥
जाती त्वरे सेवक पत्र हाती । घेऊनि, ते रायमुनी पहाती ॥
स्वसंपदेसंनिध सिध्द होती । मानूनियां तोष समस्त येती ॥८६॥
मृदंगवाद्ये सह सर्व सेना । अपूर्ण कांही सहसा दिसेना ॥
उद्दाम अश्वादि रथी पदाती । परस्परे कौतुक दाविताती ॥८७॥
शाटीदंडकमंडलादिक करी व्याघ्राजिने शोभले
ज्यांची तीव्र तपे प्रदीप्त अमुपे चंद्रार्क तेजे भले ।
शापानुग्रहाआग्रही निजबळे जे सृष्टिकर्ते ऋषी
आले सर्व समीप राजनगरा यागार्थ तो मानसी ॥८८॥
सामुग्री कुशदर्भ शुध्द समिधा पात्रे चरुची बरी,
कुंडे मंडपवेदिका मुनिजनां ऐकोनि राजा मनी
तोषे बोलत हेतु पूर्ण घडला पुत्रोत्सवा कामनी ॥८९॥
अष्टौ प्रधानांप्रति भूप बोले । समीप सर्वै ऋषिराज आले ॥
अत्यादरे सन्मुख शीघ्र जावे । घेऊनि यावे विभवे पुजावे ॥९०॥
मंत्री वसिष्ठा गुरु भूप ससैन्य गेला । साष्टांग वंदुनि मुनीप्रति बोलियेला ॥
आदित्यवंश आमुचा कृतकृत्य झाला । तीर्थे व्रते तपसमुच्चय आज आला ॥९१॥
मी धन्य धन्य ! मज दैन्य नसे त्रिवाचा.
मी लाधलों वर सुनिश्चित माधवाचा ।
सवै तथास्तु वदती कृतनिश्चयाने.
पूजूनि रम्य दिधली सकळांसि याने ॥९२॥
तैसेचि राय मग पूजियले प्रधानी । आनंदरुप निघती मग राजधानी ॥
गेले नृपाळा सदना गुरुराजयाच्या । येती फणीद्र रविही वचने जयांच्या ॥९३॥
पृथक पृथक सर्वा रम्य विश्रामधामे
करुनि विधिविधाने स्वर्गतुल्ये अरामे ।
भरुनि सकळ पूर्णा वस्तुजाता विशेषे
नृपतिमुनिसमूहा तोषवीले अशेषे ॥९४॥
सकल मुनिजनांच्य संमते श्रीवसिष्ठे । समय उचित वाक्यें बोलिली जे विशिष्ठे ॥
दशरथ नृपतीने संततीच्या अभावे । सुरगुरुवचने हा मांडिला यज्ञ भावे ॥९५॥
ऋषीशृंगहस्तेचि संपूर्ण कीजे । अनुज्ञा कृपायुक्त होऊनि दीजे ॥
समस्तांस ते मानले ते प्रसंगी । करा शृंगिहस्ते मुनीविप्रसंगी ॥९६॥
यज्ञक्रिया वेदविधिप्रमाणे । विभांडकाचा सुत सर्व जाणे ॥
प्रयोजितां मंडपकुंड तेणे । संतोषले शिष्ट विशिष्ट जेणे ॥९७॥
मध्ये सडे कुंकुमकेशरांचे । विलासती पुंज धरामरांचे ॥
यज्ञार्थ साह्यार्थ पदार्थजाती । अपूर्ण ना बोलति हे द्विजाती ॥९८॥
ऋषिशृंगे तेव्हा जनकपद माथां प्रणामिलें ।
मने वाचा काया गणपति तथा शंभु नमिले ॥
वसिष्ठांचे भाळी पद नमुनि साष्टांग सकळां।
ऋषीवर्या सांगे करुनि करुणा याजनकळा ॥९९॥
ऋषी सर्वै वक्त्रे वदति तुज सामर्थ्य दिधले ।
करावी ना चिंता दशरथकुळी होइल भले ॥
प्रसादे या राया बहुत गमला उत्सव मनी ।
आरंभी यज्ञातें सकळमुनिपादाब्ज नमुनी ॥१००॥
शतश्लोकी ऐसा दृढतर अभिप्राय घडला ।
जसा राहोते हो दुरि करुनि भानू उघडला ॥
निजानंदे तेव्हा दिनकरकुळी रंग भरला ।
कथा श्रीरामाची प्रमित प्रथमाध्याय सरला ॥१०१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-12-16T21:01:04.8730000