पंचीकरण

रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला.


श्रीगुरुभ्यो नम: ॥ सद्गुरु म्हणती शिष्य शिरोमणि । सावध होऊनी अंत:करणीं । देहचतुष्ट्य मांडणी । ऐके श्रवणीं सादर. ॥१॥
शुद्ध परम्ब्रह्म परिपूर्ण । सत्य ज्ञानानंदघन । तेथें अहंब्रह्म हें स्फुरण । उठिलें स्मरण धरोनि. ॥२॥
तोचि ईश्वर ते शक्ति । जे जगदंबा मूलप्रकृति । जिचेनि अव्यक्त आलें । अमूर्त मूर्ती विस्तारली. ॥३॥
तीपासाव गुणक्षोभिणी । कन्या जन्मली सौंदर्यखाणी । पुत्र प्रसवली प्रतापतरणी । तत्क्षणीं तिन्ही गुण ॥४॥
ब्रह्मा रजोगुणी सृष्टिकर्ता । विष्णु सत्वगुणें प्रतिपाळिता । रुद्र तमोगुणें संहर्ता । त्रिगुण तत्वता जाणिजे. ॥५॥
यापासूनि जाहली उत्पन्न, । महापंचभूतें जाणावा प्रथम, । स्थूळ देह निर्माण । करावया पूर्ण निर्मिलीं. ॥६॥
आकाश, वायू आणि तेज, । आप, पृथ्वि हें तूं बूज । या पांचांची पंचवीस सहज । तेही तूज सांगेन. ॥७॥
काम, क्रोध, शोक, मोह, भय, । हा आकाशाचा अंश नि:संशय । हें सत्वगुणाचें कार्य । असें आचार्य बोलती. ॥८॥
धावन, वळण, आकुंचन । प्रसरण आणि निरोधन । हे वायूचे पांचही गूण । तत्वता निपूण जाणती. ॥९॥
क्षुधा, तृषा, निद्रा, आलस्य, । मैथुन पांचवें परियस, । हे तेजाचे गुण विशेष । सांगणें तदंश म्हणवूनि. ॥१०॥
लाळ, मूत्र आणि शोणित, । मज्जा पांचवें रेत, । हे आपाचे गुण निश्चित । वेदार्थसंमत यदथी. ॥११॥
अस्थि, नाडी, त्वचा, रोम, । मांस, पृथ्वि हें पंचम । यांचा करूनि कर्दम । स्थूळ उत्तम निर्मिलें. ॥१२॥
एवं तु या पंचविसांचा । साक्षी वेगळा साचा । मळ न लागे तुज याचा । सत्य त्रिवाचा जाणपां. ॥१३॥
आतां या स्थूळ देहातें । लिंगदेह जें वागवितें । तें सांगों तुज निरुतें । सावध चितें ऐकणें. ॥१४॥
पंचवीस कळा पंचवीस भूतें । तेथेंही असती समस्तें । सूक्ष्मरूपें निभ्रांतें । सांगों तूतें सविस्तर. ॥१५॥
अंत:करण आणि मन, । बुद्धि, चित्त, अहंकार पूर्ण, । हें आकाशपंचक जाण । अनुभवें खूण जाणवे. ॥१६॥
व्यान, समान, उदान, । प्राण आणि अपान, । हें वायूपंचक स्थान । यासि अनुमान असेना. ॥१७॥
श्रोत्र, त्वचा, नयन, । जिव्हा आणि प्राण, । पांच ज्ञानेंद्रियें आपण । तेज पूर्ण जाणिजे. ॥१८॥
वाचा, पाणी, पाद, । शिस्न आणि गुद, । हे आपाचे भेद विशद जाणावे. ॥१९॥
शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, । हें पंचविषय विविध । पृथ्वीचे गुण प्रसिद्ध । ऐसें प्रबुद्ध जाणती. ॥२०॥
या पंचविषय कळा । यांचा साक्षी तूं निराळा । तुझी तुज न कळे लीळा । तुज निर्मळा मळ कैंचा ? ॥२१॥
हें नेणावया कारण । मुख्य अज्ञान आवरण । पडिलें तेणेंकरून । विस्मरण पूर्ण पूर्वत्वाचें. ॥२२॥
तंतू म्हणे मी झालों पट । मृत्तिका ह्मणे मी झालें घट । स्वस्वरूप नेणोनि स्पष्ट । अहा कटकट वावुगी. ॥२३॥
स्वस्वरूपाचें विस्मरण, । अन्यथा प्रपंच ज्ञान, । हें तिसरें देह कारण । ऐकलक्षण तयाचें; ॥२४॥
स्थूळ सूक्ष्माचें मूळ । अज्ञान कारण केवळ, । नाना योगी प्रबळ । घेरूनि चंचळ फिरवीत; ॥२५॥
जे जे देह वरीत । तेथेंचि तादास्य धरीत, । मी जीव हा भाव करीत । भरणा भरीत सुखदु:खाचा. ॥२६॥
या तिहीं देहांचा साक्षी । अलिप्त जो सर्व पक्षीं । उत्पत्ति, स्थिति, लय लक्षी । जयासि सुदक्षीं तयीं प्रणिजे. ॥२७॥
तत्वमसि विवेक । जेणें विवळ होय सम्यक । महाकारणदेह देख.। पुण्यश्लोक बोलती. ॥२८॥
ज्याचिया सत्ते विश्व चळे, । ज्याचिया सत्ते सर्व कळेम । दशदिशा त्रैलोक्य उजळे, । उघडती डोले आत्मदर्शनीं. ॥२९॥
हें पंचीकृत पंचीकरण । चहूं देहांचें विवरण, । याचा साक्षी तूं आपण । नित्य निर्गुण स्वसंवेद्य. ॥३०॥
या चहूं देहातीत । तूं नि:संग निर्विशेष अलिप्त । शुद्ध, बुद्ध, नित्य, मुक्त । सत्य, शाश्वत परब्रह्म. ॥३१॥
दिनरजनी सायंप्रात: । जैसा नेणोनि भास्वत् । रश्मीयोगें मृगजळ भासत । होत जात तें नेणें. ॥३२॥
तैसें तुजवरि हें भान । मिथ्या विवर्त उपादान । तूं चिन्मत्रैक चैतन्यघन । कैंचें स्वप्न जागृति ? ॥३३॥
वर्णव्यक्ति नामरूपातीत । अज, अव्यय, सदोदित । तूं स्वयंप्रकाशघन संतत । मूर्तिमंत परब्रह्म तूं. ॥३४॥
सहजीं सहज पूर्णरंग । निजानंद अभंग । निष्कळंक नि:संग । द्वैताचा पांग तुज नाहीं ॥३५॥

संपूर्ण ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP