स्फुट पदें ४६ ते ५०

रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला.


४६.
हें मज कळलें हो, कळलें हो । तरीच मन हें वळलें हो ॥ध्रु०॥
इतर साधनें तैशीं । छाया चित्रतरूची जैशी ॥हें मज०॥२॥
वाचे नाचे नाम । तो निजरंगें आत्माराम ॥ हें मज कळलें हो, कळलें हो । तरीच मन हें वळलें हो ॥३॥

४७.
अझुनी जागी नव्हेसि कंठ शोकला वो माय । कां केला अव्हेर किंवा झालें तुजला काय ॥ध्रु०॥
श्रीरंगें माझे माते । तान्हें मी एकुलतें । पुर्यष्टकपाळण्यांत मजला घातलें कां ह्मतें । सहजसमाधीशेजे निजलिस स्वस्थ चित्तें । उठिं देईं स्तनपान क्षुधा लागली वो मातें ॥अझुनी०॥१॥
देहअहंकार हा वैरी । असुरी गुणमयि याची जाया । यापासुनी जाले रजतम । त्यांनीं विसंचिली मम काया । पाळण्यांतुनी काढुनि नेईं सत्वर मज निजठायां । जागी हो जननिये विलंब न करीं पुरवीं थाया ॥अझुनी०॥२॥
धांवा ऐकुनि श्रवणीं जागी होउनि श्रीगुरुमाता । निजानंदें रंगुनि मनिंची हरिली ममता चिंता । वोसंगा घेउनियां परमामृतपयपानें आतां । नित्य तृप्त मज केलें तेणें झाली सर्वही समता । अझुनी जागी नव्हेसि कंठ शोकला वो माय । कां केला अव्हेर किंवा झालें तुजला काय ॥३॥

४८.
तरीच सार्थक झालें आल्या मानवजन्माचें । ब्रह्मार्पणबुद्धि फल पावसि केल्या कर्माचें ॥ध्रु०॥
अक्षयि सुख पाहिजे तरी हरिभजानेंच लागावें । सच्छस्त्रसंगमीं संतसमागमिं अखंड जागावें । विषवत मारक जाणुनियां विषयांतें त्यागावें । अहंममतेतें निरसुनि शाश्वत निजसुख भोगावें ॥तरीच०॥१॥
विहिताचरणें हरिगुरुस्मरणें मानवाची काया । हेळामात्रें तरणें हरिची दुस्तरतर माया । विषयांचें सुख तैसें जैसी चित्रतरूची छाया । क्षणभंगुर जड दृश्य विकारी हें जाइल विलया ॥तरीच०॥२॥
पढतमूर्ख ते म्हणती माझा गोड संसार । विषमिश्रित शर्करा रसने सेवितां मधुर । विषयांचें सुख तैसें ऐसें जाणति ते चतुर । निजरंगें रंगले सज्जन माझें माहेर । तरीच सार्थक झालें आल्या मानवजन्माचें । ब्रह्मार्पणबुद्धि फल पावसि केल्या कर्माचें ॥३॥

४९.
सदा हरिभजनीं सद्भाव पांडवांचा । स्तविति महिमा कृष्णतांडवाचा ॥ कृष्णध्यानीं मनी कृष्णमय चिंतनीं । श्रीकृष्णध्यानीं मनीं कृष्णमय चिंतनीं । श्रीकृष्णस्मरणीं अखंड वाचा ॥१॥
सत्य संभाषणीं कर्म ब्रह्मार्पणीं । धर्म चूडामणी विहित कायी । भीम अर्जुन नकुळ सहदेव सहनशीळ ॥ द्रौपदीसह समूळ विमळ चर्या ॥२॥
राज्यपदभ्रष्ट वरि दुष्ट दुर्योधनें । बहु समयीं पाडिलें त्या अपायीं । रक्षिता हरि तयां काय कारन भया । न चळती निश्चया सदय हृदयीं ॥३॥
लक्ष ब्राह्मण वनीं इच्छिलें ते मनीं । मिष्टान्न भोजनीं नित्य तृप्ती । हा नव्हे नवलाव भक्त तेथें देव । देव तेथें सर्व भुक्तिमुक्ती ॥४॥
दुष्ट दानव दमुनि साधु संरक्षणें । धर्म संस्थापणें याचसाठीं । निर्गुणी सगुण हे अवतार धरुनियां । धांवतो श्रीहरी भक्तभेटी ॥५॥
ऐक्य गोडॆए गुळा कर्पुरा परिमळा । निवडितां होय कुंठीत वाचा । निजरंग निर्द्वंद्व नेणती मतिमंद । सहज पूर्णानंद भेद कैंचा ॥६॥

५०.
रमाकांत अनंत मी संतवेषें । असें ज्यां कळे प्रिय मला ते विशेषें । ब्रह्म विद ते स्वयें ब्रह्मकृत निश्चयें । हरि म्हणे सकळ जग हें मदंशें ॥१॥
नित्य नैमित्यकें तें मदर्पण निकें । करुनि निष्काम धामासि आलें । दृश्य दृष्टी गार रसनेसि तें नीर । सेवितां नित्य मद्रूप झालें ॥२॥
नगसहित महि बुडो मस्तकीं नभ पडो । प्राचिनें तनु झडो याच देहीं । तरि हरीभजनिं रत डंडळीना चित्त । आत्मलाभें तृप्त  सर्वदाही ॥३॥
रविबिंब स्वप्निंही न देखे अंधतम । त्या तमारी म्हणति लोक सारे । संत शाश्वत पदीं रंगला निजसुखें । म्हणवेल मनुजसम तो कसा रे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP